प्रेम कधी मरत नसतं
प्रेम कधी मरत नसतं
सात बहिणींचा ऐकुलता एक भाऊ.नवसानं झालेला.नाव शशिकांत.मुलाच्या आशेने सात मुली झाल्या. घरची परिस्थिती हलाखीची. अन् खाणारे तोंडं खूप. तरी वंशाचा दिवा हवाच्.
बापाला मुली प्रिय. पण पत्नी समोर त्यांच काही चालायचे नाही. पोरींसोबत बापालाही,ती हडहड करायची. शिव्याशाप द्यायची. मन दुखवायची.पण तिला उलट उत्तर द्यायची हिम्मत कुणाची.मुली तर गुमान ऐकून घ्यायच्या तीच सर्व.शशीच्या आधी त्यांना खुप काही ऐकून घ्याव लागायचं.मुलगा न होण्याचं खापर त्यांच्यावर फोडलं जायचं.पण शशीच्या जन्मानंतर सर्व बदल झाला होता. आता बस्स मुलां मुलींतील फरक जानवायचा त्यांना. जानवायचा कसला. आई जानवून द्यायची त्यांना. म्हणतात ना.बाई बाईची वैरी असते. तसलं काही होतं यांच्यात. पण जसजसा शशी मोठा होत गेला तसतसा बहीणींना आईच्या जाचापासुन वाचवायला लागला.आईला समजवायचा. भेदभाव चुकीचा.जसा मुलगा तश्याच मुली.आईला कुठे काही कळणार. तिच्या डोळ्यात एक वेगळीच अस्पष्टता होती. तिला मुलींचं प्रेम कधी दिसलंच नाही..पण त्या अमाप प्रेम करायच्या आई बापावर. अन् शशी तर त्यांचा जीव.
शशीच्या जन्माआधीच दोन बहिणींची लग्न झाले होते.आता घरात पाच बहिणी, आई बाबा आणि शशी असे आठ लोक. खाण्यापिण्याची कमतरता, गरजांची कमी व्हायची. शशीला कधी गरीबीचा चटका लागला नाही.पण त्याला बहीणींच्या प्रेमामुळे त्या सर्व गोष्टींची जाणीव होती.त्याची दहावी झाली तोपर्यंत आनखी तीन बहीणींची लग्न झाली. तो खूप अभ्यासू होता. खूप मेहनत घ्यायचा. पुढे कला शाखेत प्रवेश घेऊनत्याने त्यातच पदवी घेतली. आणि स्पर्धा परीक्षेच्या शिकवण्या लावल्या. तिथेच भेटली वैशाली. शशिकांत ची वैशाली. तसं ती त्याच्या घराजवळंच राहायची.पण सात बहिणींचा भाऊ दुसऱ्या मुलींना बघणार कसं.
ती दिसायला सुंदर. पण त्याला आवडायंचा तो तिचा मधाळ आवाज. खरंच खूप गोड आवाज होता तिचा आणि तिला आवडायचं त्याच्यातलं वेगळेपण. मुलींकडे बघायचा पण नाही. त्याच्या नजरेत मुलींबद्दल खूप मान दिसायचा तिला आणि त्यावरंच भाळली ती. हळूहळू करत दोघांमधील संभाषण वाढलं आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं त्यांच त्यांनाच कळालं नाही.
प्रेम बहरत चाललं होत.दोघांच्या घरी भनक न लागतांच. बघता बघता सहा महिने निघून गेले. वैशाली 22ची होत आली होती आणि तिच्यासाठी संबंध येत होते. आता तर मुलं बघण्याचा कार्यक्रम अगदी जोमात सुरू झाला होता. ती सारखी शशीला म्हणायची आपण लवकरच लग्न करू या. मला
तूला सोडून जगता येणार नाही. मला दुसऱ्या कुणाशीच लग्न करायंच नाही. शशी तिला खूप समजवायचा. आपल्याला अजून शिकायचंय. मोठ्ठं व्हायचंय. घरच्यांचा आधार बनायचंय आणि तिच्या नजरेत त्याचा मान आणखी उंचावत होता.
असेच काही दिवस निघून गेले. एक दिवस वैशाली त्याला सांगते की तिचं लग्न ठरलंय. आता. आता पुढे काय. हा मोठा प्रश्न दोघांसमोर उद्भवतो.पण शशी कसाबसा तिला धीर देतो. आपण लवकरच लग्न करुया सांगतो. तिच्या साखरपुड्याला आणखी दीड महिना वेळ असते. मी करतो
काहीतरी असा आश्वासक स्पर्श करतो तो तिच्या हातावर आणि ती पण डोळे बंद करून विश्वास ठेवते. त्या काळात दोघं पण 10-12वी च्या मुलांच्या शिकवण्या घ्यायला सुरुवात करतात. जास्त नाही पण 5-6 विद्यार्थी असतात सुरवातीला. लग्न म्हंटलं तर थोडा पैसा हवाच ना हाताशी.
शशी त्या दिवशी सकाळी लवकरच घरा बाहेर पडतो. वैशालीपण मैत्रिणीकडे जातेय असं सांगून घरून निघत आणि दोघ कोर्टात जाऊन लग्न करतात. त्यांच्या या शुभविवाहाचे साक्षीदार होते त्यांचे काही मित्र मैत्रिणी. ते सर्व आटपून ते घरी पोहचतात. शशीच्या घरी.घरचे सर्व त्यांच्या लग्नाच्या अनभिज्ञ असतात. आईच्या पायाखालची जमीन निघून जाते. ती दारातूनच त्या दोघांना निघून जा बोलते. शिव्याशाप देते. तोंड काळ करण्याआधी मेला का नाही बोलते. ज्याला इतकं जपत आलो. त्याने आपल्या मतानुसार हसावं बोलावं, असं त्यांच आत्तापर्यंतचं मत बनलं होतं. पण आयुष्याचा एव्हढा
मोठा निर्णय शशीने स्वतःच्या मनाने घेतला होता. हेच त्यांच्या हुकमी मनाला पटत नव्हतं. आई आपल्याला स्वीकारणार नाही एव्हाना त्याला हे कळून चुकलं होतं आणि बाबा आईसमोर बोलणार नाही. आता अपेक्षा होती ती फक्त बहिणींकडून. पण एरवी आईच्या विरोधात बहिणींच्याकडून बोलणारा तो आज पलीकडल्या किनाऱ्यावर होता. बायको आणि तो. बहिणी त्याला काहीच बोलल्या नाही. पण त्या त्याच्याकडून नव्हत्या हे मात्र नक्की. कारण
एरवी शशीसाठी त्यांच्या डोळ्यात दिसणारं प्रेम आज दिसेनासं झालं होतं. त्यांच्या मनात हेच सलत असणार की, आपण हे पाऊल उचलावं नाही म्हणून आपल्याला आजपर्यंत चुकीची वागणूक मिळत होती आणि हा मुलगा होता म्हणून याला लाडात वाढवलं आणि यानीच घरची इज्जत नीलाम केली. आई आणि बहिणी त्याच्या या उचलल्या पावलावर नाखूष होत्या. त्यांचा राग सहाजिकच होता म्हणा. हाताच्या फोडाप्रमाणे ज्याला जपलं तो त्यांच्या
नकळत एव्हढं मोठ्ठ पाऊल उचलेल हा विचार पण त्यांच्या मनाला कधी शिवला नव्हता. पण जो जीव आहे त्याचा अचानक इतका तिरस्कार मन कसं काय करू शकतं.
वैशाली निराधार नवऱ्याच्या पाठीशी आधार बनून उभी. तिथून नाकारल्यावर ते वैशालीच्या घरी जायला निघतात. पण त्यांच्या लग्नाची बातमी वणव्यासारखी त्यांच्य
ा आधीच पोहचते. तिच्या बापालाही ते लग्न मान्य नसते.पोरीने समाजात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. ठरवलेल्या सोयरीकीला काय उत्तर देऊ, असे नानाविध प्रश्न त्यांना भेडसावतात आणि ते पोरीला नाही नाही ते बोलून घराबाहेर काढून देतात. आता बस्स मित्रांचाच सहारा. आज तेच परिवार न तेच जीवलग भासत होते. त्यांनी शशीन वर्षाला त्यांच्या घरी नेलं. पण शशीला कुणावर अवलंबून राहायचं नव्हतं. त्याने मित्रांच्या सहाय्याने त्याच भागात एक खोली भाड्याने घेतली. जेवण मित्रांकडे केलं. कशीबशी ती रात्र घालवली. सकाळी हव्या त्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करून त्या दहा बाय दहाच्या खोलीत छोटासा संसार मांडला. 2-3 महिने सुखाचे गेले. पण नंतर पैशांची चणचण भासायला लागली. आता शिकवण्यापण बंद व्हायला लागल्या. मुलं येणंच बंद झाली. कारण असं की पळून जाऊन लग्न करणाऱ्याकडे कोण आपल्या मुलांना पाठवेल. शशी कामाच्या शोधात लागला. वैशाली या सर्व मानसिक आणि शारीरिक धावपळीत बीमार पडली. आता सर्व ताण शशीवर आला. दोन वेळचं जेवण एक वेळेवर, नंतर भातावर आलं. मित्रांना सांगावं तर त्यातलं एकपण आर्थिकरित्या सक्षम नव्हतं. आधीच त्यांनी जे केलं ते कमी होतं का म्हणून त्यांच्यासमोर तो हसत, सर्व ठीक आहे... असं दाखवायचा. पण खरं काय ते दोघांनाच माहिती.
पण त्या काळात पण त्यांच प्रेम एकमेकांच्यावरचा विश्वास क्षणभरही कमी झाला नाही. उलट त्यांच प्रेम आणखीनच बहरत जात होतं. अश्यातच
वैशालीला दिवस गेले. दवाखान्याचा खर्च वाढला. सर्व ठिकाणी शोधून शेवटी शशी पेट्रोल पंपावर काम करायला लागला. कलेक्टर व्हायची स्वप्न बघणारा तो. जशी स्वप्नांना पेट्रोल टाकून आग लावली होती त्याने आणि जळत होतं ते त्या दोघांचं आयुष्य. वैशाली खूप कमजोर झाली होती. तिला तशा हालतमध्ये ठेवून त्याला काम करणं नकोस व्हायचं. पण प्रेमापोटी आणि होणाऱ्या बाळाच्या काळजीपोटी तो दिवसरात्र काम करायला लागला. एकदा
तिची मोठी बहिण तिला भेटायला आली. पण वैशालीची हालत बघून तिला जे कळायचं ते कळालं आणि बाळ होत नाही तोपर्यंत ती वैशालीला सोबत घेऊन गेली. तिचं जायचं मन नव्हतं पण शशीच्या समजावण्याचा नंतर ती बहिणीच्या सोबत जायला तयार झाली.
ती गेल्यावर तो एकटा पडला होता. तरी तो जिद्दीने काम करायचा. हाताने जळकी भाजी पोळी बनवून खायचां.कमी खर्च. जास्त बचत. दिवस भरभर निघून जात होते. पण रात्र सरायची नाही. सतत तिची आठवण यायची. तिचा चेहरा दिसायचा. तिचा भास व्हायचा. पण सरतेशेवटी बाळाच्या गोड विचारांनी छान झोप लागायची. त्याला मुलगी हवी होती. तो वैशालीला नेहमी बोलायचा. आपल्या मुलीला मी जगातलं सर्व सुख देईल. तिचं नावपण ठरवलं होतं त्याने..."शर्वरी".
जशीजशी डिलिव्हरीची तारीख जवळ येत होती. तशीतशी दोघांच्याही जीवाला धाकधूक. त्यात हा दुरावा. त्याला वाटे आताच सगळं सोडून तिच्यापाशी जावं. पण आता ते दोघांचे तीन होणार होते. जबाबदाऱ्या वाढणार होत्या. म्हणून त्याने अजून जोमानं काम सुरू केलं. तो सक्काळीच उठून वर्तमानपत्र टाकत असे आणि पेट्रोल पंपावर डे नाईट ड्यूटी. इकडे वैशालीचे सगळे लाड पुरवल्या जात होते तिला हवं नको ते सर्व तिला मिळत
होतं पण लेकराला जन्म देताना बाईचा दुसरा जन्म होतो म्हणतात पण तिला या जन्मासाठी मानसिक आधाराची गरज होती. जो नवऱ्याकडून हवा होता. सर्व असूनही तिच्यासाठी ते नकोसं झालं होतं. जीवाच्या माणसासोबत खाल्लेल्या कोरड्या चटणी भाकरीला पण पंचपक्वान्नाची चव येते म्हणतात. नाही तर अमृतपण पाण्यासारखं लागतं.
सक्काळीच तिच्या पोटात दुखायला लागलं. वैशालीच्या बहिण आणि तिच्या नवऱ्याने तिला दवाखान्यात भरती केलं. लागलीच शशीलापण कळवलं. बाळ पोटात आडवं झालं होतं. डिलीव्हरी करणं आणखीनच कठीण होऊन बसलं होतं. त्यात नाळ बाळाच्या गळ्याभोवती आवळली गेली. आई नि बाळ दोघांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. शशीला सूचणंच बंद झालं. दुःखाचा डोंगर कोसळणे काय असतं याची प्रचिती त्याला आज आली होती. ज्या कारणाने अख्खा परिवाराच्या विरोधात जाऊन त्या कारणालाच परिवार बनवलं आज तेच कारण संपणार होतं. एरवी धीराने वागणारा तो. आज देवाकडे धाव घेत होता. तो पूर्णपणे कोसळून गेला होता. त्याचं आयुष्य बाळाला आणि वैशालीला लाभो, हेच परतपरत मागत होता. त्याचं
रडणं आता आवरेनासं झालं. तो सगळं संपल्यागत जीवाच्या आकांताने रडत होता.
अचानक कुणी येऊन त्याला कळवलं की आई आणि बाळ दोघंपण ठीक आहेत. वैशालीचं सीझर झालं होतं तरी ती अजूनही शुद्धीत नव्हती. त्याला काय करू न काय नाही असं झाल होतं. दुःखाचे आसू आनंदाश्रूंमध्ये कधी बदलले त्याला कळालंच नाही. पण त्याने दुरुनच बाळाला पाहिलं आणि दवाखान्यात पेढे वाटायचे म्हणून पेढे आणायला गेला. येताना दवाखान्यासमोरच अपघातात जागीच जीव गेला त्याचा. डोळ्यांत आनंदाश्रू. चेहऱ्यावर
समाधानी हास्य आणि बाजूला सांडलेला तो पेढ्यांचा पुडा. ऐकलं देवानं त्याचं. इच्छा लगेच पूर्ण झाली.
इकडे वैशालीची हालत कुणाच्या समजण्यापलीकडली होती. तिला सत्याला सामोरं जाणं कठीण जात होतं. ती कधी हसे तर कधी रडे. जेव्हा भानावर आली तेव्हा तिने सावरलं स्वतःला... शर्वरीसाठी. तिच्या लेकरासाठी, त्याच्या अंशासाठी, दोघांच्या स्वप्नासाठी...
म्हणतात ना प्रेम कधीही मरत नाही. संपते ते शरीर. आता ती एक अनाथाश्रम चालवते. त्या प्रत्येक मुलाला पदराशी घेते ज्याला विधात्याने तिच्या लेकीसारखं पोरकं केलं...