पिगी बॅग
पिगी बॅग
समरच्या आजोबाचा ६० वा वाढदिवस करण्याचे त्याच्या आई-बाबांनी ठरवले. नातेवाईक मित्रमंडळी सगळ्यांना आमंत्रण देण्यात येणार होते. आई-बाबांनी आजोबांसाठी मस्त अशी गिफ्ट सिलेक्ट केली होती. समरच्या दादा आणि ताई पण आपल्या लाडक्या आजोबांना गिफ्ट देणार होते. आजीने वाढदिवसादिवशी देवळात पूजा करायचे ठरवले. सगळेच या ना त्या कारणाने यात गुंतले होते.
तयारी जय्यत चालू होती. आई आणि आजीने कॅटरिंगची जबाबदारी सांभाळली होती. दादा, ताई आणि बाबा इतर तयारी सांभाळत होते. यात मात्र समरला तू अजून लहान आहेस म्हणून बाजूला सरकवलं जात होतं.
समरने आईला विचारले, "आई मी काय गिफ्ट देऊ आजोबांना?"
"अरे तू अजून लहान आहेस आम्ही देऊ तेच तुझं पण गिफ्ट असेल ना..."
"नाही आई तुम्ही सगळे तयारी करता, मला लहान म्हणून काहीच नाही सांगत. मी काय आता लहान आहे, मी आता सहावीत आहे, मोठा झालोय. मला पण आजोबांच्या वाढदिवसाची तयारी करायची आहे..."
"हो का बाळा..."
"हो"
(एवढ्यात आईला बाबाची हाक येते आई निघून जाते)
समर मनात ठरवतो काही झालं तरी आपण आजोबांना गिफ्ट द्यायचं. तो आपल्या रूममध्ये जातो. ड्रॉवरमध्ये ठेवलेली पिगी बॅग उघडतो आणि पैसे मोजतो तर त्याच्या जवळ २०० रुपये जमलेले. आता या पैशाचं काय गिफ्ट द्यायचं, तो विचार करतो. तो शाळेतून येताना गिफ्टशॉपमध्ये जातो आणि त्यांना २००रुपयेपर्यंत आजोबांसाठी गिफ्ट दाखवा म्हणतो.
शॉपवाला त्याला दोन तीन गिफ्ट दाखवतो.
तो विचार करतो कुठलं घेऊ.
त्याला आठवतं, आजोबा शब्दकोडी सोडवयाला नेहमी पेन शोधत असतात. जर आपण त्यांना पेन दिले तर त्यांना उपयोग होईल. समरने ते सोनेरी रंगाचे पेन पॅक करायला सांगितले. पैसे देऊन गिफ्ट बॅगमध्ये ठेऊन तो घरी निघाला. आता त्याला उत्सुकता होती कधी तो ते पेन आजोबांना देतो.
वाढदिवसाचा दिवस उजाडला. आजोबांना सगळयांनी विश केले. संध्याकाळी सगळे नातेवाईक, मित्र मंडळी जमली
. आजोबांनाही भरून आले. सगळ्यांनी मिळून केक कापला. गिफ्ट्स दिल्या. समरही खुशीत होता. त्यानेही आजोबांना गिफ्ट दिले. आई बाबा सगळेच आश्चर्यचकित झाले.
"आजोबा माझं छोटंसं गिफ्ट तुम्हाला नक्कीच आवडेल..."
"अरे पण बाळा तू गिफ्ट कशासाठी आणलंस आणि पैसे कोणी दिले तुला?"
"आजोबा ते सोडा पण गिफ्ट पाहा हे..."
सगळी मंडळी गेल्यावर समर आजोबाच्या मागे लागला त्याचे गिफ्ट उघडण्यासाठी...
"अरे हो..."
आजोबांनी गिफ्ट उघडलं. सोनेरी पेन पाहाताच आजोबांचे डोळे पाणावले.
"अरे पाहा, माझ्या नातवाने मला काय गिफ्ट केलंय ते..."
आई, बाबा, आजी, ताई, दादा सगळे आले.
सगळ्यांनी एकच प्रश्न केला, "अरे तुला पैसे कोणी दिले?"
"मला कशाला कोण पैसे देईल मी स्वतः विकत घेतले..."
"अरे पण पैशाशिवाय कोण देईल तुला..."
"ते सोडा आजोबा आवडलं ना गिफ्ट?"
"अरे खूप तर..."
"आता मला सांग पैसे कोणी दिले तुला?"
"अहो आजोबा, पैसे माझ्याकडे होते. माझ्या पिगी बॅगमधून मी घेतले..."
"अरे पण पिगी बॅग तर तुझ्यासाठी आहे ना मग कशाला खर्च केले..."
"आजोबा तुम्ही मला चॉकलेट आणता, एवढे लाड करता मग मी एवढे केले तर काय बिघडले... आता तुम्हाला कोडी सोडवायला पेन शोधावे लागणार नाही..."
"वाह हे गिफ्ट माझ्यासाठी खूप जवळचं आहे, थँक यू बाळा..."
"वाह आमचा बाळ एवढा मोठा झाला हे आम्हाला कधी कळलंच नाही..."
"हो आई-बाबा तुम्ही उगीच मला लहान म्हणता..."
"तुम्हा सर्वांचा मी आभारी आहे. आज माझ्या वाढदिवशी तुम्ही एवढी तयारी केली खरंच मी नशीबवान आहे म्हणून मला असं कुटुंब मिळालं पण त्यात दुधात साखर टाकली ती या समरने..."
"चला एक फॅमिली फोटो होऊ जाऊ दे...." दादा उत्तरला...