मैत्री
मैत्री
मला एकदा माझ्या मुलाने एक प्रश्न विचारला . आई तुला किती मित्र मैत्रिणी आहेत ?मी म्हणाले असंख्य . तो म्हणाला , खरंच ? हो बाबा आहेत . त्याचे वय लहान असल्याने त्याला या गोष्टीचे नवल वाटले . मग मी त्याला विचारले तुला किती मित्र मैत्रिणी आहेत ?तो म्हणाला थोडेच . मग त्याला मी सांगितले की मैत्रीचं नातं हे खूप सुंदर असं नातं आहे . त्याला वयाची , धर्माची , जातीची, श्रीमंतीची, रंगरूपाची कुठलीच बंधनं नसतात . आपण अशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांशी मैत्री केली तर आपल्याला आयुष्यात काही ती कमी पडत नाही . मी मैत्री करताना प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव कसा आहे ते बघते . बाकीच्या गोष्टी माझ्या दृष्टीने गौण आहेत . मैत्री ही एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली असते. जेव्हा आपण हक्काने काही गोष्टी एकमेकांशी शेअर करतो तेंव्हा त्या बाबी फक्त आणि फक्त आपल्या पुरत्याच मर्यादित असतात . त्याचा इतर लोकांशी काहीही संबंध नसतो . म्हणून मैत्रीचा पायाच मुळी विश्वासावर अवलंबून असतो. शंका , अविश्वास यावर आधारीत असलेली मैत्री कधीच तग धरू शकत नाही . मैत्रीचं नातंच असं आहे त्यात हक्काने भांडण , रुसवा , वाद , अबोला या गोष्टी ओघानंच येतात . पण त्या गोष्टी जास्त ताणायच्या नाहीत . आपल्याला अंतर्यामी सुख मिळणारं एकमेव ठिकाण म्हणजे मैत्री . नुसतंच गोड गोड बोलणारी माणसे कधी धोकादेतील सांगता येत नाही . खरी मैत्री तीच जी एकमेकांच्या चुका सुदधा बिनधास्तपणे सांगतील आणि त्या चुका मान्य करून स्वत : त बदल घडवतील . प्रत्येकच मनुष्य काही परिपूर्ण नसतो परंतु त्याला योग्य ठिकाणी , योग्य प्रकारे पैलू पाडणारा , त्याला घडवणारा एक मित्रच असतो .
माझ्या बऱ्याच मैत्रिणी अशा आहेत जिथे चेष्टामस्करी चालते पण निंदानालस्ती नाही . हळूवारपणे एखादीची चूक दाखवून दिली जाते. ती सूधरून घेवून पुढे वाटचाल करावी . जेणेकरून जगात वावरत असताना ती सक्षम व्हावी, समर्थ व्हावी. कोणतेही संकट आले तरी तिने त्याला व्यवस्थित तोंड दिले पाहिजे . कच खाऊ नये असे आम्हाला एकमेकींबदादल नेहमी वाटते.
मैत्री म्हणजे आनंद , सुख मिळण्याचे एकमेव ठिकाण . म्हणूनच माणसाने आयुष्यात संपत्ती भले कमी कमवावी पण मित्र मैत्रिणी भरपूर कमवाव्यात तरच आपले आयुष्य अधिकाधिक समृद्ध बनते .