प्रसंगावधानी सिमा
प्रसंगावधानी सिमा
एका गावात रमेश व त्याची बायको सिमा राहत होते. रमेश बॅंकेत सर्व्हिसला होता...त्याला नोकरी निमित्त आई वडील गावाला सोडून शहरात राहत होता.पण रमेश खूप समजदार मुलगा होता. त्याला बायको पण तशीच समजदार मिळाली होती...मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात झालं ते रमेश आणि सिमा ला पण कळाले नाही. सिमा अत्यंत शांत ,सुस्वभावी,हसमुख सुंदर मुलगी होती. रमेश दिसायला खूप सुंदर होता, त्यामुळे सिमाच्या आईवडीलांनी पण लग्नाला लगेचच होकार दिला. बॅंकेत नोकरी असल्याने रमेशने स्वत:चा फ्लॅट शहरात घेतलेला होता. दोघे पती-पत्नी खूप आनंदाने राहत होते. सुखाचा संसार चालला होता. रमेश कधी कधी सुट्टीच्या दिवशी आपल्या मित्रांना आपल्या घरी बोलावून नाष्टा,कधी जेवण अधूनमधून द्यायचा.त्याचा बोलका स्वभाव मित्रांना जवळ खेचून आणायचा.
सिमाच्या हाताला पण भारी चव होती.एकसे बढकर एक पदार्थ करून रमेशला डबा द्यायची.मधल्या लंच ब्रेक मध्ये रमेश जेवायला मित्रांमध्ये जायचा तेंव्हा सर्वत्र भाजीचा घमघमाट सुटायचा आणि लोकांच्या तोंडाला आपोआपच पाणी सुटायचे...प्रत्येकाला आपला डबा रमेश शेअर करायचा.सर्व मित्र रमेशला म्हणायचे." यार तू खूप लकी आहेस तुला सिमा वहीनीसारखी बायको मिळाली आहे..." तुझी किती काळजी घेते सिमा वहीनी...दररोज,धुतलेले शुज,ईस्त्रीचे कपडे,हवं नको ते पहाते आणि जेवायला नानाविध प्रकार...यार तुझी खूप मजा आहे. तेव्हा रमेश आपल्या आईवडीलांचे कष्ट आठवायचा...रमेश आपल्या आईवडीलांना सोबत राहण्यासाठी खूप विनवणी करायचा. पण त्याच्या आई-बाबांना शहरात अधिक करमत नसे.त्यांना त्यांचा गाव,गावातला दगडाचा टुमदार वाडा,गायी.म्हशी,नोकरचाकर यातून नकोसे वाटायचे...!
बघता बघता रमेशच्या लग्नाला एक वर्ष होवून गेले.आणि एक दिवस पहाटे पहाटे सिमा झोपेतून उठली.आणि तिला अचानक धडाधड उलट्या व्हायला लागल्या.रमेशला काहीच समजत नव्हते काय झाले.तो खूप घाबरून गेला.सिमाला खूप अशक्तपणा आला होता.रमेशने त्या दिवशी बॅंकेत सुट्टी टाकली.आणि सिमाला घेऊन हॉस्पिटल मध्ये गेला.सिमाला डॉक्टरांनी अॅडमिट केलं.आणि रक्त,लघवी तपासायला पाठवली.तेवढ्यात खूप काळजीत असलेल्या रमेशला पाहून डॉक्टर साहेब आनंदाने म्हणाले.काळजी करण्याचे कारण नाही.रमेशराव गोड आनंदाची बातमी आहे.तुमच्या घरी नविन पाहुणा येणार आहे.रमेश व सिमाला खूप आनंद झाला.गावाकडेही बातमी गेली....
बघता बघता दिवस सरले...सुखाचे दिवस जायला काही वेळ नाही. एकदिवस मध्यरात्रीच अचानक सिमिला प्रसुतीच्या वेदना होवू लागल्या .रमेशने स्वत:च्या फोरव्हीलर गाडीत टाकून अवघ्या १० मिनिटांत सिमाला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला.रमेशला एकीकडे बाप होण्याचा आनंद आणि दुसरीकडे सिमाला होणारा त्रास तो पार हादरून गेला होता.सुखरू सिमाची सुटका व्हावी म्हणून देवाला हात जोडून प्रार्थना करत होता.थोड्याच वेळात नर्सने रमेशला आत बोलावले आणि एका सुंदर कन्येला रमेशच्या हातावर ठेवत नर्स म्हणाली.अभिनंदन सर... तुम्ही खूप नशिबवान आहात तुमच्या घरी कन्यारूपाने लक्ष्मी जन्माला आली आहे.रमेश भरल्या डोळ्यांनी त्या गोंडस राजकुमारी कडे बघत नकळत रमेशचे आपले ओठ नाजुक नवजात बालिकेच्या कपाळावर अलगद ठेवले.स्वर्गसुखाचा परमोच्च आनंदाची अनुभूती रमेश घेत होता. रमेश खूप खुश होता.सिमालाही घरी बहीण नसल्यामुळे मुलगी झाली म्हणून खूप खूश होती. रमेशला पण बहीण नसलेल्यामुळे रमेशचे आई-वडील ही खूश झाले होते.
सुखाचे दिव
स भरभर जात होते.एक दिवस सिमा रमेशला म्हणाली अहो आपल्या परीचा वाढदिवस आपण आपल्या गावी करूयात. तुमची मित्रमंडळी तर कायमच असते. आपण आई बाबांकडे त्यांच्या नातीचा बर्थडे करूयात.मी माझ्या पण आई बाबाला तिकडेच बोलावते.रमेशने लगेचच होकार दिला.आजच्या काळात सासुसा-यांकडे चला म्हणणा-या मुली कमीच आहेत याचे नवल रमेशला वाटत होते. रमेशपेक्षा जास्त सिमाला सासुसासरे व गावाकडचे वातावरण जास्त आवडत होते. दुस-या दिवशी स्त्रिया व रमेशने सर्व खरेदी करून ठेवली.रमेश सिमाला म्हणाला...मी आज माझी ड्युटी करून येतो मग संध्याकाळी निवांत जावूया गावाला...सिमाने सर्व तयारी करून कपड्यांची बॅग भरून घेतली.पहिल्याच मुलांचा पहिला वाढदिवस तो ही गावाला करायचा म्हणून सिमा खूप खूश होती.संध्याकाळी जेवणं आटोपून रमेश गाडीच्या डिकीत सर्व सामान व्यवस्थितपणे ठेवून सिमा आणि रमेश गावाला निघाले. प्रवास दूरचा असल्याने सिमा वारंवार रमेशला म्हणत होती.गाडी सावकाश चालवा.रमेश व सिमाच्या गप्पा जोरात रंगल्या होत्या.रमेश सिमाला सांगत होता की या ड्युटीमुळे कसा दिवस जातो आणि कशी रात्र संपते काही कळतच नाही.बघता बघता आपल्या संसाराला दोन वर्ष झाली आणि दोन हाताचे सहा हात झाले.आपण आपल्या परीला खूप शिकवायचं,तिला कलेक्टर करायची माझी इच्छा आहे.सिमा ही रमेशचं आपल्या लेकीवर किती जीव आहे हे पाहून आनंदित होती.
आता रात्र खूप झाली होती.रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी होती.सर्वत्र रातकिड्यांचा आवाज कानठळ्या बसेपर्यंत ऐकू येत होत्या.बाळ झोपलं होते सिमाच्या कुशीत...सिमाला ही नकळत डोळा लागला होता.रात्रभर गाडी चालवून रमेशची पाठ दुखत होती.मध्ये मध्येच रमेशला गुंगी चढत होती.डोळे खूप दुखत होते.तरी सिमा म्हणाली होती अहो.एखाद्या ढाब्यावर गाडी थांबवा आणि दोन तास गाडीतच झोपूया.थोडी झोप झाली म्हणजे बरे वाटेल.रमेशला वाटलं कशाला रस्त्याने वेळ करायचा? म्हणून रमेश सिमाला म्हणाला तू काळजी करू नको.पहाटेचा कुंद गारवा रमेशच्या अंगाखांद्याला लागत होता.मध्येमध्येच डोळे आपोआप झाकत होते.तरीही स्टेरिंग सुरूच होतं. सिमाची मात्र आता झोप उडाली होती.तीच लक्ष्य रस्त्यावर समोरच होतं.पहाट झाली होती.आता रस्त्यवरचे हळूहळू अंधुकपणे दिसत होतं.रमेश गाडी चालवत होता.अचनक गाडी रस्त्याच्या डाव्या दिशेने गेल्याची सिमाला जाणवली.समोर विहीर दिसत होती.आणि गाडीचा ब्रेक लागत नव्हता.क्षणात होत्याचं नव्हतं होणार या भितीने सिमाच्या काळजात लख्खं झालं.तेवढ्यात सिमा जोरात ओरडली.आणि आपल्या हाततल्या बाळाला गाडीच्या काचातून बाहेर फेकली.दुस-या क्षणी गाडी दाणकन विहिरीत गेली.विहीर तुडुंब पाण्याने भरलेली होती.सिमाच्या गाडीत पाणी शिरलं.रमेशला गाडीचं दार निघत नव्हतं.किमान तो तरी बाहेर निघून पोहला असता.सिमाचा जीव वाचवला असता.पण एका क्षणात काळाने सिमा व रमेशवर झडप घातली. दोघेही नाकातोंडात पाणी शिरून गाडीतच तडफडून मेले होते.सकाळ झाल्यामुळे लगेचच गावच्या कडच्या लोकांची गर्दी झाली.पोलिस आले....मृतदेह बाहेर काढले....बाळं गवतात पडले होते...जोरजोरात रडल्याचा आवाज ऐकून सर्वजण तिकडे पळाले.बाळ सुखरूप होते.पण बाळांचे आई-वडील बाळाचा पहिला वाढदिवस पहायला नव्हते.या घटनेनं बघ्यांच्याही डोळ्यांत पाणी तरळलं.पोलीस अधिका-याने पंचनामा केला आणि रमेशच्या घरच्यांना बोलावून घेतले... पोलिस म्हणाले रडु नका काका तुमची सून प्रसंगावधानी होती म्हणून तिने मरण डोळ्यासमोर असताना आपल्या मुलीला काचेच्या खिडकीतून बाहेर फेकले.. नाहीतर हे गोंडस बाळंसुध्दा आज आपल्यामध्ये नसते. बाळाला लगेचच हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले.