आठवण सांजवेळेची...
आठवण सांजवेळेची...


किती दिवसानंतर इतकी सुंदर सांज खुलली होती..... की तिलाच वेळ नसायचा सांज पाहायला....... ती जाणे अन् तिची सांज जाणे...... पण त्या दोघींचं एकमेकींवर अमाप प्रेम...... जणू सांज तिच्यासाठीच खुलायची आणि ही रेखाटायची चित्र तिचं स्वतःच्या डायरीत शब्दांच्या रंगाने......
वाफाळलेला चहा आणि फोन घेऊन जाऊन बसली माळीवर...... सांजीच्या रंगांची उधळण डायरीच्या पानांवर करायला...... फोनमधल्या डायरी app मध्ये "सांज" पासवर्ड टाकून बसली खरं.... पण आज शब्द साथ देत नव्हते...... एक वेगळीच हुरहूर जाणवत होती..... मनाला.....
मग चाळत बसली आयुष्याची मागची रंगवलेली पानं...... चाळता चाळता त्या दिवसाचं पान उघडलं...... ज्या दिवसाने तिच्या मनावर काळ्या रंगाच्या रेघोट्या ओढल्या होत्या.........
कसला तरी पेपर होता तिचा पुण्याला.... वय वीस वर्षे...... इतक्या दुर जायचं म्हणून आईबाबा पण सोबत होते...... 6 वाजता ट्रेन होती आणि हे 5-5:30 च्या दरम्यान स्टेशनवर पोहोचले...... ट्रेनची वाट पाहत हे तिघे तिथेच बेंचवर जाऊन बसले......
सुंदर अशी सांज खुलली होती..... हवेत गारवा जाणवत होता....... दिवसभर तापलेला सुर्य जरासा नमला होता जणू.... स्टेशन जवळपासच्या वडाच्या-पिंपळाच्या झाडावर पक्ष्यांची घरवापसी होत होती..... त्यामुळे किलबिलाटच किलबिलाट......
सांजीने तिच्या रंगांची जादू दाखवायला सुरुवात केलीच होती की तिचं लक्ष तिच्यासमोर बसलेल्या आजीवर गेलं..... त्या आजीच्या चेहऱ्यावर सांजीचा तांबडा रंग अगदी खुलून दिसत होता...... गोरा गोरा रंग..... रेखीव असे सुंदरसे डोळे...... सुरकूत्यांमध्ये पण ते सौंदर्य उठून दिसत होतं.....
ती याच विचारात की ही आजी तिच्या जवानपणी किती सुंदर दिसत असेल...... तोच त्या आजीच्या आवाजाने तिची तंद्री भंगली...... पोरी पाणी मिळेल का थोडं..... घसा कोरडा झाला..... असंच काहीसं बोलली होती ती आजी....
हिने लगेच स्वतः जवळची पाण्याची बाटली त्या आजीला दिली..... हात थरथरत होते म्हणून त्या आजीला पाणी पिणं काही जमत नव्हतं..... ती खाली बसली त्या आजीजवळ आणि स्वतःच्या हातात बाटली घेऊन त्या आजीला पाणी पाजायला लागली......
बाटलीला तोंड लावून पाणी पिलं म्हणून आईबाबाने तिच्याकडे रागाने पाहिले..... तरी ती न भिता त्या आजीची तहान भागवत होती...... पाणी पिऊन झाल्यावर आज्जीने तीला आशीर्वाद दिला....
ती आजी खूप आवडली होती तिला...... एक वेगळीच ओढ होती त्यांच्यात...... तिला आजीला भेटून एक वेगळाच आनंद मिळाला....... ट्रेन आली आणि ते तिघं आत जाऊन बसले..... ही खिडकी पाशी जाताच आजीला शेवटचा निरोप द्यावा म्हणून हात वर करते.... आजी चेहऱ्यावर समाधानी हास्य आणत हात वर करतेच.... आणि खाली जमिनीवर कोसळते.......
आजीला अचानक काय झालं हिला तर काही कळतच नाही..... बाबा जे घडलं ते पाहातच असतात..... ते लगेच बाहेर जाऊन चौकशी करतात..... तोपर्यंत खाली बाजूला असणारे रेल्वे पोलीस काका जातात आजीपाशी..... तिचा जीव गेला होता...... अनोळखी नातीच्या हातचं शेवटचं पाणी पिऊन........
ती आजी पण सांजवेळीसारखी तिच्या आयुष्यात रंगांची उधळण करून एक अंधारलेली रात्र देऊन गेली..... त्या सर्व आठवणींमधुन बाहेर येतेच तर अंधारलेलं होतं...... सांजीचे सर्व रंग कधीचेच गडप झालेले असतात त्या गर्द रात्रीत.....