पथनाट्य : बेळगांवसह संयुक्त मह
पथनाट्य : बेळगांवसह संयुक्त मह


(१० ते १५ मुलं एकत्र रिंगण करून "जय जय महाराष्ट्र माझा" हे गीत म्हणत आहेत.)
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...
(एक कडवं संपतं. मुलं खाली बसतात. आता रिंगणात एक मुलगा (मावशी) चालत आहे. तो बायल्या आहे. तो चालतोय. त्याच्या पाठीमागून अजून एक मुलगा (पेंद्या) येतोय.)
पेंद्या : ये मावशी. अगं मावशे ऐक तरी.
मावशी : काय रे? काय झालं बोंबलायला?
पेंद्या : अगं अशी वार्यावानी भरभरा कुठं चाललीस?
मावशी : हुतात्मा चौकात...
पेंद्या : हुतात्मा चौकात? ते काय असतं?
मावशी : अरे मुडद्या किस्न्याचा पेंद्या ना तू? तुला हुतात्मा चौक म्हाईत न्हाय व्हंय?
पेंद्या : ए मावशे शिव्या कशापायी देतेस. तुला एवढं म्हायती हाय तर सांग ना...
मावशी : आज महाराष्ट्र दिन हाय हे तरी ठाव हाय ना तुला?
पेंद्या : व्हय व्हय.. आज म्हने ड्राय दिन पन हाय.
मावशी : मुडदा बसिवल्या तुझ्या...
पेंद्या : आता काय झालं शिव्या घालायला?
मावशी : जाऊ दे... तुझ्या संग वाद घालत राहिले तर हुतात्मा चौकात पोचायला ऊशीर व्हईल.
(तेवढ्यात दोन गडी येतात.)
गडी एक : ऐका हो ऐका...
गडी दोन : पैशाला दोन बायका... (गडी एक त्याला मारायची ऍक्शन करतो गडी दोन घाबरतो. पेंद्या आणि मावशी त्यांना बघत आहेत)
गडी एक : आता जर पुन्हा कॉमेडी केलीस तर तुझी ट्रॅजेडी करुन टाकीन. ऐका हो ऐका... आज महाराष्ट्र दिन आहे. आपला महाराष्ट्र जरी स्वतंत्र झाला तरी अजून संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न अधूरे आहे. हुतात्म्यांनी सांडलेल्या रक्ताचे मोल अजूनही फेडले गेले नाही. तर मग मी तुम्हाला विचारतो. संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ना?
(रिंगण करुन उभे असलेली मुलं जोरात म्हणतात.. "होय... संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे)
गडी एक : मग चला हुतात्मा चौकात. (गडी व काही लोक त्याच्यासोबत चालायला लागतात. तेव्हा पेंद्या तिथे येऊन त्याला थांबवतो)
पेंद्या : ओ... पाव्हनं... ओ पाव्हनं... आवं मला सांगाला का? हि हुतात्मा चौक काय भानगड हाय.
गडी दोन : शाहीर (गडी एकला बोलतो) मला वाटतं हि काहीतरी वेगळीच भानगड हाय. (पेंद्याकडे तुच्छतेने पाहत म्हणतो)
गडी एक : ये कोण रे तू? तुला हुतात्मा चौक माहित नाही.
पेंद्या : अवं मगापासून या मावशेला इचारतोय. पण हि थेरडी काय सांगायला तयार न्हाय.
गडी एक : असं होय. मग ऐक...
ऐका ऐका हो कहाणी बलिदानाची, हुतात्मा चौकाची, संयुक्त महाराष्ट्राची हो जी जी जी जी...
भारताला स्वातंत्र्य मिळाले. भाषिक राज्य निर्माण झाले. पण महाराष्ट्र उपेक्षित राहिले.
पेंद्या : महाराष्ट्र उपेक्षित राहिले ते कसं काय?
गडी एक : दिल्लीतून हुकुम आला
गडी दोन : संयुक्त महाराष्ट्र नही होगा.
गडी एक : महाराष्ट्राचे नेते दिल्लीपुढं झुकले
मावशी : मग पुढं काय झालं शाहिर?
गडी एक : पुढं? महाराष्ट्राची जनता पेटली, रस्त्यावर उतरली, दिल्लीस न्हाई भ्याली हो जी जी जी जी...
पण दिल्लीकरांच्या मनातला सैतान जागा झाला. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या जनतेवर गोळीबार करण्याचा आदेश दिला गेला.
(रिंगण केलेली मुलं शाहिरच्या पाठीपागे उभे आहेत. जणू संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा क्षण लोकांच्या डोळ्यासमोर उभा राहिला आहे. शाहिर जे बोलतोय ते प्रात्यक्षिक होतंय)
पेंद्या : पुढं काय झालं शाहिर?
गडी एक : पुढं? सरकारच्या मनातला सैतान सत्यात उतरला. अंधाधूंद गोळीबार सुरु झाला. १०५ वीर हुतात्मा झाले. रक्ताचा पाट वाहिला. नंतर सरकारला जाग आली. संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला... पण...
पेंद्या : पण काय शाहिर?
गडी एक : बेळगांव निसटला... बेळगांव निसटला.
मावशी : बेळगांव?
गडी एक : बेळगांव निसटला... बेळगांव निसटला. महाराष्ट्राचा तुकडा पडला. काळजाचा नाही ठाव राहिला ओ जी जी जी जी...
गडी दोन : कानडी अत्याचार्यांनी थैमान घातला...
गडी एक : बेळगावांत मराठी भाषा व संस्कृती पायदळी तुडवली जात आहे. बेळगावच्या महापौरपदी ‘मराठी’ माणूस विराजमान होऊ नये यासाठी झुंडशाही चालते.
गडी दोन : बेळगावच्या महापालिकेवर फडकलेला भगवा(मराठी झेंडा) बळजबरीने उतरवला जातो.
पेंद्या : एक प्रश्न हाय शाहिर.
गडी एक : विचार ना
पेंद्या : पण बेळगांव महाराष्ट्रात का यावा? त्यो कर्नाटक सरकारला देऊन टाकला. तर काय बिघडणार हाय आपलं.
गडी एक : कसं हाय पेंद्या. आपण लोकशाहीत राहतो. लोकशाहीत जनतेचं भलं व्हावं हे महत्वाचं असतं. बेळगांवमधील मराठी बांधव महाराष्ट्रात येण्यासाठी आकांत करीत असताना हा सीमा भाग कटकारस्थान करून कर्नाटकाच्या घशात कोंबला.
पण बेळगांवच्या लोकांनी किल्ला लढविला. कानडी अत्याचाराला तो नाही घाबरला...
मावशी : असं होय? समदं इचित्रंच हाय बुवा. आपल्या देशात अतिरेक्यांशी चर्चा होते, पण न्याय मागणार्या सामान्य लोकांना चिरडले जाते.
पेंद्या : पण शाहिर बेळगांव सह संयुक्त महाराष्ट्र कधीच व्हनार नाही का हो?
गडी एक : होणार ना... नक्कीच होणार... आपण आस सोडायला नको. अनेक वर्ष बेळगांवचे मराठी बांधव हा लढा लढवत आहेत. संयुक्त महाराष्ट्राचा लढा सामान्य माणसाचा होता व तो सामान्य माणूसंच लढवू शकतो.
पेंद्या : शाहिर माफी मागतू. पन मला न्हाय वाटत, बेळगांव सह संयुक्त महाराष्ट्र व्हईल. आपली महाराष्ट्रीय जनता बेळगांवला विसरलीय शाहिर.
मावशी : व्हय शाहिर, मराठी मानूस इतका सुखासिन झालाय की त्याला कसलीच परवा न्हाय. अवं मुंबई मराठी मानसाची न्हाय राहिली, तर बेळगांव लांबंच राहिलं.
गडी दोन : शाहिर... आपली महाराष्ट्राची जनता उदासिन झालीय. नुसतं जय महाराष्ट्र बोलून काय होणार?
गडी एक : असं नाय गड्या. मला विश्वास आहे. मराठी माणूस उदासिन नाही. फक्त मराठी माणसाचा हनुमान झालाय.
गडी दोन : हनुमान?
गडी एक : होय हनुमान... हनुमानाला कसं त्याच्या शक्तीची जाणीव करुन द्यावी लागायची तसं आहे. मराठी माणासात देश पेलवण्याची ताकद आहे. फक्त त्याला त्याची जाणीव करुन दिली पाहिजे. हे काम आपण सारे प्रबोधक करु शकतो.
मावशी : व्हय शाहिर
पेंद्या : व्हय.. व्हय.. एकदम बेश्ट बोललात बघा.
गडी एक : तर मग चला महाराष्ट्राला जागे करुया. (सगळे चला चला बोलतात) चला हुतात्मा चौकात... हुतात्मांना आदरांजली वाहूया आणि बेळगांव सह संयुक्त महाराष्ट्र करण्याची शपथ घेऊया आणि नुसत्या बाथा नको बरं का? करुन दाखवूया... बेळगाव, कारवार, बिदर, भालकी आणि निपानीसहित संयुक्त महाराष्ट्र... (सगळे एकत्र बोलातात, झालाच पाहिजे)
(शाहिर आणि सगळे जागेवरच परेड केल्यासारखे चालताता आणि गाणं गातात)
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा...