Asmita Satkar

Tragedy Drama


5.0  

Asmita Satkar

Tragedy Drama


अनुरागी

अनुरागी

27 mins 1.2K 27 mins 1.2K

“राणीसा, राणासा ने याद किया है आपको!!!”


हे ऐकताच महालातल्या दर्पणात एकवार पाहुन तिने घुंघट ओढलं, भरजरी पोशाख, घुंघट, दागिने सांभाळत चालताना तिची पुरती दमछाक व्हायची, पण राणाजींचा सांगावा आलाय म्हटल्यावर ती होईल तितक्या चपळाईन पुढे झाली, महालात तिच्या काकणांची, पैंजणांची एक लय झंकारत गेली.

“प्रणाम राणासा”

“पधारीये राणीसा “म्हणत राणाजींनी तिला मंचकावर अलगद बसवलं.

ती घुंघटमधून राणाजींना न्याहळत होती... लग्न होऊन अवघे काही दिवस लोटले होते, ती नुकतीच ह्या महालात राणीसा म्हणून आली होती. परका मुलुख, वेगळी भाषा, वेगळा वेश, इथल्या चालीरिती सगळं काही वेगळं... मागच्या काही दिवसांत इथे जुळवून घेताना तिची अन् राणासांची भेट तर दूरच तिने अजून त्यांना पाहिलंदेखील नव्हतं.


“आप ये घुंघट हटाकर भी हमे देख सकती हो” म्हणत राणाजी गडगडाटी हसले.

आपली चोरी पकडली गेली म्हणून ती जरा खजील झाली, राणाजींनी जवळ जात तिचं घुंघट वर केलं, तशी लाजून तिनं नजर खाली केली.

बराच वेळ राणाजींशी बोलल्यानंतर तिच्या मनावरचं दडपण जरा कमी झालं, तिच्या महालाकडे परतताना तिचा वेग मंदावला, ती गडावरची प्रत्येक गोष्ट न्याहाळत पुढे निघाली.


कुंभलगड मुधोळच्या वाड्यापेक्षा बराच भव्य, स्वराज्यातल्या गडांसारखा उंच नाही, परंतु भौगिलिक वैशिष्ट्य असणारा... गडाच्या चारही बाजूंना टेकड्यांची अशी रचना होती की इथे गड असावा हे पाहणाऱ्याच्या ध्यानातही येणार नाही. प्रत्येकाचे वेगळे महाल, वेगळी दालनं. खाबांवर कोरीव काम, संगमरवराच्या पायऱ्या, प्रत्येक दालनाचे उंच झरोके, पण द्वार मात्र अगदीच लहान, सुरक्षेच्या दृष्टीने अश्या प्रकारची रचना केलेली होती. 


तिकडे मुधोळला मात्र अगदीच वेगळं, चौसोपी वाडा, चौक, वृंदावन, बैठकीचे सोपे, माजघर, हिशोबाची खोली... सगळ्याची किवाडं मोठी, अंगणात - परसात सगळीच झाडं, त्यांच्या फुलांचा दरवळ, मुळात सगळीकडे वावरण्याची मुभा. इथे तसं नव्हतं, ह्या दालनातून त्या दालनात जातानाही दासींचा ताफा, घुंघट...शिवाय कुठेही मोकळेपणानं वावरता यायच नाही, मुधोळच्या मानानं हिरवळही तितकी नव्हती, इथे काहीच तर नव्हतं मुधोळसारखं, हा विचार येताच ती हळवी झाली.

ती मुधोळच्या सरदारांची कन्या रेवती, इथे कुभंलगडच्या राणांची राणीसा म्हणून दूर राजस्थानात दाखल झाली होती.


राणाजी दक्षिणेतून एका मोहिमेवरून परतताना, मुधोळला मुक्कामी थांबले, तिथेच पहिल्यांदा पाहिलं त्यांनी रेवतीला, रेवती नावाप्रमाणेच सुंदर अगदी नक्षत्रासारखीच,

गोरा वर्ण, घारे डोळे, उंचपुरी रेवती राणाजींना पहिल्याच नजरेत भावली... राणाजींचा विसाव्याचा मुक्काम लांबला, राणाजी राज्यात परतले ते रेवतीला राणीसा बनवूनच.

नऊवार नेसणारी रेवा अचानक घुंघट ओढून परराज्यात आली तीच जबाबदाऱ्यांचं ओझं घेऊन. ह्यात सुखवणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे तिचं भाषेचं ज्ञान,परमुलखातल्या सगळ्या भाषा बोलता येत नसल्या तरी समजण्याइतपत तिचं शिक्षण झालं होतं, कारण काळ बदलत होता, इंग्रजांचे पाय भारतात पसरत होते, राजांनंतर शंभुराजांच्या हाती स्वराज्याची सुत्रं आली होती. सरदारपुत्रांच्या बरोबरीनं सरदारकन्याही शिक्षण, युद्धकलेच प्रशिक्षण घेत होत्या, बदलत्या वातावरणात रेवाही शिकत होती आणि आता परमुलखात हेच तिच्या कामी येणार होतं!


विचारचक्रात मग्न रेवती महालात पोहोचली तेव्हा भवानीमंडपात संध्याआरती सुरू झाली होती. तिच्या महालाच्या मोठ्या झरोक्यातून भवानीमंडप अगदी सहज दिसायचा, आज भवानीमंडपातली आरती ऐकताना... तिचं मन मुधोळला पोहोचलं, वाड्यातल्या शिवालयात!!

तिला लख्ख आठवत होता तो दिवस, आज शंकरप्पांऐवजी त्यांचा मुलगा सिद्धरमण पूजा सांगायला आला होता, तो पहिला श्रावणी सोमवार होता, सिद्धरमण जसजसं सांगत होता तसतसं ती करत होती, सिद्धरमणच्या धीरगंभीर आवाजानं रेवतीच्या मनात बरंच काही हललं, एखाद्या तपस्वीसारखी चर्या, डोळ्याच्या डोहात फक्त भक्ती, राजबिंड्या रूपातला तो सात्विक अंश तिने आजतागायत कोणत्याच पुरूषात पाहिला नव्हता. सिद्धरमणवर मोहित झाली रेवती, पहिल्याच सोमवारी तिनं तिचा वर निवडला ....सिद्धरमण!!


पुढे बरेच दिवस तोच वाड्यात यायचा पुजेला, तेव्हा त्याला सगळी पुजेची सामग्री रेवतीच आणून द्यायची, वाड्यात सिद्धरमणचा गंभीर आवाज घुमायचा अन् रेवाच्या मनात सिद्धरमणच्या नावाचा घोष व्हायचा... पण सिद्धरमणने तिच्याकडे पाहिलंदेखील नव्हतं. शेवटी कर्नाटकातल्या कर्मठ ब्राम्हण मुलाने मराठा साम्राज्याच्या सरदारकन्येकडे पाहणं म्हणजेच गुन्हा, तो आपलं स्थान ओळखून होता... कित्येकदा रेवतीच्या नाजुक निमुळत्या पावलांकडे पाहून त्याला मोह व्हायचा तिला अगदी निरखून पाहण्याचा, मात्र पुढच्याच क्षणी तो विश्वेश्वराचं नामस्मरण करत मनाचं घोडं आवरायचा.


रेवतीच्या नजरेतुन त्याची ही घालमेल कधीच सुटायची नाही, तिला जाणवायचा मंत्रोच्चारांचा वाढलेला वेग अन् त्या बरोबर त्याच्या स्पंदनांचाही... कित्येकदातर तिला वाटायचं आपणच विचारावं का ह्याला? पण कितीही वाटलं तरी घोरपड्यांची लेक ती, असली आगळीक तिला शोभणार नव्हती, शिवाय ह्याचे परिणामही बरे होणार नव्हते... बुद्धीला पटणारं सगळं मनाला पटतंच असं नाही, रेवतीही मन आणि बुद्धीच्या ह्या व्दंव्दात अडकली होती, योग्य-अयोग्य काय हेच तिला समजत नव्हतं. मनात हे असं विचारांचं काहुर माजलं की त्या दिवशी रेवाची तलवार बेफाम चालायची, घोडेही नुसते वाऱ्याच्या वेगाने दामटायची ती.


काळाबरोबर रेवतीच्या मनात सिद्धरमणचं स्थान अजुन पक्कं होतं गेलं, पण त्याच्याकडून प्रेमळतर सोडा साधा ओळखीचा कटाक्षही तिच्या वाट्याला आला नव्हता. तरीही रोज ती मनोभावे विश्वेश्वराकडे मागायची त्याला. अखेर एक दिवस विश्वेश्वरालाच दया आली, वेगानं दामटलेला घोडा घेऊन नदीजवळच्या जंगलात रेवा घुसली खरी पण आज परतीचा मार्ग तिला दिसेना. तसं जंगल तिला नवं नव्हतं पण तरीही ती वाट चुकली... जवळच नदीचा आवाज येत होता मात्र प्रयत्त्न करूनही तिला नदी सापडत नव्हती.

शेवटी ती शांतपणे उभी राहून चित्त एकाग्र करू लागली, तिला ठाऊक होतं आता ध्यानाशिवाय पर्याय नाही, मन एकाग्र केलं तरंच परतीचा मार्ग सापडेल. तिला मंदमंद ध्वनी ऐकू येऊ लागले... कसल्याश्या मंत्रांचे... तिची पावलं आपोआप त्या ध्वनीकडे वळाली... काही क्षणातच त्या आवाजाच्या उगमाशी... नदीच्या काठी ती पोहोचली.

सिद्धरमण नदीपात्रात उभा होता, संध्या करत... नेहमीच्याच धीरगंभीर स्वरात मंत्रोच्चार चालू होते, शुभ्र सोवळ्यात त्याचा मूळचा गोरा वर्ण अजूनच उठुन दिसत होता, एखाद्या राजासारखं कमावलेलं शरीर, राजबिंड रूप निरखुन पाहत होती रेवती... पूजेच्यावेळी चंदनाचा टिळा लावलेलं रूंद कपाळ, मिटलेल्या डोळ्यांनी बसलेल्या सिद्धरमणला न्याहाळताना ती नेहमीच हरवून जायची... पण आज त्याहीपेक्षा कितीतरी देखणा दिसत होता तो!!!


संध्या आटोपून सिद्धरमण वळाला पण समोर रेवतीला पाहून चपापला. क्षणभर तिच्या चेहऱ्यावरून त्याची दृष्टी हटेना, परंतु मनाला लगेच आवर घालत त्याने नजर जमिनीकडे झुकवली.

“आम्हाला मार्ग सापडत नाहीये” रेवती सिद्धरमणजवळ जात म्हणाली.

“कोणता?” सिद्धरमणने जमिनीवरची नजर हलू न देता विचारलं.

“परतीचा... म्हणजे... वाड्याकडे परतण्याचा मार्ग” रेवती त्याला निरखत पुटपुटली.

“या माझ्यामागे” म्हणून तो झपझप पुढे चालू लागला, तशी रेवतीने त्याची वाट अडवली.

“उशीर होतोय, एव्हाना वाड्यात शोधाशोध सुरू झाली असेल, तुम्ही कृपया इथून चलावे” समजावणीच्या स्वरात तो बोलला.

“नाही, आज आम्ही आपल्याशी बोलल्याशिवाय इथून हलणार नाही”

“आपणास जे काही बोलावयाचे असेल ते उद्या वाड्यावर बोला, तूर्तास इथुन निघावे, आम्ही विनंती करतो आपणास”

“आम्हाला लग्न करायचे आहे आपल्याशी” ती निग्रहाने बोलली.

“माफ करा रेवती पण आपण सरदारकन्या आहात, हे वागणे तुमच्या कुळास शोभेलसे नाही, शिवाय हे धर्माविरूद्ध आहे” तो थेट तिच्या डोळ्यात पाहत उत्तरला.

“का धर्माविरूद्ध आहे?? आणि ह्यात कुळाचा प्रश्न येतोच कुठे? विश्वेश्वराच्या साक्षीने वरलंय मी तुम्हाला, लग्न करेन ते तुमच्याशीच आणि आम्हाला ठाऊक आहे आपणही आमच्यावर तितकेच प्रेम करता”

“नाही, आमचे तुमच्यावर प्रेम नाही, तुम्ही कधीच हे विसरू नका की आम्ही केवळ आपल्या शिवालयाच्या पुरोहितांचे पुत्र आहोत, आपल्यात नातेसंबंध शक्य नाहीत, आता आपण कृपया इथून निघुयात, अधिक समय इथे थांबणे योग्य नाही.”

“हेच सगळं आमच्या नजरेला नजर देऊन बोला सिद्धरमण”

हे ऐकून सिद्धरमण तिथेच थबकला, “आपण हट्ट सोडावा रेवती, ह्या प्रेमास काही भवितव्य नाही”

“म्हणजे तुमचेही प्रेम आहे तर??”

“काही प्रश्न अनुत्तरित ठेवावे, अनर्थ टळतो”तो हताशपणे बोलत होता

“काही अनर्थ वगैरे नाही, आत्तातर कुठे अर्थ आलाय नात्याला, आम्ही योग्यवेळ येताच आबांशी बोलतो” ती उत्साहाने, आनंदाने बोलत होती... मनोमन ती विवाहवेदीवर जाऊन पोहोचलीसुद्धा.

परंतु सिद्धरमण मात्र धास्तावला कारण रेवतीशी झालेल्या ह्या संवादावरून तिच्या निग्रहाची, मनाच्या तयारीची त्याला कल्पना आली होती, तिचं गणोजीरावांशी बोलणं होण्याआधीच काहीतरी करायला हवं हे त्यानं मनाशी पक्क केलं!


रेवती आनंदाने वेडीच व्हायची बाकी होती परंतु तिने तो उत्साह लपवत वाड्यात प्रवेश केला कारण आज ती योग्य वेळ नव्हती.

वाड्यात आल्याआल्या इतका वेळ कुठे होतातपासून सुरू झालेला प्रश्नांचा तोफखाना, उद्यापासून घोडेस्वारी बंद ह्या निर्णयाप्रत पोहचला... परंतु रेवाला मात्र कशाचंच दु:ख वाटलं नाही, कारण तिच्या मनाचे घोडे फार दूरवर दौडत निघाले होते!!!

दुसऱ्यादिवशी सिद्धरमण आल्यावर पहिल्यांदा त्यांच्यात संवाद घडला,

पुजेनंतर सिद्धरमणने लाल वस्रात गुंडाळलेला एक ग्रंथ तिला दिला आणि म्हटला “आयुष्यात कधी दुबळेपणा जाणवला, कधी पोकळी जाणवली किंवा मी तुमच्याजवळ असावं अस वाटलं तर हे वस्र उघडून एकदा हा ग्रंथ वाचा, सगळ्या प्रश्नांचं निवारण करून तुम्हाला बळ देईल हा ग्रंथ”

“छे छे, आता आम्हास गरज नाही पडणार ह्याची, कारण आम्ही उद्याच आबांशी बोलणार आहोत, त्यानंतर आपण कायम आमच्यासोबत असाल, तेव्हा ह्याची गरज नाही.” म्हणत तिने ग्रंथ त्याच्याकडे दिला.

“आम्ही म्हणतोय म्हणून ठेवा जवळ, विधीलिखित टाळता येत नसलं तरी सहन करता यावं यासाठी देतोय” असं म्हणून तो ग्रंथ पुन्हा रेवतीच्या हातात देत सिद्धरमण निघुन गेला, तिच्या प्रतिक्रियेची वाटही न बघता.


रेवाला प्रश्न पडला असा काय हा, धड ना स्वत:च्या प्रेमाची कबुली, ना धड आमचं प्रेम स्वीकारलं, कसलं विधीलिखित?? ते काही नाही आता आम्ही उद्याच पुजेनंतर आबांसोबत बोलतो, म्हणजे हे असं दुराव्याचं बोलणंच नको.

ग्रंथपेटीच्या तळाशी टाकून रेवा उद्या नक्की कसा विषय काढावा ह्याचा विचार करत बसली. आबांसमोर आत्तापर्यंत केलेला प्रत्येक हट्ट पुरवला गेलाय, परंतु लग्नाची गोष्ट तशी मोठीच, पण आबा नक्की होकार देतील ह्या विश्वासाने ती निर्धास्त होऊन सकाळ होण्याची वाट पाहू लागली.


रेवानं ठेवणीतलं तिच्या आवडीचं हिरव्याकाठाचं पिवळं पातळ नेसलं, पुन्हा पुन्हा दर्पणात पाहात कधी खोपा ठीक केला तर कधी कुंकु... आज वेगळाच उत्साह होता तिच्या सगळ्या हालचालींमध्ये. मोगरा, केवडा सगळी सुगंधीच फुलं तिनं वेचली पुजेकरीता, रेवाच्या आईनं सरस्वतीबाईंनी तिला विचारलंदेखील “आज काही विशेष आहे का??” पण तिनं नुसतंच हसून “नाही” अशी मान डोलवली.


शिवालयात पोहोचल्यावर मात्र तिच्या चेहऱ्यावरचं हसूच मावळलं, आज पुजेला शंकरप्पा आले होते, त्यांना प्रणाम करून ती पुजेला बसली खरी पण चित्त थाऱ्यावर नव्हतं, सिद्धरमण का आला नसेल? शंकरप्पांना तरी कस विचारायचं? आज विश्वेश्वराला अश्रुंचा अभिषेक होत होता. पुजा आटोपेपर्यंत तिनं स्वत:ला सावरलं.

धीर एकवटून शंकरप्पांना विचारलं “आज सिद्धरमण आले नाहीत?”

“अरेच्चा त्याने तुम्हाला कळवले नाही का??? तसं तो परवाच गणोजीरावांशी बोलून गेलाय, मला वाटले आपणासही सांगितले असेलंच!”

“कशाबद्दल बोलताय आपण?”रेवतीने हुंदका दाबत शंकरप्पाना विचारले.

“तो कालच पुजेनंतर काशीला गेलाय, म्हणाला विश्वेश्वराचं दर्शन घेऊन, पुढे ऋषिकेशला स्वामी नारायणांकडे शिष्य म्हणून जाण्याचा मानस आहे, गणोजीरावांची परवानगी अन् आशीर्वाद घेऊनच निघाला काल तो!”

हे ऐकून रेवतीच्या पायाखालची जमीन सरकली, काल दिलेल्या ग्रंथाचं कोडं तिला उलगडलं, तिला ठाऊक होतं सिद्धरमण मुधोळला परतण्याच्या शक्यता आता जवळपास नव्हत्याच... आपण आबांसोबत बोलणार म्हणूनच सिद्धरमण अशाप्रकारे निरोप न घेता गेले.


ती शंकरप्पाना प्रणाम करून निघाली,

झालेलं दु:ख, काळजावरची जखम उघडउघड दाखवता येणार नव्हती. त्यादिवशी ती बंद कवाडाआड बराच काळ रडत होती, तिनं त्या दिवसानंतर पुजेला जाणं बंद केलं... जणू ती रूसली होती विश्वेश्वरावर! तिचा स्वभाव तसा लहरी होता म्हणून कोणीच तिला विचारलं नाही अचानक पुजा बंद का केलीस वगैरे, तसं आईने एक-दोनदा विचारलं पण तिनं वेळ निभावून नेली. शिवालयातला घंटारव ऐकला, शंकरप्पांचे मंत्रोच्चार कानी पडले की सिद्धरमणच्या आठवणी तीव्र व्हायच्या... मग तिच्या पठणाचा, सुभाषितांचा आवाज वाड्यात घुमायचा, डोळ्याची पापणी लवण्याचाही अवकाश न घेता तिची तलवार चालायची, बेफाम घोडा उधळत ती त्या नदीकिनारी जायची... तिला मावळतीच्या छटांमध्ये पाठमोरा सिद्धरमण दिसायचा, संध्या करणारा, तेजस्वी, तिचा सिद्धरमण... मग ती अजूनच सैरभैर व्हायची.

असंच एक दिवस वेगानं तलवार चालवणारी रेवती राणासांच्या दृष्टीस पडली... अंजिरी रंगाच्या नऊवार पातळातली रेवा राणासांच्या मनात घर करून गेली... रेवाला तर ठाऊकही नव्हतं तिचं भविष्य काय वळण घेतंय, ती फक्त वेगानं तलवार चालवतं होती, सिद्धरमणच्या आठवणींवर!!!

                       

विसाव्याला थांबलेल्या राणाजींनी गणोजीरावांजवळ रेवतीशी विवाहाचा प्रस्ताव ठेवला, नकाराचा प्रश्नच नव्हता, शेवटी राणी होण्याचं भाग्य सगळ्यांनाच लाभतं असं नाही. त्यात रेवती घोडनवरी, कारण लाडाकोडातली घोरपड्यांची एकुलती एक लेक अशीच कशी कुणाला द्यायची म्हणून वय उलटलं तरी तिचं लग्न जमवलंदेखील नव्हतं. त्यामुळे राणाजींचा प्रस्ताव गणेजीरावांनी तात्काळ मान्य केला. खलिते धाडले, मांडव पडला अन् सरदार घोरपड्यांची रेवती कुंभलगडची राणीसा झाली, तो काळ मुलीला पसंती विचारण्याचा नव्हताच मुळी, त्यामुळे रेवाच्या होकार-नकाराचा मुद्दाच नव्हता. रेवतीनं राणासांना पाहिलंदेखील नव्हतं, मनातलं सिद्धरमणचं स्थान न पाहिलेल्या व्यक्तीला द्यावं लागणार ह्यानेच ती कोलमडली होती. त्यात इथल्या चालीरिती, वेश सगळंच निराळं... तरीही ती आल्या प्रसंगाला सामोरी गेली, हसरा मुखवटा घालून. तिला घुंघटमध्ये कधीकधी गुदमरल्यासारखं व्हायचं, गळ्यातले भलेमोठाले हार घालताना तिला हमखास तिच्या टपोऱ्या बोरमाळेची आठवण व्हायची... नाजुकसा बकुळहार, पोहेहार कुठे अन् हे मोठे कुंदन, तेलियो, कण्ठी कुठे... पणआता इथे जुळवून घेणं क्रमप्राप्त होतं. 


मुधोळच्या वाड्यात तिच्या पठणाचे स्वर घुमायचे. इथे महालात तिच्या छोट्याश्या हालचालीनंही झंकार उठायचे... काकणांचे, पैंजणाचे!!! तिनं ठरवलं आता मनापासुन ह्या नव्या बदलांना स्वीकारायचं, राणाजींशी बोलल्यानंतर उर्वरित आयुष्य सुसह्य असेल एवढी तिची खात्री पटली होती, नियतीच्या खेळात किमान जोडीदार समजुतदार, कर्तबगार होता ह्या गोष्टी लक्षात घेऊन ती सज्ज झाली नव्या बदलांना स्वीकारायला, राणाजींना स्वाीकारायला.


भवानीमंडपातली संध्याआरती संपली होती. ती संपतासंपता रेवाचा विश्वेश्वरावरचा रूसवाही निवळला होता.

रेवतीनं पुढल्याच दिवशी राणासांना विनवून गडावर शिवालयाचं काम करवून घ्यायला सुरवात केली, हळूहळू इथल्या परंपरा, भोजन, कुंभलगड... आणि राणा भानुप्रतापला ती समजून घेऊ लागली. आताशा तिला मारवाडी भाषाही बोलता यायला लागली होती. परंतु ह्या सगळ्यात तिला एकच गोष्ट खटकायची ती म्हणजे राणाजींच्या मातोश्री फारश्या बाहेर येत नसत. तिची अन् त्यांची नीटशी भेटही झाली नव्हती. राजपरिवारातील इतर सदस्यांशीही तिचा काहीच संबंध आला नव्हता. तिने तसं राणाजींना बोलूनही दाखवलं, मात्र ते म्हणाले “तुम्ही परमुलखातून आलात त्यामुळे राजपरिवार जरा नाराज आहे. त्यांची नाराजी निवळेल हळूहळू, तु्म्ही बस शिवालयाच्या कामात जातीनं लक्ष घाला, बाकी चिंता करू नका.” राणाजींच्या ह्या बोलण्यानंतर तिनं लक्ष शिवालयाच्या निर्माणात वळवलं, तिचा जवळजवळ संपूर्ण दिवस त्यातच जाऊ लागला.


शिवालयाचं कामही जोमात चाललं होतं, एकसंध संगमरवरी दगडांवर कोरीवकाम, प्रत्येक खांबावरची नक्षी वेगळी, असंख्य पुराणकथा कोरलेले शेकडो खांब तिच्या विश्वेश्वराकरिता उभारले जात होते, वास्तुकलेचे उत्तमोत्तम आविष्कार तिच्या नजरेसमोर घडत होते, पण जसंजसं शिवालय पूर्णत्वास येत होतं... तसंतसं मनाच्या गाभाऱ्यात काहीतरी घडत होतं, भवानी मंडपातल्या अखंड धुनीसमोर हात जोडताना... काहीतरी जुनं प्रकाशमान व्हायचं... उगा सैरभैर व्हायची रेवती, इतकी की एक दिवस भवानी मंडपातून घुंघट न घेताच ती महालाकडे परतली, दासींनी तिला आवाज देऊनही ती भानावर आली नाही. गडावरचे सगळेच राणीसांचं रूप पाहून हबकले, जणू तेजःपुंज तारका जमिनीवरून चालावी इतकं सुंदर रूप होतं ते... पण प्रतिष्ठेच्या, नियमांविरूद्ध वागणं होतं... ती भानावरच नव्हती, नक्की कसली पोकळी, कसला दुबळेपणा जाणवतोय हेच तिला उमगत नव्हतं.


राणासांच्या कानावर त्यांच्या ह्या वागण्याची खबर जाताच ते तडक रेवतीच्या महाली पोहोचले, मोकळे केस, लालबुंद डोळे, अस्ताव्यस्त अवस्थेत जमिनीवर बसलेली रेवती पाहून त्यांना काही कळेना.

रेवतीला मंचकावर बसवून त्यांनी तिला पाणी दिले, ती जरा भानावर आली.

“रेवा, क्या हुआ है?? आप जाणो हो ना, यहां आप घुंघटबिना पग भी बाहर नही रख सकते. तो आज आपसे इतनी भूल कैसे हुयी??” खरंतर राणा खूपच मवाळ शब्दात बोलले.

राणाजींनी चुकीबद्दल न ओरडता एवढ्या प्रेमानं तिला विचारलं की ती त्यांना बिलगुन रडायलाच लागली,

स्फुंदत स्फुंदत “मला मुधोळची याद येते” एवढंच म्हणाली.

“बस इतनीसी बात पे राणीसा की ये हालत हो गई, हम आज ही संदेसा भेज देते है, बस ऐसी भूल दोहराना नही” म्हणत त्यांनी रेवाचे अश्रु पुसले.

खरंतर रेवाची चुक खूप मोठी होती मात्र राणाजींना तिची स्थिती समजत होती. डोक्यावर पदर घेणं आणि घुंघट घेणं ह्यातला फरक ते जाणून होते...


तिच्या डोळ्यातल्या अंगारात पहिल्याच दिवशी त्यांना हळवेपणाची किनार दिसली होती... म्हणूनच रेवाची ही चुक त्यांनी पोटात घेतली. रेवतीला मात्र कळेनासं झालं आज शिवालय पाहून सिद्धरमणची आठवण इतकी का तीव्र झाली... आता बराचसा काळ लोटला होता... तिच्या मनातलं मुधोळ धुसर झालं होतं... मग आज अचानक भवानी मंडपातून शिवालयाकडे पाहताना काय झालं...


शिवालयाचं काम वेगानं चाललं होतं. शिवरात्रीच्या दिवशी मोठा यज्ञ करून मंदिरात शिवलिंगाची स्थापना करायचा मानस होता,

त्याकरिता काशी, हरिव्दार, केदारनाथवरून ऋषीमुनी येणार होते. कित्येक वर्षांनंतर गडावर मोठा सोहळा होता पण रेवा मात्र मोक्याच्याच क्षणी दुबळी पडली. इतक्या मेहनतीनं विश्वेश्वराचं राऊळ उभारलं जात होतं पण ती सैरभैर होती. महाशिवरात्र आता काही दिवसांवर येऊन ठेपली होती. गडावर साधुसंताचं येणं सुरू झालं, तयारीचा वेग वाढला... मंडप... सनई-चौघडे... तोरणं... रांगोळ्या सर्वत्र मंगलमय वातावरण... मात्र रेवतीला काहीच आनंद नव्हता... ती कुठेतरी हरवली होती... अचानक एका रात्री तिच्या स्वप्नात मुधोळचं शिवालयं आलं... सिद्धरमणने तिला ग्रंथ दिला तोच प्रसंग स्वप्नात दिसला तशी ती दचकून जागी झाली. दिव्याची ज्योत वाढवत तिने पेटीच्या तळाशी असलेला, लाल वस्रात गुंडाळलेला ग्रंथ काढला.

सुहृद नावाचं हस्तलिखित होतं ते, सिद्धरमण ने लिहलेलं.

दोन क्षण हृदयाशी कवटाळून तिनं ते वाचायला घेतलं.

“प्रिय रेवती,

हो अगदी बरोबर वाचताय आपण, तुम्ही आम्हाला प्रियच आहात.

तुम्हाला ठाऊकही नाही अगदी तेव्हापासून प्रिय आहात, तुम्ही आम्हाला सोमवारच्या पुजेला पाहिलं...पण त्याही आधी तुम्हाला पाहिलं होत आम्ही...

वाड्यात महारूद्राच्या वेळी... तेव्हापासून तुमच्या प्रेमात आहोत आम्ही... हो प्रेमातच आहोत.

वाटलंच नव्हतं कधी अशाप्रकारे आपण संवाद साधू... परंतु काही गोष्टी विधीलिखिताप्रमाणेच घडतात.

तुम्ही पहिल्या श्रावणी सोमवारी अंजिरी रंगाचं पातळ नेसलं होतं... कुणीही प्रेमात पडावं इतक्या सुंदर दिसत होतात तुम्ही... तुमच्या नाजुकशा मनगटांवरच्या लाल बांगड्यांची किनकिन अजुनही कानात साठवलीये आम्ही.

तुमच्या शरीराला येणारा चंदन-केवड्याचा गंध... सतत दरवळतो आमच्या श्वासात.

तुम्ही घोडा घेऊन बेफाम वेगानं जायचात तेव्हा वाटायचं... वारा होऊन तुमची सोबत करावी.

न्हायल्यावर केस मोकळे सोडून यायचात पुजेला... वाटायचं ढग दाटून आलेत गाभाऱ्यात.

आरक्त चर्या, नयन असे अनुरागी,

पुजितो तुला मी नित्य हे मनमोही!! 

तुमचं रूप, निग्रही बाणा, सगळचं मोहित करणारं आहे,

परंतु,

रेवती आम्ही ब्राम्हणपुत्र आहोत, आपण क्षत्रिय, ह्या प्रेमास आपल्या किंवा आमच्याही घरातून मान्यता मिळणे केवळ अशक्य, म्हणूनच आम्ही आपल्यासमोर कधी व्यक्त नाही झालो... पण आपण भारी जिद्दी... नकळत आज हे सत्य वदवून घेतलेत आमच्याकडून... तुमचा आबासाहेबांकडे जाण्याचा मानस ऐकून मात्र नाईलाजाने आम्ही काही निर्णय घेतला आहे.

तुम्ही गणोजीरावांशी बोलण्याअगोदरच आम्ही मुधोळ सोडलेले असेल, आम्हाला ठाऊक आहे आपण सहजासहजी दुबळ्या पडणार नाही... पण एक दिवस हे हस्तलिखित आपणास वाचावेच लागेल... ह्यामधे आपणावर रचलेल्या काही काव्यरचना आहेत, संकटसमयी कामी येतील असे चतुर्वेदातील श्लोक आहेत, शिवमहात्म्य आहे, आमची अनेक वर्षांपासूनची पुण्याई, साधना ह्यात बांधून देतोय, योग्यसमयी पठण करा, विश्वेश्वर मार्ग दाखवेल...

आम्ही खुद्द येऊ तुम्हाला विवंचनेतून बाहेर काढायला.

तुम्हाला प्रश्न पडलाय, की कसली विवंचना येणार आहे? कशातून मार्ग दाखवेल विश्वेश्वर?

रेवती, प्रत्येकाच्या जन्माचे एक इप्सित असते, तसेच तुमच्याही जीवनाचे आहे.

तुमचा जन्म विश्वेश्वराच्या, मातृभुमीच्या सेवेकरिता झाला आहे, तेव्हा विश्वेश्वरावरचा रूसवा तेवढा लवकर घालवावा.

अंजिरी रंगाचे पातळ नेसून बाहेर गेलात तर सतर्क रहा, दूरदेशीचा प्रवासी तुम्हाला घेऊन जाणार... हे विधीलिखित आम्ही टाळू शकत नाही... कारण तिथेच तुमचे सेवाकार्य घडणे योजले आहे.

हे वाचून मात्र रेवा चपापली.

कारण राणासांनी तिला पाहिलं तेव्हा ती अंजिरी पातळच नेसली होती, तसं राणासांनीच तिला सांगितलं होतं.

विश्वेश्वराची सेवा तर घडतंच होती, पण मातृभुमीची सेवा म्हणजे? ती पुढे वाचू लागली.

धीर सुटेल तेव्हा नामस्मरण करा, येत्या शिवरात्रीस कार्य सिद्धीला न्यावे लागेल.

परमुलखात आहात तेव्हा निसटण्याचे मार्ग नसतील, तेव्हा आई भवानीला शरण जा, अग्नि देवतेला शरण जा!!

तुम्हाला विचार पडला असेल हे सगळे आम्हास कसे ठाऊक?

तीही विश्वेश्वराची आमच्यावरची कृपा, भविष्यकालीन संकेत थोडेबहुत समजतात, ह्या कार्यात आमच्या भावनांमुळे अडथळा येऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतलाय.

तुमचे प्रेम चिरंतन जपून ठेऊ आम्ही, तेच ऊर्जा देत राहील आम्हाला.

रेवती आपण क्षत्रियधर्म कदापि सोडू नका, शस्र संहारासोबत संरक्षणही देते तेव्हा सतत सोबत बाळगा.

आता निरोप घेतो.

सदैव तुमचाच,

सिद्धरमण


रेवा वाचुन पेचात पडली, अनेक प्रश्नांनी तिच डोकं भंडावलं, अश्रू थांबत नव्हते. नक्की कसली परीक्षा होती ही?

तिनं हस्तलिखिताचं पान उलटलं,

“पाळले तू, मी न कधी मोडले

सखे हे मर्यादांचे सोवळे,

पालटले ऋतु कित्येक

सरले सारे प्रेमसोहळे,

पण न मोडले कधी 

हे मर्यादांचे सोवळे ...!!!”


हे वाचून तिचा बांध फुटला, ज्याच्या श्वासांना आपला गंध येतो... त्याची साधी सोबतही न मिळावी हे कसले विधीलिखित?

रात्र सरतासरता ते हस्तलिखित रेवानं वाचून काढलं, अनेक सुक्त, स्तोत्रांद्वारे तिला मार्ग दाखवला होता.

आतापर्यंत गडाचं निरिक्षण करणाऱ्या रेवाला आता इथल्या प्रत्येक माणसाचंही निरिक्षण करायचं होतं,

तिचं स्वराज्य... तिचे शंभुराजे धोक्यात होते... कुंभलगडच्या राणासांचाही जीव धोक्यात होता.

तिने पेटीतला खंजीर बाहेर काढला, कमरेला खोचला. महाशिवरात्रीला केवळ सात दिवस शिल्लक होते... तत्पूर्वी तिला गडावरचा गनीम शोधायचा होता... कारस्थानाची पाळंमुळं खणायची होती.

आज तिनं मनोमन विश्वेश्वरासह सिद्धरमणलाही आळवलं... तिला माहित होतं तो नक्की मार्ग दाखवणार.

                                 

रेवती आज कसलीच वर्दी न देता राणाजींच्या महाली आली, येताना ती प्रत्येक सैनिकाचा आवाज टिपत होती, तिच्या तीक्ष्ण कानांनी अचूक हेरले भाषेच्या लहेजातले बदल... तिला अचानक आठवलं असाच एक वेगळा लहेजा तिनं ऐकलाय...

पण नक्की कुठे हाच विचार करत ती महालात शिरली, तसे मंत्री शिवप्रसाद आणि राणाजी चपापले. परंतु लगेच सावरत त्यांनी शिवप्रसादजींना जाण्याची आज्ञा करत राणीसांचं स्वागत केलं.

“पधारीये राणीसा, आज कुछ संदेसा दिये बिनाही महलमे आ गयी आप?”

“अच्छा... राणाजींना भेटायला आता आम्ही परवानगी घ्यायची तर” रेवा लटक्या रागात बोलली.

“ना ना राणीसा, बैठिये... वैसे मुधोल से गणोजीराव और बाकी घरवाले पधार रहे है”

“जी संदेसा तो आया है”

“आपके मामासां हंबीररावजी भी आ रहे है ना ???”

“जी हां”

हे ऐकुन भानुप्रतापच्या डोळ्यात आलेली चमक रेवतीनं हेरली. तिला जरा धक्का बसला, कारण भानुप्रतापवर तिचा विश्वास होता.

पण तिनं चेहऱ्यावरचे भाव जराही न बदलता संभाषण पुढे चालू ठेवलं, अचानक तिला जाणवलं हाच तो वेगळा लहेजा... हाच तर लहेजा आठवत होतो आपण...

म्हणजे आपल्या समोरची व्यक्ती राणासा नाहीयेत?? की ऐकण्यात गल्लत होतीये??

“बहुरूपियां ऐसो जाल बिछाए,

काच को भी कोहिनूर बतलाए,

सिरत उसकी खोटी, सुरत जरा भोली

तुम कान लगाकर सुनना उसकी बोली...”


तिला लख्ख आठवल्या रात्री वाचलेल्या ओळी...

जुजबी चर्चा करून ती राणासांच्या महालातून निघाली तीच मुधोळच्या माणसांना, हंबीरमामांना सावध करायला.

उघडउघड खलिता धाडणं केवळ अशक्य होतं... तेव्हा तिनं एक शक्कल लढवली,

“चंद्रमौळी घरास माझ्या रक्षितो विश्वेश्वर

लवकर येणे करावे, धीर धरवत नाही”


इतक्याच ओळीचा खलिता तिने धाडला.


तिला ठाऊक होतं मामांना नक्कीच खलिता दिव्यावर धरल्यावर सर्व स्पष्ट होईल. आता तोपर्यंत तिला खात्री करायची होती, नक्की राणा भानुप्रताप म्हणून कोण वावरतंय.

तिच्या हालचालींना वेग आला होता...

गडावर आलेल्या साधुसंतांकडून आशिर्वाद घेण्याचे निमित्त करून ती महालाबाहेर पडू लागली... अन् हळूहळू सर्व परिस्थिती तिच्या ध्यानात आली, खरंतर गड नजरकैदेत होता... सर्वत्र वेशांतर केलेली औरंगजेबाची माणसं होती... गडावर दहशतीचं वातावरणं होतं.

पण अजुनही राणासा कोण आहेत हे तिला शोधता आलं नव्हतं... ती रोज सुहृद वाचत होती, प्रश्नांची उत्तर शोधत होती...

एव्हाना अपेक्षित खलिता मात्र आला, हंबीरमामांना मोहिमेस जायचे असल्याने ते वाटेतूनच स्वराज्यात परतले. आता केवळ मुधोळची माणसं येणार होती.

खलिता वाचून राणाजींचे बदललेले हावभाव पाहून रेवा समजुन चुकली, हाच तो गनीम...

पण हा नक्की कोण आहे हे शोधणं गरजेचं होतं. अवघे तीन दिवस हातात होते.

मुधोळची माणसं पहाटेपर्यंत पोहोचणार होती... तत्पुर्वी नक्की काय कट शिजतोय हे शोधलंच पाहिजे हा निश्चय करून रेवानं राजमातांच्या महाली वर्दी धाडली.

रेवती गडावर आल्यापासून ती राजमातोश्रींना केवळ एकदाच भेटली होती. ती परमुलखातील असल्याने तिच्यावर त्यांची नाराजी होती शिवाय प्रकृतीच्या कारणास्तव त्या सहसा कुणालाच भेटत नाहीत, असं रेवतीला सांगण्यात आलं होतं. तिला तेव्हाही ते कारण विशेष पटलं नव्हतं मात्र शिवालयाच्या उत्साहात तिने त्याकडे दुर्लक्ष केलं.

परंतु तिला आता त्याच ह्या संकटातून सोडवतील ह्याची पुरेपूर खात्री होती, किमान त्या मार्गतरी दाखवतील... रेवती राजमातोश्रींच्या महाली पोहोचली.

“प्रणाम माॅंसा”

“आईये रेवतीबाईसा”

“आपसे कुछ पुछना था माॅंसा”

“जानु हुं घने अंधेरे में राणीसां के पुछने आई है... राणासांकी हकीकत... बस आपने बहोत देर लगा दी ये पुछनें में”

“मतलब?”

“नजरकैद में है किला, हमारे राणासा भी, और वक्त कम हैं”

“आप ठीक से बताए माॅंसा? कौन है ये सब?? और राणा भानुप्रताप कहां है??”

“भानुप्रताप कैद मे है, तयखानें मे...”

“तो यें कौन है उनकी जगह??”

“यें औरंगजेब के बेटे किताबुद्दीन है, भेस बदलकर यहां पे आए है” 

राजमातांनी दक्षिणेवरून येताना कसं आपल्याच काही फितुरांमुळे राणाजी पकडले जाऊन किताबुद्दीन त्यांच्याऐवजी कुंभलगडला पोहोचला हे रेवाला सांगितलं. राणासा आणि किताबुद्दीनमध्ये बरचंसं साम्य असल्याकारणानं प्रजा बदललेल्या राणासांना ओळखू शकली नव्हती. तसंच चाणाक्ष किताबुद्दीनला अनेक भाषांचं ज्ञान होतं, तो उत्त्तमरित्या अनेक भाषा बोलू शकत होता त्यामुळे इथे गडावर कुणालाच त्याची भाषा वेगळी वाटली नाही. त्याने राणा भानुप्रताप असल्याचे नाटक अगदीच हुबेहुब वठवले आणि संपूर्ण किल्ला ताब्यात घेतला. मंत्रिमंडळ आणि खुद्द राजमाता नजरकैदेत होत्या. थोडक्यात मुधोळचा मुक्काम, रेवतीसोबत विवाह ही किताबुद्दीनची पहिली चाल होती. भौगोलिकदृष्टया सहजासहजी नजरेस न पडणारा कुंभलगड किताबुद्दीनला जिंकायचा होता मात्र त्याहीपेक्षा मोठं काम होतं शंभुराजांना नामोहरम करण्याचं.


रेवतीच्या मातोश्री सरस्वतीबाई हंबीरराव मोहित्यांच्या मानलेल्या भगिनी, त्यामुळे घोरपडे-मोहित्यांचे संबंध घरोब्याचे होते,

तसेच रेवतीवर हंबीरमामांचा विशेष जीव, तेव्हा त्यांना कुंभलगडी येण्याचं निमंत्रण दिल्यावर ते येणं टाळणार नाहीत हे किताबुद्दीन जाणून होता. तो गडावर कोणत्या उत्सवाचं नियोजन करावं ह्या विचारात असताना रेवतीनं शिवालय बांधण्याची गळ घालून त्याला आयती संधीच दिली होती. हंबीररावांना कैद केलं तर शंभुराजांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोपा होईल,शंभुराजे हंबीररावाच्या सुटकेकरीता खुद्द येतील आणि तेव्हाच आपण त्यांना कैद करू, अशी योजना होती किताबुद्दीनची.


खरंतर मुधोळच्या मुक्कामीच तो हल्ला करणार होता मात्र तेव्हा हंबीरमामा लग्नाला येऊ शकले नाहीत अन् त्याचा डाव फसला. तेव्हा त्यानं राजमातांसमोर तहाचा प्रस्ताव ठेवला. भानुप्रतापांना कैद केल्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी तह करण्याची तयारी राजमातांनी दाखवली. ह्या योजनेत राजमातांनी सहकार्य केले तर भानुप्रतापला सोडण्याचे किताबुद्दीनने कबुल केले. राजमातांना हे मंजुर नव्हते परंतु बगावत केल्यास भानुप्रतापला देहदंडाची शिक्षा होईल असे किताबुद्दीनने धमकावल्यावर मात्र त्यांचा नाईलाज झाला. प्राण गेले तरी कुणासमोर न झुकणाऱ्या राजपुतानी संस्कारांवर माया आडवी आली अन् राजमाता झुकल्या.


हे सगळं घडताना रेवा तिथेच गडावर होती तरीही तिला ह्या सगळ्याची कुणकुणदेखील लागली नाही. हे ऐकून रेवाला सगळे संदर्भ उलगडत गेले. अचानक भानुप्रतापचं मुधोळलं येणं, लग्नं, राजपरिवारातील कोणाचंही रेवाला कमी भेटणं. रेवतीला समजलं युद्धनिती शिकणं आणि प्रत्यक्षात उतरवणं ह्यात जमीन-अस्मानाचा फरक असतो.


तिनं हंबीरमामांवरचं संकट तर टाळल होतं पण आता भानुप्रतापला सोडवण्याची जबाबदारीही तिनं शिरावर पेलली.

परंतु हे सगळं ती एकटी कशी निभावणार होती?

“माॅंसा आप चिंता कोणी करो, आपके राणासांको हम कैद से बाहर लेकरही आएंगे... अब चलते है, खयाल रखिए, प्रणाम!”

राजमातांनी तिला आशिर्वाद दिला, आता त्यांनाही थोडीफार आशा वाटत होती.

मुधोळवरून सगळे गडावर पोहचले... राणाजींना भेटून सगळे थेट रेवतीच्या महाली आले. रेवानं थोडक्यात आबासाहेबांना सगळी हकीकत सांगितली. गणोजीराव गडावर तसे तयारीनिशीच आले होते. साधुसंतांच्या वेशात काही मावळे गडावर दाखल होते तर अजून मावळ्यांची वेशांतर केलेली फौज घेऊन खुद्द हंबीरमामा गडावर येणार होते.


रेवतीनं आता सुहृदची आवर्तनं सुरू केली कारण गनीम सापडला तरी त्याला हरवणं तस कठीण होतं, दिवस सरतासरता गडावर ऋषीकेशवरून स्वामी नारायण त्यांच्या शिष्यगणांसह आल्याची खबर रेवतीच्या महाली आली. हे ऐकताच रेवतीला अतिशय आनंद झाला. शेवटी सिद्धरमणच्या विरहातून सुरू झालेलं कार्य त्याच्या येण्यानचं सिद्धीला जाणार होतं. रेवती तात्काळ स्वामींच्या दर्शनाला गेली.

“प्रणाम स्वामीजी”

“शुंभ भवतु, शुंभ भवतु!”

स्वामींशी महाशिवरात्रीच्या नियोजनाची चर्चा करताना,

रेवतीची नजर सिद्धरमणचा शोध घेत होती, अखेरीस तो दिसला... तशी ती त्याच्यासमोर नतमस्तक झाली.

“कल्याणमस्तु” सिद्धरमणने तिला आशिर्वाद दिला.

“केवळ दोन दिवस आहेत, मात्र मार्ग दिसत नाही”

“चिंता नसावी, नारायण स्वामी त्याकरिता तर आले आहेत, तुम्ही विश्वेश्वरावर श्रद्धा ठेवा.”

“परंतु...”

“आता किंतु मनात ठेवू नका, धरणीच्या गर्भातलं गुपित सुखरूप बाहेर येणार आहे, तुम्ही निश्चिंत रहा.”

“ठीक, आपण म्हणत असाल तर किंतु ठेवत नाही.”

महाशिवरात्रीच्या पुजेत केवळ किताबुद्दीन, रेवती आणि नारायण स्वामी भक्तगणांसह गाभाऱ्यात असतील अशी योजना करून पुजेच्या तयारीस प्रारंभ झाला. रेवतीने नारायण स्वामी व इतरांना पुन्हा प्रणाम केला आणि महालाकडे चालू लागली.

किताबुद्दीन मात्र हंबीरमामाच्या न येण्यानं चवताळला होता, त्यानं ठरवलं पुजा संपन्न होताच रेवतीसह मुधोळच्या माणसांना कैद करायचं.

“हमे किसी भी किमतपर वो हंबीरराव और संभा यहां चाहिए, और उस भानुप्रताप को खत्म कर दो... उनकी अम्मी को भी!” त्वेषानं लालबुंद किताबुद्दीन त्याच्या विश्वासु शिवप्रसादला सूचना करत होता.

“लेकिन जहापनाह हमे ये काम पुजा के समयही करना होगा उससे पहले हम इसे अंजाम नही दे सकते. उस वक्त सब बेखबर रहेंगे, अभी तो किलेपर काफिरोंका आना शुरू है, एक बार पुजा शुरू हो जाए तो काम को अंजाम देना आसान होगा”

“ठीक है, सब सैनिकों को आगाह कर दो, अब नजरकैद नही... कैद होगी..!”

“जी हुजुर” किताबुद्दीनला सलाम करत शिवप्रसाद महालातून बाहेर पडला.


इकडे रेवतीला ठाऊक होतं की कितीबुद्दीन कुणालाच सहजासहजी सोडणार नव्हता. तिच्या विचारांचं चक्र आता वेगानं धावायला लागलं... किताबुद्दीनला संपवण्याच्या योजनेनं तिच्या मनात आकार घ्यायला सुरवात केली... आता केवळ भानुप्रतापची सुटका करणं गरजेचं होतं. त्यासाठी गणोजीरावांनी योजना तयार करून मावळ्यांना तशा सूचना अतिशय गुप्ततेनं दिल्या.


वेशांतर केलेले मावळे ह्याच कामगिरीवर गडाची पाहणी करत होते. भानुप्रतापला कैदेतून सोडवण्याचे मार्ग निर्माण करण्यास सुरवात झाली होती. साधुच्या वेशातले मावळे हळूहळू कुंभलगडच्या सैनिकी वेशात वावरू लागले त्यामुळे तळघरातल्या कैदखान्यात पोहचणं थोडं सुकर होणार होतं.


रेवतीच्या महालातून मंत्रोच्चाराचे स्वर गडावर घुमू लागले. यज्ञाच्या काही विधी ह्या केवळ नारायण स्वामी, त्यांचे शिष्य व राणासा-राणीसांच्या उपस्थितीत होतील, असा सांगावा महालात धाडण्यात आला. रेवाला समजुन चुकले आता कार्य सिद्धीला जाणार.


तळघरातल्या तुरूंगातून भानुप्रतापला सोडवून त्यांच्या जागी सैनिकाला झोपवण्यात आले. गनिमी काव्याचा पुरेपूर वापर करून, शत्रूच्या पहारेकऱ्यांना भुलवुन, प्रसंगी मारून, शिवरात्रीचा दिवस उजाडण्यापूर्वी शत्रुला खबरही लागू न देता मावळ्यांनी कामगिरी फत्ते केली. तसा निरोपही रेवती व नारायण स्वामी, सिद्धरमणपर्यंत पोहोचवण्यात आला. ह्या सगळ्यांपासून बेखबर किताबुद्दीन महालात निद्रिस्त होता.


ब्राह्ममुहूर्तावर किताबुद्दीनला शिकस्त देण्याचे कार्य शिवालयात सुरू झाले. रेवती किताबुद्दीनसह शिवालयात आली. लालजर्द पेहरावातली, जडजवाहिरांनी सजलेली रेवती आज नववधूप्रमाणे दिसत होती. ती मनोमन विश्वेश्वराला “आता केवळ बळ दे लढण्याचं“ इतकंच विनवत होती. तर किताबुद्दीन ह्याच शिवालयात रेवतीला कैद करण्याचा मानस ठेऊन शस्रासह शिवालयात आला होता.


यज्ञास आरंभ झाला, विश्वेश्वराची प्राणप्रतिष्ठा होऊन पंचनद्यांच्या पाण्यानं, दुग्धाने अभिषेक सुरू झाला, धूप-दीप दरवळू लागले. नारायण स्वामी धीरगंभीर आवाजात रूद्राष्टक म्हणत होते, 

“नमामीश मीशान निर्वाणरूपं।

विभु व्यापकं ब्रम्हवेद स्वरूपमं।। ओम नम: शिवाय।

निजं निर्गुणं निर्विकल्पमं निराहं।

चिदाकाशमाकाशवासं भजे हं ।।ओम नम:शिवाय।

निराकारमोंकारमुलं तुरीयं। 

गीराग्यान गोतीतमीशं गिरिशं।।” ओम नम:शिवाय।


प्रत्येक आहुतीनंतर सिद्धरमण किताबुद्दीनला अभिमंत्रित जल आचमनास देत होता. त्या जलाचा परिणाम हळूहळू दिसायला लागताच नारायण स्वामींनी सिद्धरमणला राणासा व राणीसा ह्यांच्यासह भवानी मंडपातील अखंड धुनीतील अग्नी घेऊन येण्याची सूचना केली.


तिकडे भवानी मंडपात पुरोहितांच्या वेशात खुद्द हंबीरमामा आणि राणा भानुप्रताप बसले होते. किताबुद्दीनने भवानी मंडपात प्रवेश करताच सिद्धरमणने सैनिकांना बाहेर थांबवून भवानीमंडपाचे व्दार लावले.

“आईये राणासा... ना ना... शहजादे किताबुद्दीन...पधारीये.”

हे ऐकताच अर्धवट गुंगीतील किताबुद्दीन बरळला “कौन? कौन?”

“हमे पहचाना नहीं शहजादे? हम राणा भानुप्रताप... और ये है हंबीरमामासा, जिन्हे आप कैद करना चाहते थे.”

राणाने हंबीररावांचं नाव घेताच किताबुद्दीननं अंगरख्यामधुन शस्त्र बाहेर काढलं, अर्धवट गुंगीतही त्वेषानं त्यांच्यावर चालून गेला. तेव्हा रेवतीनं चपळाईनं पुढे होत तिच्याकडचा खंजीर त्याच्या छातीत उतरवला.

“तुला काय वाटलं, मराठे सहजासहजी भुलतील? आमच्या शंभुराजांजवळ पोहोचण्यापूर्वी तुला आम्हाला सामोरं जावं लागेल!” म्हणत रेवानं तो खंजीर त्वेषानं बाहेर काढला. रेवाचा प्रतिकार करण्याइतपत अवधीही किताबुद्दीनला मिळाला नाही.

हंबीरमामांनी इशाऱ्याचा घंटानाद सुरू करताच किताबुद्दीनच्या माणसांभोवती भानुप्रतापच्या सैन्यासह मावळ्यांचा वेढा पडला. प्रतिकार करणाऱ्यांची गर्दन त्याचक्षणी धडावेगळी होत होती.


सिद्धरमणनं भवानी मंडपाच द्वार उघडलं... हातात रक्तानं माखलेला खंजीर घेऊन रेवती भवानी मंडपाच्या बाहेर पडली.

तिचं घुंघट केव्हाच बाजुला झालं होतं... त्वेषानं लालबुंद नेत्र, हातात शस्त्र घेतलेली रेवती रणचंडीचा अवतार भासत होती.

स्वराज्य आणि विश्वेश्वराप्रतीचं तिचं कार्य सिद्धीला गेलं. राणा भानुप्रतापांनी किताबुद्दीनच्या सैन्यासह फितुर मंत्र्यांनाही तत्काळ कारागृहात नेण्याचे आदेश देऊन प्रजेला संबोधित केले, शांत केलं. सर्व हकिकत ऐकताच “राणीसा की जय हो, रेवतीबाईसा की जय हो“चे घोष गडावर दुमदुमायला लागले.


रेवतीनं समाधानानं सिद्धरमणकडे एक कटाक्ष टाकला. प्रजेला अभिवादन करून ती शिवालयात गेली. नारायण स्वामींनी शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठापना करून यज्ञ पूर्ण केला होता.


विश्वेश्वराच्या गाभाऱ्यात मात्र तिला अश्रू अनावर झाले. संघर्ष पूर्ण झाला मात्र पुढची वाट त्याहीपेक्षा खडतर होती. राणीसा म्हणून आली असली तरी विवाह किताबुद्दीनसोबत झाला होता... त्यामुळे कुंभलगडावर भानुप्रतापची पत्नी म्हणून राहणं संयुक्तिक नव्हतं, सिद्धरमणसह पुढची वाटचालही रितीविरूद्ध होती... मुधोळला परतावं का? असा विचारही मनात आला मात्र त्याचक्षणी तिच्याच मनातून तीव्र नकार आला. मनात असंख्य प्रश्नांचा कल्लोळ माजला होता. प्रसंगी शूर असणाऱ्या रेवाचे जणु त्राणच गेले.


तिच्या मनाची अवस्था जाणून सिद्धरमण गाभाऱ्यात गेला,

“रेवा... शांत व्हा, आम्ही जाणतो तुमची अवस्था, परंतु हे विधीलिखितंच, तेव्हा अश्रूंना जरासा आवर घाला.”

“आणि? आणि काय करू हे अश्रू थोपवुन?” रेवती सिद्धरमणकडे पाहात म्हणाली.

“केवळ नामस्मरण करा, योद्ध्यानं असं हतबल होऊ नये रेवती.”

“आम्ही मनुष्यही आहोत सिद्धरमण, भावना आहेत हो आम्हालाही, तुम्ही जाणून होतात सगळं तरीही दूर गेलात, का झोकलं आम्हाला नियतीच्या ह्या चक्रात?

आता पुढचा मार्गही आपणच सांगा, ठाऊक असेलच ना आपणास?”

“रेवा विधीलिखित माहित असलं तरी ते बदलण्याची क्षमता आमच्या ठायी नाही. असतीच तर आपण आज इथे कदापि नसता... तरीदेखील आम्हाला क्षमा करा रेवती.”

“नाही सिद्धरमण आपण क्षमा मागू नये, केवळ मार्ग सांगावा.”

तिच्या प्रश्नावर निरूत्तर सिद्धरमणनं केवळ तिच्या मस्तकावर हात ठेवला, तसं रेवतीला सुहृदमधील सिद्धरमणच्या ओळी आठवल्या, ”आई भवानीला शरण जा, अग्निदेवतेला शरण जा.”

तिने दासीला महालातून सुहृद आणण्यास सांगितले, तिला मार्ग सापडला होता. सिद्धरमणसह उपस्थितांचा आशिर्वाद घेऊन ती भवानी मंडपाकडे निघाली. ह्यावेळी मात्र सिद्धरमणने तिला थांबवलं.

“रेवती तुमच्यासोबत जीवन हे नीतीविरूद्ध असेल मात्र मृत्यूला कोणतेच नितीनियम नाहीत, तेव्हा आम्हीही तुमच्यासोबत येणार. उपस्थित सर्वांना प्रणाम करून दोघेही भवानी मंडपाकडे निघाले,जणू शिवासह शक्ती चालल्याचा भास होत होता.


त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सरस्वतीबाई, गणोजीराव, हंबीरमामांनी केले मात्र नारायण स्वामींनी त्यांना रोखले. भवानी मंडपाच्या अखंड धुनीमध्ये सिद्धरमणसह रेवती सुहृद कवटाळुन बसली. सिद्धरमण रेवतीच्या मुखातुन निघणारा

“नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय।

नित्याय शुद्ध्याय दिगंबराय तस्मै ‘न’काराय नम: शिवाय:।।

मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वराय प्रमथनाथ महेश्वराय।

मंदारपुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै ‘म’ काराय नम: शिवाय।।

शिवाय गौरी वदनाब्जवृंद सुर्याय दक्षध्वरनाशकाय।

श्री नीलकंठाय वृषभध्वजाय तस्मै ‘शि’ काराय नम: शिवाय।।

वशिष्ठ कुभ्भोद्भव गौतमार्याय मुनिंद्र देवचर्चित शेखराय।

चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै ‘व’ काराय नम: शिवाय।।

यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय।

दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै ‘य’काराय नम: शिवाय ।।

ओम नम:शिवाय, विश्वेश्वराय नम:” चा घोष गडभर घुमू लागला. भवानी मंडपातील धुनी तीव्र होत गेली अन् घोष मंद!!

अग्नीच्या गर्भात सिद्धरमण-रेवती एकत्र सामावले, पुन्हा जन्मण्यासाठी...


Rate this content
Log in

More marathi story from Asmita Satkar

Similar marathi story from Tragedy