कोवळा अंश......
कोवळा अंश......


दुपारच्या रखरखत्या अंग पोळून काढणार्या उन्हाच्या वेळेला....... कोवळ्या उन्हाबद्दल लिहीणं जरा विचित्रच.....पण विषयच असा आहे की मनातल्या सुप्त भावनांना जीवंत व्हावसं वाटतंय....... कामं आटोपून नुकतीच बसली..... सकाळी कामाकामात शांपू केलेले केस अजूनही ओलसर होते..... तसेच बांधून ठेवले होते ना त्यांना सकाळपासून....... आता कुठं क्लचरच्या बंधनातून सुटकेचा निश्वास सोडला होता त्यांनी..... आज का कोण जाणे.... म्हातारी असल्यागत वाटायला लागलं..... एकदम तसेही नाही म्हणा.....पण ती चंचल अशी माझ्यातली मी कुठेतरी गायब झाली होती...... दिवस कामात संपवून.... वेळ मिळाला की पुस्तक वाचणं.... दुपारी सर्वांसाठी चहा ठेवून परत संध्याकाळी..... रात्रीच्या जेवनाची तयारी करणं.....हल्ली कित्येक दिवस झाले.... हेच करतंय मी........आता नाही आवडत मला ते धांगडधिंगा वाले गाणे ऐकणं.....त्यांची जागा आता शांत मनाला आल्हद देणार्या संगीताने घेतली होती...... का कोण जाणे.... ह्या शांततेची गरज का भासतंय मला.....आता त्या संगीतावर पाय पण थिरकायला बंद झालेत माझी.......या वेळेला पावसाळा बराच लांबला .....पण एक दिवस पण मी घरी त्या पावसात ओले चिंब होऊन आले नाही...... का मला बाहेर जातांना नेहमी छत्री सोबत नेण्याची आठवण राहायची...... उन्हाळ्यात पण तसंच......कधी बर्फाच्या त्या रंगबिरंगी गोल्याची जागा family pack वाल्या ice cream ने घेतली कळलंच नाही......कालचीच गोष्ट घ्या ना .....त्या भाजीवाल्याशी पाच रुपये कमी करण्यासाठी भांड भांड भांडली मी.......पुर्वी आईशी भांडायची.....की देऊन दे ना ग त्या काकांना पाच रुपये जास्त.... तेवढेच ते खूश होतील........ तशीच ताडकन उठून घरात गेली..... लागलीच स्वतःला आरशासमोर उभं केलं......खरं खोट करायला....... माझी मलाच मी वेगळी भासली....... निस्तेज चेहरा..... डोळ्यांभोवती काळे घेरे.... ज्यांनी मला कधीचंच घेरलं होतं.....
सुंदर काळेभोर लांब केस मी तसेच कायम बांधून ठेवायची..... हातापायाची त्वचा कोरडी झाली होती जणू त्यातलं पाणी पण डोळ्यातल्या पाण्यासोबतंच आटलं होतं...... कधीचं हसतांना रडतांना पाहलं नव्हतं स्वतःला...... आणि कोवळ्या उन्हाच्या किरणांचा अंश कधीच जवाबदार्यांच्या खिडकीआड गेला कळलंच नाही.