प्रेरणा
प्रेरणा
कोणाच्या आयुष्यात नेमका कोणता प्रसंग, कोणती घटना किंवा कोणती व्यक्ती त्याचं प्रेरणास्थान असेल हे सांगता येत नाही . पण कधी कधी आपल्यातल्या गुणांना ओळखणारी किंवा आपल्यासारखाच स्वभाव असणारी व्यक्तीसुद्धा आपली प्रेरणा ठरतात. स्वभाव ओळखायला वेळ निश्चितच लागतो. पण जेव्हा हे लक्षात येते की निश्चितच या व्यक्तीत काहीतरी आहे ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यात चांगले सकारात्मक बदल घडू शकतात, तेव्हा त्या व्यक्तीच्या सहवासात राहायला आवडतं, ही मनाची एक प्रांजळ भावना असते. त्या भावनेला निश्चित असे नाव द्यावेच असे काही नाही. आता अशी भावना दोन स्त्रिया किंवा दोन पुरुष यांच्यामध्येच असावी असे काही नाही. त्यातून ही गोष्ट काही ठरवून घडत नाही. कळत नकळत या गोष्टी सहज घडतात. मग याची जाणिव आपल्याला होते. परंतु यामुळे एखादी व्यक्ती निश्चितच एखादे उच्च ध्येय गाठू शकते, जीवन जगताना दुःख विसरून आनंदाने जीवन जगायला शिकते किंवा संकटांचा सामना खंबीरपण करायला शिकते. काहीही असेल पण यातून होणारी निर्मिती ही उत्कृष्टच होत असेल तर निश्चितच एकमेकांना साथ देणे हे आपले कर्तव्य आहे.
परंतु असे कधी घडते तर स्त्रीने स्त्रीला किंवा पुरुषाने पुरुषाला मदत केली तर. अन्यथा नाही. कारण एक स्त्री आणि एक पुरुष जर नात्यात असतील तर ठीक. नात्यात नसतील तर मात्र मोठा गहजब निर्माण होतो.
वपुंनी म्हटल्यासारखे जेव्हा एक स्त्री आणि एक पुरुष काही वैचारिक गोष्टीसाठी जरी एकत्र येत असतील तरी अख्खा समाज एक सेक्स रिलेशनशिपचा शिक्काच घेऊन बसलेला असतो. कोण कोणाला उगीचच कशाला मदत करेल ? त्यातून स्त्रीला मग बदनामीची भीती आणि नात्याला नाव नाही म्हणून पुरुषालाही भीती.
एक तर समाजात स्वतंत्रतेने वावरताना स्त्रियांना संघर्ष अटळच आहे. तू एक स्त्री आहेस तू असेच असायला हवे. तुझ्याकडे काहीही करण्याची जिद्द असली तरी नवऱ्याने किंवा घरातील इतरांनी पाठींबा दिला तर ठीक नाही तर तिचे आयुष्य एक वाळवंटच. काय अर्थ आहे मग स्त्री स्वतंत्र झाली म्हणण्याला ? स्वतंत्रता ही विचारांची हवी, एक माणूस म्हणून जगण्याची हवी. समानतासुद्धा वैचारीकच हवी. जर एखादा पुरुष कितीही नि:स्वार्थी भावनेने काही करत असेल तरी इतरांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळाच. म्हणजे मदत करणारा किंवा प्रवृत्त करणारा हा पुरूषसुद्धा कच खातो. मग वैचारिक संबंध एखाद्या स्त्रिशी ठेवूच शकत नाही. पुन्हा स्त्रिया ओरडणार आम्हाला पुरुष मदत करत नाहीत.
विचारांमध्ये सुधारणा होत असताना सर्वच वयांतील स्त्री पुरुषांमध्ये होणे गरजेचे आहे. एका समान पातळीवर जाऊन जर विचार केला तर निश्चितच आपल्या संपूर्ण समाजासाठीच्या काही समस्या दूर होण्यास वेळ लागणार नाही. आपली पुढची पिढी सक्षम विचारांची असेल. ठराविक मर्यादा पाळून स्त्रीपुरुषांनी एकत्र येऊन काम करण्याची आता नक्कीच गरज आहे. ज्यामुळे एक जबाबदार मर्यादा पाळणारी पिढी घडवण्यात आपण यशस्वी होऊ. समाजालाही अशा गोष्टींचे आश्चर्य वाटणार नाही. न जाणो यातूनच उद्या आपल्याला एखादा मोठा राजकारणी, अभिनेता, शास्त्रज्ञ, साहित्यिक घडलेला किंवा घडलेली दिसेल.