पत्र...
पत्र...


देसाई काकु आपली रुम आवरत होत्या एवढ्यात त्यांना टेबलच्या ड्रॉवरमध्ये एक कागद मिळाला व्यवस्थित घडी करून ठेवलेला तो कागद काकूंनी उघडला आणि वाचू लागल्या.
प्रिय सुमा...
वयाची साठी आपण पार केली खूप काही सांगायचं आहे तुला पण सांगणं होत नाही म्हणून ठरवलं की लिहून ठेवावं. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तू मला चांगली साथ दिली आणि देत आहेस. तुझा जीव थकलाय पण घरकाम माझं तू अजुनही न थकता करतेस. तुला किती वेळा सांगितले की ठेवू एक मोलकरीण पण तू काही ऐकत नाहीस. पूर्वीसारखी ताकद नाही गं तुला आता. पूर्वी कशी तू घरकाम, मुलांचं करुन कामावर जायची. परत येऊन मुलांचा अभ्यास, जेवण बनवायची. कधी तू माझ्याकडे कसलीच तक्रार केली नाही. आपली मुलं मोठी झाली आपला सौरभ इंजिनिअर झाला. आपल्या संसारासहीत बेंगलोरला स्थायिक झाला. आपली मीरा तीही आपल्या संसारात रमली आहे.
पोरं लांब असली तरी आपल्याला त्यांनी दूर केलं नाही. दिवसातून एकदातरी फोन येतोच ह्याचं श्रेय मी तुला देईन कारण तू त्याच्यावर संस्कार चांगले केलेस. मी माझ्या कामात व्यस्त असताना तू मात्र घर, तुझं काम आणि मुलांना चांगल सांभाळलंस. आपलं मन मारत आमच्यासाठी जगलीस तू. पण आता पोरं आपल्या मार्गाला लागली आता उरलो फक्त तू आणि मी. रिटायर माणसं... मी ठरवलं की तुला तुझ्या मनासारखं जगू द्यायचं, तुला खुश ठेवायचं, उरलेले क्षण तुझ्याबरोबर आंनदात घालवायचे.
एवढ्यात दाराची बेल वाजली. काकूंनी ते पत्र व्यवस्थित होतं तसं ड्रॉवरमध्ये ठेवलं आणि दरवाजा उघडला. काका दारात उभे होते. काकूंच्या पाणावलेल्या डोळ्याकडे पाहून काकांनी विचारले "काय गं तुझे डोळे का भरलेले?"
काही नाही मगाशी कांदा कापला म्हणून
"बरं हे बघ तुझ्यासाठी आईस्क्रीम आणलंय लवकर खा नाहीतर वितळून जाईल..."