प्रतिभा
प्रतिभा
कोणी कितीही प्रयत्न केला तरी त्याला त्याचे पहिले प्रेम विसरता येतच नाही पण दुसरे, तीसरे आणि चौथे किंवा त्यापुढचे सारे प्रेम सहज विसरता येते. असो ! वयाच्या पंदराव्या वर्षी मी कोणाच्यातरी म्हणजे प्रतिभाच्या प्रेमात पडलो होतो. त्यापूर्वी तसं काही केल्याचे मला स्मरत नाही. प्रेमात पडलो म्हणजे मला तिच्या काही गोष्टी मनापासून आवडत होत्या. जे माझ्याकडे नव्हते ते सारे तिच्याकडे मुबलक होते. हे एकमेव कारण असेल ही कदाचित मी तिच्या प्रेमात पडण्याला. ती दिसायला खूपच नव्हे अतिशय सुंदर होती. तशा प्रेमात पडल्यावर माणसाला सार्याच गोष्टी सुंदर दिसतात अगदी साठ वर्षाची व्य्क्ती सोळा वर्षाचीही दिसू शकते. तिचा आवाज खुपच गोड होता अगदी कोकीळ सारखा कारण कोकीळा गात नाही असं मी हल्लीच वाचलं होतं कोठेतरी ! त्याविरुद्ध माझा आवाज भसाडा होता दारावर भिक्षा मागायला येणार्या भिक्षुकासारखा ! ती शरिराने फारच नाजुक होती आणि मी हाडकुला आपल्या देशातील दुष्काळग्रस्त शेतकर्यासारखा ! तिला खो - खो खेळायला आवडायच आणि आंम्हाला गोट्या खेळायला. गोठ्या खेळणार्यांना आपल्या देशात अजूनही मानाचे स्थान मिळाले नाही आमच्या दुर्दैवाने ! आता पर्यत मी हजारो बायो-डेटे टाईप केले आहेत पण त्यात आवडता छंद म्ह्णून गोठ्या खेळणे असं कोणी टाईप करायला सांगितल्याचे किंवा तसे मी कोण्याच्या बायो-डेट्यात वाचल्याचे निदान मला तरी स्मरत नाही. तिला भाषण करण्याची फार आवड होती ते ही व्यासपीठावर उभं राहून आणि आम्हाला बापाचे फुकटचे भाषण ऐकण्याची आवड होती ते ही रफाटे खात ! आम्ही शाळेत असेपर्यंत व्यासपीठावर पाऊल ठेवल्याचेही मला स्मरत नाही. आता जेंव्हा कधी आम्ही एखादया व्यासपीठावर दिसू तेंव्हा नक्कीच आम्ही एखादया राजकीय पक्षाचे बिनपगारी कायकर्ते वैगरे झालेले असू असा माझा पूर्वी समज होता जो आता दूर झालाय ! तिचा चेहरा नेहमी हसरा आणि टवटवित असायचा गुलाबासारखा आणि आमच्या चेहर्यावर नेहमीच बारा वाजलेले असायचे बंद घडयाळातील. बंद घड्याळही दिवसातून दोनचा बरोबर वेळ दाखविते तसे आम्ही दिवसातून दोनदा चुकून हसायचो ! ती अभ्यासात भयंकर हुशार होती कारण शाळेत असेपर्यंत तीने पहिला नंबर कधीच सोडला नाही. कॉलेजात गेल्यावर तिचा तो नंबर सुटला त्याला काही बाह्य गोष्टी कारणीभूत होत्या हे वेगळे ! त्या कोणत्या होत्या यावर आम्ही भाष्य करू शकत नाही कारण आम्ही कॉलेज तोंड पाहिले ते फक्त चित्रपटात. कॉलेजात गेल्यावर मुली बिघडतात असं काही लोक म्हणतात पण मला वाटत त्या जरा जास्तच सुधारतात. आता मी तिच्यासमोर माझं प्रेम व्यक्त करण्याचा प्रश्नच नव्हता कारण ‘कहा राजा भोज और कहा गंगु तेली’ अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता जर मी तिच्यासमोर माझ्या प्रेमाचा प्रस्ताव मांडला असता आणि तिने तो स्वीकारला असता तर आमची जोडी राधा-कृष्णाची जोडी शोभली असती आमच्या रंगामुळे ! पण मला दांडीया खेळता येत नसल्यामुळे तिला त्यासाठी दुसरा कृष्ण शोधावा लागाला असता. दांडीया नाचायला मी कदाचित शिकलोही असतो पण तिच्या बोटावर नाचायला मला या जन्मात जमल नसतं. या एकाच बाबतीत आम्ही आमच्या बापावर गेलेलो आहोत.
वयाच्या पंदराव्या वर्षी मी तिच्या प्रेमात पडलो आणि मी माझ्या आयुष्यातील पहिले आणि शेवटचे प्रेमपत्र लिहले. ते प्रेमपत्र माझ्या काही कामाला आले नाही पण माझ्या मित्रांच्या कामी ते आजही म्हणजे इंटरनेटच्या जमान्यातही येत आहे. त्या पत्राला जणू अमरत्वाचे वरदान लाभलेले असावे. माझे मित्र मला म्हणतात , ‘ते पत्र तू तिला आज जरी दिलसं तरी सारं जग सोडून तुझ्याकडे धावत येईल वेड्यासारखी !’ सुरूवातीला मी जेव्हा तिच्या प्रेमात पडलो होतो तेव्हा माझा रस्त्यावरील लाईटचा खांब झाला होता. ती रस्त्यावरून येताना दिसली की जलायचा आणि ती निघून गेल्यावर विजायचा. मधेच एखादा कुत्राही त्याचा उपयोग करायचा कधी – कधी ! तिचा पाठलाग करणारा एखादा रोडरोमियो मला उगाचच छेडायचा कारण मी त्याला स्पर्धक वाटायचो. त्याच्याबरोबरच्या हाणामारीत माझे कपडे फाटायचे आणि घरी गेल्यावर आईच्या शिव्या पडायच्या ते वेगळे ! माझे कपडे फाटण्याचे खरे कारण आजही आईला कळलेले नाही. तिच्या प्रेमात पडल्या - पडल्या मी स्वतःच स्वतःला वचन दिलं होतं तिच्याशीच लग्न करायच आणि नाही केल तरी तिच लग्न होईपर्यंत आपण लग्न करायचं नाही. माझ्या दुर्दैवाने मी ते वचन पाळले आणि तोपर्यत माझ्यासोबत लग्न करण्याची इच्छा बाळगणार्या सर्वांची लग्ने झाली. मी माझं वचन पाळल्याचा मला अभिमान वाटत असला तरी जगाच्या दृष्टीने तो मुर्खपणा होता. आता मलाही काहीस तसचं वाटू लागलं होतं. तिच लग्न झालं ! ती दोन पोरांची आई झाली म्हणून माझं तिच्यावरील प्रेम कमी झाल अथवा संपल असं काही झाले नाही. माझ्या तिच्यावरील एकतर्फी प्रेमातच खरं म्हणजे माझे यश लपलेले होते. तिच्या प्रेमात पडलो तेव्हा तिला प्रेमपत्र लिहण्यासाठी मी पहिल्यांदा माझी लेखणी लेखक म्हणून उचलली जी कधीच खाली ठेवली नाही. त्या लेखणीतून नंतर जन्माला आल्या अनेक प्रेम कविता आणि कथा ! मी कवी आणि लेखक कसा झालो हा प्रश्न माझ्या मित्रांना आजही त्रस्त करतो कारण मी कोणाच्या प्रेमात पडू शकतो याची त्यांना शक्यताच वाटत नाही. मधल्या काळात अनेकजणी माझ्या प्रेमात पडल्या पण त्याला माझा नाईलाज होता. तिच्या मनात माझ्याबद्दल प्रेम होतं की नाही ते मला माहित नाही पण आदर नक्कीच होता कारण तिने ज्या यशाचं स्वप्न पाहिलं होतं ते यश आज माझ्या वाट्याला आलं होतं. साक्षात मेनकाही आता माझा तपोभंग करू शकत नाही इतका मी पाषाण हृदयी झालो आहे. माझ्या हृदयावर तिच्या आठवणींच कवच तयार झालंय ते कवच आता साक्षात ती ही भेदू शकणार नाही. प्रेम म्हटलं की आता मला हसू येत कारण सलग कित्येक वर्षे एकमेकांवर प्रेम करूनही क्षणाचाही विचार न करता दुसर्यांच्या मिठीत अगदी सहज विसावणारे आता मला माझ्या सभोवताली हजारोंच्या संख्येत दिसत आहेत. प्रेम देण्या – घेण्याची वस्तू झालेय. चॉकलेट वाटत फिरावे तसे आजचे तरुण- तरूणी प्रेम वाटत फिरू लागले आहेत. प्रेमासाठी त्याग करावा लागतो हे त्यांच्या गावातच नाही. कोणाचेही प्रेम कोणासाठी त्याच्या यशाची पायरी ठरायला हवं कोणाच्या पायातील काटा अथवा बेडी ठरायला नको असं मला वाटत. तिच्या प्रेमात पडल्यामुळे मी कवी झालो हे मी आज खात्रीने सांगू शकतो मी जेंव्हा पहिली कथा लिहिली तेंव्हा त्या कथेतील नायिकेला मी ‘प्रतिभा’ हे नाव दिले आणि ती कथा एका प्रतिष्ठीत दैनिकात प्रकाशित झाली. त्यानंतर माझी कथा बदलली, कथेच विषय आणि आशय बदलला पण माझ्या बहुतेक कथेतील नायिकेचे नाव प्रतिभाच राहिले. माझ्या कथा नियमित वाचणार्यां वाचकांना एक प्रश्न नेहमी पडतो की ही प्रतिभा कोण असावी ? त्यांना माझ एकच उत्तर असतं प्रतिभा एक कल्पना आहे. प्रतिबिंब आहे माझ्या स्वप्नातील प्रेयसीचे. तिच्याजवळ असणारे गुण मला कधीच कोणा एका स्त्रीत कधीच दिसले नाहीत. तिच्यातील काही गुण ज्यांच्यात दिसले त्यांच्यात दुर्गुणही तितकेच होते. माझ्या कथेतील प्रतिभा प्रत्यक्षात कधीच माझ्यासमोर आली नाही. प्रत्येक वेळी ती मला हुलकावणी देत राहिली. आजही देत आहे. प्रतिभाने माझ्यातील कवीला आणि लेखकाला जन्म दिला होता. पण माझ्या कल्पनेतील प्रतिभाला मात्र मी जन्म दिला होता. मला ती जशी हवी होती तशी मी तिला घडवली होती. माझ्या ईच्छेविरुद्ध ती काहीच करत नाही. ती माझ्या हातातील बाहुली झालेली आहे. मला वाटत आता तिला मुक्त करायला हवं तरच ती कल्पनेतून आता प्रत्यक्षात माझ्यासमोर प्रकट होईल आणि माझी तिला पाहण्याची युगानुयुगांची प्रतिक्षा संपेल कदाचित...