The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

परेश पवार 'शिव'

Drama Tragedy Others

4.5  

परेश पवार 'शिव'

Drama Tragedy Others

फुलराणी

फुलराणी

27 mins
696


अजय आज खूश होता. बरेच दिवसांनी घरात वर्दळ झाली होती. समारंभ आटोपला होता. खूप दिवसांनी माणसांची बडबड होती घरात. अंगण सारवलं गेलेलं. एकेक करून जो तो आपापल्या घरी निघून गेल्यावर रांगोळ्या काढून सजवलेलं ते अंगण पाहत अजय ओसरीवर उभा राहून विचार करत होता. सगळं शांत होतं पण प्रसन्न होतं. शमा गेल्यानंतर तर घर जणू पडीक झालं होतं. पुन्हा कधीही घर किंवा अजय हसेल याची कुणालाही खात्री वाटत नव्हती. सगळ्या प्रसन्नतेने भारलेल्या त्या वेळीही शमाच्या विचाराने काही वेळ अजयची तंद्री लागली.


शमा देशमाने.. कॉलेजमधली सगळ्यांत देखणी, सुस्वभावी, हुशार आणि अष्टपैलू मुलगी. शिवाय श्रीमंत घरातली एकुलती एक. इतकं सगळं असूनही कसला व्यर्थ अभिमान नाही. वाद विवाद स्पर्धेत समोरच्याला हमखास चितपट करणारी शमा एरव्ही मात्र खूप शांत असायची. तिच्या या स्वभावामुळे तिच्या आणि इतरही वर्गातील मुलं तिच्या मागे अगदी गोंडा घोळत असायचे. पण तिच्या मनात मात्र एकानेच घर केलं होतं. तो म्हणजे अजय शिंदे. एका गरीब, मध्यमवर्गीय घरातील एक रुबाबदार तरुण. अभ्यासात आणि बाकी सगळ्या उपक्रमांत कायम हिरीरीने सहभाग घेऊन कॉलेजला खूप सारी बक्षीसं सुद्धा मिळवून दिलेली त्याने. वाद विवाद स्पर्धा जरी शमाची असली तरी वक्तृत्व स्पर्धेत नेहमी अजय बाजी मारायचा. शिवाय कॅरम आणि बॅडमिंटन स्पर्धेतही त्याला तोड नसायची. 


अनेक स्पर्धा, त्यासाठीचे दौरे यांमध्ये नकळतच कुठेतरी दोघेही एकमेकांकडे ओढले गेले होते. हळूहळू दोघे कॅन्टीन आणि लायब्ररी मध्ये सोबत दिसू लागले होते. नंतर तर बऱ्याच जणांनी त्यांना बागेत एकत्र पाहिलं होतं. पूर्ण कॉलेज मध्ये जेव्हा बातमी पसरली तसे अनेकजण आणि अनेकजणी असे सगळेच हळहळले होते. शमाच्या लांब वेणीत गुलाबाचं फूल भरणाऱ्या अजयला पाहून मुली आणि लाजून अजयच्या मिठीत शिरणाऱ्या शमाला पाहून सगळी मुलं नुसती चरफडायची. पण अजय आणि शमा दोघेही सोबत अगदी शोभून दिसत असत, हेही तितकंच खरं. श्रीमंत शमाच्या घरी हे सगळं मान्य होणारं नव्हतंच. पण शमा आपल्या निर्णयावर ठाम होती. तिला आपली निवड आणि अजय दोन्हीवर विश्वास होता. म्हणून तर घरच्यांनी विरोध करूनही तिने अजयशी पळून जाऊन लग्न केलं.


अजयच्या घरी त्याची एक आई असायची. वडील अपघातात वारले तेव्हा अजय १०-१२ वर्षांचा होता. तेव्हापासून खूप कष्टाने आईनेच त्याचा सांभाळ केला होता. अजयनेही तिचे मन कधी मोडले नाही. कायम तिच्या मर्जीत राहून वागला. ना कसले व्यसन.. ना कधी कुणाच्या अध्यात ना मध्यात.. आणि आता शमासारखी इतकी सुंदर आणि गुणी सून आणली होती त्यामुळे आईसुद्धा खुश होती. पण आता अजून एक समस्या होती त्यांच्यासमोर.. त्यांनी लग्न तर केलं होतं पण दोघांपैकी कुणाकडेही काम नव्हतं. त्यामुळे आता सगळ्यांत आधी काम शोधणं हीच मोठी गरज होती त्यांची. तसे दोघेही हुशार, होतकरू आणि व्यवहारी होते. त्यामुळेच तर शेवटच्या वर्षाची परीक्षा देऊन झाल्यावरच दोघांनी लग्न केलं होतं. दोघांनीही काम शोधायला सुरुवात केली. पण काही दिवसांनी अजयची आई आजारी पडली. शमा श्रीमंत घरातून आलेली खरी पण तिच्यात संस्कारांची कमी नव्हती. तिने काहीसा विचार करून अजयला काम शोधायला सांगितलं आणि ती स्वतः आईजवळ थांबली. तिची सेवा करू लागली. अजयकडे मात्र आता काम मिळाल्याशिवाय काही पर्याय नव्हता. पैसे भरून काम मिळवणे त्याच्या तत्वात बसत नव्हतं. आणि त्याच्याकडे नेमकी तीच मागणी केली जात. घरची स्थिती पाहता त्याने आपल्या तत्त्वांना मुरड घातली असती पण पैसा कमावण्यासाठी काम हवं होतं त्याला त्यामुळे काम मिळवायला त्याच्याकडे पैसा कुठून येणार? अजय आता हळूहळू निराश होत होता. शमा त्याला धीर देई. आईदेखील तर सगळं पाहून दुःखी होत असत. आपल्या मुलासाठी कसलीही तरतूद करून ठेवू शकलो नाही याची तिला खंत वाटू लागली. शमा ज्याप्रकारे अजयला सांभाळत होती ते पाहून मात्र ती सुखावत होती.


या सगळ्या प्रकाराला आता ६ महिने होत आलेले. अजय निव्वळ त्याच्या पेपर टाकण्याच्या कामावर टिकून होता. हल्ली खूप निराश असायचा तो; पण आई आणि शमा त्याची ताकद बनून त्याला सावरत असत. शेवटी एके रात्री झोपताना शमा म्हणाली,

"अजय, तुझी धडपड मी पाहतेय गेले कित्येक महिने.. पण आता मलाही काही करुदेत आपल्यासाठी. मी काम बघते. आईंची काळजी नको करू. त्यांची तब्येत आता बरी आहे. आणि आपण दोघेही आहोतच की त्यांच्यासाठी. तुझे प्रयत्न तू चालू ठेव. पण आता सोबत मीही माझे प्रयत्न करून बघते."

अजय काहीच न बोलता तिच्याकडे फक्त पाहत राहिला. त्याला मनातून खूप वाईट वाटलं पण तो काहीच करू शकत नव्हता. इतक्या सुखवस्तू कुटुंबातून ही माझ्यासाठी आलीय आणि आपण तिला साधं सुख देऊ शकत नाहीत याचा त्याला पश्चात्ताप होऊ लागला. होकारार्थी मान हलवून तो कूस बदलून झोपी गेला.


दुसऱ्या दिवसापासून शमा काम शोधायला लागली. आणि संयोगाने तिच्या तात्यांच्या एका जुन्या मित्राच्या ओळखीने तिला एका वकिलांच्या हाताखाली काम मिळालं. अर्थात तात्यांना याबद्दल काहीही न सांगण्याच्या अटीवर तिने ते स्वीकारलं होतं. तसंही तिला पुढे एलएलबी करायचं होतंच. त्यामुळे ती खुश झाली. घरी पैसा तर चालू झाला होता. पण आता अजयवर जबाबदारी जास्तच वाढली होती. किमान तो तसं समजत होता. त्याला चैन पडत नव्हती. वृत्तपत्रातील जाहिराती बघून त्याचे प्रयत्न तो करतच होता. आणि त्याच्या नशिबाने एके ठिकाणी त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली सुद्धा. तो खूप खुश झाला. त्या संध्याकाळी त्याने शमाला कामावरून थेट मंदिरात बोलावलं. तिथे त्याने तिला सगळं सांगितलं. दोघांनीही देवीचे आशीर्वाद घेतले आणि मग चौपाटीवर थोडी मजामस्ती करून आईसाठी मिठाई घेऊन ते घरी परत आले. आईदेखील ते ऐकून खुश झाली. हात जोडत पाणावलेल्या डोळ्यांनी तिने देवाचे आभार मानले. जेमतेम ३-४ दिवस झाले असतील कामावर जाऊन आणि अजयला तिथे विचित्र वाटायला लागलं. तिथले कर्मचारी एका वेगळ्याच कुत्सित नजरेने त्याच्याकडे पाहत. समोर कुणी बोलत नव्हतं काही पण तरी तो त्यांच्यात गेला की त्यांचे विषय थांबायचे किंवा बदलायचे. चाणाक्ष अजयच्या नजरेतून ती गोष्ट सुटली नव्हती. त्याला कसंतरीच वाटायचं पण मग आपलं काम भलं आणि आपण भले असा विचार करून त्याने दुर्लक्ष करायचं ठरवलं. एके दिवशी साहेबांनी अजयला बोलावून घेतले आणि सोबतच्या सहकाऱ्यांसमोर त्याचा पाणउतारा करू लागले.

"तुम्ही इतके हुशार आहात ना मग ही चूक कशी झाली? काम जमत नाही तर विचारून घ्या आणि शिकून घ्या पण असल्या चुका नकोत मला पुन्हा. तात्यासाहेब देशमानेंचे जावई म्हणून तुम्हाला कामावर ठेवलं नाहीतर आम्ही इथे कामचुकार लोकांना अजिबात ठेवत नाहीत. समजलं? या आता!" अजयला काही कळेना आधी. पण मग तात्यांचा उल्लेख येताच त्याला कळून चुकलं होतं की हे काम त्याला वशिल्यावर देण्यात आलं आहे. त्याचा स्वाभिमान त्याला शांत बसू देत नव्हता. त्याने तिथलाच एक कागद आणि पेन उचलला आणि लागलीच राजीनामा लिहून साहेबांच्या हातात दिला आणि तो निघून गेला. सगळेच अवाक् होऊन केबिनच्या बंद होणाऱ्या दाराकडे पाहत राहिले. भानावर येत साहेबांनी राजीनामा वाचला.


आदरणीय व्यवस्थापक साहेब,

श्री. तात्यासाहेब देशमाने यांचा जावई असण्यापलीकडे माझे असे स्वतंत्र अस्तित्व आहे. आणि त्याला पाहून, पारखून घेऊन मला सदरच्या पदासाठी योग्य समजल्यामुळे तुम्ही मला कामावर ठेवले होते असा माझा समज होता. परंतु, तो माझा गैरसमज होता. त्यामुळे आता इथे काम करणे मला संयुक्तिक वाटत नाही. सबब मी माझ्या पदाचा राजीनामा लिहून देत आहे.


आपला,

अजय शिंदे


घरी आल्यावर आपल्या आधीच अजयला आलेलं पाहून शमा खुश झाली आणि तिला आश्चर्य सुद्धा वाटले. पण त्याचा आवाज नाही किंवा नेहमीप्रमाणे त्याने रेडिओ सुद्धा लावला नव्हता. तिने हातातली पर्स जागेवर ठेवत आईंना विचारलं,

"अजय आलाय ना? कुठे आहे? आणि घर शांत कसं इतकं?"

"काही कळत नाही. आलाय तोच अगदी शांत आहे. माझ्याशी पण काहीच बोलला नाही. सरळ तुमच्या खोलीत निघून गेलाय." आईंनी सांगितलं.

तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर हलक्याशा आठया येऊ लागल्या. आणि शमा लागलीच अजयला हाक मारत त्यांच्या खोलीत गेली. खिडकीपाशी असलेल्या खुर्चीत डोळे मिटून पडलेला अजय तिला दिसला. तिची हाक ऐकूनही त्याने तिच्याकडे पाहिले नाही. शमाला विचित्र वाटलं. ती त्याच्या पुढ्यात जाऊन गुडघ्यावर बसली आणि त्याच्या मांडीवर हात ठेवून त्याच्याकडे बघून लाडाने त्याला चिडवत म्हणाली.

"इतका कसला राग आलाय बाबूला माझ्या? माझ्यावर रागावला का?"

अजयने तिला बाजूला केलं आणि खिडकीजवळ जाऊन उभा राहून बाहेर पाहत राहिला. त्याला इतकं चिडलेले पाहून शमाने ओळखलं काहीतरी मोठं कारण असणार. त्याशिवाय हा चिडणार नाही. तिने त्याच्या समोर जाऊन त्याला विचारलं.

"अजय, काय झालंय? सांगशील का मला? कामावर काही झालं का? का इतका चिडलास की माझ्याशी नाहीच पण आईंशीसुद्धा तू बोलला नाहीस."

अजयचा राग कमी होत नव्हता त्यामुळे तो तिथून निघून जाऊ लागला पण तिने त्याचा हात पकडला आणि त्याला थांबवलं आणि काहीश्या रागाने म्हणाली.

"अजय, काय झालंय ते एकदा सांग मला नीट. मी बोलतेय तुझ्याशी. निघून कुठे जातोय असा?"

त्याने वळून तिच्याकडे पाहिलं. तो आता रडवेला झालेला. ते पाहताच शमाने त्याला मिठी मारली. आणि विचारू लागली.

"काय झालं रे? सांग ना.."

"मी नालायक ठरलो. मी तुझ्या आणि आईच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकलो. मी नालायक ठरलो आज.." - अजय.

तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. त्याला पलंगावर बसवत धीर देत तिने विचारलं.

"असं का म्हणतोय? तुला कुणी काही बोललं का?"

"मी राजीनामा देऊन आलोय आज." डोळे बंद करून एक मोठा सुस्कारा सोडत अजयने सांगून टाकलं.

"अरे पण का? असं अचानक?"

"कारण मला ते काम निव्वळ एका पात्रतेवर मिळालं की मी श्री. तात्यासाहेब देशमाने यांचा जावई आहे. बाकी माझी काहीही लायकी नाही."

स्वतःचा तिरस्कार वाटल्यासारखे हावभाव करत अजय म्हणाला. ते ऐकून शमा काय ते समजली. ती उठली आणि अजयला घेऊन निघाली. रिक्षात बसून त्यांनी थेट तिचे घर गाठले. तिचे तात्या आणि आई अंगणातल्या लॉन मध्ये बसून चहा घेत होते. त्यांच्यापुढे जाऊन उभे राहत शमा उद्वेगाने म्हणाली.

"मला माहित नव्हतं तुम्हाला गरिबांची इतकी दया येते ती. यापूर्वी कधी दिसली नाही मला ती तुमच्या डोळ्यांत. माझ्या नवऱ्याला तुमच्या भिकेची काहीएक गरज नाहीय. आणि तुम्हाला वाटत होतं ना की कुठल्याश्या भिकारड्या मुलाशी मी लग्न केलं म्हणून..? तर आता तुम्ही बघा. ज्याक्षणी त्याला कळलं की ही नोकरी तुमच्या दयेने मिळाली आहे त्याक्षणी त्या नोकरीला लाथ मारून आला आहे हा अजय. घरी इतकी हलाखीची परिस्थिती असून सुद्धा. हा आहे माझा अजय. ज्याच्यावर मी प्रेम केलं आणि आज मला सार्थ अभिमान आहे त्या गोष्टीचा. आज जे झालं ते शेवटचं. यापुढे आमच्यासाठी काही करायचं झालं तर फक्त तुमचे आशीर्वाद असुद्यात. बाकी तुमचं आम्हाला काहीच नको. चल अजय..!"

असं म्हणत तिने अजयचा हात धरला आणि त्याला घेऊन तिथून निघाली. तिच्यामागे चालत चालत अजय तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. आणि तिथे तिचे आई बाबा थक्क होऊन फक्त बसून त्यांच्या पाठमोऱ्या आकृतींकडे पाहत राहिले.


रिक्षात बसून अजय आणि शमा घरी निघाले. दोघेही एकही शब्द बोलत नव्हते. घराजवळच्या बागेपाशी येताच तिने रिक्षा थांबवण्यास सांगितली. अजय तिच्याकडे बघत होता पण तो काही बोलला नाही आणि तिच्या मागोमाग उतरून त्याने रिक्षाचे पैसे दिले. ती बागेच्या दिशेने जाऊ लागली तसा तोही तिच्या मागे जाऊ लागला. एका निवांत ठिकाणी दोघे बसले. तिने त्याच्याकडे पाहिलं. अजयला कळलं की ही कोणत्याही क्षणी रडेल. आणि तसंच झालंही. ती अजयच्या खांद्यावर डोकं ठेवून खूप रडली. त्यानेही तिला मनसोक्त रडू दिलं आणि मग काही वेळाने तिचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणाला.

"जे झालं त्यात तुझी काहीही चूक नव्हती. आणि थोडा त्यांच्या बाजूने विचार केला तर चूक कदाचित तात्यांचीही नव्हती. कुठल्या बापाला वाटेल की त्याच्या मुलीने अश्या गरीब घरात हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढावेत."

"पण त्यासाठी तुझा स्वाभिमान दुखावून तुझा अपमान करण्याची काय गरज होती त्यांना..?" 

रडवेल्या स्वरात शमाने प्रश्न केला. त्यावर त्याने हसून तिला जवळ घेतलं. काही वेळ तिला शांत करण्यात गेल्यावर ते दोघे सावरले आणि घरी निघाले. दोघांना शांतपणे घरी आलेलं पाहून आईंनाही बरं वाटलं.


दुसऱ्या दिवसापासून अजयचे काम शोधणे पुन्हा एकदा सुरू झाले. आणि बहुधा आता नशीब त्याच्यावर खरंच खुश होतं. एका प्रथितयश बँकेची नवीन शाखा त्यांच्याच शहरात उघडणार होती त्यासाठी भरतीची जाहिरात त्याला दिसली. आणि त्याच्या नशिबाने कोणत्याही वशिला किंवा एकही पैसा न देता त्याला तिथे चांगल्या पदावर काम मिळालं. आणि मग मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाही. त्याच्या मेहनतीचे फळ त्याला लवकरच बढतीच्या स्वरूपात मिळाले. २ वर्षांतच तो सहायक व्यवस्थापक म्हणून काम पाहू लागला. आता मात्र घराला सुगीचे दिवस दिसायला लागले होते. शमाने एलएलबी साठी प्रवेश घेतला होता. आईंनी आता नातवाचे तोंड दाखवा, असा हट्ट सुरू केला होता.

पण लग्नाला ४ वर्षे होत आली तरी घरी पाळणा हलेना. सुखाच्या संसारात एकच काय ती कमी राहिली होती. त्याची आता सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. पण हळूहळू आता त्या विचारांनी त्यांचे दिवसरात्र हरवून चालले होते. एकमेकांना दिलासे दिले जात होते. आशा हळूहळू सुटत चालली असताना एके दिवशी त्यांना गोड बातमी मिळाली. नशीब हसलं होतं. आता अजय अजूनच काळजी घेऊ लागला होता शमाची. शिवाय आईंनाही हुरूप आला होता. एके दिवशी आई आणि शमा दुपारी ओसरीवर बसल्या होत्या. आई रामायणाचे पाठ वाचून दाखवत होत्या तिला. इतक्यात अंगणात एक गाडी येऊन थांबली. शमाने गाडी ओळखली पण तिला पाहून चेहऱ्यावर आलेला आनंद लपवला आणि खुर्चीत बसून राहिली. गाडीतून तिचे आई आणि तात्या आले होते. त्यांना पाहताच आईंनी हातातलं काम बाजूला ठेवून त्यांना आत बोलावलं. पाणी वगैरे पिऊन झालं तरी शमा त्यांच्याशी बोलायला तयार नव्हती. शेवटी तिच्या आईने जवळ जाऊन तिला मिठी मारली तसा तिचा सगळा राग विरघळून गेला. आणि दोघी मायलेकी खूप रडल्या. ते पाहून अजयच्या आईनेही डोळ्यांना पदर लावला आणि तात्याही गहिवरले.

"इतकं परकं केलंस का मुलीला? की मागचा राग गेलाच नाही.. निरोप पाठवून सुद्धा इतका वेळ लागला यायला आई?" 

रडवेल्या स्वरातच हुंदके देत शमाने विचारलं. त्यावर आई काही बोलणार इतक्यात तात्या उठले आणि तिच्या जवळ जात म्हणाले,

"त्या माऊलीचा दोष नाही बेटा. माझ्याच दगडाच्या काळजाला जरा उशिरा पाझर फुटला. माफ कर तुझ्या बापाला.."

ते ऐकताच शमाने तात्यांना मिठी मारली आणि त्यांनाही अश्रू आवरता आले नाही. मग बरेच दिवसांनी आई आणि तात्या भेटले आणि सगळं काही ठीक झालं या आनंदात सगळेच खूप खुशीने अगदी संध्याकाळपर्यंत गप्पा मारत बसले होते. संध्याकाळी अजय कामावरून आल्यावर त्यालाही सुखद धक्काच बसला. सगळं काही ठीक होतंय हे पाहून खूप आनंद झाला त्यालाही. एकमेकांची माफी मागून झाली, माफ करून झालं. आग्रहाचं जेवण आटोपलं आणि दोन दिवसांनी पोरीला बाळंतपणाला माहेरी घेऊन जायला येतो, असा वायदा करून तात्या आणि आई घरी निघाले.

"आई अहो मी राहते ना इथेच. कशाला तिकडे जायला हवं? इथे तुमचं आणि अजयचं करायला कसं जमेल तुम्हाला? शिवाय अजय कामावर गेला की तुम्ही एकट्याच राहणार घरी. माझं मन नाही करत तिकडे जायला. मी सांगते आई आणि तात्यांना, ते घेतील समजून.."


शमाचा पाय निघत नव्हता घरून. तिने दुसऱ्या दिवशी सकाळीच आईंच्या मागे तगादा लावला होता. अजय आणि आई कसं सांभाळतील एकमेकांना याचीच काळजी तिला सारखी सतावत होती. आईंनाही तिची खूप सवय झालेली पण म्हणून तिला तिच्या घरी न पाठवणे त्यांच्या मनाला पटेना. त्या त्यांच्या परीने तिची समजूत घालत होत्या पण ती काही ऐकत नव्हती. दिवसभर त्यांची चर्चा चालू होती. संध्याकाळी अजय थोडं लवकरच घरी आलेला पाहून शमा खुश झाली. आईंनी देखील तिचं म्हणणं त्याला सांगत, "आता तूच काय ते सांग बाबा.." म्हणत आपली सुटका करून घेतली. अजय फक्त हसला आणि हातपाय धुवून आला. चहा पिऊन झाल्यावर शमाला घेऊन तो त्यांच्या खोलीच्या खिडकीतून दिसणाऱ्या त्यांच्या छोट्याश्या बागेत घेऊन गेला. तिथे त्यांनी छान फुलझाडं लावली होती त्यांच्या लग्नापासून. त्या फुलांच्या साक्षीने त्यांच्या कितीतरी रात्री आजवर धुंद झाल्या होत्या. शमाची ती आवड अजयने मनापासून जपली होती. आणि आता तर त्यालाही त्या सगळ्याची आवड वाटू लागली होती. तिला तिथे त्यांच्या त्या छोटेखानी बागेपाशी आरामखुर्चीत बसवून तो परसदारी गेला आणि चाफ्याचे एक रोप घेऊन आला जे कामावरून येतानाच त्याने आणून ठेवलं होतं. तिच्या आवडीचा सुगंध. छान दरवळणारा. अजयने तिच्या हातात दिलेलं ते रोप पाहून ती खूपच खुश झाली. एखाद्या लहान मुलीसारखं लाडे लाडे त्या रोपाला तिने मिठी मारली. त्याचा पापा घेऊ लागली. ते पाहून अजय कौतुकाने पाहत उभा राहिला शेजारी. मग भानावर येताच तिने अजयकडे पाहिलं आणि त्याला खुणेनेच जवळ बोलावलं. खुर्चीच्या हाताला धरून अजय तिथे खाली चवड्यांवर बसला. तिने त्याला अजून जवळ यायला सांगितलं. जवळ जाताच आधी तिने त्याच्या कपाळाचे एक दीर्घ चुंबन घेतले आणि मग त्याच्या मिटल्या डोळ्यांचे.. त्याने डोळे उघडून पाहिलं तर तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. ज्याचे थेंब त्या रोपावर पडले होते. तिच्या नजरेत त्याला त्याच्यावर असलेलं सगळं प्रेम दिसत होतं ज्याची व्यक्त होण्याची पातळी पूर्ण झाल्याने अश्रूंच्या रूपाने ते बाहेर पडून दृश्य स्वरूप घेत होतं. त्याने तिच्याकडे तितक्याच प्रेमाने पाहत डोळे अलगद बंद करत चुंबनाची एक खट्याळ खूण केली. ती क्षणभर लाजली आणि मग त्याच्याकडे चोरटा कटाक्ष टाकून गालातल्या गालात गोड हसत त्या रोपाचे हळूच चुंबन घेतले आणि म्हणाली.

"आय लव्ह यू टू.."

अजयने उठून तिच्या केसांत एक चुंबन घेतलं आणि तिच्या हातातून ते रोप घेऊन त्यांच्या खोलीच्या खिडकीतून दिसेल अश्या पद्धतीने ते कुंडीत लावलं. त्या रात्री झोपण्यापूर्वी बराचवेळ शमा त्या रोपाकडे कौतुकाने पाहत होती. आणि मनोमन देवाचे आभार मानत होती की अजयसारखा इतकं प्रेम करणारा जीवनसाथी तिला मिळाला. झोपताना पलंगावर पडल्या पडल्या कुशीत घेऊन अजयने प्रेमाने तिची समज घालून दिली आणि तिला माहेरी जाण्यासाठी तयार केली.


दोन दिवसांनी तात्या तिला न्यायला आले. सगळी तयारी असतानाही तिचं पाऊल काही केल्या निघत नव्हतं. खोलीत अजय तिला खिडकीपाशी घेऊन गेला आणि त्या चाफ्याच्या रोपाकडे बोट दाखवत म्हणाला,

"ती बघ तिथे तुझी सावली आहे माझ्यासाठी.. माझ्याजवळ.. मग तू दूर कशी सांग बरं?"

"आणि माझ्याजवळ?" शमा लाडाने म्हणाली.

"अगं इतकंच ना? त्या घरीसुद्धा एक रोप आणतो लावायला. मग तर झालं? आणि खरंतर माझी सावली कायम तुझ्या सोबत, तुझ्या आत आहे ना..!"

अजयच्या उत्तराने शमा अजूनच भावूक झाली आणि त्याला बिलगली. थोड्या वेळाने साश्रू नयनांनी सगळ्यांनीच एकमेकांचा निरोप घेतला. थोड्या वेळाने अजय कामाला निघून गेला आणि त्याची आई घरकामात गढून गेली. संध्याकाळी घरी आल्यावर मात्र त्याला खूप रिकामं झाल्याचं जाणवलं. शमाची खूप आठवण येऊ लागली. खूप बेचैन होत होता तो. चहा घेऊन आलेल्या आईला त्याची अवस्था कळली.

"आठवण येते ना? मलाही आज दिवसभर करमत नव्हतं. सारखी तिलाच हाक मारत होते. फोन करून विचार तरी काय करते माझी लेक.."

आईकडे बघून तो हसला आणि चहाचा कप तसाच ठेवून लागलीच टेलिफोन कडे वळला. पण तिच्या घरचा नंबर त्याच्या लक्षातच येईना. आठवण्यासाठी डोकं खाजवू लागला तोच त्याचं लक्ष टेलिफोन शेजारी ठेवलेल्या डायरीमधून डोकावणाऱ्या कागदावर गेलं. त्याने तो कागद उघडून पाहिला तर शमाची एक चिठ्ठी (नोट) होती ती.

"मला माहितेय मि. शिंदे तुम्हाला माझी आठवण येणारच आहे. म्हणून मुद्दाम दिवसभर फोन नाही केलाय. आणि आता आठवण आलीय पण नंबर लक्षात राहत नाहीत तुमच्या. म्हणून तात्यांच्या नावाने लिहून ठेवलाय डायरी मध्ये. करा डायल मी वाट बघतेय. - तुमची शमा"

ते वाचून त्याला खूप हसायला आलं. तिने त्याच्याही नकळत त्याचा प्रेमळ ताबा घेतला होता. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तिला इतक्या सगळ्या कामात बरोबर लक्षात राहिल्यात याचं त्याला खूप कौतुक वाटलं. त्याने नंबर शोधून डायल केला आणि अगदी पहिली रिंग पूर्ण ऐकूही आली नसेल इतक्यात पलीकडून शमाचा आवाज आला.

"बोला मि. शिंदे.. आली का आठवण बायकोची? सकाळपासून आता वेळ मिळाला वाटतं..? खुश असाल ना बायकोपासून सुटका झाली म्हणून..?"

"मिस देशमाने उगीच माझ्या बायको आणि माझ्या मध्ये पडू नका. मिसेस शिंदेंकडे फोन द्या बरं..!" 

अजयने मिश्कीलपणे उत्तर दिलं आणि फोन मुद्दाम आईकडे दिला.

"ओ मिस्टर.. देशमाने आहोत आम्ही. अदबीने बोलायचं बरं आमच्याशी. तुमची बायको सध्या आमच्या ताब्यात आहे. त्यामुळे हुशारी फक्त आमची चालणार.." तात्यांची नक्कल करत शमा म्हणाली.

"बरं.. देशमाने सरकार.. तुमची आज्ञा असेल तर आमच्या लेकीशी बोलू शकतो का आम्ही?" 

आईने तिची फिरकी घेत विचारलं तशी शमाने जीभ चावली आणि सॉरी सॉरी आई म्हणत त्यांची विचारपूस करू लागली. शेजारी उभा राहून अजय हसत सगळं बघत होता. बोलून झाल्यावर आईने चहाचा कप त्याच्या हातात दिला आणि ती किचन मध्ये निघून गेली. मग बराच वेळ ते दोघे फोनवर गप्पा मारत होते.

दुसऱ्या दिवशी कामावरून काहीसा लवकर येताना अजय चाफा घेऊन शमाला भेटायला गेला. तिच्या खोलीत जाताच शमा त्याला अशी बिलगली की जणू कितीक जन्मांची भेट राहिली होती. हल्ली ती खूप भावूक होऊ लागली होती. दोघेही तिच्या खोलीच्या खिडकीपाशी गेले आणि तिथून शेजारी लावलेले ते रोप अजयने तिला दाखवलं. आणि बराचवेळ त्याच्याकडे कौतुकाने बघत बघत बोलत बसले. पुढचे ३-४ दिवस अश्याच भेटी होत राहिल्या पण नंतर मात्र अजयला बँकेत उशीर होऊ लागला. त्याच्या कामाचा व्याप खूप वाढत होता. परिणामी भेटी बंद झाल्या. पण रात्री कितीही उशीर झाला तरी एक कॉल केल्याशिवाय दोघे झोपत नसत. इतकं सगळं असतानाही शमा किती समजून घेते आपल्याला याचं अजयला फार बरं वाटायचं. रोज रात्री झोपताना दोघेही चाफ्याकडे बघत.. कधी त्याच्याशी बोलत.. त्याला हवेतून चुंबन घेत.. दिवस असेच चालले होते. शमाची तारीख हळूहळू जवळ येत होती. तिला या दरम्यान खूप भीती वाटू लागली. सारखी अजयची आठवण येऊ लागली. पण अजयच्या कामाचा व्याप इतका वाढला होता की त्याला बरेचदा घरी जायलाही रात्र व्हायची. त्यामुळे दमून घरी आल्यावर पूर्वीसारखं बोलणं सुद्धा होत नव्हतं त्यांचं.. शमा बिचारी मन मारून राहायची. त्याला समजून घेत होती. पण मग त्याच्यावरचा राग त्या खिडकीतल्या चाफ्यावर काढायची. त्याला अजय समजून खोटं खोटं भांडायची.. रुसायची.. पुन्हा त्याचे लाड करायची आणि स्वतःच्या वेडेपणावर खूप हसायची. पण जसजसे दिवस भरत होते तसतसे तिची भीती वाढत होती. अजयच्या आठवणीने सारखी बेचैन व्हायची. कधी अख्खी रात्र जागून काढायची. दिवसभर काही वाटायचं नाही तिला. आई आणि तात्यांशी बोलून तिला बरं वाटायचं पण कातरवेळ आली की तिची भीती वाढत जायची. रात्री आई तिच्यासोबत असायची. तिला देवांच्या कथा सांगायची. श्लोक वाचून दाखवायची. शमा तात्पुरता दिलासा घेऊन शांत व्हायची. पण झोप नव्हती तिच्या डोळ्यांना..


एके दिवशी दुपारच्या वेळेस अजयच्या केबिन मधला फोन खणखणला. पलिकडून अत्यंत घाबऱ्या आणि रडवेल्या आवाजात कुणीतरी बाई बोलत होती.

"हॅलू अजय साहेब, म्या पारू बोलती.. असशाल तसं निगून या.. अंगणात जाताना पायरीवरून पाय घसरून शमा ताईसाहेब पडल्या. लई लागलंय त्यास्नी.. त्यांला कदम बाईंच्या इस्पितळात नेलंया.. तुमी लवकर निगा.. समदी तिथंच गेल्यात."

अजय काही क्षण एकदम सुन्न झाला. त्याच्या कापऱ्या हातातून रिसीव्हर कधी खाली पडला त्यालाही कळलं नाही. पुढच्याच क्षणी भानावर येत त्याने समोर पडलेली गाडीची चावी घेतली आणि धावतच तो निघाला. सगळेजण त्याच्याकडे विस्मयाने पाहू लागले. धडपडत तो बाहेर पडला आणि गाडीत बसला. त्याला कळायच्या आत तो कदम हॉस्पिटलजवळ होता. घामेजून गेलेला अजय धावतच पोहचला आणि आत गेल्यावर समोर त्याला तात्या दिसले. त्याची आणि शमाची आई रडत होत्या.. तात्या बाजूला होते खुर्चीत बसून.. पण त्यांची चलबिचल त्यांच्या हलणाऱ्या पायावरून जाणवत होती. ऑपरेशन चालू होतं. अजय तिथे जाताच त्याच्या आईने त्याला मिठी मारली आणि रडायला लागली. तो तिला सावरणार तोच डॉक्टर कदम बाहेर आल्या. सगळ्यांकडे एक नजर पाहून झाल्यावर अजयकडे पाहत त्या म्हणाल्या,

"आय एम सॉरी.. डोक्याला जबर मार लागला असल्याने खूप रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे आम्ही त्यांना आणि बाळाला नाही वाचवू शकलो.."

अजयच्या अंगातून एक शहारा धावत गेला पायापासून डोक्यापर्यंत. आणि कानात एक सुन्न करणारी किंकाळी ऐकू आली फक्त आईची. त्यानंतर तो जणू काही दगड बनत गेला. त्याला काहीही कळेनासे झाले. तो फक्त इकडेतिकडे बघू लागला.. समोर फक्त आक्रोश करणारे चेहरे दिसत होते त्याला.. हळूहळू तेही धूसर होत गेले. आणि मग फक्त काळोख उरला.


"अजय.. अजय.. ए अजय.. काय रे.. कुठे हरवलास इतका?" अजयला मागून एक हात खांद्यावर जाणवला आणि त्याची तंद्री भंगली. त्याने वळून पाहिलं तर कविता काहीश्या आश्चर्यानं हसत त्याला साद घालत होती. 

"पुन्हा तोच विचार ना? कितीदा सांगितलं तुला अजय, घडून गेलेल्या गोष्टी बदलू शकत नाही आपण.. चल, मला आत घेऊन चल बरं.." 

अजयच्या चेहऱ्यावर आलेला घाम पदराने पुसत कविता म्हणाली. अजय तिच्या फुलांनी सजलेल्या रूपाकडे बघत वरवर हसला आणि तिच्या खांद्याला धरून तिला हळू हळू खोलीत घेऊन गेला.

रात्री झोपण्याची वेळ झाली. औषधं देऊन कविताला झोपवलं त्याने पण आज त्याचे डोळे सताड जागे होते. तो उठून खिडकीजवळ गेला आणि बाहेर त्या चाफ्याला बघत उभा राहिला. आज खूप बेचैन झाला होता तो बरेच दिवसांनी. खूप दिवसांनी त्याचा हात बाजूच्या ड्रॉवरकडे गेला. त्याने त्यातून हळूच एक सिगारेट आणि लायटर काढलं. आवाज न करता ड्रॉवर बंद केला आणि खिडकी लावून तो गुपचूप बाहेर निघून गेला. सिगारेट शिलगावली आणि डोळे बंद करत एक झुरका घेतला. पुन्हा डोळे उघडले तर समोर तेच चाफ्याचे झाड. पुन्हा एकदा भूतकाळ डोळ्यांसमोर आला. याच चाफ्याच्या मुळाशी त्याने शमाची थोडी राख टाकली होती. झुरके घेत घेत तो त्या चाफ्याच्या झाडाला बघत होता. डोळ्यांतून त्याच्याही नकळत अश्रू वाहत होते. एक झुळूक आली आणि ते झाड थरथरले. त्याची नजर एकटक पाहत होती. पुरुषभर उंचीचे झाड त्याला शमा वाटू लागलं. दोन्ही हात पसरून ती आपल्याला बोलावते आहे असा भास झाला. तो नकळत उठला.. सिगारेट विझवली आणि झाडाजवळ गेला. त्याच्या फांदीला हळूवार हाताने गोंजारत हुंदके देत रडू लागला. तिथेच खाली बसून शून्यात हरवून गेल्यासारखा बसून राहिला. पुन्हा त्याची तंद्री लागली.


शमा गेल्यावर बरेच लोक त्याचे सांत्वन करण्यासाठी भेटायला येत होते. मित्र मैत्रिणी, नातेवाईक, कामावरची मंडळी सगळेच. इतक्या सोन्यासारख्या आयुष्यातून, संसारातून इतक्या अचानक शमासारख्या लाघवी मुलीचं निघून जाणे सगळ्यांनाच चटका लावून गेलं. अश्याच एका दुपारी तो एकटाच अंगणात बसला होता. आईचा नुकताच डोळा लागला होता. एक गाडी येऊन थांबली आणि त्यातून एक त्याच्याच वयाची एक स्त्री बाहेर पडली. साडी नेसली होती पण गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. चेहरा त्याला ओळखीचा वाटत होता पण नक्की लक्षात येत नव्हता म्हणून त्याने थोडं निरखून पाहिलं. तोवर ती मुलगी पुढ्यात येऊन उभी राहिली. 

"ओळखलं ना?"

मोजकंच हसून तिने प्रश्न केला.

"अं... अगं कविता ना तू? मी खरंच ओळखलं नाही तुला आधी. ये ये बैस. मी पाणी घेऊन येतो." थोडासा गोंधळून अजय म्हणाला आणि आत पाणी आणायला गेला.

"कुठे होतीस इतकी वर्ष? लग्नालाही नव्हती आली ना तू?"

पाण्याचा ग्लास पुढ्यात ठेवत अजयने विचारलं.

"अरे नाही.. तुमच्या लग्नाच्या वेळेसच मी मामाकडे गेली. अचानक ठरलं त्यामुळे काहीच सांगता नाही आलं कुणालाही." 

कविताने पाणी पीत इकडे तिकडे बघत उत्तर दिलं. आणि अजय काही बोलणार तोच पुन्हा बोलू लागली.

"काकूंचा फोन आला परवा मला. त्यांनी शमा बद्दल सांगितलं. मग काल सकाळी तशीच निघून आले. तू.. ठीक आहेस ना?"

कविता अचानक खूप हळवी झाली होती. अजयने डोळ्यांतले अश्रू आवरत हसण्याचा एक व्यर्थ प्रयत्न केला. तिने आपली खुर्ची त्याच्या बाजूला सरकवली आणि त्याच्या हातावर हात ठेवत त्याला धीर देऊ लागली. त्याने तो अजूनच रडू लागला. त्याला रडताना पाहून तिलाही अश्रू अनावर झाले. बराचवेळ गेल्यावर ते दोघे सावरून बसले. डोळे पुसून झाल्यावर तो तिची चौकशी करू लागला.

"इतकी वर्षे तिकडेच राहिली? आणि मग आता काय करते?"

"काका किती शिस्तीचे आहेत माहितेय ना तुला? त्यांची सारखी भुणभुण असायची. कंटाळा यायचा रे.. काकूकडे बघून सगळं सहन करायची. आईबाबा गेल्यावर त्यांनीच सांभाळलं होतं. काका तापट पण काकूने खूप माया केली माझ्यावर. पण मग नाही जमलं अरे जास्त वेळ तिकडे काढणं.. दोन वर्षांपूर्वी काका गेले पण इकडे यावं नाही वाटलं. शिवाय मामाच्या घरी सगळं मला हवं तसं चालू देतात. सगळे लाड करतात. आधी पत्रकार होते आता दूरदर्शन मध्ये बातमी निवेदक म्हणून काम मिळेल असं दिसतंय. बघुयात.."

अजय तिच्याकडे बघत राहिला तशी ती गोड लाजली. तिला लाजताना पाहून अजय दुःख विसरून मनापासून हसला काही क्षण.

"कविता राजे. तुम्ही चक्क लाजता आहात? अगं तुझ्या थाऱ्याला उभं राहण्याची कुणाची बिशाद नसायची कॉलेज मध्ये. तुझ्या नाटकात काम करायला नकार दिला म्हणून तू माझ्याशी भांडण करून बोलणं टाकून दिलं होतं. आणि तू आता अशी साडीमध्ये.. केस वाढवून वेणी घातलेली.. अशी लाजते आहेस.. खरंच विश्वास नाही बसत अगं. मघाशी म्हणूनच तुला ओळखायला वेळ लागला मला.."

"काही नाही रे.. तेव्हा होते मी तशी.. बिनधास्त.. पोरकट.. पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. त्या वयात ते ठीक होतं. ते वय खरंच वेडं होतं.. खूप वेडं.."

इकडेतिकडे बघत ती बोलत होती आणि तिची तंद्री लागत होती इतक्यात अजय म्हणाला.

"वाटतेस पत्रकार अगदी.. बरं, लग्न वगैरे का नाही केलं अजून?"

"तुझ्यासारखा नाही ना भेटला कुणी.. असो. चल आता निघते. काकू वाट बघत असेल. आणि एक कामही आहे इथे ते आटोपून मग घरी जाते. आणि आता आहे इथेच. येईन पुन्हा."

असं म्हणत ती लगबगीने जाऊ लागली. तसा अजय तिला गाडीपाशी सोडायला गेला. गाडीत बसताना त्याच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली

"काळजी घे, अजू.."

खूप दिवसांनी त्याने ती हाक ऐकली होती. त्याला बरं वाटलं. ती गाडीत बसली तसं हा गाडीच्या दरवाज्यावर वाकत तिला म्हणाला,

"कविता, खूप बरं वाटलं तू आलीस पण.." 

इतकं म्हणत तो पुन्हा हळवा झाला. कविताने त्याला हलके हसून धीर दिला आणि ती निघाली.

त्यानंतर ती येत राहिली घरी. आईशी गट्टी जमली होती तिची. घरी येऊन जेवण करून देणं, सांत्वन करण्यासाठी भेटायला येणाऱ्या लोकांची उठबस करणं, सगळं तीच बघत होती. आई आणि अजयला तिचा खूप आधार वाटू लागला होता आता. कॉलेजमध्ये असतानाचे किस्से आठवून बऱ्याचदा हसत तिघेही. शमाची आठवण आली की मात्र सगळे रडायचे.


आता आठ महिने होऊन गेले तरी त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा. अजय दिवसभर कवितासोबत असल्याने दुःख विसरून असायचा. पण रात्री तो आणि चाफा ठरलेलं असायचं. काय झालं कुणास ठाऊक पण इतकी काळजी घेऊनही चाफा आता बहरत नव्हता. झाड वठलं नव्हतं पण का कुणास ठाऊक फुलं लागत नव्हती त्यावर. रात्री खिडकीत उभा राहून अजय बरेचदा त्याच्याशी शमा समजून बोलायचा. त्याला सगळं आयुष्य खूप जड वाटायचं. कामावर रुजू झाला.. काम सुरू झालं पूर्वीप्रमाणे.. व्याप वाढवला त्याने मुद्दाम पण तरीही राहून राहून त्याला शमा आठवायची. तिचं ते निपचित पडलेलं शरीर आठवून तो शहारून जायचा. कधी कसलंही व्यसन नसणारा अजय आता सिगारेट ओढू लागला होता. या सगळ्यामध्ये काळ मात्र त्याच्या गतीने चालत होता. बघताबघता वर्ष गेलं. अडीच वर्षे झाली होती आता शमाला जाऊन. अजयच्या आईची तब्येत अलीकडे कुरबुर करायला लागली होती. त्यांना खूप वाटायचं की शमाचे दुःख विसरून अजयने आता पुन्हा संसार थाटायला हवा. त्याला आधाराची गरज होती. आणि आपण तरी कुठवर असणार त्याच्यासाठी.. कविता मध्ये त्यांना आशेचा किरण दिसला होता पण अजय तयार होईल का? या भीतीने त्या अजूनतरी काही बोलत नव्हत्या. एके दिवशी कविताची काकू भेटायला आली तेव्हा तिच्याकडे त्यांनी मनातलं बोलून दाखवलं. त्यानंतर दोघी बराचवेळ बोलत होत्या. अगदी संध्याकाळी अजय कामावरून येईपर्यंत त्यांची चर्चा चालू होती. 

"अजय.. ए अजय.. उठ ना.. बघ माझ्याकडे.."

अजयने डोळे उघडून पाहिलं तर एका निर्विकार चेहऱ्याने शमा त्याला पाहत उभी होती. अजय पटकन उभा राहिला आणि तिच्याकडे जाऊ लागला तसं तिने हातानेच त्याला थांबायची खूण केली आणि म्हणाली,

"तू नको येऊ अरे इथे.. इथे काही नाहीय आता.. मलाही नाही करमत इथे असं.. मीच येते थांब तुझ्याकडे.. तू नको येऊ.. मी येते.." असं म्हणत बघताबघता तिने एका तेजस्वी फुलपाखराचे रूप घेतले. आणि त्याच्या भोवती दोन चकरा मारून ती त्या चाफ्याच्या झाडात लुप्त झाली. हळूहळू त्याच्या समोर तो सारा प्रकाश विरत गेला. अजय दचकून उठला. सकाळ होत होती. अंधुक प्रकाश दिसायला लागलेला आताशा. त्याने आजूबाजूला पाहिले तेव्हा त्याला कळलं की तो चाफ्याच्या झाडाला टेकून झोपी गेलेला रात्री विचार करत करत. कविताची आठवण होताच तो पटकन उठला आणि खोलीत गेला. कविता अजून गाढ झोपलेली. त्याला हायसं वाटलं. त्याने आंघोळ केली आणि तो खोलीमध्ये खिडकीजवळ चहा घेऊन खुर्चीत बसला. कविताकडे पाहून हलके हसला तो. आणि मग तिच्या गर्भाकडे पाहिलं. त्याला आताही विचार करताना खूप वेगळं वाटत होतं की इतक्या वर्षांनी, इतक्या सगळ्या गोष्टी घडून गेल्या आणि तरीही कालपासून तो पुन्हा शमाच्या आठवणीत रमला होता. चहाचा घोट घेतल्यावर त्याला थोडी तरतरी आली. पण नजर बाहेर चाफ्याकडे गेली आणि तो रात्रीच्या स्वप्नाचा विचार करू लागला. आणि नकळतच पुन्हा भूतकाळात गेला.


एके दिवशी न राहवून आईने त्याच्यापाशी पुन्हा लग्न करण्याचा विचार बोलून दाखवला. अजयने ठाम नकार दिला तरीही त्या त्यांच्या परीने प्रयत्न करतच राहिल्या. आणि त्यानंतर दर दिवशी कामावर जाताना आणि संध्याकाळी घरी आल्यावर त्या मुद्दाम लग्नाचा विषय काढत असत. आधी सपशेल नकार देणाऱ्या अजयला नंतर नंतर मात्र आईचे म्हणणे पटू लागले होते. शिवाय त्याच्या आयुष्यातील पोकळीची जाणीव त्याला रोज होतच होती. पण तरीही तो नकार देत होता. त्यादिवशी सुद्धा आईने रात्री जेवताना विषय काढला. शेवटी आईच्या रोजच्या त्रासाला वैतागून त्याने विचारलं,

"बरं आई.. तू म्हणते तसं.. मी लग्नाला तयार झालोच तर कोण देणार आहे मला मुलगी? कोण माझ्याशी लग्न करायला तयार होणार आहे? तेव्हा ऐक माझं.. सोडून दे हा विषय."

"कविता कशी वाटते तुला?"

आईच्या या प्रश्नावर तो चमकला. काही क्षण गांगरून गेला आणि मग म्हणाला,

"काहीतरी बोलू नको आई.. ती चांगली मैत्रीण आहे इतकंच.. त्यापलिकडे मी विचार नाही केला कधी तिचा. तिचं अजून लग्न झालेलं नाहीय. चांगली वागते आपल्याशी म्हणून असा कसा विचार करू शकतो आपण?"

"आणि ती तयार असेल तर?"

"आई अगं ती का एका बिजवराशी लग्न करेल..?"

"कारण, तू तिला आवडतोस."

आईच्या या उत्तरावर मात्र अजय खरंच गप्प झाला. त्याला काहीच काळात नव्हते. कसाबसा फक्त तो "म्हणजे?" इतकंच बोलू शकला.

"सांगते. त्यादिवशी तिची काकू आलेली तिने मला सांगितलं. कविता येणार होती म्हणून तिने तिचा रूम साफ करायला घेतला तेव्हा तिथे माळ्यावर एक जुनी डायरी तिला सापडली. ती कविताची कॉलेजच्या वेळची डायरी होती. तिने सहज चाळून पाहिलं तर त्यात तिने तुझ्यावर केलेल्या कविता, आणि तुझ्यावर असलेल्या प्रेमाबद्दल लिहून ठेवलं होतं. कविता आली त्या रात्री तिने तिला त्याबद्दल विचारलं तेव्हा तिने सगळं खरं असल्याची कबूली दिली. ती सुरुवातीपासूनच तुझ्यावर प्रेम करायची. अगदी आजही करते. शमा आणि तुझ्याबद्दल समजलं तेव्हा तिने सगळं काही आपल्या मनात ठेवलं होतं. आणि तुमच्या लग्नाच्या वेळी ती हे शहर सोडून मामाकडे निघून गेली. आताही तिला तिथे दूरदर्शन मध्ये कामाची संधी चालून आली होती पण निव्वळ आपल्यासाठी किंबहुना तुझ्यासाठी तिने ती नाकारली आणि ती इथेच राहिली आपल्यात. तिच्या मनात अजूनही तू आहेस. पण तुझ्या मनात शमा असल्याने ती हे कधीच बोलून दाखवणार नाही हे तिच्या काकूने ओळखलं आणि म्हणून त्या तिच्या नकळत माझ्याशी बोलायला आल्या होत्या. मला विचारशील तर कविता खूप गोड आणि गुणी मुलगी आहे. तिच्याशी लग्न कर. संसार कर. अख्खं आयुष्य आहे तुझ्यापुढे. मी आज आहे सोबत पण उद्याचा माझा काय भरोसा? तुझे बाबा गेल्यावर तू होतास म्हणून मी जगू शकले. आपल्याला साथीदाराची गरज असतेच रे.. ऐक माझं."

अजय खाली मान घालून ऐकत होता. पण डोक्यात कॉलेजचे प्रसंग फिरू लागले. कविताने त्याच्याशी केलेलं भांडण आणि मग धरलेला अबोला.. तिचे त्याची बाजू घेऊन भांडणं सगळं आठवत होतं त्याला.. आणि आता त्याचे अर्थही लागत होते. शमापुढे त्याला इतर कुणाचा विचार करायला वेळही नसायचा. दोघे त्यांच्याच दुनियेत असायचे. आणि कविता म्हणजे चुकून मुलगी झालेली. टॉम बॉय. ती कधी डायरी लिहीत असेल.. कविता करत असेल असं चुकूनही कुणाला वाटणार नाही. म्हणून तर त्यादिवशी साडीत एक वेणी घातलेल्या कविताला ओळखू शकला नव्हता तो. पण ती आपल्यावर इतकं प्रेम करते? अगदी आजही? या विचाराने त्याचं डोकं गरगरायला लागलं. तो आईकडे बघून

"मला खरंच आता काय बोलावं ते कळत नाहीय. आपण नंतर बोलू यावर." इतकंच म्हणाला आणि तो त्याच्या खोलीत निघून गेला.


नंतर बरेच दिवस आईंनी विषय नाही काढला पण त्यांना खात्री होती की अजय लग्नाला तयार होईल. त्यामुळे त्याने विषय काढेपर्यंत त्या शांत होत्या.

अजयने चांगले दोन आठवडे घेतले आणि शेवटी होकार दिला. दरम्यान आईने शमाच्या घरी जाऊन तात्यांच्या कानावर ही गोष्ट घातली होती. मुलीच्या जाण्याने तात्या आता खूपच हळवे झाले होते. ते म्हणाले,

"काळजाचा तुकडा गेला आमच्या.. पण म्हणून आम्ही जगणं नाही सोडलं.. मग अजयने तरी का सोडावं.. लेकाचं आयुष्य खूप आहे अजून.. आता तोच आमचा पोरगा. त्याचं भलं होत असेल तर आम्हाला आनंदच आहे. खुशाल होऊ द्या तुमच्या मनासारखं!"

अगदी साध्या पद्धतीने घरगुती कार्यक्रम झाला लग्नाचा देवीच्या देवळात. मोजकी माणसं आली होती. आता अजयची आई निर्धास्त झाली होती कारण कविता त्याचा सांभाळ करेल याची पूर्ण खात्री होती त्यांना.


कविताशी लग्न केल्यावरही अजयने थोडा वेळ मागून घेतला तिला पूर्णपणे स्वीकारायला. कविताही समंजस होती. तिने समजून घेतलं होतं. तिच्यासाठी अजयची पत्नी होता येणं हेच भाग्याचं होतं. कविताच्या प्रेमाने अजयला तिच्यापाशी नेलंच. आणि शेवटी काळ जखमांवर फुंकर घालत असतोच की!

आज कविताला आठवा महिना चालू होता. आणि अजय तिची सर्वतोपरी काळजी घेत होता. आता अजय व्यवस्थापक झाल्याने काम वाढत होतं पण तरीही तो जातीने कविताला हवं नको ते सगळं बघत होता. शमाच्या वेळी न करता आलेली कर्तव्य तो आता कटाक्षाने पार पाडत होता. कपातला चहा संपला आणि अजयची तंद्री भंग पावली. त्याची नजर कविताकडे वळली. ती नुकतीच उठली होती आणि पलंगावरून खाली उतरू पाहत होती. कप तसाच ठेवत अजय लगबगीने उठला आणि तिला आधार देत बाथरूमकडे घेऊन गेला.

दिवस आता भरभर जात होते आणि कविताची तारीख जवळ येत होती. अजय खूप काळजी घेत होता पण त्याला राहून राहून भूतकाळ आठवत असे. कुणाशीही न बोलता तो जमेल तितकं शांत आणि हसून खेळून राहायचा प्रयत्न करत. एके रविवारी सकाळी अंगणात बसून नाश्ता करता करता गप्पा मारत होते अजय आणि कविता.

"तुला माहितेय अजय.. मला गेले काही दिवस ना.. एक छान स्वप्न पडतं अरे.. तेच स्वप्न हां आणि रोज.."

"अच्छा? काय दिसतं स्वप्नात?"

"अरे खूप मस्त.. मी ना अशी छान बागेत बसले आहे एका बाकावर आणि अशी छान रंगबिरंगी फुलपाखरं येतात कुठूनतरी.. माझ्याभोवती फिरत राहतात.. आणि त्यातलं एक छोटुसं फुलपाखरू माझ्या पोटावर येऊन बसतं अरे.. इतकं गोड वाटतं ना ते.. मी हसते आणि तुला हाक मारत राहते. पण तू येइतोवर ते उडून जातात."

"हो? मस्तच की!"

"हो हो.. स्वप्नात फुलपाखरू दिसलेलं चांगलं असतं.." 

तिच्यासाठी दूध घेऊन येणाऱ्या अजयच्या आईने तिचे बोलणे ऐकून प्रतिक्रिया दिली. यावर सगळेच खुश झाले. दिवस छान जात होते.

एके दिवशी दुपारी अजय काम करत होता आणि टेलिफोन वाजला.

"हॅलो, ब्रांच मॅनेजर अजय शिंदे बोलतोय.."

"अरे अजय, मी आई बोलतेय.. बाळा लवकर निघ जरा.. कविताला कळा सुरू झाल्यात. तिला कदम हॉस्पिटल मध्ये आणले आहे. कविताची काकू आणि आपले तात्या वगैरे मंडळी आहेत पण तू सुद्धा ये बरं.."


आईचा आवाज आणि कदम हॉस्पिटल चे नाव ऐकताच अजयचे हातपाय थंड पडले. सगळं पुन्हा एकदा डोळ्यांसमोर उभं राहिलं. तो थरथरत उठला आणि जेमतेम समोरची चावी उचलून धडपडतच बाहेर पडला. सगळेजण त्याची लगबग बघून हैराण झाले. त्याच्या चेहऱ्यावर चिंता आणि घाम दोन्ही भरपूर जमा झालेले. त्याने गाडी सुरू करताच बँकेतला कुलकर्णी तिथे आला.

"सर, इतक्या घाईत बाहेर पडलात. सर्व ठीक आहे ना?"

"तुम्ही इथे लक्ष द्या मी आलोच.."

इतकं म्हणून त्याने गाडी सुसाट पळवली आणि थेट हॉस्पिटलजवळ नेऊन थांबवली. धावतच आत गेला तर समोर तात्या बसलेले.. तसेच काळजीने पाय हलवत.. बाजूला कविताची काकू, त्याची आई आणि त्यांच्या शेजारी शामाची आई दिसली आणि त्याने एक आवंढा गिळला. त्याचे हातपाय आता लटपट करायला लागलेले. तात्यांनी ते हेरलं. ते उठून आले आणि त्याला धीर देत आपल्या शेजारी बाकावर बसवलं. काही वेळ असाच धीरगंभीर शांततेत गेल्यावर डॉ. कदम बाहेर आल्या. सगळ्यांकडे एक निर्विकार नजर फिरवून त्या म्हणाल्या,

"अभिनंदन.. मुलगी झालीय. मिठाई आणा.." आणि असं म्हणत त्या हसू लागल्या.


ते सगळं ऐकताच उभा राहिलेला अजय पटकन खाली बसला. आणि आजवर दाबून ठेवलेले सगळे अश्रू अगदी मुक्तपणे वाहू लागले. ओंजळीत आपला चेहरा लपवत तो एखाद्या लहान मुलासारखा रडला. तात्यांनी आपले अश्रू आवरत बाजूला बसून त्याला धीर दिला आणि डोळ्यांनीच बाकीच्यांना आत जाऊन कविताला भेटायला सांगितलं. तात्यांना मिठी मारून अजय खूप रडला. काहीवेळ तात्यांनी सुद्धा त्याला रडू दिलं.. मोकळं होऊ दिलं.. मग शांत झाल्यावर त्याला घेऊन आत गेले. आत जाऊन पाहतात तर एका गोंडस मुलीला शमाच्या आईने हातात घेतलं होतं आणि रडवेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत तिचं कोडकौतुक करत होती. कविताची काकू आणि अजयची आई कविताचे लाड करत होत्या. बोटं मोडून तिची दृष्ट काढत होत्या. अजय जाताच शामाच्या आईने बाळाला त्याच्याकडे दिलं. त्याने अलवार हाताने तिला भीत भीत आपल्याकडे घेतलं. अत्यंत गोड, गुलाबी गुलाबी कांती पाहून अजयला भरून आलं. त्याने तिचा मुका घेतला आणि समोर धरून तिला पाहू लागला तेव्हा त्याचं लक्ष एका गोष्टीने वेधलं. बाळाच्या हनुवटीवर तीळ होता अगदी तसाच जसा शमाच्या होता. त्याने चमकून शमाच्या आईकडे पाहिलं. तिने रडवेल्या डोळ्यांनीच मान हलवली.. तात्यांकडे पाहिलं अजयने तेव्हा तात्या लहान होऊन रडत होते. त्याने बाळाला त्यांच्या हातात दिलं. आणि तो कविता जवळ गेला. तिला प्रेमाने जवळ घेतली आणि तिच्या कपाळाचे एक चुंबन घेतले. सर्वांसमक्ष असं केल्याने कविता खूप लाजली. कविताच्या काकूने हसत विचारलं,

"काय मग.. नवे नवे आईबाबा.. बाळाचं नाव काय ठेवायचं? काही ठरवलंय का?"

"शमा.."

अजय आणि कविता एकाच सुरात बोलले आणि एकमेकांकडे चमकून पाहिलं. त्या दोघांच्या डोळ्यांत आता अश्रू तरळले होते. तिकडे तात्या आणि शमाच्या आईलाही अश्रू अनावर झाले. अजय कविताला जवळ घेत म्हणाला,

"ते फुलपाखरु नव्हतं तुझ्या स्वप्नांत.. ती आपली ही फुलराणी होती.. तिने मलाही सांगितलं होतं पण मला ते आता लक्षात येतंय.."

कविता त्याच्याकडे बघत हळूच त्याला बिलगली. तात्यांनी त्यांच्याकडे बाळाला आणून दिलं. कविताने तिला हातावर घेत छातीशी कवटाळून घेतलं. अजय त्या दोघींना मिठी मारत म्हणाला..

"माझी फुलराणी..."


Rate this content
Log in

More marathi story from परेश पवार 'शिव'

Similar marathi story from Drama