Jayesh Mestry

Others

3  

Jayesh Mestry

Others

नैतिकता

नैतिकता

2 mins
1.5K


चेंगिजखान हा जगप्रसिद्ध योद्धा. त्याचे नाव ऐकताच शत्रू थरथर कापत. चेंगिजखानाकडे एक ससाणा होता. खानास तो खुपच प्रिय होता. मनुष्य व प्राणी, पक्षी यांची मैत्री फार प्राचीन आहे. एकदा खान शिकारीला गेला. त्याच्यासोबत त्याचा प्रिय ससाणाही होता. खान जंगलात खुपच आत गेला होता. जंगल फारच भयाण वाटत होते. पण चेंगीजखान हा शिकारी होता, शिकार नव्हता. तो योद्धा होता, पळपुटा नव्हता. असे अनेक भयाण प्रसंग त्याच्या आयुष्यात आले होते.


ससाणाही चेंगीजखानप्रमाणे शूर होता. खानासाठी कित्येक जनावरांवर त्याने झडप मारली होती. चेंगीजखान खुपच दमाला. त्याला तहान लागली होती. पण नेहमी सकारात्मक विचार करणार्‍याला दैवही मदत करीत असतं. त्याला समोर छोटासा वाहता झरा दिसला. त्याने ससाण्याला खांद्यावरुन खाली उतरवले. त्याच्याजवळ नेहमी असणारा त्याच्या आवडीचा चांदीचा पेला त्याने काढला आणि झर्‍यापाशी गेला. खानाने पेला झर्‍याखाली धरला. पेला भरुन पाणी वाहू लागलं. ससाणा मात्र फारच लक्ष देऊन हे दृश्य पाहत होता. खान पेला ओठाला लावणार इतक्यात ससाण्याने खानाच्या हतावर झडप घालून पेला खाली पाडला. खान थोडासा रागावलाच. एकतर तो खुप दमला होता. त्याला तहानही प्रचंड लागली होती. उन्हातून फिरताना त्याचा कंठ कोरडा झाला होता. पण ससाणा त्याला अधिक प्रिय होता. म्हणून त्याने ससण्याला दंड दिला नाही.


खानाने पुन्हा पेला उचलला व स्वच्छ करुन पुन्हा पाणी भरु लागला. पेला भरत असतानाच ससाण्याने पुन्हा हल्ला केला व पेला खाली पाडला. आत मात्र खान प्रचंड संतापला. खानाने खंजीर काढला व ससाण्याला उद्देशून म्हणाला "आता जर पुन्हा असं केलंस तर तुला जीव गमवावा लागेल." खान पेल्याला हात लावणार इतक्यात ससाणा पुन्हा त्याच्या दिशेने झेप घेऊ लागला. या क्षणी मात्र खानाने कोणतीही दया न दाखवता खंजीर फिरवला. ससाणा रक्तबंबाळ होऊन खाली पडला. मरणापुर्वी त्याने थोडी तडफड केली व क्षणात तो मरण पावला. तहान लागल्यामुळे तो फारच व्याकूळ झाला होता. त्याने लगबगीने पेला उचलला व झर्‍यापाशी नेला.


पण पाण्याची धार आता संपली होती. खान फारच वैतागला. ज्या दिशेने पाणी वाहत होतं. त्या दिशेने तो डोंगर चढू लागला. त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. त्याला दम लागत होता. अखेर तो डोंगरावर आला. त्याला एक डबके दिसले. याच डबक्यातील पाणी खाली वाहत होते. त्याने अंदाज लावला. डबक्यात एक विषारी साप पडून मेला होता. त्याच्या तोंडून अचानक चित्कार बाहेर पडले "हे परमेश्वरा... हे काय केले मी. म्हणजे हे पाणी विषारी आहे म्हणूनच ससाणा हे पाणी मला पिऊ देत नव्हता. माझ्या हातून आज खुप मोठे पाप झाले."


पण आता पश्चाताप होऊन काहीच अर्थ नव्हता. कारण ससाण्याने मालकासाठी जीव गमावला होता आणि चेंगिजखानाने मैत्रीतील नैतिकता पाळली नव्हती. पण ससाण्याने मात्र नैतिकता पाळली होती.


Rate this content
Log in