Jayesh Mestry

Others

3  

Jayesh Mestry

Others

रंगमंच आणि कलाकार

रंगमंच आणि कलाकार

4 mins
1.5K


त्या दिवशी संध्याकाळी चर्चगेटवरुन ट्रेन पकडली. चर्चगेटवरुन ट्रेन पकडली की बसायला मिळतं. नाहीतर मुंबई लोकलच्या गर्दीत तुम्हाला व्यवस्थित उभं रहायला मिळालं तरी देव पावला म्हणायचा. विंडो सीट मिळाली होती. मी निवांत बसलो होतो. गाडी एकदाची सुटली. काही लोकांनी स्वतःलाच कसल्या तरी खाणाखुणा केल्या. त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांनी देवाला मनोमन प्रार्थना केली होती. मी मुंबईकर असल्याने हे माझ्या सवयीचं आहे. मरीन लाईन्स आलं. सीट पकडण्यासाठी लोकांची धडपड सुरु झाली. काही यशस्वी झाले तर काही उभेच राहिले. एकेक स्टेशन येत होतं गाडी भरत होती. प्रत्येकजण आपापल्या कृतीत दंग होते. कुणी झोपत होतं. कुणी बाहेर पाहत होतं. कुणी एकमेकांकडे तर कुणी शुन्यात पाहत होते. मी सर्वांना पाहत होतो. ती माझी सवय आहे. मी प्रत्येकाला निरखून पाहतो. एखादी निर्जीव वस्तू असली तरी तिला निरखून पाहतो. आपल्या प्रत्येक अवयवाला भुक लागते. कानाला काहीतरी ऐकायची भुक लागते, पोटाला अन्नाची, जीभेला पक्वान्नाची आणि डोळ्याला पाहण्याची. ट्रेनमध्ये सर्व काही पाहून झालं होतं. आता पाहण्यासारखं तसं काही उरलं नव्हतं. सगळीच पुरुष मंडळी. असो. मी ब्यागेतून सुरेश भटांचं 'झंझावात' हे पुस्तक काढलं. बाजूचा माणूस पुस्तकाचं नाव वाचण्याचा प्रयत्न करत होता. पण पुस्तक मराठी असल्याने त्याचा रसभंग झाला. तो बहुधा गुजराती असावा असं मी मानतच ठरवून टाकलं. मी पुस्तक वाचत होतो. तसं मी ते काही वेळा वाचलंय. पण कुणास ठाऊक भट प्रत्येक वेळेला नव्याने भेटतात. एखादी गझल आपण आधी वाचली असेल पण ती काही काळाने पुन्हा वाचली तरी ती ताजी वाटते, टवटवीत वाटते. पुन्हा एक नवा अर्थ उलगडतो. सौंदर्य हे क्षणभंगूर असतं. पण सौंदर्याचं वर्णन चिरंजीव राहतं. भटांच्या कवितेचंही तसंच आहे. आता मला आजूबाजूचे दृश्य दिसत नव्हते. ट्रेनचा कर्कश आवाज ऐकू येत नव्हता. मी आणि भट एकरुप झालो होतो.

पुस्तक वचण्यात गर्क असतानाच संगीत कानावर पडलं. सुरुवातीला मी लक्ष दिलं नाही. पण हळू हळू आवाज स्पष्ट होऊ लागला. पुढे कुणीच नव्हतं, म्हणून मी मागे पाहिलं. तर एक चाळीशीतला माणूस वॉयलिन वाजवत होता. तो हिंदी चित्रपटातील गाणी वाजवत होता. त्याच्या कपड्यावरुनं तो खुप गरीब असावा असं वाटत होतं. ट्रेनमध्ये अनेक लोक येतात, गाणं गातात, डमरु किंवा असंच काहीतरी वाजवतात, पैसे मागतात आणि निघून जातात. हा माणूस वॉयलिन वाजवत होता म्हणून मी त्याच्याकडे कुतुहलानं पाहिलं. त्याच्यासोबत अंदाजे ८ वर्षांचा एक मुलगा होता. दोघांचेही कपडे मळलेले होते. कदाचित तो त्याचा मुलगा असावा. माणूस वॉयलिन वाजवत होता व मुलगा लोकांकडे जाऊन पैसे मागत होता. यात नवीन काहीच नव्हते. ट्रेनमध्ये पैसे मागणार्‍यांना मी बर्‍याचदा पाहिलंय. ते आपली असलेली-नसलेली कला सादर करतात, स्वतःच हात पुढे करतात, पैसे घेऊन पुढे जातात. पण हा कलाकार मात्र दंग होता. आजूबाजूचे लोक आपल्याला पाहत आहेत का? किंवा ते आपल्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याची त्याला पर्वा नव्हती. त्याला फक्त वॉयलीन वाजवायचे होते, बस्स... ते रुढार्थाने वॉयलीनही नव्हते. एका जाड्या काटीला तार बांधलेली होती. असं काहीतरी विचित्र होतं ते. म्हणजे हे घरगुती वॉयलीन असावं. माझं संगीतातलं ज्ञान कच्च असल्यामुळे मला सांगता येणार नाही. ज्ञान वगैरे सोडा संगीताबद्दल मला फारशी माहिती सुद्धा नाही. मी त्याला पाहत होतो. त्याच्या चेहर्‍यावर नीरव शांतता होती. त्याचे डोळे बंद होते. हात वॉयलीनशी चाळा करीत होते. त्याला दैवी समाधी लागली होती. त्याच्या चेहर्‍यावर जग सामावल्याचा भाव होता. तो भाव मला बर्‍याचदा बुद्धांच्या प्रतिमेत दिसतो. आम्हा सर्व प्रवाशांमध्ये सर्वात सुखी माणूस मला तोच वाटला. सर्व प्रवाशी त्याच्याकडे पाहत होते. गाणं वाजवून झाल्यावर त्याच्या मुलाने पैशांसाठी प्रवाशांसमोर हात पसरले. पहिल्यांदाच मी पाहिलं की अनेक लोकांनी त्या मुलाला पैसे दिले. बर्‍याचदा मोजकेच लोक पैसे देतात. पण या अवलियाला अनेकांनी पैसे देऊ केले होते. ही एका सच्च्या कलाकाराला रसिकांनी दिलेली दाद होती. मी सुद्धा १० रुपयाची नोट त्याच्या हातावर टेकवली व मुलाकडे पाहून हसलो. तोही समाधानाने हसला. कदाचित माझ्या हसण्यात जितकं समाधान नव्हतं तेवढं त्याच्या हसण्यात होतं. तो पुढे गेला आणि पुन्हा वॉयलीन वाजवू लागला. पुढच्या लोकांनीही त्याला पैसे दिले. अंधेरी आलं आणि तो माणूस व मुलगा ट्रेनमधून उतरले.

कोण असेल हा मनुष्य? माझ्या मनात विचार रेंगाळला. कलाकार तर चांगला आहे. पण त्याची कला तो रंगमंचावर सादर करु शकत नव्हता. त्याला ट्रेनमध्ये फिरुन आपल्या कलेचे प्रदर्शन करावे लागत होते. किती फुटकं नशीब आहे याचं. पण कला सादर करायला रंगमंच कशाला हवे आहे? देव या जगात आहे की नाही? माहित नाही. पण कुणीतरी एक अशी शक्ती आहे. जी प्रत्येकाला ज्याचं त्याचं काम नेमून देते. कुणी ए.आर रेहमान बनावं आणि कुणी ट्रेनमध्येच आपली कला सादर करावी हे नियती ठरवतेच. पण कलाकार शेवटी कलाकार असतो. तो जिथे जाईल तिथे आपली कला सादर करतो. त्याला रंगमंचाचं बंधन नसतं. तो जिथे उभा राहून आपली कला सादर करतो तेच रंगमंच होऊन जातं आणि खर्‍या कलाकाराला रसिक दाद देतातंच


Rate this content
Log in