Kaustubh R

Others

0.4  

Kaustubh R

Others

देव भक्तीचा भुकेला

देव भक्तीचा भुकेला

2 mins
10.6K


श्रावण महिना आला . महिलावर्गाची स्वच्छतेची , उपवासाच्या तयारीची , पुजे अर्चेची लगबग सुरू झालीच म्हणून समजायचे . सगळी व्रतांची पुस्तके , आरत्यांची पुस्तके यांच्यावरची धूळ झटकली गेली .मनावरची धूळ तशीच . सगळे घर आरशासारखे स्वच्छ केले . पण मन सूर्यप्रकाशाइतके लख्ख झाले का ?

हे आणि असे असंख्य प्रश्न मला पडतात . संतांच्या म्हणण्याप्रमाणे वरच्या रंगरूपाला न भूलता आत्म्याच्या शांतीचा विचार करा . जेंव्हा जेंव्हा आपण वस्तूंची स्वच्छता करू तेंव्हा थोडी मनाची मरगळही झटकू . वाईट गोष्टी , चुका , कुरघोडी , अपमान सगळ सोडून देऊ . कहाण्यांमधून सुद्धा नेमका मतितार्थ घेतला तर बऱ्याच गोष्टी साध्य होतात . पण नेमके याच्या उलट करतो . त्याच्या गाभ्यापर्यंत पोचतच नाही .मी पारायण केले अमके तमके केले .मी म्हणते एक वेळेस समजले नाही . दोन -तीन वेळेस वाचा पण वाचनानंतर त्यातला नेमका महत्वाचा अर्थ समजून घ्या . त्याप्रमाणे आचरण ठेवा . मन शुद्ध, हेतू शुद्ध तर निश्चितच देवापर्यंत आपली भावना पोचतेच . मग भले तुम्ही उपास करा किंवा न करा . देवाला हे आवडते ते आवडते म्हणून फुले , पाने ढीग ढीग रचा किंवा न रचा . देव भक्तीचा भुकेला . दोन मिनिट तुम्ही डोळे बंद करून जरी मनापासून देवाचे चिंतन केले तरी त्याला चालते . इतकेच काय आपल्या कर्मातच आपला देव आहे असे मानले तरी चालते .परवाच देऊळ बंद सिनेमा पाहिला त्यातही हेच सांगीतले आहे तू फक्त सच्चाईने , प्रामाणिकपणे कार्य करीत राहा मी तुझ्या पाठीशी राहीनच.

म्हणजे बघा काही काही ठिकाणी तरूण स्त्रिया भजन किर्तनात दंग दिसतात . हे काही वाईट आहे असे मी म्हणत नाही . पण मला असे वाटते आता खरं तर काही करून दाखवण्याची जिद्द या वयातच घरातील वयोवृद्ध लोकांना आधार देण्याची पण हीच वेळ . या सगळ्या गोष्टींना बगल देऊन जर तुम्ही हेच करत बसलात तर देवाला सुद्धा हे मान्य होणार नाही .

बघा हं काम करत करत जरी राम नामाचा जप चालू ठेवला तर काही नुकसान तर होणार नाहीच . उलट डोक्यात कुठलेही अविचार न येता ते काम उत्कृष्ट होईल . संत लोक कुठे कामधाम सोडून भक्ती , पूजाअर्चा करत बसत होते ? त्या काळात भक्ती मार्गाचा , राष्ट्र प्रेमाचा विचार यांचा प्रसार त्यांना करायचा होता . तो त्यांनी केला . पण देव त्यांच्यावरच प्रसन्न झालाच ना .

आता काय होते आहे मी किती कोणापेक्षा जास्त भक्ती करतो किंवा करते हे दाखवण्याची चुरसच लागली आहे . पण यात वेळ खर्ची घालवण्यापेक्षा जे का रंजले , गांजले यांच्यासाठी आपण थोडा जरी वेळ काढला तर तीच खरी देवपूजा ठरू शकणार नाही का ? देव आपल्याला निश्चितच भेटेल फक्त कामावर नितांत श्रद्धा असावी ..


Rate this content
Log in