Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Pradip Joshi

Comedy


3.6  

Pradip Joshi

Comedy


पोटपूजा- हॉटेल कम खानावळ

पोटपूजा- हॉटेल कम खानावळ

4 mins 1.1K 4 mins 1.1K

गण्या मॅट्रिक परीक्षा कसं तरी पास झालं. समद्या विषयात 35 गुण पडलं. मास्तरांनी त्याच्या आत्मविश्वासाची तोंडभरून स्तुती केली. निकाल जाहीर झाला अन् मास्तरच गण्याच्या घरला आलं. त्याच्या बाला भेटलं. म्हणालं, “पोर नाव काढल्याशिवाय राहणार नाय. त्याला तालुक्याला धाडा. मला त्याच्यात स्पार्क दिसत्यात.“

मास्तरांच्या बोलण्यावर गण्याच्या बानं विश्वास ठेवला. शेतात काबाडकष्ट करून पोराला तालुक्याला धाडलं. पोरगं नेमकं काय शिकतंय हे शेवटपातूर बाला कळलं नाय. एक दिस पोरगं हायफाय कापडं घालून घरला आलं. बाला काही समजंना.


गण्या म्हणाला,”बा आता काय बी काळजी करू नको. मी हॉटेल यवस्थापनाचा कोर्स केलाय. आता आपुन गावात फायु स्टार हॉटेल सुरू करू. मग काय बक्कळ पैसा. काय बी चिंता नाय.“

बा म्हणाला,”लेका हॉटेलचं काढायचं हुतं तर त्या इराण्याकड शिकून घ्यायचं. त्याला तालुक्याला जायची काय गरज. उगचच्या उगाच पैसा उधळपट्टी करतुयास.”

गण्या काय बोलला नाय. त्यानं भाड्यानं एक इमारत घेतली. चांगली पाच-सहा खोल्याची. एका खोलीत भटारखाना, एका खोलीत माल ठेवायची जागा, एक खोली कामगारांना, एक चोरून दारू पिणारासाठी. एक दोन मात्र राखीव ठेवल्या. हॉलमध्ये भारतीय बैठक केली. समोरच त्याची गल्ल्यावर बसायची जागा. सारं कसं आगळंवेगळं.

बाहेरच्या बाजूला भला मोठा बोर्ड लावला. पोटपूजा-हॉटेल कम खानावळ. 24 तास सेवा. बोर्डवर मोठी पातेली, मोठ्या डिश, वाडगी यांची चित्रे. वाट्या, चमचे, भांडी याला पूर्ण फाटा.


गावातील माणसं यायची बोर्ड बघायची मातूर त्यांना त्यातलं काय बी कळायचं नाय. हॉटेल सुरू व्हायला अजून आठ दिवसाचा अवधी होता.

एकानं गण्याला हॉटेलच्या नावाबद्दल इचारलं. गण्या म्हणाला ते तर वैशिष्टय हाय. पोटपूजा म्हणजे पोटाची पूजा. देवाची पूजा आपण कशी मनोभावे करतो. तशीच पोटाची पूजा करायची. त्याला काय बी कळलं नाय. गण्या म्हणालं उद्या ये आणखी काही बोर्ड बघ मग समजलं तुला.


दुसऱ्या दिवशी हॉटेल बोर्डानीच रंगून गेले. बोर्डावरील मजकूर असे होते. 1) एटिकेट हेच आमचे ध्येय- चमच्यांचा वापर निषिद्ध आहे. सूप, बासुंदी, रस वाडग्यात दिला जाईल. वाडग्याने तो घटाघटा पिऊन टाकावा. ताक, कढी यात मीठ घालून पाची बोटाने चांगली ढवळावी. वाडग तोंडाला लावावे आणि ताक-कढी संपेपर्यंत ते बाजूला करू नये. 2) आमटीला वाटी दिली जाणार नाही. थाळीभर भात दिला जाईल. त्याच आळं तयार कराव. त्यात आमटी एकदाच ओतली जाईल. तूप आचमनापुरते दिले जाईल. डाळीचे दर भडकल्याने वरणाचा अट्टाहास कोणी धरू नये. 3) ताकभात, आमटीभात, वरणभात, दहीभात यापैकी एकाचीच मागणी करावी. मसालेभात असेल तर यापैकी काहीही मिळणार नाही. 4) पाण्याऐवजी कोणाला आमटी प्यायची असेल तर त्याची आगाऊ सूचना द्यावी. आंम्ही आमटीचे जग पुरवतो. त्यामुळे आमटी संपवण्याची जबाबदारी ग्राहकांची राहील. त्याचे पार्सल करून मिळणार नाही. 5) रसगुल्ले खाताना तोंड वर करून ते जिभेवर सरकवावेत. ते खाली पडल्यास जादा दिले जाणार नाहीत. 6) जिलेबी-मठ्ठा एकत्र खाऊ नये. तुम्ही फक्त जिलेबी खा आमचा माणूस तुमच्या तोंडात मठ्ठा ओतेल. श्रीखंड, आम्रखंड खाताना ते बोटावर घ्यावे नाम ओढल्यासारखे जिभेला चाटवावे. 7) आम्ही पापड, चटणी, कोशिंबीर, कुरडया देत नाही. हे पदार्थ उगाच जागा अडवतात. हे पदार्थ फिरवले जातील ज्यांना हवेत त्यांनी पाच बोटांचा वापर करून ते आपल्याच तोंडात टाकावेत. 8) बटाटेवडे, भजी आम्ही फारसे देत नाही. दोन ताटात एक बटाटेवडा दिला जातो. तो अर्धा-अर्धा करून घ्यावा. भज्यांच्या बाबतीत कांदेभजी, मिरचीभजी, बटाटेभजी, कोबीभजी असे नखरे असल्याने आम्ही त्यांना हद्दपार केले आहे. 9) आमचे व्हेज-नॉनव्हेज विभाग वेगळे आहेत. तथापि मटण, चिकन, मच्छी याचा एखादा पीस निघाला तर उगाच आकांडतांडव करू नये. प्रत्येकाला ताटाबरोबर गोमुत्राची एक छोटी वाटी दिली आहे. ते पीस काढून टाकून गोमुत्राचे दोन थेंब पानात टाकावेत व जेवण सुरू करून सहकार्य करावे. 10) आम्ही ड्रिंक्स पुरवतो. हवे असल्यास तुम्ही जेवायला बसलात त्याच्यामागे एक नळ व त्याला जोडलेली छोटी पाईप आहे. त्याच्याखाली कोणता ब्रँड हवा ते लिहिले आहे. बटन दाबताच पाईपमधून पाहिजे तो ब्रँड येईल. कोणताही गाजावाजा न करता पाईपने तो प्यावा. बिल येईल ते तिथल्याच पेटीत प्रामाणिकपणे टाकावे. चोरून प्यायचे असल्यास शेजारच्या खोलीत जावे. ११) तुम्ही नॉनव्हेज खाताय हे कोणाला समजू नये म्हणून त्याला वांग्याच्या भाजीचा फ्लेवर दिला आहे. 12) बडीशेप, पान, सुपारी आम्ही देत नाही कारण ते एक प्रकारचे व्यसनच आहे.


नियमावली वाचून गिऱ्हाईक थक्क झाले. अखेर हॉटेल सुरू करण्याचा दिवस उजाडला. उदघाटन झालं. मंडळी जेवायला बसली. गण्याच्या या अभिनव हॉटेलचं सर्वांनी कौतुक केलं. गण्याची एक शाखा चांगली चालली. त्यानं दुसरी शाखा उघडली. बघताबघता सगळीकडे पोटपुजेचे बोर्ड झळकू लागले. गण्याच्या बाला आपण गुणी पोराला जन्म दिल्याचे बघून जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान लाभले. मास्तरांचा पहिल्यांदाच अंदाज बरोबर आल्यानं त्यांना एक पगारवाढ मिळाल्याचं समाधान लाभलं. तुम्ही कधी गेलात तर गण्याच्या पोटपूजा हॉटेलमध्ये जाऊन या. जमलंच तर गण्याचा आदर्श घ्या.


Rate this content
Log in

More marathi story from Pradip Joshi

Similar marathi story from Comedy