Asmita Satkar

Tragedy

4.2  

Asmita Satkar

Tragedy

तु भेटता पुन्हा

तु भेटता पुन्हा

1 min
1.4K


रात्री झोपायला जरा उशीरच झाला, पुनःपुन्हा मनात फक्त विचार येत होते.

पहाटे कधीतरी शांत झोप लागली... विचारांचं चक्र खूप प्रयत्न करूनही थांबलं नव्हतं... तशीच विचार करता करता झोपले होते.


विचार होता तरी कसला... सगळं आयुष्य डोळ्यासमोरून सरकत होतं... दिवसभर त्याचेच भास... पण तो इथे येऊच कसा शकतो? शक्यच नव्हतं...पण मग ओपीडीबाहेर ते कुंद्याच आणि सोनचाफ्याचं फुल? तो पर्फ्युमचा स्मेलसुद्धा होता त्या फुलांना...

असणारंच ना... पर्फ्युम मारलेल्या शर्टच्या खिशात तोच ठेवायचा फुलं...


पण त्याला माझा पत्ता कुणी दिला? आज साडेतीन वर्षे झाली मला पुणे सोडून... आई बाबा सोडून कुणालाच माहित नाही मी कुठे आहे... मग आज एवढ्या वर्षांनी मला कोल्हापुरात का भास होतायेत त्याचे? 


कदाचित मी मिस करतीये त्याला... का आज एवढ्या तीव्रतेने आठवण येतीये त्याची... पण त्याला विसरलेच कधी मी... खरं तर त्यालाच काय कुणालाच विसरले नाही मी कधीच... बस मागे सोडून आले सगळं... त्यालाही सोडून आले...!


पहिली भेट... आता तर आठवतच नाहीये केव्हा झाली होती भेट... बस पहिल्याच भेटीत तो खास दोस्त झाला... एकदम टकाटक स्टाईल... “कडक” या पेटंट शब्दासोबत तो होताच की... माझे अश्रु... माझ्या कविता... माझ्या विश... माझी स्वप्नं... माझे प्रॉब्लेम... माझ्या तुटलेल्या मनाला सांभाळत... मला हसवण्याचा प्रयत्न करत कायम सावलीसारखा सोबत होताच की तो...


माझी असणारी प्रत्येक गोष्ट त्याने आपली केली होती... माझ्या हातावरची मेहंदीपण नोटीस करायचा... माझा प्रत्येक शब्द झेलायचा... अगदी त्याची सोबतीण म्हणजे सिगारेटसुद्धा माझ्यासाठी सोडायला तयार होता तो... पण मीच आले त्याला सोडून...


तेव्हा जाणवलं नव्हतं की माझंही  प्रेम आहे त्याच्यावर... मी आपली माझ्याच दु:खात  सोडून आले सगळं...!

खरंतर खूप जिवलग अश्या व्यक्तींमधला तो एक होता, दिवसरात्र भिरभिरायचा माझ्याभोवती...

दिवसरात्र मी ही त्याला चिडवायचे कित्येक मुलींवरून... कधी वाटलंच नव्हतं.... मलाच तो आवडायला लागेल... आणि आता हे सगळं सांगायला मी परतसुद्धा जाऊ शकत नव्हते...


पण कालची ती फुलं... हा भास... विचार थांबत नाहीयेत... ओपीडीलासुद्धा जावं वाटत नाही... पण रूमवर बसून काय करू म्हणून आवरायला घेतलं... हॉस्पिटलला जायची तयारी झाली... पण फिरून पुन्हा आरशासमोर उभी राहिले... स्वतःला न्याहाळत...


डोळे सुजलेले... ड्रेसचा कलरपण डल वाटत होता... कपाटकडे गेले... सगळ्या कपड्यांवर नजर फिरवली, वरच्या खणात ठेवलेला अबोली रंगाचा ड्रेस काढला... अनारकली... त्याला आवडायचा हा रंग खूप म्हणून घेतला होता... पण कधी घातलाच नव्हता, त्याला मॅचिंग झुमकेसुद्धा शोधले... मला झुमके छान दिसतात असं त्याचं मत... केससुद्धा मोकळे सोडले... पहिल्यांदा जाणवलं मोकळे केसपण छान दिसतात की... आज मलाच हसू आलं...


दोन फुलं, पर्फ्युमचा दरवळ एवढ्यावरून मी तर्क लावतिये तो इथे आलाय असा... किती हा वेडेपणा... ह्यात एक गोष्ट पॅाझिटिव्ह झाली... ती म्हणजे किमान तो आलाय ह्या विचारानेच  मला एवढं खुश रहावं वाटत होतं... हेही नसे थोडके !

ह्याच आनंदात हॉस्पिटलमध्ये कधी पोहोचले हे समजलंच नाही, कार पार्क करून ओपीडीकडे जाताना पुन्हा तोच दरवळ... मग असा विचार केला कितीतरी लोक वापरत असतील हा पर्फ्युम... असेल कुणाचातरी... किती लोक आहेत इथे...


“गुड मॉर्निंग मॅम, मस्त दिसताय, काय विशेष? ” सारिकाच्या आवाजाने मी भानावर आले.

“काही नाही गं, सहजच... गुड मॉर्निंग”

तशी आज पेशंटची विशेष गर्दी नव्हती, एक एक पेशंट तपासताना बेचैनी मात्र वाढत होती, नजर ओपीडीच्या दारावरंच, कारण एक भाबडी आस... कदाचित पुढचा पेशंट म्हणून तोच आला तर...


पण असे एवढे विचार जरी असले तरी पेशंटवरचं लक्ष मी विचलित होऊ नव्हतं दिलं, तीन वर्षांत एवढी पक्की डॉक्टर तर मी नक्कीच झाले होते...

दोन तासांनी रिसेप्शनला फोन लावला,“हॅलो सारिका, बाहेर किती पेशंट आहेत?’’

“दोन आहेत अजून.”

“ओके, कुणाला अपॉईन्टमेंट दिली आहेस का?’’

“हो मॅम, साडेअकरा वाजता आहेत एक पेशंट”

“बरं...ऐक त्यानंतर कुणाला देऊ नकोस अपॉईन्टमेंट.’’

“ओके मॅम’’


अर्ध्या तासात सगळेच पेशंट तपासून झाले... ह्यातला एकही पेशंट “तो” नव्हता म्हणून मन जरा खट्टू झालं.

तेवढ्यात फोन वाजला

“बोल सारिका’’

‘’मॅम तुमच एक कुरियर आलंय, आत पाठवू?’

“हो पाठव की’’

‘’मावशींनी ते कुरियर टेबलावर ठेवलं, त्या बाहेर जाताच मी अधीरतेने ते उघडलं...

आत एक मोरपीस होतं, आणि त्याला एक छोटी नोट लावली होती... पाच मिनिटांत पार्किंगमध्ये ये, तु सुट्टी घेतीयेस मी डॉ. गांधींना तसं कळवलं आहे आधीच... पटकन ये वाट पाहतोय... ऑलमोस्ट दाराकडे पळत जातच मी शेवटची लाईन वाचली... इमर्जन्सीशिवाय मी अशी पहिल्यांदा पळत निघाले होते.


“मॅम मॅम.....’’, सारिका आवाज देत होती.

‘’उद्या बोलू सारिका... महत्त्वाचं काम आहे, बाय.’’

पार्किंगमध्ये तो पाठमोरा उभा होता... मी सगळं भान विसरून त्याला तशीच मिठी मारली, त्याने हळुवार हात सोडवत मला समोर उभं केलं, मी थरथरत होते...

किती वर्षांनी तो समोर होता, म्हणजे कालपासून मला जे वाटत होतं तो भास नव्हता!


“काही बोलशील का?? की अशीच उभी राहणार आहेस?’’

त्याने असं बोलताच मी पुन्हा त्याला मिठी मारली, अजून घट्ट.....

“वेडी गं वेडी, फुलं पाहून झोपली नाहीस ना रात्री?’’

“तुला कसं समजलं मी झोपले नाही ते?”

“ डोळे बघ... केवढे सुजलेत... बदलली नाही अजुनपण, वेडाबाई”

“हमम”

“काय अबोली रंगाचा ड्रेस घातला म्हणून तू पण अबोली झालीस का?’’

“अजूनही पांचट मारतोस यार.....’’

‘’हुश... बोललीस फायनली... गोड आवाजात... हाच आवाज ऐकायला तरसलो होतो यार”

“ हो का?’’ भुवया उंचावत मी विचारलं.

‘’हो... बरं चल, चहा घेऊयात, किती वर्षांत चहाच घेतला नाहीये मी, आणि मला हे पण माहित्ये की आपणसुद्धा चहा घेतला नसणारच एवढी वर्षं.’’

“हमम....सगळंच मागे सुटलं रे....चहा, कट्टा, तुम्ही सगळेच.”

“बरं चल, मला खूप बोलायचं आहे, चहा पिता पिता गप्पा मारू.”

“चल... मलाही खूप बोलायचं आहे.’’

चहा घेतानाही मी त्याचा हात सोडला नव्हता, कधीकाळी ज्याला सोडून आले... आज त्याचाच हात मला एक मिनिटपण सोडायचा नव्हता.


“किती भारी दिसतीयेस गं तु... मला तर तुला पाहतंच रहावं वाटतंय...’’

मी नुसतंच ऐकत होते, हेच तर ऐकायचं होतं... म्हणून तर त्याला आवडतं तशी तयार झाले मी... हा रंग, हे झुमके... मोकळे केस... त्याने असंच बोलत रहावं असं वाटत होतं.


‘’ऐक की... मी काय पळून जाणार आहे का?’’

“अं... नाही... म्हणजे?’’


“अगं मग माझा हात सोडत का नाहीयेस तु?’’

“ओह सॉरी” मी त्याचा हात सोडत म्हणाले.


तसं त्याने माझा हात हातात घेत त्यावर ओठ टेकले, “जंगजंग पछाडलंय तुला शोधायला... आता हा हात सहजासहजी नाही सोडणार मी... तुझ्यासाठी आयुष्यभर थांबायची तयारी होती माझी, पण देवाला  दया आली आणि मला तू लय लवकर सापडली.”


“एवढं प्रेम करतोस?’’


“हो मग... तेव्हाच तुला सांगितलं असतं तर आतापर्यंत बायको असती तू माझी... अशी लांब नसती आलीस मग न सांगता...”


“सॉरी”


“सॉरी बोलून काय परत येणार सांग? येतील का साडेतीन वर्षं परत?” बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला.


“मग ह्यासाठी तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे. काय म्हणशील तू ते करेन मी’’


“बघ बरं का”


“हो... तु मार, शिव्या दे... काही कर मला मान्य सगळं”


“यातलं मी काही करणार नाही, पण तुला हा काय पुढचे सगळे जन्म लक्षात राहील अशी शिक्षा देणार आहे “


“कोणती?”


“इथली सगळी काम आटोपायची, सामान घ्यायचं... परत यायच पुण्याला, घरी जाऊन सांगायचं आपल्याविषयी... जो पहिला मुहूर्त निघेल त्या मुहूर्तावर लग्न करायचं”


“हो... हो...थंड घे जरा... घरचे नाही म्हणाले तर?”


“ते नाही म्हणणार नाहीत... तू बाकी सगळं माझ्यावर सोड गं... चल फक्त तू...”

“बरं... मला एक सांग...  माझा पत्ता कुठून मिळाला तुला?’’


“ती एक मोठी स्टोरी आहे... सांगतो नंतर.”


“नंतर नाही आत्ता सांग.’’


“सांगतो गं... पुण्याला जाता जाता... आता मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत... तुझे कान खेचायचे आहेत... आणि...”


“आणि काय?’’


मी असं म्हणताच त्याने ओठ माझ्या गालावर टेकले...,”हे करायचं होतं”


“तू ना खरंच......”


“मी हा आहे असा आहे... आता तुला नो ऑप्शन!’ तो हसत मला मिठीत घेत म्हणाला.


म्हणजे ह्या भास आभासाच्या खेळात माझे अंदाज खरे ठरले होते, तो इथे नुसताच आला नव्हता तर तो मला न्यायला आला होता... त्याचं नाव मला द्यायला आला होता... आता माझं आयुष्य त्याच्या मिठीत फुलणार होतं... हळूहळू आता सगळंच दरवळणार होतं... आणि हा भास नाही हे सत्य होतं... अहं... हेच सत्य आहे.

 

तर मित्रांनो कशी वाटली आजची स्टोरी? तु भेटता पुन्हा...

आवडली ना... तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा... भेटू या पुढच्या गुरुवारी ह्याच वेळी...९८.३ वर... नवीन कथेसह... प्यार के रंग आरजे निहारीका के संग ह्या प्रोग्राममध्ये... तबतक के लिये बाय... शब्बा खैर... Stay tuned.


“ओह माय गाॅड निहारिका.. .बेस्ट स्टोरी होती... क्या बोलू यार... बढिया... बाय द वे... रायटर कोण आहे...” मिलिंद  तिला विचारत होता.


“काही स्टोरी तो वरचा लिहतो मिल्या... असं समज ह्या स्टोरीचा रायटर वर बसलाय.”


“म्हणजे?”


“म्हणजे... वाघाचे पंजे... उशीर होतोय मी निघते बाय.”


“बाय” अशी काय ही, सरळ उत्तरच देत नाही... वरचा रायटर म्हणे... मिलिंद स्वत:शीच बोलत होता... अचानक त्याचं लक्ष तिच्या डेस्कवर गेलं... तो धावतच खाली पार्किगमधे गेला...


ती गाडी काढतच होती, ह्याला पाहुन थांबली.


“काय रे पळत आला... काय झालं?”


“साॅरी... मी तुला तो प्रश्न नव्हता विचारायला पाहिजे... मी कधी नोटीसंच नाही केलं गं... तुझ्या डेस्कवरची ती फुलं आणि अतुलचा फोटो...”


“इट्स ओके... मला नाही काही वाटलं... तू ही काही वाटून घेऊ नकोस... अतुल मला आयुष्यभर पुरेल एवढा खमकेपणा, प्रेम आणि दरवळ देऊन गेलाय...

बाय द वे आणि एक सिक्रेट सांगू ????”


“काय??”


“मी आरजे निहारिका आत्ता आत्ता झालीये... माझी जुनी ओळख डाॅ. निहारिका अतुल देशपांडे... प्रॅक्टिसमधे मन रमलं नाही... म्हणून हे रेडिओ जाॅकी वगैरे... सो ही गोष्ट माझी आहे... आणि लिहणारा तो वरचा आहे... त्यामुळे तू वाईट नको वाटून घेऊस... निघते आता मी....बाय!”


“बाय... सावकाश जा...”  मिलिंद कितीतरी वेळ ती गेली त्या दिशेने पाहत राहिला...

  

त्याच्याशिवायही दरवळतंय की तिचं आयुष्य... तिच्यासारखाच दरवळ जपता आला पाहिजे सगळ्यांना... नाही का????


“दरवळ तुझा होता असा की,

तुझे नसणेही गंधित होते।

तु सामावला असा रंध्रारंध्रात की,

तुजविन घेतले ते श्वासही सुगंधी होते।।”


Rate this content
Log in