चिंब
चिंब
“तुला कळत नाहीय का? मला नाही यायचं परत.. का तू जबरदस्ती करतोय..?”
तिने हातातला मोबाईल खाली फेकून दिला आणि तावातावाने पुढे चालत चालतच त्याला सुनावू लागली..
“तुला एकदाच सांगतेय.. मी आता थांबणार नाहीय. मला घरी जाऊदेत.. इथे रस्त्यावर तमाशा नको..”
मागे वळून इतकं बोलतेय तोच तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं तो खाली गुडघ्यावर बसून डावा पाय धरून कळवळत होता.. तिने फेकलेला फोन त्याच्या पायाच्या घोट्यावर शेकला होता.. तरीही तो तिला विनवत होता तश्याही अवस्थेत..
तिला लक्षात येताच ती थांबली आणि लगबगीने त्याच्याजवळ येऊन खाली वाकली आणि कवर बॅटरी आणि बाकीचा मोबाईल एकवटून उठत म्हणाली..
“साधा मोबाईलही कॅच करता येत नाही का रे तुला? आणि कसल्या गोष्टी सांगतो मला.. आता उगीच मागे मागे येऊ नको.. मी घरी जातेय..”
इतकं म्हणून ती जायला वळली तोच त्याने आवाज दिला..
“अगं गौरी ऐक ना जरा तरी माझं..!”
“मला काहीही ऐकायचं नाहीय शिव.. आणि मी का ऐकू? जा ना तुझ्या त्या लांब वेणीवालीला सांग.. ती ऐकेल तुझं.. मी घरी जातेय अँड दॅट्स फायनल.. गुड बाय मिस्टर शिव..”
ती वळून म्हणाली आणि फणकाऱ्याने निघून गेलीही.. तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला फक्त..
शिव.. पंचविशीतला एक देखणा तरुण.. पण जितका देखणा तितकाच स्वभावाने गरीब.. शिक्षणासाठी मुंबईत आलेला आणि त्यात पहिल्यांदाच प्रेमात पडलेला गौरीच्या.. गौरी.. पक्की मुंबईकर.. बिनधास्त.. सुंदर असल्याचा गर्व होताच पण मूळ स्वभाव स्वप्नाळू.. देखणा तरीही शांत स्वभावाचा शिव तिला आवडला होता.. त्यालाही ती खूप आवडायची पण तो मुलखाचा भित्रा.. शेवटी गौरीनेच पुढाकार घेत त्याला प्रपोज केलं.. पण या सगळ्याला जेमतेम ६ महिने होताहेत तोच गौरी विचित्र वागायला लागली होती.. खासकरून गेला महिनाभर.. रागावणं तर नेहमीचंच झालेलं.. बिचारा शिव गोंधळून जाई.. आजही तसंच झालं होतं.. प्रॅक्टिकल आटोपून दोघे कॅंटीनकडे निघाले तर तिथे समोर बॅडमिंटन कोर्टवर फिज़िक्सची एक मुलगी जिच्या कंबरेपर्यंत येणाऱ्या लांबसडक वेणीमुळे ती कॉलेजभर ओळखली जायची, ती बॅडमिंटन खेळत होती.. तिला पाहून गौरी शिवला म्हणाली,
“केस बघ ना किती लांब आहेत तिचे.. कसे मॅनेज करत असेल कुणास ठाऊक!”
“हो ना.. आणि नेहमी एक वेणी असते.. कधी बांधते काय माहीत..!”शिव म्हणाला..
बस्स…! झालं इतकंच कारण..
“तुझं बरं लक्ष असतं कोण वेणी घालते कोण जीन्स घालते कोण काय करते.. तिचं नाव पत्ता पण माहीत असेलच.. नुसता दिसतोस साधा पण शेवटी तुम्ही मुलं सगळी सारखीच.. दिसली मुलगी की तुमची नियत फिरली..”
शिव चमकलाच तिचा असा हल्ला पाहून.. त्याला कळेना काय चुकलं त्याचं.. तिच्या एका साध्या बोलण्याला याने व्यवस्थित बोलून प्रतिसाद दिला इतकंच.. गौरी फणकाऱ्याने निघून जाऊ लागली.. तो तिची मनधरणी करायला लागला..
“अगं गौरी कुठे चाललीस? काय झालं?? माझं जरा ऐकून तरी घे.. असं काय करतेय? अगं..”
पण तिने चाल धरली.. गेटपाशी पोहचेतोवर एप्रन बॅगेत भरला होता तिने.. आणि ती तरातरा स्टेशनकडे चालू लागली.. ती पुढे आणि शिव मागे विनवणी करत.. शेवटी ती निघून गेल्यावर त्याला कळेना घरी जावं की पुन्हा कॉलेजला जाऊन ग्रुपला भेटावं.. शेवटी तो माघारी वळून कॉलेजला गेला.
कॉलेज कॅंटीनला जाताच मानसीने त्याला हात केला.. ती एकटीच येऊन चहा घेत बसलेली. त्याने तिथे जातानाच चहाची ऑर्डर दिली आणि चहा येताच तो घेऊन तो मानसीसमोर जाऊन बसला..
“कुठे होतास? लॅबमधून तर मघाशीच निघालात दोघंपण.. मला वाटलं गेला असाल फिरायला मरीन ड्राइवला.. गौरीमॅडम कुठे आहेत आणि?”
मानसीने विचारणा करायला सुरुवात केली.
“अगं कसलं काय गं.. हल्ली गौरी विचित्र वागते खूप..!” - शिव.
“का रे? काय झालं?”
मानसीने हसतच विचारलं तसं शिवने सगळी हकिगत सांगून टाकली तिला..
“मला कळतच नाहीय माझं काय चुकतंय.. गौरी ऐकूनही घेत नाही माझं काहीच..!”
शिव तक्रारीच्या सुरात बोलू लागला.
“अरे मग तू बोलायचं ना तिला.. खरंतर भांडायचं तिच्याशी.. तू असा मुळमुळू करत बसलास तर ती मिऱ्या वाटेल डोक्यावर तुझ्या..”
मानसी म्हणाली. आणि इतक्यात शिवचा मोबाईल वाजला. कॉल गौरीचा होता. त्याने तात्काळ रीसीव केला.
पलिकडून गौरी रडत म्हणाली,
“मी भायखळा स्टेशनला उतरले आहे. तुझं खरंच प्रेम असेल तर ये मला भेटायला ताबडतोब..”
ते ऐकताच तो तडक निघाला.. निघताना चहाचे पैसे द्यायला सांगितले मानसीला बाकी काहीच न बोलता तो तडक निघाला.. थेट भायखळा स्टेशन गाठलं. तिथे जाऊन तो गौरीला कॉल करू लागला. पण ती कॉल उचलत नव्हती. शिव आता थोडा चिंतित दिसायला लागला त्याने पुन्हा पुन्हा कॉल करणं चालू ठेवलं होतं.. सोबत प्लॅटफॉर्मवर सगळीकडे पहायला लागला.. गौरीला शोधायला लागला.. ती कुठेच दिसेना शेवटी तिथल्याच एका बेंचवर बसून तो तिला कॉल करू लागला पण तिचा काहीच रिस्पॉन्स नव्हता.. शिव हताश झाला.. इतक्यात गौरीचा कॉल आला.
“हॅलो.. गौरी अगं कुठे आहे तू? मी आलोय भायखळ्याला.. तू दिसतच नाहीय इथे.. कुठे आहेस तू?”
एका दमात शिवने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
“मी घाटकोपरला पोहचले. आता ऑटो करून घरी जातेय. डोन्ट कॉल मी अगेन.. बाय.” इतकं बोलून गौरीने कॉल कट केला.
शिव आता अजूनच बावरला. तो तिथेच बसून राहिला काही वेळ.. थोड्या वेळाने मानसीचा कॉल आला त्याला.. त्याच्या डोळ्यांत आता अश्रू तरळत होते त्याने थरथरत्या हाताने कॉल रीसीव केला.
“हॅलो शिव, अरे कुठे गेलास असा अचानक निघून.. ठीक आहे ना सर्व?”
त्याने रडवेल्या आवाजात तिला झालेला प्रकार सांगितला.
“अरे ती गौरी तशीच आहे रे.. खूप विचित्र मुलगी आहे ती.. तू आता शांत हो आणि घरी जा आता.. आणि फार विचार नको करू.. उद्या भेटू कॉलेजला.. चल बाय.. मी पण घरीच निघतेय आता..” इतकं म्हणून मानसीने कॉल कट केला.. जड पावलांनी शिव निघाला तिथून.. नजर आताही गौरीला शोधत होती.. शेवटी त्याने घरचा रस्ता धरला.. कुर्ल्याहून त्याने वाशी गाडी पकडली आणि घराकडे रवाना झाला.
रात्री जेमतेम जेवण करून तो अंथरूणात पडला पण झोप काही येत नव्हती.. राहून राहून दुपारचं सगळं आठवत होतं त्याला.. आपलं काय चुकलं ते त्याला अजूनही नीटसं कळत नव्हतं.. पहिल्या प्रेमात होता बिचारा.. तोही अगदी नवीनच.. गौरीने ठरवून दिल्याप्रमाणे ११ वाजेपर्यंत तिला कॉल करून पाहत होता पण ती काही केल्या उचलत नव्हती. त्याने मेसेजेस केले त्यांनाही उत्तर ती देत नव्हती. शिव आता रडवेला झाला होता.. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला.. मानसीने कॉल केला होता..
“हॅलो शिव.. ठीक आहेस ना? जेवलास वगैरे ना नीट?”
“हो जेवलो. तू जेवली का?”
शिवने औपचारिक विचारणा केली. पण त्याच्या आवाजावरून त्याची अवस्था कळत होती.
“बरं ऐक.. गौरीसोबत माझं बोलणं झालंय.. खूप रागात होती पण तिने उद्या सकाळी आपल्या नेहमीच्या वेळेत तुला ओवल ग्राउंडवर बोलावलं आहे.. बाकी आता फार विचार नको करू आणि झोप शांत.. मी तिची बेस्ट फ्रेंड आहे त्यामुळे मला माहीत आहे ती कशी आहे ती.. असो बाय.. गुड नाइट. टेक केअर..”
असं म्हणत तिने कॉल कट केला.
उद्या असं भेटायला का बरं बोलावलं असेल गौरीने..? त्याच्या मनात असे अनेक प्रश्न पडायला लागले.. खूप वेळ झाली तरी झोप काही लागत नव्हती त्याला.. शेवटी पहाटे कधीतरी त्याचा डोळा लागला.
तिकडे गौरीच्या घरी तीही जागीच होती बराच वेळ.. शेवटी ती उठली आणि तिची डायरी लिहायला घेतली. फक्त मानसीला माहीत होतं की ती डायरी लिहिते. तिच्याखेरीज बाकी कुणालाही गौरी म्हणजे एक फटाकडी पोरगी इतकंच ठाऊक होतं.. बिचारा शिव कसा काय तिच्या प्रेमात पडला असंच वाटायचं सर्वांना.. डायरी लिहून होताच का कुणास ठाऊक पण गौरी चक्क लाजली.. आणि मग डायरी बंद करून ड्रॅावरमध्ये ठेवली आणि झोपी गेली.
सकाळी लगबग करत शिव तयारी करत होता.. कधी एकदा ग्राउंडवर पोहचतोय असं त्याला झालं होतं.. धावपळ पळापळ करत त्याने ग्राउंड गाठलं.. तिथे जाऊन पाहतो तर गौरी आणि मानसी बसलेल्या आधीच.. शिवला पाहून मानसी तिथून जाऊ लागली. त्याच्याशेजारून जाताना त्याला हळूच म्हणाली,
“चांगली खरडपट्टी काढ.. काहीही ऐकून नको घेऊ..”
असं म्हणत हसतच ती तिथून निघून गेली.. तसा शिव गौरीच्या दिशेने चालू लागला.
समोर उभा राहताच गौरी तुसडेपणाने म्हणाली..
“काय आहे बोल! सकाळी सकाळी इथे कशाला बोलावलं आहेस पावसात? छत्री पकडून कंटाळा आलाय आणि तू आता येतोय.. बोल चल.. काय बोलायचं आहे ते..!”
“अगं मी कुठे..”
त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच गौरी पुन्हा म्हणाली,
“गप रे.. काय ततपप करतोय.. नीट बोल जरा.. काल आला नाहीसच भायखळ्याला.. कॅंटीनमध्ये बसून मला कॉल करत होतास.. मला सगळं सांगितलं मानसीने.. इतका खोटा कसा रे तू..? तोंड तर बघ.. किती सभ्य किती भोळा.. फक्त नाव शिव म्हणून भोळा नाही होत कुणी..!”
शिव चपापला.. तो मागे वळून मानसी दिसतेय का ते पाहू लागला..
“अरे मी इथे बोलतेय ना तुझ्याशी तिकडे कुठे बघतोय.. खरं बाहेर आलं तर तोंड लपवतोय का?”
गौरी घुश्श्यातच बोलली..
शिवला काहीच कळत नव्हतं.. मानसीने असं का खोटं सांगितलं..? मी तर गेलो होतो तिकडे.. गौरी असं का म्हणते आहे? अश्या प्रश्नांनी त्याच्या डोक्यात थैमान घातलं.. तो चक्रावून गेला आणि इतक्यात पाऊस अजूनच वाढला.. तो बावरून पावसाकडे पहायला लागला तोच जोरजोरात हसण्याचा आवाज आला.. त्याने चमकून पाहिलं तर गौरी हसत होती त्याला पाहून.. त्याला काहीच कळत नव्हतं.. त्याने आठवून पाहिलं आज एप्रिल फूलही नव्हता..
“मूर्ख.. पावसाळ्यात असतो का एप्रिल फूल?” तो पुटपुटला स्वतःशीच..
तोवर तिचं हसणं थांबवून गौरी आता पुन्हा रागाने बघू लागली त्याच्याकडे..
“इतका कसा रे बावळट तू.. तुला साधं भांडताही येत नाही.. मी भांडले तर सगळं निमूट ऐकून घेतोस.. मी निघून गेले तर माझ्या मागे मागे आलास.. मी मोबाईल टाकला तर थांबलास.. आणि कॉल केला तर सगळं टाकून निघून आलास.. कसा रे असा तू? मी कसंही वागली तरी तू काहीच तक्रार करत नाहीस.. तुला कितीही त्रास झाला तरीही.. गेला महिनाभर मी हवं तसं वागतेय हवं तसं छळतेय तुला.. तरीही तू तसाच वागतोस.. कसली तक्रार नाही की भांडण नाही.. खरंच भोळा आहेस तू.. भोळा शिव.. इतकं प्रेम करतोस माझ्यावर?”
यावर शिव फक्त गोंधळून बघत होता..
“अरे गधड्या बोल ना.. बघतोस काय असा?”
“अगं क्क.. काय बोलू कळतच नाहीय.. तुझं काय चालू आहे मला नीट सांग आधी.. काल इतकी भांडलीस आज हसते आहेस..!?!”
यावर गौरी अजूनच हसायला लागली. आणि मग म्हणाली,
“बावळट रे नुसता तू.. अरे तुझ्या साध्या सरळ स्वभावाचं मानसी आणि मला खरंतर आम्हा मुलींच्या ग्रुपलाच भारी अप्रूप वाटायचं.. बऱ्याचजणी फिदा आहेत तुझ्या या साधेपणावर.. आणि काहीजणी संशय घेतात की तू उगीच खोटं खोटं वागून मुलींना फसवतोय.. शेवटी मानसीने पैज लावली. आणि मला हा प्लॅन सांगितला. म्हणूनच तर तुझ्याशी मुद्दाम कारणं काढून भांडतेय आज जवळपास महिनाभर.. काल तुला भायखळा स्टेशनला पाहिलं मी मला शोधताना तेव्हा तुझं तोंड बघून काय समजायचं ते समजली मी..”
शिव अवाक् होऊन ऐकत होता तिला.. आणि मग हसायला लागला..
“बापरे..! काय काय चालू असतं तुम्हा मुलींचं..!”
“सॉरी ना बच्चू.. मी खूप छळलं ना तुला? मलाही त्रास व्हायचा रे.. काल तर तिथे तुझी हालत बघून असं वाटलं की धावत येऊन तुला मिठी मारावी.. प्लीज माफ कर मला..”
गौरी थोडी लाडाने आर्जव करू लागली पण तिच्या डोळ्यांच्या कडा आता खरोखरीच पाणावल्या होत्या..
“आणि मी खरंच तुझी मैत्रीण म्हणते तसा खोटा वागत असेन तर?”
शिवने मिश्किलपणे प्रश्न केला.
“जीव नाही का घेईन मी तुझा..?”
त्याची कॉलर पकडून तिने लटक्या रागाने उत्तर दिलं..
“हो गं बाई.. आता पटलंय.. तू घेशीलही.. तुझा काही भरोसा नाहीय..”
शिवच्या या बोलण्यावर दोघे जोरजोरात हसू लागले..
गौरी हसता हसता काहीशी भावुक झाली आणि हसणाऱ्या शिवला पाहत राहिली.. तिच्या मनात काय आलं कुणास ठाऊक.. तिने हातातली छत्री मागे उडवून दिली आणि त्याची कॉलर धरून त्याला जवळ खेचलं.. शिव गोंधळला.. आणि त्याला काही कळायच्या आत गौरीने तिचे ओठ त्याच्या ओठांवर टेकवले.. शिवचे डोळे आधी विस्फारले मग हळूहळू बंद होत गेले..
त्या ओवल ग्राउंडवर आता जणू फक्त ते दोघेच होते.. एका छत्रीत.. फक्त दोघेजण.. बाकीच्या जगाचा त्यांना विसर पडला होता.. पाऊस थांबला होता याची पुसटशीही कल्पना दोघांना नव्हती.. गौरीच्या मनात रात्री डायरीमध्ये लिहिलेल्या ओळीच घोळवत होत्या..
“तू फक्त माझाच पाऊस,
मी तुझा हरेक थेंब..
बरसुनि ये असा साजणा,
तुझ्यात होऊ दे मला चिंब..."