STORYMIRROR

Sarita Sawant Bhosale

Inspirational

2  

Sarita Sawant Bhosale

Inspirational

पोलिसाच्या बायकोचे पत्र

पोलिसाच्या बायकोचे पत्र

5 mins
331


प्रिय नवरोबा,  हसला असशील नाही का प्रिय वाचून.. आणि मनात म्हणालाही असशील आज हिला वेड लागलं की काय ??? हे पत्रप्रकरण वगैरे काय नवीनच. पण तुला माहीत आहेच असे काहीतरी वेगळे सुखद धक्के द्यायला मला आवडतच. तेव्हाचं तुझ्या चेहऱ्यावर आलेलं हे गोड हसू पाहून मी मनोमन सुखावते म्हणून तर ती जातानाच तुझ्या खिशात हे पत्र ठेवलं. तसे सरप्राईज द्यायचे आणि तुझं गोड हसू पाहण्याचे क्षण फार कमी मिळतात ना आम्हाला तुझ्या नोकरीमुळे. आता आजचंच बघ...तुझा वाढदिवस आहे पण तू आमच्यासोबत नाहीस तर समाजाची सेवा करत भर तळपत्या उन्हात उभा असशील खाकी वर्दीत.. ते मास्क आणि सॅनिटायझरही सोबत घेऊन. आजच हा कोरोना आजार आलाय म्हणून तू आमच्यासोबत नाहीस अस तर मुळीच नाही कारण लग्न झाल्यापासून तुझा एकही वाढदिवस आपण त्याच दिवशी साजरा करू शकलेलो नाही...मुलांचीही नेहमी इच्छा असायची की बाबाने त्याच्या वाढदिवसा दिवशी केक कापावा पण ते आजतागायत शक्य नाही झालं. कधीकधी तर तू मुलांच्या वाढदिवसालाही नसतोस.. हिरमुसतात बिचारी पण आता त्यांना कळतं की आपला बाबा समाजातील वाईट प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी जन्मलाय. तो आपला आहेच, असणारच पण समाजाप्रती कर्तव्य हे त्याचं प्राधान्य असणार आहे. आज मुलंही निवांत घरी आहेत..कोरोना आजारामुळे. त्यांच्या मित्र मैत्रिणीपैकी बऱ्याच जणांचे पालक दोघेही घरीच आहेत...मग त्यांनी त्यांच्या बाबांसोबत हसत खेळत घालवलेले क्षण पाहिले की मला येऊन विचारतातच की का बाबा पोलीस आहे?? जर तो पोलीस नसता तर आज आपल्यासोबत असता खेळायला. त्यांचं निरागस मन शेवटी.  पण पोलिसांची नोकरी म्हणजे 24 तास ड्युटी,खूप काम, ऊन्हा पावसात,रात्र दिवस रस्त्यावर बंदोबस्त करा,अनिश्चित सुट्ट्या, कधीही कामावर बोलावणे, अनिश्चित काळासाठी परिवारा पासून लांब राहणे, सणवार असो की दुःखद घटना पण आधी ड्युटी मग वैयक्तिक आयुष्य अस म्हणत जर सगळ्यांनीच या मार्गावर येणं थांबवलं तर मग समाजातील लोकांची सुरक्षा कोण करणार??? आज या भयावह परिस्थितीत सगळी जनता घरात बसून आहे पण तुम्ही तुमचा जीव मुठीत घेऊन रक्षण करताय या जनतेचं. तुम्ही नसता तर कदाचित ही परिस्थिती आटोक्यात आणणं कठीणच झालं असतं. पोलीस म्हणजे काय आणि पोलीस का व्हायचं असतं..आपला बाबा किती मोठं काम करतोय हे सांगितलं की अभिमानाने मुलांचाही उर भरून येतो. आनंदाने तेही म्हणतात मी पण बाबासारखा पोलिसच होणार आणि देशाची सेवा करणार. तेव्हा मला अभिमान वाटतोच मुलांचा पण तीच भीती,तीच असुरक्षितता जी तू घरातून बाहेर पडल्यावर मी रोज अनुभवते तीच मनी दाटून येते आणि डोळे पाणावतात. परवाच तुझ्या डोक्याला मार लागला तरीही तू थांबला नाहीस. मी तावातावाने म्हणालेही मी सांगते तुझ्या साहेबांना एवढं लागलंय एक दिवस तरी घरी राहु द्या आरामासाठी त्याला... त्यावर तू फक्त हसलास आणि म्हणालास अस नसत ग पोलिसाच्या नोकरीत. आणि या घडीला तर मी आराम करूच शकत नाही. अस बोलून डोक्यावरची ताजी जखम घेऊन तू ड्युटीवर पोहचलास देखील. खरंतर घरातुन बाहेर पडू नका सांगितलं असतानाही काहीजण घराबाहेर पडून फिरत होती.. तुमचं ऐकत नव्हती म्हणून नाईलाजाने तुम्हाला त्यांना मारावं लागलं पण त्यांची चूक त्यांच्या लक्षात न येता त्यांनी तुम्हालाच दगडफेक केली आणि त्यातलाच एक दगड तुला लागला. टीव्ही वर फक्त तुम्ही लोकांना मारहाण कशी केली हे दाखवलं पण तुझ्या डोक्याला झालेली जखम तुझ्यापर्यंतच राहिली.    खरंतर या जनतेचाच जीव वाचावा म्हणून तुमचा जीव तुम्ही धोक्यात घालत असता पण कधीतरी ते तुमच्याच जीवावर उठतात. खूपदा असंच पोलिसांनाच विनाकारण जबाबदार ठरवून त्यांना नावं ठेवली जातात...तुम्ही ज्या जनतेचं रक्षण करता तीच जनता तुमची बऱ्याचद

ा अक्कल काढते. तुमच्या कामात तुम्हाला सन्मान मिळण्याऐवजी अपमानच जास्त होतो. अहोरात्र काम करूनही, एकेक दिवस वडापाव खाऊनही सरतेशेवटी उपेक्षाच पदरी पडते. पण तुम्ही तुमचं काम अगदी प्रामाणिक पणे करत राहता अर्थात याला काहीजण अपवाद असतील आणि यांमुळेच पोलीस खातं जरा बदनाम असेल. पण त्या अपवादांत तू नाहीस माहितीये मला. तुझं तुझ्या नोकरीवर, देशावर असणार निस्सीम प्रेम पाहिलंय मी.     

26/11 लाही तू असाच परत कधी येईन, येईन की नाही असं सांगून घरातून बाहेर पडला होतास. दहशतवादाला संपवण्यासाठी जीवाची बाजी लावून लढला तुम्ही सगळेच. तेव्हाही क्षणाक्षणाला मन कापत होतं. नको त्या विचारांच काहूर मनात दाटत होतं..२६ जुलैला कोसळणाऱ्या मुसळधार पावसातही तू तीन दिवस घरी आला नव्हतास तेव्हाही मी देव पाण्यात ठेवलेले. आजही परिस्थिती तीच आहे. फक्त लढा दहशतवादाशी किंवा निसर्गाशी नाहीतर एका भयानक आजाराशी आहे. तू घरी येईपर्यंत मन थाऱ्यावर नसतं आणि आलास तरी माझ्यापासून सगळे लांबच राहा अस सांगतोस..तेव्हा तर अजून जीव घाबरा होतो. या परिस्थितीशी सगळेच लढतायत पण तू आणि डॉक्टर त्या सीमेवर लढताय आणि सोबत तुमचं कुटुंबही. तू समोर असून फक्त दुरून पाहात राहायचं आपल्या मुलांचं दुःख माझ्यापासून लपत नाही आणि तुझ्यापासूनही. असो. ही परिस्थितीही बदलेल आणि तू पुन्हा आधीसारखा आमच्यासोबत असशील खात्री आहे मला.    आजपर्यंत तू खूप सुख दिलंस,भरभरून प्रेम केलंस आपल्या कुटुंबावर ते तसच राहूदे. एका पोलिसाची बायको म्हणून तुला काय वाटतं अस नेहमी विचारत असतोस ना म्हणूनच हे पत्रातून मांडलं. आपल्या मुलांना जसा अभिमान आहे तसाच मलाही गर्व आहे माझा नवरा पोलीस असल्याचा. भले आजपर्यंत प्रत्येक सण, प्रत्येक दिवस,आमचे वाढदिवस तू ड्युटीवर आणि आम्ही घरे असे साजरे होत असले तरी तू बाहेर लढताना आम्हीही एक लढाई तुझ्यासोबत घरात राहून लढत असतो पण तरीही तुझ्या कामाचा ,नोकरीचा आम्हाला नेहमी अभिमानच राहील. माझे बाबा पोलीस असं सांगताना मुलांची मन ताठच राहील.    तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो..खूपखूप प्रगती होवो आणि सदैव अशीच निष्ठेने,प्रामाणिकपणे तू देशसेवा करत राहो ही शुभेच्छा आणि दरवर्षीप्रमाणे तुझा पुढचा तरी वाढदिवस साजरा करण्यासाठी तू आमच्यासोबत असशील अशी आशा मनात बाळगून हे पत्र संपवते. पहाटेही लवकर गेलास आणि तू रात्री आला असशील तेव्हा मुलं झोपली असतील म्हणून त्यांच्याकडूनही तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तर वाट बघतेच तुझ्या आवडीचा केक बनवून. जमेल तितकं लवकर ये.                             

तुझीच प्रिय,   बायको


 पत्रात प्रत्येक पोलिसाच्या बायकोच्या मनातील भावना मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. अहोरात्र झटणाऱ्या खाकी वर्दीतल्या माणसालाही कुटुंब असतं. वेदना,व्यथा,प्रेम,दुःख साऱ्या भावना असतात पण वर्दीच्या आतच दडून असतात....आपल्याला दिसतात ते फक्त पोलीस. एका बायकोला पोलीस म्हणून कळलेला नवरा.    पत्र आवडल्यास लाईक,कॉमेंट्स नक्की करा. शेअर करा फक्त नावासहितच. सदर पत्राच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव. धन्यवाद!                


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational