Kaustubh R

Others

3  

Kaustubh R

Others

माणसातील देव

माणसातील देव

3 mins
9.5K


एकदा आमच्या शाळेतील शिक्षकांची शैक्षणिक सहल निघाली साताऱ्याला . तिथून सज्जनगड , महाबळेश्वर ही ठिकाणे करायची म्हणून आम्ही निघालो . या वेळेस माझ्या सोबत माझी सदूसष्ट वर्षाची आई पण सोबत होती . माझ्या बरोबरीने सगळीकडे फिरत होती . अचानक मी तिच्याकडे सहज म्हणून पाहिले तर तिच्या गळ्याच्या थोडया खाली मला एक गाठ दिसली . ती गाठ काही लहान नव्हती .मी तिला विचारले हे काय ? किती दिवसापासून आहे ही गाठ ? ती म्हणाली नाही गं आत्ताच तर झालीय . पण हे वडिलांना सांगू नको म्हणाली . त्यांनी जर टेन्शन घेतले तर काय होईल ? असे वारंवार ती मला विनवू लागली .

मला तर असे टेन्शन आले की काही सुचेना . स्त्री खरोखरंच तिचं सगळं आयुष्य इतरांचाच विचार करण्यात घालवते याची मला जास्त प्रकर्षाने जाणीव झाली . पण जेव्हा माझ्या मैत्रिणींना मी हे सांगीतले तेंव्हा त्यांनी मला सल्ला दिला की ताबडतोब तपासणी करा . तेंव्हा मी आईच्या मागे लागून तिची तपासणी केली . निदान झाले कॅन्सरचे . मग ? मग माझ्या डोळ्यांपुढे अंधारच . आता पुढे काय ?ज्या बाईने आयुष्यभरात एकही गोळी खाल्ली नाही , कायम कष्टातच सगळा जन्म घालवला तिच्या नशिबात हा प्रसंग ?

आता मीच मला खंबीर करायचे ठरवले . माझे सगळे सहकारी मित्र - मैत्रिणी माझ्यासोबतच असल्याने मला धीर आला .मी भावांना विश्वासात घेवून सांगितले .आठ दिवस आम्हा भावंडांची मन : स्थिती

थाऱ्यावर नको . सगळे सोलापूर आम्ही पालथे घातले डॉक्टरचा शोध घेत . योग्य डॉक्टर मिळावा जो माझ्या आईला बरे करील . त्याच वेळेस एक नाव सतत आम्हाला कळू लागले .डॉ. फहिम गोलीवाले . कॅन्सर सर्जन . बस्स त्यांची भेट घेतली . तो देव माणूस आमच्या आयुष्यात आला .

त्यांनी आमची बाजू ऐकून घेतली .न घाबरता आपण या गोष्टीला कसं तोंड द्यायचं हे त्यांनी इतकं छान सांगितले की आमचे जे मानसिक खच्चीकरण झाले होते . ते नाहिसेच झाले . खरंच डॉ .गोलीवाले डॉक्टरांनी इतका चांगला अनुभव आम्हाला दिला कि त्याला तोडच नाही . जेव्हा ऑपरेशनची वेळ आली तेंव्हा माझे वडिल म्हणाले मी रिटायर्ड आहे .पैशाची जुळवाजुळव करायला थोडा वेळ लागेल तेंव्हा डॉक्टर म्हणाले ठीक आहे . तुम्ही पैशाची काळजी करू नका . फक्त अॅडमीट व्हा .मी पुढचे बघतो .आजच्या जमान्यात असा डॉक्टर भेटला यावर माझ्या वडिलांचा विश्वासच बसेना . योगायोगाने माझ्या भावाने खटपट करून पंतप्रधान योजनेअंतर्गत प्रयत्न केला व मदत मिळविली तो भाग वेगळा .परंतु आजकाल आपण पाहतो जो तो पैश्याच्या पाठीमागे लागलेला . पण डॉ . फहिम गोलीवाले ही एक व्यक्ती आम्हाला अशी भेटली की माणसातच आम्हाला देव भेटला .

आम्हाला ते वारंवार अशा प्रकारे धीर देत की मीच काय माझी आई तर त्यांना आपल्या भाच्याला बोलल्यासारखे बोलायची . हक्काने सांगायची . त्यांनी सुदधा माझ्या आईला मावशी हेच नाव दिले होते .एवढी जवळीक , एवढा समजूतदारपणा , कोणत्याही कठिण प्रसंगाला खंबीरपणाने कसे तोंड द्यावे या सर्व बाबी आम्ही त्यांच्याकडून शिकलो . प्रत्येक वेळेस आम्हाला त्यांच्या वागण्यावरून असे वाटायचे की यांचे जीवन किती व्यस्त आहे तरीही ते न कंटाळता प्रत्येक पेशंटशी एक माणुसकीचे नाते निर्माण करतात .

आता माझ्या आईची सगळी ट्रीटमेंट पूर्ण झाली आहे . ती व्यवस्थित आहे . देव दगडात नसून तो माणसात असतो , शोधला तर सापडतोच याबाबत माझी तरी आता पक्की खात्री झाली आहे . खूप खूप धन्यवाद देते मी डॉ . फहिम गोलिवाले सरांना .


Rate this content
Log in