Anuja Dhariya-Sheth

Inspirational

4.0  

Anuja Dhariya-Sheth

Inspirational

पुनर्विवाह... #माणसातलादेव

पुनर्विवाह... #माणसातलादेव

4 mins
330


विठ्ठलाचे कट्टर भक्त असलेल्या महिपतरावांना खूप वाईट वाट्त होते, एवढ्या वर्षात न चुकलेली वारी मागच्यावर्षी प्रमाणे यंदाही चुकणार याची खंत व्यक्त करत तें पांडूरंगाची पूजा करत होते.


मालीनी ताईंनी मात्र तोंड वाकडे करत बडबड करायला सुरुवात केली, तुमच्या त्या पांडुरंगाला म्हण आम्ही काय वाकड केल होते तूझं की माझ्या लेकीच्या नशीबी ह्याे भोग लावलान तुमच्या त्या विठ्ठलानी..


समद्या जगावर जो घात झालाय त्यातून अजून समदे जग सावरतय अन् तुम्हाला काळजी पडलीय वारीची.. लेकीकड बघा आधी.. ४ वर्षाच लेकरू हाय तिच्या गळ्यात.. ह्या आषाढीला जावई बापूंना जाऊन एक वर्ष होईल.. आपल्या पोरीचा विचार आपण नाही करणार तर कोण? सासरचे सर्व चांगले आहेत, सासूबाई काय सासू आईच झाले तिची तरी पण एकदा तिची समजूत घाला, उभ आयुष्य पडलय.. कशी काढेल ती एकटीने..


अगं तो आहे ना.. तो बघतोय सगळे असे म्हणत महीपतरावांनी पांडुरंगाला हात जोडले..


माझा नाही विश्वास त्याच्यावर... मालीनी ताई..


काय बोलतेस आग.. पांडुरंगा तूच सुबुद्धी दे हिला.. महिपतराव..


तो काय सुबुद्धी देणार? आयुष्य भर तुम्ही विठ्ठल विठ्ठल केलेत.. काय दिले त्यांनी? आषाढी एकादशीलाच माझी पोर विधवा झाली.. कोरोनाने आपल्या जावयांना.. असे म्हणत पदरात तोंड खूपसून रडू लागल्या..

तेव्हा कुठे गेला होता तुमचा पांडुरंग...


अगं नशिबाचा खेळ हा सारा.. पण आपल्या माधूरीच्या सासरची माणसे किती देव माणसे आहेत. हा पांडुरंगा माणसांच्या रुपान देव बनून किती वेळा आला आपल्या नशिबात सांग बरं.. आता पण काहीतरी त्याच्या मनात असेलच.. त्याला त्याच्या लेकराची काळजी असतेच ग.. तो आपल्याला योग्य मार्ग नक्कीच दाखवेल.


तेवढ्यात फोन येतो, माधुरीच्या सासूबाई बोलत असतात.. आता एक वर्ष होईल, माधुरीला दुसर लग्न करायचं असेल तर आमची काही हरकत नाही, अहो आवघ २९ वय तीचं.. तिने आमच्या साठी अड़कुन रहाव असे आम्हाला अजिबात वाट्त नाही. मालिनीताई म्हणाल्या, अहो विहीणबाई मी पण आता तेच बोलले बघा ह्यांना.. आम्ही उद्या येतोय आल्यावर ह्या विषयावर बोलू..


बघितलस माझ्या पांडुरंगाला नाव ठेवत होतीस ना.. तोच मार्ग काढणार यातून.. महिपतराव


काढू द्या मार्ग, मग् ठेवीन मी विश्वास तोवर माझा राग काय जायचा नाय.. मालीनी ताई


चला मला तयारी करायची आहे, तुमच्या विठोबा वानी कमरेवर हात ठेवून नाय जमायच मला.. मालीनी ताईंनी परत एकदा नाराजी व्यक्त केली.


खर तर त्यांचा सुद्धा खूप विश्वास होता विठ्ठलावर, पण जावई गेल्या मुळे त्या जरा राग धरून असायच्या. पण, महिपतराव अगदी त्यांची कसर भरून काढायचे..


सगळी तयारी चालु असताना त्यांच्या मित्राचा मुलगा आनंद आणि त्यांचे मित्र सुधाकरराव आले. त्यांना असे अचानक आलेले बघून या दोघांना धक्का बसला. खर तर सुधाकर आणि महिपत दोघ अगदी खास मित्र.. आनंदला माधुरी आवडायची पण सुधाकर कडे मासांहारी जेवण घरातच व्हायचे म्हणून ५ वर्षा़पूर्वी महिपतरावांनी नकार दिला होता, संबंधही कमी केले होते.


आज त्या दोघांना अचानक आलेले पाहून महिपतराव विचारात पडले. सुधाकरराव म्हणाले, महिपत तुझ्या कडे काम होते म्हणून न सांगता आलो.. तूला आवडले नसेल तर माफ कर मला. परवा तुझ्या जावयांना जाऊन १ वर्ष होईल. त्याच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, पण माझा आनंद अजूनही माधुरीचा स्वीकार करायला तयार आहे अगदी मुलासकट..


काय?.. महिपतराव एकदम ओरडलेच


हो काका, माझे माधूरीवर प्रेम होते. तुम्ही नकार दिल्यावर मी परत कधीच तिला कॉन्टॅक्ट केला नाही. गेल्या वर्षी तीच्या नवऱ्याची बातमी समजली. मला खूप वाईट वाटले. काही महिन्यांपूर्वीच मी बाबांशी ह्या विषयावर बोललो पण बाबा तयार नव्हते. त्याच मन वळवण्यात मला यश आले. म्हणुनच त्यांना घेऊन मी इथे आलो. माधुरीशी तुम्ही बोला, तिच्या सासरच्या माणसांशी बोला आणि मला कळवा..


महिपत आणि मालीनी ताई एकमेकांकडे बघतच बसले. क्षणभर त्यांना कळंलच नाही काय बोलाव? आनंद उठून महिपतरावांजवळ येऊन त्यांचा हात हातात घेऊन म्हणाला, काका तुम्ही मला लहान असल्यापासून ओळखता. मी तुम्हाला शब्द देतो काका, माधूरीला आणि तिच्या मुलाला मी सुखात ठेवेन.


महिपतराव उठले, त्यांचे डोळे भरून आले. विठोबाच्या मूर्तीजवळ जाऊन तें म्हणाले, विठ्ठला कोणत्या कोणत्या रूपात तू येतोस रे.. खरच कसे आभार मानू तुझे.. सगळे भेदभाव आम्ही माणसे करतो रे तूला मात्र तुझी सगळी लेकर सारखीच असतात.. खरच पटले मला देव माणसात शोधावा..


माधुरीची आई, पटले ना तुम्हाला माझा विठोबा निष्ठूर नाही आहे, या आनंदच्या रूपाने आज माझा विठू माझ्या दारात आलाय.. खरच मला माफ कर सुधाकर, तुझे मन खूप मोठे आहे बघ.. माझ्या लेकीच कल्याणच होईल. पण आता तिच्या सासरच्या माणसांचा अधिकार जास्त आहे तिच्या वर त्यांच्याशी बोलुन घेतो आणि कळवतो.

चहा-पाणी झाल्यावर तें जातात, मालीनी बाई विठूची माफी मागतात, महिपतरावांची माफी मागते.. अहो पण तिच्या सासरची तयार होतील का? नातू राहूदे म्हणाल्या तर कशी राहील आपली माधूरी लेकराला सोडून...

आता तुम्ही उगाच शंका-कुशंका काढू नका. त्यांनी आशा दाखवले ना आता तोच ह्यातून मार्ग काढेल.


तें दोघे मुली कडे आले, वर्षश्राद्ध झाल्यावर महिपतरावांनी घाबरत विषय काढला. सासू- सासरे यांनी हसत परवानगी दिली. तुमच्या माहिती मधील आहे म्हटल्यावर आम्हाला काळजी नाही.


जो मुलगा एवढे चांगले काम करतोय, पुण्याचे काम करतोय त्याचे विचार एवढे चांगले आहेत तो माणूस म्हणून खरच किती चांगला असेल असे माधूरीचे सासरे म्हणाले.


सर्वानी समजून सांगितल्यावर माधूरी तयार झाली. लवकरच त्यांचे लग्न झाले. स्वतः अविवाहित असून सुद्धा एका विधवेला तिच्या मुलासकट स्विकारून आनंदने त्याच्या या निर्णयामधून समाजासमोर एक आदर्श ठेवला.

महिपतरावांनी आणि मालीनीताईंनी आनंदचे खूप आभार मानले. जणू काही त्यांचा विठोबाच त्याच्या रुपाने धावत आला होता.


  कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली ❤️ असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.

   अभिप्राय द्यायला विसरू नका हं..!! अर्थात तुमच्या कंमेंटमधून.. अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.... साहित्य चोरी हा गुन्हा आहे.

  सदर कथेच्या प्रकाशनाचे, वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची नोंद घ्यावी.

  कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational