परेश पवार 'शिव'

Tragedy

4.9  

परेश पवार 'शिव'

Tragedy

पोरकी

पोरकी

32 mins
2.1K


“हॅलो? कोण बोलतोयंस तू आणि कुठून बोलतोय?”

“तुझा माझा काय संबंध? मग नीच माणसा, हे असं घाण बोलताना लाज नाही वाटत का तुला..?”

तिचा आवाज आता चांगलाच तापला होता.. कानशिलं लाल झालेली.. भीती आणि संतापाने ती थरथरत होती. तसं तिला हे नवं उरलं नव्हतं पण आज तिचा त्वेष पाहता नक्कीच काहीतरी भयंकर ऐकलं होतं तिने..

ती म्हणजे रमा.. एक ३०-३२ वर्षांची नाकी डोळी सुंदर, गव्हाळ वर्णाची विवाहित तरुणी.. तिचं सुंदर आणि तरुण असणं आता मात्र तिला नकोसं झालं होतं.. मनोहरसोबत तिचं लग्न होऊन आता चांगली ८-१० वर्षं झाली होती पण अजूनही त्यांच्या पदरी मूल नव्हतं दिलं देवाने.. सगळे डॉक्टर झाले.. वैद्य झाले.. अगदी उपास तापास ते नवस सायास सगळं करून झालं होतं.. पण कशाने काहीच फायदा झाला नव्हता.. सासूने सगळा दोष रमावर ठेवून तिला रोज बोल लावायला सुरुवात केलेली पण याउलट मनोहर मात्र तिला कधीच काही बोलायचे नाहीत. मनोहर एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होता. रमापेक्षा ७-८ वर्षांनी मोठा. पण दोघेही एकमेकांना शोभतील असेच. दिसायला उमदे आणि सुशिक्षितही. त्यात पुन्हा दोघांचा स्वभावही इतका मनमिळाऊ की शेजारीपाजारी त्यांना कुत्सित नजरेने कधीच पाहत नसत. हळूहळू शेजारच्या मुलांसाठी मनोहरचा मन्या मामा झाला आणि रमा आपसूकच मामी झाली. मग सगळेच शेजारी लाडाने त्यांना मामा आणि मामी बोलू लागले होते. इतकं सगळं असताना त्यांचं अंगण मात्र त्याच्या वारसाच्या वाटेकडे डोळे लावून थकलं होतं..

पण गेले काही दिवस मात्र काही विचित्र घडत होतं.. कुठल्यातरी अनोळखी नंबरवरून लँडलाइनवर रमासाठी कॉल यायला लागले होते. सुरुवातीला ब्लॅंक कॉल्स असायचे पण आजकाल मात्र पलिकडून एक तद्दन पुरुषी आवाज अचकट विचकट आणि अर्वाच्य भाषेत घाण घाण बोलायला लागला होता. पहिल्यांदा तर रमा घाबरून फोन ठेवून द्यायची पण मग जेव्हा असह्य झालं तेव्हा तिने मनोहरला सांगणं योग्य समजलं.. त्यानंतर एकदा मनोहरने स्वतः फोनवर बोलून समोरील व्यक्तीचा खरपूस समाचार घेतला. पण परिणामी हल्ली कॉल अजूनच वाढू लागले होते.. मनोहरने धीर देऊन तिला समजावले त्यामुळे आता ती धीराने सगळ्याला सामोरं जाऊ लागली होती.. बदनामीच्या भीतीने रमाने पोलिसांत जाणं टाळलं आणि मनोहरलाही तसं न करण्यास सांगितलं. जिथे एकीकडे मनोहर त्याच्या प्रत्येक वागण्यातून रमाविषयीचं प्रेम व्यक्त करत होता तिथे दुसरीकडे तिची सासू मात्र आता तिच्यावर संशय घेऊ लागली होती. तिला नाही नाही ते बोलू लागली होती..

एके दिवशी बाजूच्या गावात आठवडा बाजारात खरेदीसाठी रमा एकटीच गेली होती. तिथे भाजीपाला खरेदी करत असतानाच तिला गर्दीत कुणीतरी आपला पाठलाग करतंय असं वाटलं.. तिने मागे न पाहता आपला वेग वाढवला आणि उरलेली खरेदी पटापट आवरून बाजारातून बाहेर पडतच होती की इतक्यात एक हात तिच्या खांद्यावर पडला.. त्याच्या खरबरीत स्पर्शावरुन तो हात पुरुषाचा होता हे तिला कळलं.. आणि तिच्या पायापासून एक थंडगार सणक निघून तिच्या डोक्यापर्यंत गेली. पुढच्याच क्षणी स्वतःला सावरून तिने फणकाऱ्याने मागे वळून पाहिले आणि हातातली पिशवी टाकून ती त्याच्या कानाखाली लगावणार इतक्यात तो माणूस काहीसं मागे सरकून आपले हात बचावासाठी डोक्यापाशी नेत म्हणाला..

“अगं.. हो हो हो.. वसू अगं मी आहे मी.. प्रताप..!”

रमाचा हात तिथेच तसाच हवेत थांबला आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव हळूहळू बदलू लागले. भीती आणि संताप यांची जागा आता आश्चर्यमिश्रित हसूने घेतली होती.. त्याच्यावर उगारलेला हात तिने तोंडावर ठेवत ती अजूनच हसायला लागली. तिला हसताना पाहून तो ही सावरला आणि मग दोघंही एकमेकांना बघून जोरजोरात हसायला लागली. आजूबाजूचे लोक तर त्या दोघांनाही वेड लागलंय अश्याच नजरेने पाहत होते. त्यांचं हसू आवरून झालं तसं रमाच्या लक्षात ही बाब आली. ती ओशाळली आणि लगेच हातातून पडलेली पिशवी सावरु लागली. प्रतापही तिची मदत करायला खाली वाकला आणि पुन्हा दोघे एकमेकांना पाहून हसायला लागले.

“चला मॅडम.. आता इथेच हसत राहिलो तर लोक वेडे म्हणून हाकलून लावतील दोघांनाही..” प्रताप म्हणाला आणि दोघे तिथून बाहेरच्या दिशेने चालू लागले. त्याने रमाच्या हातातल्या पिशव्या आग्रहाने स्वतःकडे घेतल्या आणि म्हणाला..

“एक काम करुयात.. काहीतरी खाऊया म्हणजे थोडं निवांत बोलता येईल..”

त्यावर रमा म्हणाली..

“अरे इथे कशाला? घरी चल ना.. इतक्या वर्षांनी भेटलाहेस तर घरी चल.. तिकडेच निवांत बोलू.. मस्त आल्याचा चहा आणि आवडीचे कांदेपोहे करते शेंगदाणे घालून.. तुला आवडतं ना!”

प्रतापने काहीसे आढेवेढे घेतले पण तो तिचं म्हणणं टाळू शकला नाही. त्याने तिला तिथेच बाजूला थांबवलं आणि बाइक आणायला गेला. इतक्यात बाजारातून बाहेर पडणाऱ्या नंदावहिनी रमाला पाहून हाका मारू लागल्या पण रमाचं लक्ष नाही गेलं सगळ्या वर्दळ आणि आवाजामुळे.. पुढच्याच क्षणी प्रताप बाइक घेऊन रमाच्या पुढ्यात येऊन थांबला आणि रमाला घेऊन निघूनही गेला. त्यांना जाताना पाहून नंदावहिनींचे डोळे चमकले.. कपाळावर किंचित आठ्या जमल्या आणि गालात मात्र एक हसू उमटलं.

“वसू, घर छान आहे की गं.. आवरलंही आहेस मस्त.. बरं वाटलं बघून.. कोण कोण असता गं घरी..?” शोकेसमधला मनोहर आणि रमाचा फोटो पाहून परत ठेवत किचनमध्ये कांदेपोहे बनवून डिशमध्ये भरणाऱ्या रमाला उद्देशून प्रताप म्हणाला..

“आवडलं का? थॅंक यू.. आणि आता वसुधा सबनीस नाही हो.. रमा पळशीकर झाले मी लग्नानंतर.. बरं हे घे गरम गरम खाऊन घे.. लिंबू पण दिलाय सोबत..” कांदेपोह्याच्या डीशेस टेबलवर ठेवत रमा काहीसं अडखळत म्हणाली.

प्रतापच्या लक्षात ती गोष्ट आली मग त्याने थोडंसं खोदून विचारल्यावर रमा बोलती झाली. कांदेपोहे आणि चहा संपेपर्यंत रमाची सगळी कहाणी प्रतापने ऐकून घेतली.. खिडकीत उभे राहून बाहेर मावळतीला टेकलेला सूर्य पाहत चहाचा शेवटचा घोट घेऊन होताच त्याने बाजूला उभ्या असलेल्या रमाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत पाणी होतं.. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला धीर दिला.. काही वेळ शांतता पसरली तिथे आणि डोळे पुसत रमाने खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा तिचं लक्ष समोरच्या घराच्या खिडकीत गेली.. नंदावहिनी त्या दोघांना पाहत होत्या आणि रमाने पाहताच त्या लपल्या. रमाला ते काहीसं खटकलं पण तिने दुर्लक्ष केलं आणि खुर्चीत बसत प्रतापला विचारलं..

“माझं मेलीचं सोड.. तुझं काय चालू आहे सध्या? कॉलेजनंतर आता भेटतो आहेस.. लग्न वगैरे केलंस की नाही? काय रे?”

तंद्री भंग झाल्यासारखं करून प्रताप तिच्याकडे वळून म्हणाला..

“अगं माझं काय.. कॉलेज झालं आणि मग मी पुण्याला गेलो मामाकडे. तिकडे मास्टर्स केलं आणि आता तिथल्याच एका खाजगी कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. सोबत तिथेच पीएचडी करतोय सध्या.. सध्यातरी माझा लग्नाचा विचार नाहीय पण तिथल्याच एका कलीगच्या बहिणीचं लग्न होतं. इथे बाजूच्याच गावात राहतो तो.. त्याच्याकडे आलो होतो. उद्या परवाकडे परत जाणार आहे. आता कंटाळा आला म्हणून बाजारात गेलो तिथे तू दिसलीस पण नक्की तूच आहेस का कळत नव्हतं म्हणून मागे मागे आलो.. तर तू काय मला मारायलाच निघाली होतीस..” सगळं ऐकून दोघं पुन्हा हसायला लागले. घड्याळाकडे लक्ष जाताच प्रताप जायला निघाला.. एकमेकांचे नंबर्स घेऊन झाल्यावर प्रतापने तिचा निरोप घेतला आणि तो निघून गेला. तो गेल्यावर रमा कामात गुंतली. १५-२० मिनिटांनी दारावरची बेल वाजली. रमा हात पदराला पुसत पुसत हॉलमध्ये आली आणि दार उघडलं..

“अगं बाई नंदावहिनी तुम्ही..? या या..” रमा म्हणाली आणि पाणी आणायला किचनकडे चालू लागली.

“अगं काही नाही गं रमे.. जरा टोमॅटो असले तर दे गं दोन.. तेच विचारायला आले होते.. मघाशी गेले होते बाजारात पण नेमकी टोमॅटोच आणायचे विसरले बघ कसे काय ते..!” आत येत जेमतेम दार ढकलून रमाच्या मागे मागे किचनकडे जाताना नंदावहिनी म्हणाल्या.

“अगं बाई हो का? मी पण आताच आले जाऊन बाजारात.. आधी म्हणाल्या असतात तर सोबत नसतो का गेलो आपण?” रमा बाजारातून आणलेली टोमॅटोची पिशवी नंदावहिनींच्या पुढ्यात आणत म्हणाली.

“अय्या हो का..? तरीच मी मनात करते.. ही नक्की रमाच आहे पण गाडी ओळखीची नाही दिसली ना.. मन्या भाऊंची गाडी मी ओळखते..” नंदावहिनीच्या चेहऱ्यावर चोराची चोरी पकडल्याचे भाव स्पष्ट दिसत होते.

“अहो तो प्रताप माझा मित्र. पुण्याला असतो हल्ली.. बाजारात भेटला अचानक.. त्याच्याच बाइकवर आले घरी..” रमाने सांगितलं पण तिला वहिनींची नजर खटकली. मग टोमॅटो घेऊन नंदावहिनी निघून गेली.

काही दिवसांनी मात्र शेजारीपाजारी थोडे वेगळे वागताहेत असं रमाच्या लक्षात आलं पण ती मात्र आधीसारखीच वागत होती सगळ्यांशी. पण काही दिवसांनी मात्र घरच्या फोनवर ब्लॅंक कॉल सुरू झाले. अंगणात खेळायला येणारी शेजारची लहान मुलं हल्ली बोलावूनही येईनाशी झाली. सासू हल्ली रोज भांडण करायला लागली होती.. कालपरवा तर प्रतापचं नाव घेऊन ती रमाला बोलू लागली असताना मनोहर घरी आला. त्याच्या कानावर ते पडताच त्याने आईला खडसावलं पण रमाशी न बोलता तो आत निघून गेला. आधीच सगळं असह्य झालेल्या रमाला त्या सगळ्या प्रकाराने रडूच आलं.. ती तशीच रडवेली होऊन मनोहरच्या मागे मागे गेली. पण मनोहरने तिला सांगितलं की त्याला आता या विषयावर काही बोलायचं नाहीय. रमा मन मारून किचनमध्ये निघून गेली.

रात्री काम आटोपून रमा बेडवर आडवी पडली पण तिला कामाच्या थकव्यापेक्षा झाल्या प्रकाराचा विचार करून डोक्याला शीण जास्त आला होता. तश्याच स्थितीत ती बराचवेळ तळमळत राहिली. आणि शेवटी तिने न राहवून बाजूला दुसरीकडे तोंड करून झोपलेल्या मनोहरच्या दंडावर डोकं ठेवलं. मनोहरही जागाच होता. आणि तोही डाव्या कुशीवर वळला आणि डाव्या हाताची उशी करून रमाला त्याने जवळ घेतलं.

“मनोहर…”

“अहं.. काही नको बोलूस.. मला माहितेय तुला जे म्हणायचं आहे ते.. पण एक लक्षात ठेव रमा.. तुझ्यावर माझा माझ्याहून जास्त विश्वास आहे. त्यामुळे कुणी काही म्हंटलं तरी त्याचा काहीच फरक नाही पडणार. पण गेले काही दिवस येणाऱ्या फोन कॉल्समुळे नाही म्हंटलं तरी मी थोडा डिस्टर्ब होतो आणि त्यात आईने प्रतापचं नाव घेऊन तुला बोल लावले ते ऐकून माझा संताप झाला. तुझा काही दोष नसताना उगीच तुझ्यावर राग नको निघायला म्हणून मी आत निघून आलो आणि तुला परत पाठवलं. प्लीज, माफ कर मला..”

यावर रमाची अवस्था आसू आणि हसू अशी झाली. ती काहीच बोलली नाही मनोमन मनोहरसोबत लग्न झाल्याबद्दल देवाचे आभार मानून ती मनोहरच्या छातीवर डोकं ठेवून पडून राहिली. हळूहळू दोघे त्या शांततेत झोपी गेले.

असेच काही दिवस निघून गेले. रमाच्या नकळतच मनोहरने आपल्या एका पोलिस मित्राला हाताशी धरून त्या कॉल करून त्रास देणाऱ्याला पकडले. पोलिस पाहून त्याची घाबरगुंडीच उडाली आणि त्यात ४-५ फटके पडल्यावर तर त्याने पाय धरून माफी मागितली. पुन्हा असं काही घडणार नाही या वचनावर ताकीद देऊन त्याला सोडून दिलं. त्यामुळे आता रमाला येणारे ते कॉल बंद झाले. पण तिचे शेजारी पाजारी जाणं मात्र अगदीच कमी झालं. टोमण्यांना कंटाळून स्वतःची देवळात जाण्याची वेळ तिने बदलून घेतली. सासूला मनोहरने समजावले त्यामुळे तीही तिची कुरबुर आता कमी करू लागली होती. सारं काही पुन्हा सुरळीत चालू झालं होतं.

अश्यातच एके दिवशी सकाळीच एक कार येऊन त्यांच्या दारात थांबली. रमा अंगणातच काहीतरी करत होती तिचं लक्ष तिकडे गेलं. एक जोडपं बाहेर त्यातून बाहेर आलं. तो प्रताप होता. आणि सोबत एक गव्हाळ रंगाची, साधारण ५ फुटांच्या आसपासची, २७-२८ वर्षांची साडीतली एक सुंदर तरुणी.. रमाने पुढे होऊन स्वागत केलं दोघांचं.. आणि घरात घेऊन गेली. रविवार असल्याने मनोहरही घरात होता. त्यानेही हसून त्या दोघांचे स्वागत केले. इतक्यात पाण्याचे ग्लास पुढ्यात देत रमाने गालात हसत म्हणाली..

“काय रे.. छुपा रुस्तम निघालास अगदी.. आणि आलास तो ही असा अचानक तोही असा..!..”

“अगं हो हो.. पाणी पितो आधी तोवर फक्कड आल्याचा चहा टाक.. तो घेत घेत सगळं बोलू निवांत.. आज मस्त जेवणच करून जाणार आहोत. त्यामुळे वेळच वेळ आहे आपल्याकडे.. काय मनोहर.. तुम्हाला चालेल ना?” प्रताप पाण्याचा ग्लास हातात धरून बोलत होता.

“अरे.. चालेल म्हणजे काय.. वाटलंच तर वेगळा बेत पण करू आपला आपलाच.. बाकी सगळे किचनमध्ये असताना..” मनोहर हाताने ड्रिंक घेण्याची खूण करुन डोळे मिचकावत सगळ्यांकडे बघत बोलला. त्यावर सगळे हसायला लागले.. पाण्याचे ग्लास घेऊन रमा किचनकडे वळली तशी ती ही तिच्या पाठोपाठ निघाली. रमाने थांबवलं तरी ती गेलीच सोबत किचनमध्ये. मग इकडे मनोहर आणि प्रतापच्या गप्पा सुरू झाल्या. थोड्यावेळाने रमासोबत ती बाहेर आली हातात चहाचा ट्रे घेऊन..

“काय रे प्रताप हिला काय जास्त न बोलायची ताकीद देऊन आणलीस की काय इथे?” मिश्किल रागाने डोळे मोठे करत विचारताना रमाने त्याच्या हाती कप दिला. सगळ्यांच्या हातात कप देत ट्रेमधला शेवटचा कप आणि सोबतच्या बिस्किटातलं एक बिस्कीट उचलत रमा स्थिरावली तसं हसत हसत प्रतापने बोलणं सुरू केलं..

“काय गं सीमा? अगं आपलंच घर आहे हे इथे का लाजतेय? बरं हिचं नाव सीमा. आमच्या कॉलेजला मास्टर्स करतेय सोशल सायन्स मधून.. तिथेच ओळख झाली आणि मग.. तेव्हापासून एकत्र आहोत आम्ही. आता लग्न करायचा निर्णय घेतलाय आम्ही दोघांनी.. साधासा छोटेखानी कार्यक्रम करायचा आहे. आणि अगदी जवळचे ५-७ स्नेही आणि मित्र बोलवायचे असं ठरलं आहे. पत्रिका नाही छापल्या म्हणून म्हंटलं प्रत्यक्ष जाऊन सगळ्यांना बोलवूयात..”

“अरे वा.. अभिनंदन.. अभिनंदन..” रमा म्हणाली. मनोहरनेही दोघांचे अभिनंदन केलं. मग प्रताप पुन्हा बोलू लागला..

“आता नीट ऐका दोघंही.. म्हणजे माझं तुमच्याकडे अजून एक काम होतं.. तुम्ही समजूतदार आहात म्हणून मी स्पष्टपणे बोलतो आहे. माझं बोलणं पूर्ण ऐकून घ्या आणि मग काय ते तुमचं मत सांगा. ही सीमा. हिचे आईवडील नाहीत. लहानपणापासून ती पुण्यातल्याच एका अनाथालयात वाढलीय. माझंही तसं एक मामा सोडले तर कुणीच नव्हतं.. २ वर्षांपूर्वी तेही गेले. त्यामुळे आता मीही तसा अनाथच झालोय. त्यामुळे कदाचित आम्ही जास्त जवळ आलो आणि आता एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं ठरवलं. तर मुद्दा असा की मागे ज्यावेळेस मी रमाला भेटून गेलो तेव्हा मला तुमची कहाणी कळली आणि ती मी सीमाला सांगितली त्यावर तिने जे सांगितलं ते मला पटलं म्हणून आज आम्ही त्यासाठीच आलो आहोत खासकरून..” असं म्हणताना त्याने सीमाकडे पाहिलं. तशी इतका वेळ शांत बसलेली सीमा बोलू लागली..

“म्हणजे तशी आपली ओळख फारशी नाहीच.. आज आपण पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटतोय. पण प्रतापकडून मी बरंच ऐकलेलं आहे तुमच्याबद्दल.. आणि आज भेटून माझीही खात्री पटली की तुम्ही लोक भली माणसं आहात.. मी ज्या अनाथालयात वाढली तिथेच आता कामही करते. तिथे अगदी काही महिन्यांपासून ते चांगली १४-१५ वर्षांची मुलं आहेत. आम्ही दत्तक देताना फार चौकशी करून खातरजमा करतो आणि मगच दत्तक देण्याबद्दल ठरवतो. तुमची परिस्थिती मला प्रतापकडून कळलीय तर आमचं दोघांचं बोलणं झालं त्यानुसार तुम्हालाही मूल दत्तक घेण्याबाबत विचार करायला हवा असं वाटतं.. माफ करा म्हणजे मी एकदम स्पष्ट बोलली पण मला खरंच वाटतं की तुम्ही याबाबत काहीतरी विचार करावा..”

रमा आणि मनोहर एकमेकांकडे पाहायला लागले.. दोघेही अस्वस्थ झालेत हे त्यांच्या हातांच्या चुळबुळीवरून कळत होतं.. ते ओळखून प्रताप म्हणाला,

“हे बघा तुम्ही फक्त विचार करा आणि कळवा पुढचं सगळं आम्ही दोघं बघून घेऊ..”

“अं.. म्हणजे तसं नाही काही.. पण हा विचार नाही केला आजवर आम्ही कधी.. त्यामुळे पटकन असं निर्णय घेणं वगैरे म्हणजे…” रमा चाचरत म्हणाली.

“हां.. आणि शिवाय आईला हे असं दत्तक मूल घरी आणणं वगैरे कितपत…” मनोहर बोलतच होता इतक्यात त्याची आई म्हणजे राधाबाई दारात हजर झाल्या.

“दत्तक मूल? कुणाचं दत्तक मूल? काय शिजतंय तुमचं? काहीबाही विचार कराल तर मी खपवून घेणार नाही..” दारातून आत येत राधाबाई म्हणाल्या. त्यांचा आवाज चढलेला पाहून सगळे एकदम गप्प झाले. मनोहर समजावणीच्या सुरात तिच्याशी बोलत बोलत तिला आत घेऊन गेला. रमाही ‘आता हा विषय नको बोलायला..’ अशी चेहऱ्यानेच खुणावत मागोमाग गेली. बराच वेळ त्यांचं आत काहीतरी बोलणं चालू राहिलं. आणि शेवटी रमा आणि मनोहर एका पाठोपाठ बाहेर आले. राधाबाई मात्र आतच बसून राहिल्या. त्यांना पाहून सीमा आणि प्रताप दोघेही उठून उभे राहिले. तसं रमाने हसतच सीमाला किचन मध्ये जेवण बनवायला थोडीशी मदत म्हणून आत येण्यास सांगितलं. तसा मनोहरही हसून सगळं ठीक आहे असं भासवू लागला.. त्या दोघी किचनकडे वळताच मनोहरने त्यांच्या प्लॅनप्रमाणे चटई, ग्लास, पाण्याची बाटली वगैरे घेतलं आणि प्रतापला घेऊन तो गच्चीवर गेला. तिथे त्यांचं बोलणं झालंच दत्तक विषयावर.. पण किचनमध्ये सीमाही हळूहळू रमाजवळ मघाशी राहिलेलं बोलणं पूर्ण करत होती. काही वेळाने जेवायला बसले सगळे पण राधाबाईही तिथेच असल्याने सगळेजण फक्त जेवणाबद्दल बोलत राहिले. मग हळूहळू ऊन्हं उतरायला लागली तसे सीमा आणि प्रताप निघाले. कारपर्यंत सोडायला आलेल्या रमा आणि मनोहरला लग्नाला येण्याबद्दल आणि सदर विषयावर विचार करायला सांगून दोघं निघून गेले.

पुढचे काही दिवस पळशीकरांच्या घरात तणावपूर्ण शांतता होती. रमा आणि मनोहर दोघंही एकमेकांशी नीट बोलत नव्हती. राधाबाई आपल्या खोलीतून फारश्या बाहेर पडत नव्हत्या. दत्तक का होईना पण या घरात लहान मूल येईल.. या विचाराने रमा खूश होऊ पाहत होती. मनोहरची अवस्था काही वेगळी नव्हती. पण राधाबाईंच्या विचाराने सगळंच अवघड वाटत होतं दोघांनाही..! शेवटी न राहवून एके रात्री सगळं आवरून अंथरूणात झोपायला आलेली रमा बाजूला पडलेल्या मनोहरच्या बाजूला बसून त्याच्याशी बोलू लागली..

“मनोहर.. झोपलात का?”

मनोहरही जणू वाट पाहत असल्यासारखा लगेचच कुस बदलून तिच्याकडे बघू लागला. रमाने त्याच्याकडे पाहिलं आणि तिथेच सरकून त्याच्या छातीवर डोकं ठेवून पडली. आता दोघं एकमेकांकडे न बघताही एकमेकांशी बोलू लागले.

“मनू.. तुम्हाला काय वाटतं? सीमा आणि प्रताप जे बोलले त्याबद्दल..?”

रमाच्या तोंडून मनू अशी हाक ऐकून मनोहर समजून गेला की रमाच्या मनात काय चालू आहे आणि तिने त्यावर कितपत विचार केलाय ते..

“रमे.. खरं सांगू का? माझ्या मनातही आता तेच आहे जे तुझ्या मनात चालू आहे. पण..”

“आईंचा विरोध आहे हेच ना?”

“हो.. ती ही आपल्या कुटुंबाचा भाग आहे त्यामुळे तिचं मतही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तिचं मन मोडवत नाही गं माझ्याच्यानं.. काय करायचं कळत नाहीय.”

“माझंही मन त्याच विचारापाशी येऊन थांबलं हो.. काहीच होऊ शकत नाही का हो?”

मनोहर काहीवेळ शांत राहिला. पण पुढच्या क्षणी त्याने रमाभोवती आपल्या हातांची मिठी घट्ट केली.. रमा चमकली आणि त्याच्याकडे पहायला डोकं वर उचलणार इतक्यात मनोहरने तिचं डोकं छातीवर घट्ट पकडून ठेवलं.. रमा लाजली. आणि हसून तिने स्वतःला सैल सोडून दिलं कारण तिला मनोमन ठाऊक होतं.. मनोहरच्या डोक्यात नक्की काहीतरी चालू असणार.. नंतर कुणीच काही बोललं नाही. पण दोघेही एकमेकांच्या मिठीत शांतपणे झोपी गेले.

काही दिवसांनी रविवारी प्रतापचा कॉल आला. रमाशी लग्नाला येण्याबद्दल आठवण करून देऊन इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यावर तो मनोहरसोबत बोलू लागला. काहीतरी महत्त्वाचं बोलत होते दोघं खूप वेळ.. रमा मात्र किचनमध्ये आपल्या कामात गर्क होती. प्रतापने काहीतरी सांगितल्यावर मनोहर खुश झाला. दुपारी जेवतानाही मनोहरला खुश बघून रमा थोडी चकित झाली. पण काही बोलली नाही ती त्याला..

प्रताप आणि सीमाचं लग्न ४ दिवसांवर आलं होतं आता.. मनोहरने आधीच सुट्टी मंजूर करून घेतली होती. पुण्याला २ दिवस आधीच जायचं होतं.. रविवारी संध्याकाळी चहा घेताना मनोहरने विषय काढला.

“काय मग महिलामंडळ? तयारी झाली की नाही लग्नाची? नाही म्हंटलं तरी बुधवारी संध्याकाळी जायचं म्हणजे गुरुवारी राहायला लागेल तिकडे म्हणजेच बॅगा नीट भरून ठेवा दोघींच्या.. तिकडे थंडी आहे म्हणत होता प्रताप..”

“हो हो.. माझी तयारी झालीय सगळी. आपल्या दोघांचे कपडे वगैरे भरून बॅगा तयार आहेत. पण अजून आईंची बॅग तेवढी भरायची आहे. त्या नाहीच म्हणताहेत यायला..” रमाने उत्तर दिलं.

“माझं काय काम आहे तिकडे..इतक्या लांब? तुम्ही या जाऊन.. मी थांबते घरी..” राधाबाई काहीसं तोंड वाकडं करत बोलल्या. रमाने मनोहरकडे पाहून काहीतरी बोला असं खुणावलं.

“अगं आई असं काय करतेय? ते लोक इतके घरी येऊन सांगून गेलेत. शिवाय तुझंही खूप दिवसांत कुठे जाणं झालेलं नाहीय. चल.. तितकाच तुलाही बदल..!” मनोहर मनवत म्हणाला. पण राधाबाई कुरकुर करत राहिल्या. त्यावर रमानेही मनवून पाहिलं पण नाहीच. शेवटी मनोहर म्हणाला,

“मला कळतंय आई तू का येत नाहीय ते.. आणि स्पष्टच सांगायचं तर आता तुला वाटतं ते योग्यही आहे. तिकडे ती अनाथ मुलं असतील. आणि त्यादिवशीचा विषय पुन्हा काढतील ते दोघं असा संशय येतोय ना तुला..? तसं असेल तर त्याची काळजी नको करू. आपण फक्त लग्नाला जाऊयात. पण तू चल सोबत.” राधाबाई ऐकायला तयार नव्हत्या. तेव्हा मनोहर म्हणाला,

“अगं आई ऐक गं.. काही होणार नाही.. आणि जर दाखवलीच त्यांनी मुलं तर बघू फक्त.. त्यात तर काहीच अडचण नाही वाटत मला.. नाही पटलं तर सोडून देऊ विषय पण एकदा जाऊन बघूयात तर..”

ते ऐकून थोडंसं विचार करत काहीसं कुरबुरत राधाबाई शेवटी तयार झाल्या. या सगळ्या दरम्यान थोडं आश्चर्याने पण गालात हसत रमा मनोहरकडे पाहत होती. तिच्या आता हळूहळू लक्षात येत होतं.

२ दिवस म्हणता म्हणता निघून गेले. बुधवारी दुपारी जेवून संध्याकाळी थोडे लवकर पोहचू अश्या बेताने पळशीकर कुटुंब पुण्याकडे निघाले. संध्याकाळी दिवेलागणीला ते पुण्यातल्या त्या अनाथालयात पोहचले. गाडीच्या हेडलाइटच्या उजेडात गेटवरील कमानीवर नाव दिसलं.. ‘सांत्वन अनाथालय’. गाडी आत येऊन थांबताच काही मुलं आणि सोबत प्रताप आणि सीमा स्वागताला आले.

“अरे वा.. या या या... छान.. बरं वाटलं तुम्ही आलात.. लवकर निघलात वाटतं?” प्रताप म्हणाला. तिकडे सीमा आधी राधाबाईंच्या पाया पडली आणि मग रमाला मिठी मारली. प्रतापने डिकीतून बॅगा काढल्या तशी सोबतची १४-१५ वर्षांची लहान मुलं आपणहून पुढे आली आणि छोटं छोटं सामान घेऊन तिथल्या एका खोलीपाशी जाऊन थांबले. प्रतापने त्यांच्या राहण्याची सोय तिथेच केली होती. मुलं सगळं सामान तिथे ठेवून निघून गेली. प्रताप आणि सीमाने सगळी खोली आणि तिथली व्यवस्था तिघांना समजावून सांगितली. सगळं आवरून होईपर्यंत रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. एक १८-१९ वर्षांची मुलगी कडेवर एका छोट्या साधारण दोन-अडीच वर्षांच्या २ बो बांधलेल्या गोबऱ्या गालांच्या गोऱ्यापान मुलीला घेऊन तिथे जेवणाचा निरोप घेऊन आली.

“सीमा ताई.. जेवणाची तयारी झाली आहे. मोठ्या सरांनी बोलावलं आहे सगळ्यांना जेवायला..” ती मुलगी म्हणाली.

“अगं शलाका.. ये ये आत ये.. अरे वा.. रेणूबाळ पण आलंय का? ये ये..” सीमा तिला आत घेत म्हणाली. आणि पुढे त्यांचा परिचय करून देऊ लागली.

“बरं का.. ही आहे शलाका.. आमच्या ‘सांत्वन’मधली सगळ्यांत हुशार मुलगी. गेल्यावर्षी १२वी ला कॉलेजमध्ये पहिली आली. ९१% गुण मिळवून..”

“९१ का? वा वा.. छान छान.. पुढे काय विचार आहे मग बेटा?” रमाने तिला जवळ घेत विचारलं. मनोहरने आणि राधाबाईंनीही तिच्या पाठीवर कौतुकाने हात फिरवला.

“ग्रॅजुएशन पूर्ण करून स्पर्धा परीक्षा देणार आहे. मला सीमा ताईसारखं बनायचं आहे.” शलाकाने उत्तर दिलं. ते ऐकून सगळेच खुश झाले कारण तिचा फोकस खरोखर क्लियर होता अगदी या वयातही.. या सगळ्यांत प्रतापने पाहिलं की शलाकाबद्दल बोलतानाही रमा आणि मनोहरची नजर त्या लहानगीवरुन हलत नव्हती. ते पाहून तो म्हणाला,

“आणि ही आमची शेंडेफळ.. सगळ्यांची लाडकी.. रेणू बाळ..!”

ते ऐकताच रमाने रेणूला शलाकाच्या कडेवरून आपल्या कडेवर घेतलं आणि गालावर एक पापा दिला. आणि उत्तरादाखल रेणूनेही तिच्या गालावर एक गोड पापा दिला. ते पाहून सगळेच हसले. रमा मात्र त्या इटूकल्या ओठांच्या स्पर्शाने आत्यंतिक सुखावून गेली होती.. तिने लगेचच अजून एक पापा तिच्या दुसऱ्या गालावर दिला. तिला वाटलं रेणूही पुन्हा तसंच करेल. पण यावेळी तिने सरळ तिचे इवले इवले हात तिच्या मानेभोवती टाकून घट्ट धरून आपलं डोकं रमाच्या खांद्यावर ठेवलं. रमाच्या आनंदाला आता सीमा नव्हती उरली. तिनेही तिला तसेच ठेवून गोल गोल २ गिरक्या घेतल्या. मग तिने मनोहरकडे पाहिलं. तो अनिमिष नेत्रांनी तिचं ते रूप पाहत होता.. राधाबाईही कौतुकाने पाहत होत्या सगळं.. मग मनोहर आणि त्यांनी तिचे गालगुच्चे वगैरे घेऊन लाड करायला सुरुवात केली. मग सगळे तसेच हसत खेळत जेवायला गेले. तिकडेही रमा रेणूचे लाड करत होतीच. मनोहरही मध्येच रेणूला भरवत होता. तिची मस्करी करत होता. आणि आश्चर्याची बाब म्हणजे राधाबाई ते सगळं कौतुकाने पाहत होत्या.. बहुधा त्यांच्याही नकळतच..! खरंतर अनाथालयात मुलांना कुणाही बाहेरील माणसांशी इतकी सलगी करू देण्यात येत नाही विशेषतः लहान मुलांना.. पण आज रेणूला एक क्षणही सोडायला तयार नव्हती रमा..! आणि रेणूही जणू त्यांचीच होऊन गेली होती.. रात्री झोपताना रमाला बिलगून झोपली होती ती..

दुसऱ्या दिवशी सकाळी रमाने डोळे उघडले तेव्हा पुढ्यात रेणू नव्हती. ते लक्षात येताच ती ताडकन उठली. इकडे तिकडे पाहिलं खोलीत ती नव्हती. रेणू..रेणू.. अशी हाका मारतच ती बाहेर आली. आणि तिकडे रेणू मनोहरच्या कडेवर बसून दात घासताना तिला दिसली. मनोहर आणि तिच्या त्या लीला पाहून ती दारातच चौकटीला डोकं टेकून उभी राहिली. त्यानंतर रमाने तिला आंघोळ घातली. आणि राधाबाईंनी तिला गंध पावडर लावून तयार केलं. तयार होऊन ती त्या सफेद रंगाच्या फ्रॉकमध्ये खूपच गोड दिसत होती. त्यावरची ती अबोली पिवळ्या रंगांची फुलांची नक्षी अजूनच खुलून दिसत होती. तिचे ते दोन बो बांधलेलं ध्यान पाहून राधाबाईंनी तिच्या केसांतून हात फिरवत कडाकडा बोटं मोडली. मग राधाबाईंनी तिला दोन हातात दोन लिमलेटच्या गोळ्या देऊन खेळायला पाठवलं. पण ती थोड्या वेळाने शलाकाला घेऊन आली आणि “आजी गोळ्या दे ना” असं म्हणायला लागली तेव्हा शलाका ओरडली पण राधाबाईंनी शलाकाला समजावत शांत केलं आणि दोघींनाही गोळ्या देऊन पाठवलं.

काही वेळानंतर रमा आणि मनोहर अनाथालयाचा परिसर पहायला निघाले. सगळी मुलं कसली ना कसली कामं करण्यात गुंतली होती. तिथले सगळे कर्मचारीही त्यांना मदत करत होती आणि सोबतच त्यांच्यावर लक्ष ठेवून होती. पटांगणात पताके लावणारी मुलं दिसताच दोघं तिकडे चालू लागली.. तिकडे जाऊन बघताहेत तर बाजूलाच सगळे कोपरे रांगोळी काढून सजवण्याचं काम काही मुली करत होत्या आणि त्यात रेणू फक्त लुडबूड करत होती. आणि सगळे तिची गंमत करत होते. ते पाहून रमा-मनोहर हसायला लागले. त्या दोघांना पाहताच रेणू धावत येऊन रमाला बिलगली.. रमा सगळं फार आनंदाने अनुभवत होती. तिला उचलून घेताना ती मनोहरकडे पाहत हलकेच हसली. मनोहर तिच्याकडे पाहून हसला..आणि तिच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ घेतलं.. रेणूनेही त्यांना सोडलं नाही अगदी दिवसभर..! दुपारी जेवतानाही ती राधाबाईंच्या पुढ्यात बसली होती. संध्याकाळी मनोहर तिच्यासोबत अगदी लहान होऊन घोडा घोडा खेळत होता. इतकं सगळं असताना रेणू तयारीच्या कामात मध्येच लुडबूड करत होती. मग ज्यांच्या कामात लुडबूड करत ते एकतर तिला बाजूला करत किंवा रमा वा मनोहरला हाक मारून तिची तक्रार करून तिला बाजूला न्यायला सांगत.की लगेच रमा तिला तिकडून उचलून नेत असत. दिवसभर त्या लहानगीने त्या सगळ्यांनाच सतावून सोडले होते. पण सगळे तिचे ते सतावणेही प्रेमाने आणि कौतुकाने सहन करत होते. रात्री जेवणापासून ती राधाबाईंकडेच होती. त्या स्वतःचं वय विसरून लहान होऊन गेलेल्या तिच्यासोबत.. रात्री झोपताना तिच्या “ए आजी, गोत्त शांग ना गं..” या मनीच्या डोळ्यांसारख्या निरागस आर्जवाला त्या नाही म्हणू शकल्या नाहीत. त्यांनी झोपेपर्यंत ४-५ गोष्टी सांगितल्या तिला. आणि जेव्हा शेवटी तिच्याकडे पाहिलं तर त्यांच्या पदराला हातात घट्ट धरून त्यांच्या कुशीत ते पिलू शांत झोपी गेलेलं. रात्री जेव्हा रमा-मनोहर उठून तिला पाहू लागले तेव्हा तिला त्या अवस्थेत झोपलेलं पाहून दोघंही खूप खुश झाले. मनोहरला जास्त खुश करणारी गोष्ट म्हणजे त्याच्या आईने रेणूला घट्ट जवळ घेऊन ठेवलं होतं आणि त्या दोघींच्या चेहऱ्यावरचं हसू आणि समाधान त्याला अजूनच सुखावून गेलं..

सकाळी थोडंसं लवकर उठून सगळे तयार झाले. सीमा आणि प्रताप आज लग्न करणार होते रजिस्ट्रारच्या ऑफिसला जाऊन.. अनाथालयाचे काही कर्मचारी तिथला सगळा कारभार पाहणारे भिडे सर आणि राधाबाई, रमा, आणि मांडीवर छान नटलेली रेणू घेऊन मनोहर त्या दोघांसोबत तिकडे गेले. लग्न उरकून येऊन मग दुपारी जेवण करून नंतर सगळे मित्र निघणार होते आपापल्या मुक्कामी.. आणि जसजसं निघण्याची वेळ येत होती तसतशी रमा अस्वस्थ होऊ लागली होती. मनोहर आणि राधाबाई यांचीही अवस्था फारशी वेगळी नव्हती पण कुणीही एकमेकांसमोर ते व्यक्त करत नव्हतं. परतीचा प्रवास लवकर सुरू करून लवकर घरी पोहचायचं असं ठरवून सगळे एकमेकांचा निरोप घेऊ लागले. या सगळ्यात रेणू मात्र काहीशी गोंधळून गेलेली दिसत होती. राधाबाईंच्या पदराला घट्ट धरून ठेवलेल्या रेणूच्या डोळ्यांत आता पाणी तरळू लागलं होतं. मिश्या काढून तिने हळूहळू रडायला सुरू करताच रमाचा धीर संपला आणि तीही रेणूला छातीशी कवटाळून रडू लागली. पण आम्ही परत येऊ बाळा तुला भेटायला असं काहीतरी म्हणत तिची समजूत काढू लागली. ते दृश्य पाहून राधाबाईंनीही डोळ्यांना पदर लावला. मग शेवटी रेणूने सगळ्यांचा पापा घेतला आणि गाडी घराकडे निघाली. पूर्ण प्रवासात खूप कमीवेळा तिघे एकमेकांशी बोलत होते. २ दिवसांत त्या लहान जीवाने त्या सगळ्यांनाच खूप लळा लावला होता.

घरी येऊन आज ४ दिवस झाले होते. पण कुणाचंही लक्ष लागत नव्हतं कशातच! एके रात्री कीर्तनाहून राधाबाई घरी आल्या. आणि मनोहरला हाका मारू लागल्या. रमा आणि मनोहर त्यांचा आवाज ऐकून बाहेर हॉलमध्ये आले. राधाबाई रडत होत्या.

“काय झालं आई?” मनोहरने घाबरून विचारलं.

“आपला कृष्ण आपल्याला बोलवतोय.. त्याला घेऊन या लवकर….” असं म्हणत त्या अजून रडू लागल्या. रमाने त्यांना पाणी आणून दिलं आणि शांत करत पुन्हा विचारलं तसं त्या बोलू लागल्या..

“आज महाराजांनी कीर्तनात बाळकृष्ण जन्माचा दाखला देऊन निरूपण केलं तर मला रेणूबाळाचा चेहरा समोर दिसायला लागला.. तिची आठवण आली..”

“पण आई..” म्हणत मनोहर रमाकडे पाहू लागला.

“माहितेय मला.. मीच सांगितलं होतं पण आताही मीच सांगते मन्या लेकराला घरी घेऊन या.. पोरीत जीव गुंतलाय रे… आणि तिलाही आपला लळा लागलाय.. पाहिलं ना..?”

ते ऐकून रमा आणि मनोहरने तिला मिठी मारली..

“उद्याच प्रतापला कॉल करून कळवतो आम्ही येतोय रेणूला… आमच्या रेणूला न्यायला येतोय..” मनोहरने इतकं म्हणताच रमा आणि राधाबाईंच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.

आज सकाळपासून रमाची नुसती लगबग चालू होती. काम करता करता ती बाहेर येऊन रेणू आली की नाही ते पाहत होती. तिचा आज चौथी इयत्तेचा निकाल होता ना.. रेणूला दत्तक घेतल्याला आता ६-७ वर्षं उलटली होती. घरी आणल्यावर तिचं खूप कौतुक झालं.. शेजारीही सगळे खूश झाले. सगळ्यांकडे हक्काने खाऊ मागायचा अधिकार फक्त रेणूकडेच होता. मुळातच इतकी गोड आणि त्यात तिच्या हसऱ्या खेळत्या चेहऱ्याकडे पाहून सगळेच विरघळायचे.. त्यामुळे त्या परिसरातील सगळ्यांचीच ती लाडकी झालेली. पळशीकरांच्या घराचं तर तिने नंदनवनच करून टाकलं होतं.. इतक्या वर्षांत एकच गोष्ट वाईट झाली ती म्हणजे राधाबाईंचं जाणं.. रेणू दुसरीतून नुकतीच तिसरीत गेलेली. त्या दरम्यान न्युमोनियाचं निमित्त होऊन त्या कैलासवासी झाल्या. त्या एका गोष्टी व्यतिरिक्त त्या घराची फक्त आणि फक्त भरभराटच झाली होती. मनोहरला प्रमोशन मिळालं होतं. रेणूच्या ८व्या वाढदिवसाला काढलेल्या तिकिटावर त्यांना ₹५ लाखांची लॉटरीही लागली होती. सारं काही सुरळीत आनंदाने चालू होतं. आज रेणू पाचवीत जाणार होती. तशी ती अभ्यासात फार हुशार नव्हती पण रमा आणि मनोहर यांची फार अपेक्षाही नव्हती. रमा नुकतीच बाहेर डोकावून पुन्हा आत रेणूसाठी रव्याची खीर करायला गेली. इतक्यात गाडीचा हॉर्न ऐकू आला. शाळेच्या बसमधून रेणू उतरली आणि धावतच घर गाठलं.. रमा तोवर दारात आलेलीच. रेणूच्या तोंडात एक अख्खा पेढा कोंबत म्हणाली,

“मला माहीत आहे. एक मुलगी पास झालीय.”

“अगं आई.. नुसती पास नाही काही.. ७वा नंबर आलाय माझा वर्गात.. आम्ही सगळे नंबरवाले विद्यार्थी ना समोर उभे राहिलो फळ्याजवळ तेव्हा सगळ्यांनी टाळ्या पण वाजवल्या..” तोंडातला पेढा खाऊन झाल्यावर रेणू सोफ्यावर बसत सांगू लागली. ते ऐकून रमा अजूनच खूश झाली. हात पाय धुवून देवाला आणि आजी-आजोबांच्या फोटोला नमस्कार करायला सांगितलं तिने रेणूला.. मग मनोहरला कॉल करून रेणूनेच तिचा निकाल सांगितला. नंबर आलाय हे कळताच मनोहरही खूप खूश झाला.

“..संध्याकाळी लवकर निघतो.. दोघी तयार रहा.. आपण आज फिरायला जाऊयात आणि मग मूवी मग हॉटेलला जेवण करून रात्री घरी.. लव यू माय बच्चा.. माय लवली रेणू बेटा.. बाय..” असं म्हणत मनोहरने फोन ठेवला तशी रेणू उड्या मारून आनंद व्यक्त करू लागली. ते बघून रमाही तिच्यासोबत लहान होऊन उड्या मारू लागली. मग दोघी जेवण आटोपून टीव्ही बघत बघत खीर खायला बसल्या. खीर खाता खाता रेणूने विचारलं..

“ए आई.. दत्तक म्हणजे काय गं..?”

रमाच्या हातून चमचा खाली पडला आणि घास तोंडातच अडकला. तिने चमकून रेणूकडे पाहिलं.. रेणू टीव्ही बघतच प्रश्न करत होती म्हणजे तिला त्यातलं काही गांभीर्य कळलं नव्हतं. तिचं वयच नव्हतं ते.. रमा मुद्दामहून शांत राहून पुन्हा खीर खाऊ लागली. त्यावर रेणूने पुन्हा विचारलं. तेव्हा रमाने विचारलं..

“काही नाही गं.. तू कुठे ऐकलंस पण हे..?”

“अगं मघाशी ती सायलीची आई मयूरीच्या आईला सांगत होती की मी दत्तक मुलगी आहे.. म्हणजे काय गं आई?” रेणू बोलघेवडी आणि मस्तीखोर होती पण शेवटी होती लहानच.. तिच्या बालमतीला त्यातलं काही कळत नव्हतं.. पण रमा मात्र खूप धास्तावली होती. कसंबसं धैर्य गोळा करून तिने स्वतःला सावरलं आणि खोटं हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली,

“अगं म्हणजे ती म्हणाली की रेणू खूप हुशार आहे.. म्हणून तर नंबर आला तिचा.. बरं ते सोड तुला अजून खीर हवी का?”

रेणूने डोळे मोठे करून जिभ ओठांवर फिरवत “हां…” असं केलं.. आणि रमा लगेच तिची वाटी घेऊन किचनलामध्ये निघून गेली. नंतर रेणूला झोपवून ती तिच्या शेजारी बराच वेळ त्यावर विचार करत बसून राहिली.

संध्याकाळी जेव्हा तिघे आधी चौपाटीवर फिरायला गेले तेव्हा रेणू वाळूत किल्ला करण्यात मग्न असताना रमाने मनोहरला सगळा विषय सांगितला. ते ऐकल्यावर तो ही काहीसा काळजीत पडला. पण मग तिला म्हणाला,

“काही झालं तरी हे खरं तिच्यावर कधीच पोहचू द्यायचं नाही आपण.. आणि आज तिचा दिवस आहे तेव्हा आपण आता फक्त एंजॉय करायचं.. बाकीचा विचार सोडून दे..” असं म्हणत त्याने तिला जवळ घेतलं आणि धीर दिला. तिकडून किल्ला पूर्ण करून बाजूला उभं राहून उड्या मारत मारत रेणू त्या दोघांना हाका मारू लागली.. ते पाहून मनोहर रमाला म्हणाला,

“ती बघ.. ती आहे रेणू मनोहर पळशीकर. सौ. रमा आणि श्री. मनोहर पळशीकर यांची लाडाची लेक. आपली मुलगी. बाकी काहीच आपण मनात आणायचं नाही.. आणि तिच्यापर्यंत तसलं काही येऊही द्यायचं नाही. कळलं..?”

इतकं बोलून तो रेणूकडे गेला आणि तिला उचलून घेऊन गाडीकडे वळला. पाठोपाठ आपले अश्रू पुसत हसऱ्या चेहऱ्याने रमाही चालू लागली.

बघता बघता दिवस महीने आणि वर्षं उलटून गेली.. मागच्या आठवड्यात रेणू १९ वर्षांची झाली. दरवर्षीप्रमाणे खूप दणक्यात तिचा वाढदिवस साजरा केला गेला. मनोहरने तिला एक स्कूटी गिफ्ट म्हणून दिली. तिचे जमेल तितके लाड करत होते ते दोघं.. १२वीत फक्त ५२% मिळवून रेणू पास झाली पण तरीही कसलं दुःख न करता त्यांनी तिला नवा महागडा मोबाईल घेऊन दिला होता. इतक्या वर्षांत एकदाही चुकूनही कधी तिच्याजवळ दत्तक किंवा परकेपणाचा कसलाच उल्लेख केला नव्हता त्यांनी. एकदा शेजारच्या नंदावहिनींनी तसा आगाऊपणा केला होता पण त्यावेळेस सालस, सोशीक आणि हसतमुख रमाचा रुद्रावतार त्यांच्यासकट सगळ्या शेजाऱ्यांनी बघितला होता. त्यानंतर मात्र नंदावहिनी आणि इतर कुणीही ते धाडस केलं नव्हतं. आता कॉलेजकन्या झालेली रेणू स्कूटीवरुन जाताना पाहून रमा कौतुकाने तिला पाहत राही. मनोहर तर तिच्यासाठी जीव ओवाळून ठेवी. त्या दोघांचं विश्व आजही तिच्याच भोवती फिरत होतं. कसलीही कोणतीही कथा अश्या सुखद वळणावर संपावी वाटत असतं प्रत्येकाला.. पण दरवेळी प्रत्येक गाणं हव्या असलेल्या ओळीवर संपतंच असं नाही. रमा मनोहर आणि रेणू या त्रिकोणी सुखी कुटुंबाचं सगळं आलबेल सुरू आहे, असं वाटत होतं. पण पुढे काळाच्या पोटात काय दडून राहिलं होतं कुणालाच माहीत नव्हतं..!

नवीन स्कूटी मिळाल्यानंतर कॉलेजला जाणारी रेणू हल्ली खूप बिझी झाली होती. कॉलेज सुटल्यावर घरी यायला उशीर होत असे. घरी आली तरी स्वतःच्या बेडरूममध्ये मोबाईल घेऊन तासनतास बसून रहायची. जेवणाकडे दुर्लक्ष होऊ लागलं होतं तिचं.. चिडचिड करू लागली होती. परवा तर क्षुल्लक कारणावरून रमाला उद्धटपणे काहीतरी बोलून तिने हद्दच केली. रमाला काही कळतच नव्हतं काय होतंय ते.. कारण नसता पार्टी करणं, पिकनिक काढणं, हॅंगआउट करणं हे नित्याचे झाले होते. रमाने मनोहरला जेव्हा कधी याबद्दल बोलून दाखवलं; त्याने हसून दुर्लक्ष केलं. पण रमा हल्ली खूप चिंतेत राहू लागली. आपल्या अतिलाडाने रेणू बिघडत चालली आहे असं तिला वाटायला लागलं होतं. अलिकडे तर रेणू घरी शांतच राहायला लागली होती. कमी झालेलं बोलणं अजूनच खुंटत जात होतं.. उलट त्या दोघांपैकी कुणी तिच्याशी बोलायला गेलं तर नेहमी तिरकस उत्तरं द्यायला लागली होती आजकाल ती.. रमा नेहमी मनोहरला याबाबत काही बोलायला गेली तर तो नेहमीसारखं हसण्यावारी नेत होता पण एके दिवशी काही झालं जे मनोहरही दुर्लक्षित करू शकला नाही. त्यादिवशी सकाळी नाश्ता करताना रेणूच्या हातात मोबाईल बघून रमा चिडली आणि तिच्या हातातून मोबाईल घेऊन तिने बाजूला ठेवला. बस्स..! इतकं कारण.. आणि रेणूने “अगं काही अक्कल तुला.. माझा मोबाईल दे आधी इकडे.. दे म्हंटलं ना..” असं म्हणत सरळ पुढ्यात ठेवलेली नाश्त्याची प्लेट उडवून लावली. त्यामुळे समोर ठेवलेला ज्यूसचा ग्लास कलंडला आणि त्यातलं ज्यूस रमाच्या साडीवर उडालं. मनोहरही पटकन उभा राहिला. यावर रमा अजूनच चिडली आणि रेणूकडे रागाने पाहू लागली. मनोहरलाही राग आला होता यावेळेस रेणूचा; पण रेणू मात्र याच्याउलट रमाच्या अंगावर वसकन् ओरडली..

“बघितलं काय झालं तुझ्यामुळे.. मूर्ख..”

हे ऐकताच रमा काही बोलणार याच्या आधीच मनोहरने एक सणसणीत कानाखाली ठेवून दिली रेणूच्या गालावर.. रेणू गडबडली.. रमाही चमकून एकदम मागे झाली. मनोहरचं ते रूप त्या दोघीही आज पहिल्यांदा पाहत होत्या. त्यानंतर रेणू रडत रडत अंत गेली आणि बॅग घेऊन कॉलेजला निघून गेली. मनोहरही तसाच रागाच्या भरात ऑफिसला गेला. रमा त्याच्या मागे हाका मारत धावली.. पण तोपर्यंत तो निघून गेला होता. त्यादिवशी रमाचं कशातच लक्ष लागत नव्हतं. तिने दोघांनाही कॉल करून पाहिले पण कुणीच उत्तर देत नव्हतं त्यामुळे रमा अजूनच काळजी करू लागली.

संध्याकाळी दिवेलागणीची वेळ झाली तरी रेणू आली नव्हती. त्यामुळे देवासमोर दिवा लावतानाही आज रमा स्थिर नव्हती. बाहेर अंगणात तुळशीजवळ दिवा लावायला आली तेव्हा तिला रेणू दिसली. सोबत एक जॅकेट घातलेला, दाढी वाढवलेला एक साधारण पंचविशीतला एक तरुण दिसला. ती अजून निरखून पाहू लागली इतक्यात तो गाडी वळवून निघून गेलाही सुसाट.! आणि रेणूने स्कूटी गेटमधून आत आणली. रमाकडे पाहताच रमा हसली पण ती तिच्या बाजूने तोऱ्यात निघून घरात गेली. रमा तिच्या मागोमाग घरात गेली.

“अगं रेणू ऐक तरी.. कुठे होतीस इतका वेळ? मी किती कॉल्स केले. का उचलले नाहीस? मी काळजीत होते गं.. सकाळपासून काही खाल्लं की नाही ते ही माहीत नाही.. बरं तो कोण होता सोबत आता गेटजवळ..?

“तुला काय करायचं आहे? डिटेक्टिवगिऱ्या बंद कर की जरा.. मला माझं लाइफ आहे. तुझ्या लाइफमध्ये मी कधी करते का ढवळाढवळ? रेणूने तुसडेपणाने उत्तर दिलं..

“तेच तर चुकतंय तुझं मूर्ख मुली.. मला वाटलं सकाळी इतकं सगळं झाल्यावर लाजेने तुझी मान खाली घालून आईची माफी मागशील पण तुझं तर सगळं उलटंच चालू आहे.. से सॉरी टु यॉर ममा..” दारात येऊन सगळं ऐकत असलेला मनोहर आत येत म्हणाला.

“सॉरी, मिस्टर पळशीकर. बट आय डोन्ट थिंक आय नीड टु अपॉलोजाइज टु एनीबडी..” रेणू काहीतरी विचित्र वागत होती. तिचा तो उद्धटपणा बघून मनोहर चिडला आणि तिच्या अंगावर धावून गेला.

“डोन्ट यू ईवन थिंक ऑफ इट.. आय अॅम नॉट गॉना टॉलरेट धिस एनीमोर..” रेणू मनोहरच्या डोळ्यांत डोळे घालून उद्धटपणे उत्तर देत होती. ते पाहून मनोहरचा हवेतला हात हवेतच थांबला आणि रागाने थरथरणारा मनोहर विफल होऊन सोफ्यावर बसला. त्याचा चेहरा आता रडवेला झाला होता. ते पाहून मात्र रमा चवताळली आणि न राहवून तिने रेणूवर हात उगारला. पण रेणूने न रडता फक्त तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि तशीच तडक निघून आपल्या बेडरूममध्ये गेली. त्या रात्री कुणीच जेवलं नाही. रमा आणि मनोहर तिथेच सोफ्यावर झोपी गेले. सकाळी सगळे उठले तेच एका विचित्र तणावपूर्ण शांततेत.. आजची सकाळ नेहमीसारखी प्रसन्न नव्हती. पुढले दोन दिवस घरात तसंच वातावरण होतं. इतक्या लाडाने वाढवलेल्या पोरीवर हात उचलला याचं रमा आणि मनोहर दोघांनाही खेद वाटत होता. पण रेणूच्या डोक्यात काय चालू होतं काहीच कळत नव्हतं. चुपचाप निघून कॉलेजला जायची आणि उशीरानेच घरी यायची. साचलेलं सारं मळभ दूर होऊन सगळं ठीक होऊ दे, इतकीच प्रार्थना रमा देवाजवळ करत होती.

आणि मग शेवटी तो दिवस उजाडला. सकाळी नेहमीप्रमाणे रेणू कॉलेजला निघून गेली आणि मनोहर ऑफिसला. रमा तिच्या कामात गुंतून गेली पण डोक्यातलं विचारचक्र काही थांबत नव्हतं. गेले काही दिवस जे काही घरात घडत होतं त्याची पुसटशी कल्पना स्वप्नातही केलेली नव्हती कधी रमाने.. अश्या विचारातच तिने जेवण बनवलं आणि देवापुढे नैवेद्य ठेवला आणि मनोमन त्याच्याकडेच सगळ्यातून सुखरूप बाहेर काढ अशी विनवणी करू लागली. इतक्यात दारावरची बेल वाजली. रमा पदराने डोळे पुसतच हॉलमध्ये आली.

“काकू.. रेणू आहे का घरात?” एक रेणूच्याच वयाची मुलगी दारात उभी होती.

“नाही गं बाळा.. ती कॉलेजला गेलीय. तू नाही का गेली? ये घरात ये.. मी ओळखलं नाही तुला बाळा.. काय नाव तुझं..?” रमाने तिला आत घेत विचारलं.

“माझं नाव प्रतीक्षा मोघे.. मी रेणूच्याच वर्गात शिकते. ती बरेच दिवस कॉलेजला येत नव्हती. काल मला रस्त्यात भेटली तेव्हा माझ्याकडून नोट्स घेऊन गेली. मला म्हणाली उद्या परत करते. पण आज आली नाही कॉलेजला म्हणून मी आता घरी आले.” पुढ्यात ठेवलेला पाण्याचा ग्लास हातात घेत ती म्हणाली.

“अगं पण.. ती रोज जाते कॉलेजला.. आणि पूर्ण वेळ झाल्यावर परत येते.” रमा गोंधळून म्हणाली.

“काकू तुम्ही रागावू नका पण मी तुम्हाला रेणूबद्दल काही महत्त्वाचं सांगायला आलेय आज..” प्रतीक्षा असं म्हणताच रमाच्या काळजात धस्स झालं.. ती प्रतीक्षाच्या बाजूला जाऊन बसली आणि म्हणाली,

“प्रतीक्षा बाळा तुला जे काही सांगायचं आहे ते स्पष्ट सांग आणि लवकर सांग..”

त्यानंतर हातातला ग्लास समोर टेबलवर ठेवत प्रतीक्षाने बोलायला सुरू केलं..

“खरंतर सांगावं असं खूप आधीपासून वाटत होतं काकू.. पण मला रेणूने भीती दाखवून गप्प केलं होतं.. पण मी काल जे ऐकलं ते पाहून मला राहवलं नाही. आणि म्हणून आज मी इथे आले. खरंतर रेणू पूर्वीपासून आमची लीडर.. ती बिनधास्त आहे, ती आमच्याशी फटकळपणे बोलली तरी ती चांगली मुलगी आहे हे आम्हाला माहीत होतं. पण गेल्यावर्षी रोहित तिच्या लाइफ मध्ये आला आणि तिथून सगळं बिनसलंच.. रोहित शेंडे नावाचा एक मुलगा रेणूच्या मागे लागला होता. सुरुवातीला तो तिचा पाठलागही करायचा पण तेव्हा रेणूने त्याला चांगलंच सुनावलं होतं. तो खूप वाया गेलेला मुलगा आहे हो काकू.. त्याचा एक काका आहे फक्त तोही बरेचदा जेलमध्ये असतो. त्या झेडपीवाल्या अण्णाभाऊ शिंदेंच्या सभा वगैरे अरेंज करणाऱ्या टोळक्यामध्ये रोहित असतो. दारू सिगरेटचा नाद खूप आहे त्याला. घरी कोणी नाही पण पार्टी ऑफिसमधून पैसा घेऊन चैन करतो. त्या प्रकारानंतरही त्याने रेणूचा पाठलाग सुरूच ठेवला. पण काही महिन्यांनी रेणू आमच्यात कमी यायला लागली. आमच्याशी फार बोलायची नाही. लेक्चर बंक करून लवकर निघायची. मला खटकलं म्हणून मी एकदा ग्रुपमध्ये विषय काढला तेव्हा कळलं की रोहित आणि रेणूचं अफेयर सुरू आहे. मला धक्काच बसला. मी रेणूला याबाबत विचारलंही तर तिने मला थातुरमातूर कारणं देऊन पिटाळून लावलं. मी तुम्हाला सांगायला येणार होते पण कुणास ठाऊक कसं रेणूला कळलं आणि तेव्हा तिने आणि रोहितने मला जवळपास धमकीच दिली की जर मी असं काही केलं तर परिणाम वाईट होतील. मग मी घाबरून गेले. पण रोज त्या दोघांना गाडीवर फिरताना बघून मला खूप वाईट वाटायचं. तुमच्याबद्दल विचार यायचा. पण मन मारून राहायचे. वाटायचं रेणूला कधी ना कधी कळेल तिची चूक.. पण काल त्या दोघांना बोलताना ऐकलं की ते दोघं लग्न करणार आहेत लवकरच.. तेव्हा मला राहवलं नाही आणि आज मी इथे आले..”

सगळं बोलताना प्रतीक्षा रडू लागलेली. तिने रुमालाने डोळे पुसत रमाकडे पाहिलं तर तिला घेरी येत होती. प्रतीक्षा घाबरली. तिने पटकन तिला सोफ्यावर मागे डोकं टेकवून बसवलं. समोर ठेवलेलं पाणी तिच्या तोंडावर शिंपडलं.. आणि “काकू.. काकू..” अशी हाका मारायला लागली. रमा शुद्धीवर आली आणि समोर प्रतिक्षाला पाहून ती रडायला लागली. प्रतीक्षा रमाला सावरू लागली. काही वेळाने रमा थोडी सावरली तशी प्रतीक्षा तिला म्हणाली,

“काकू, मी येते आता पण प्लीज माझं नाव नका सांगू कुणाला..” आणि इतकं बोलून ती तिला काळजी घ्यायला सांगून ती निघून गेली. ती जाताच रमाने रेणूला कॉलवर कॉल केले पण तिने एकही कॉल उचलला नाही. शेवटी घाबरलेल्या रमाने मनोहरला कॉल करून घरी बोलावून घेतलं आणि त्याला सगळा प्रकार सांगितला. ते सगळं ऐकून तो ही पटकन खालीच बसला. त्याचेही कॉल्स रेणू उचलत नव्हती त्यामुळे मनोहर गाडी घेऊन तिला शोधायला बाहेर पडला. खूप फिरून त्याने सगळी संभाव्य ठिकाणं पालथी घातली. वेडापीसा झाल्यासारखा तो फिरत होता. शेवटी हताश होऊन तो परतला. गेटपाशी येतोय तोच एकजण मागून आला आणि त्याला सांगू लागला,

“मन्याभाऊ तुमीच का? तुमास्नी अण्णांनी उद्या सकाळी हापिसात बोलवलंय..”

त्याचं बोलणं होईतोवर तिथे प्रतापची गाडी येऊन थांबली. त्यातून प्रताप आणि सीमा उतरले. त्यांना बघताच त्या माणसाने काढता पाय घेतला. प्रताप आणि सीमाकडे पाहून मनोहर काही बोलणार इतक्यात प्रतापने त्याला रमाने कॉल करून सगळं सांगितल्याचं सांगितलं. आणि त्याला घेऊन ते घरात गेले. घरात येताच सीमाला मिठी मारून रमाने हंबरडा फोडला. आणि प्रतापने मनोहरला सावरले. पण सगळेच खचून गेले होते. बऱ्याच वेळाने सगळे शांत झाले तसं सीमाने साधी खिचडी बनवली आणि आग्रहाने दोघांना जेवू घातलं. आज त्या घराचं रुपरंगच बदलून गेलं होतं.. ती रात्र कशी गेली ते त्या चौघांनाच ठाऊक..

दुसऱ्या दिवशी प्रतापच्या गाडीत बसून चौघेही अण्णा शिंदेंच्या ऑफिसमध्ये गेले. तिथे आधीच अण्णांसोबत काही पंचमंडळी बसले होते. त्यांनी या चौघांना बसवलं आणि मग अण्णांनी बोलायला सुरुवात केली.

“पळशीकर तुम्हीच का? हे बघा.. आता जे व्हायचं ते होऊन गेलंय तेव्हा आता वाद करून काही उपयोग नाही. दोघंही सज्ञान आहेत त्यामुळे काही करता येणारही नाही आपल्या कुणाला.. दोघांनी काल शेजारच्या गावातल्या टेकडीवरच्या देवळात जाऊन लग्न केलेलं आहे. आता आपलं कर्तव्य एकच ते म्हणजे त्यांना आशीर्वाद देणं..”

हे सगळं ऐकताच मनोहरने एक हताश सुस्कारा सोडला आणि त्याचा कंठ दाटून आला. त्याची अवस्था बघून प्रताप म्हणाला,

“दोघं आता कुठे आहेत? त्यांना समोर बोलवा आधी. इतक्या लाडाने वाढवली पोरीला.. असंच कुणाच्याही हवाली करून सोडून द्यायचं का? पोराला ना काही काम ना धंदा.. कसं होणार आहे संसार..?” त्याच्या आवाजात त्याचा राग स्पष्ट होत होता. इतक्यात आत थांबलेले रेणू आणि रोहित बाहेर आले. मागोमाग रोहितचा काका आला. त्याला पाहताच मनोहर खाडकन् उडाला. कारण तो दुसरा तिसरा कुणी नव्हता तर रमाला अश्लील कॉल करणारा भामटाच होता तो..! त्याला बघून मनोहरला स्वतःच्या नाशिबाची चीड आली. आणि तिकडे मंगळसूत्राचे काळे मणी घातलेली रेणू दिसताच रमाचा बांध फुटला आणि ती रडू लागली. त्यांची ती अवस्था आणि रोहितचा अवतार बघून सीमाचाही उद्रेक झाला. ती रेणूला पाहून दोष देऊ लागली.

“अगं मूर्ख मुली थोडा तरी विचार करायचा. इतक्या चांगल्या आईबापाला असं सोडून जाण्याचा अविचार करताना काहीच कसं वाटलं नाही? तळहातावरच्या फोडासारखीजपली तुला.. आणि तू हे फळ दिलंस त्यांच्या प्रेमाचं..?”

“ओ सीमाताई.. तुम्ही नका शिकवू मला.. मी सज्ञान आहे तेव्हा माझं भलंबुरं मला चांगलं कळतं. आणि मला जपलं त्यात वेगळं काही केलं नाही. त्यांना मूल होत नव्हतं म्हणून मला दत्तक घेतलं आणि स्वतःची आई बाप होण्याची इच्छा पूर्ण केली. मला माहितेय सगळं.. काकांनी सगळं सांगितलंय मला..” रेणूचे हे शब्द गरम शिश्यासारखे घुसले रमा आणि मनोहरच्या कानात. रमा आ वासून तिच्याकडे बघतच राहिली. पण मनोहर मात्र चवताळून उठला.. तिला मारायला धावला पण हात उगारला तोच त्याला तिच्या जागी ती दोन बो बांधलेली, गोबऱ्या गालांची, अबोली पिवळ्या फुलांची नक्षी असलेला फ्रॉक घातलेली दोन-अडीच वर्षांची रेणू दिसली आणि त्याच्या त्या आरक्त डोळ्यांमध्ये अश्रू दाटले. तो काहीतरी बरळला पण त्याच्या छातीत एक जोराची कळ आली.. डावा हात छातीवर दाबत तो गुदमरला आणि कळवळून “..रेणू…” अशी जोराची हाक मारून तो कोसळला. ते पाहून सगळेच जण गडबडले.. रमा तर इतकी धास्तावली की ते दृश्य पाहून तिला चक्कर आली. तिथलं वातावरण तणावपूर्ण होत असल्याचं पाहून अण्णांनी गर्दी कमी केली आणि रमा व मनोहरला लागलीच गाडीत टाकून हॉस्पिटलला नेलं.

“मनोहर कसे आहेत? मला त्यांच्याकडे घेऊन चला.. मनोहर.. मनोहर..” रमा शुद्धीवर येताच जोरजोरात रडत कॉटवरुन उठत उठत म्हणू लागली. प्रताप आणि सीमाने रडवेल्या अवस्थेत तिला शांत करायचा प्रयत्न केला. पण ती ऐकायच्या मनःस्थितीत नव्हती. ती जोर काढून तिकडून त्यांना बाजूला सारून मनोहरला शोधायला निघू लागली. तेव्हा बळजबरीने प्रतापने तिला तिथे थांबवलं आणि खांद्याला धरून जोरजोरात हलवूनही ती आवरत नसल्याचे पाहून त्याने तिला एक कानशीलात लगावत तिला ओरडून सांगितलं..

“अगं वसू.. आपला मनोहर गेला आपल्याला सोडून… तुला कळतंय का??”

ते ऐकताच रमा सुन्न झाली.. पुढचं तिला काही कळेनाच.. रमा पुढच्या वेळेस जेव्हा भानावर आली तेव्हा ती मनोहरच्या पार्थिवाला अग्नी देत होती. अग्नी देताच तिने “मनोहर…” अशी एकच किंकाळी फोडली.. आणि ती तिथेच कोसळली.. तेव्हा सोबतच्या बायकांनी आणि सीमाने तिला बाजूला नेली आणि तिला तोंडावर पाणी शिंपडून शुद्धीवर आणलं.. पण रमा शून्यात पाहत बसली फक्त.. प्रतापला ते दृश्य पाहून सहन नाही झालं.. तो बाजूला जाऊन रडू लागला.. इकडे रेणूने धावत जाऊन रमाला मिठी मारली पण तिला कसलीच जाणीव उरली नव्हती.. ती पुतळ्यासारखी बसून राहिली…

प्रतापने स्वतःला सावरलं आणि तो सीमा आणि रमाला घेऊन तिथून निघू लागला.. तेव्हा रेणूने माफी मागून त्यांना थांबवू पाहिलं पण त्याने तिचा हात झिडकारला आणि दोघींना तिकडून घेऊन जाताना सीमाकडे पाहून तो अगतिक होऊन म्हणाला..

“या माऊलीने आई बनून एका अनाथाला आधार दिला.. आयुष्य दिलं.. पण त्याच उरफाट्याने आज तिलाच पोरकी करून सोडलं…”


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy