परेश पवार 'शिव'

Inspirational

4.3  

परेश पवार 'शिव'

Inspirational

दुसरी बाजू

दुसरी बाजू

28 mins
2.3K


“अरे साहेबा.. कॉलेज झालं सुरू कधीच.. तू कधी जाणार आहेस?” त्याच्या ताईने कॉलेजहून घरी येताच त्याला विचारलं.

कॉलेज सुरू होऊन जवळपास आठवडा झाला होता.. पण त्याला त्याची कसलीच माहिती नव्हती.. अभ्यासात तसा हुशारच.. सन २००५चं ते वर्ष तर त्याला खूपच चांगलं ठरलं होतं.. दहावीला चांगले ८२% गुण मिळवून पास झालेला तो.. शाळेत पहिला आलेला.. मग तालुक्याच्या कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. पण अंगात हुशारी नव्हती.. दुनियादारी माहीत नव्हती.. दिसायलाही साधारणच.. उंच पण अगदीच किरकोळ देहयष्टी.. कॉलेजकुमार तर म्हणूच नये कुणी.. थोडक्यात, लक्षात न राहणारा एक सर्वसाधारण मुलगा.. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असणाऱ्या त्याच्या बहिणीने सांगितले तेव्हा त्याला समजले की कॉलेज कधीचं सुरू झालंय.. थोडं बिचकतंच दुसऱ्या दिवशी नवीन रजिस्टर वही घेऊन तो कॉलेजला गेला..

गेटमधून आत जातोय तोच तास सुरू झाल्याची घंटा झाली.. बिचारा धावतपळतच वर्गात गेला.. हजेरी (सॉरी आता एटेंडेंस म्हणायचं) चालू झाली आणि मग त्याला कळलं की तो चुकून दुसऱ्या वर्गात म्हणजे ११वी ब मध्ये आलाय.. पहिल्या बाकावर बसून कसबसं ते लेक्चर त्याने पूर्ण केलं.. लेक्चर संपल्याची घंटा होते न होते तोच तो सटकला.. एव्हाना त्याला बाजूचा वर्ग आपला आहे हे कळलेलं.. तिथे जाऊन तो बसला..

“काय रे.. अजून कुठे होतास?” एक ओळखीचा आवाज त्याच्या कानावर पडला..

त्याने पाहिलं तर त्याच्या शाळेतील वर्गशिक्षिका पाटील मॅडमचा मुलगा रितेश! त्याला थोडं हायसं वाटलं.. थोडा धीर मिळाला.. नाहीतर आतापर्यंत पुरता भांबावलेला तो.. रितेशने कॉलेज गेल्या आठवड्यात सुरू झाल्याचं सांगितलं.. आणि नोट्सचं टेंशन घेऊ नकोस म्हणत संध्याकाळी माझ्या नोट्स घेऊन जा असंही सांगितलं.. तेव्हा त्याने निःश्वास टाकला. मग रितेशने बाकीच्या मित्रांची ओळख करून दिली.. तसं पुस्तकी मराठी बोलायची सवय असल्याने त्याचं बोलताना कुठेच अडलं नाही.. पण त्या मुलांमध्ये आणि आपल्यात खूप फरक असल्याचे त्याला जाणवले.. तो किंवा त्याचे मित्र भंकस करत मस्करी करत लहानाचे मोठे झालेले.. इथे मात्र हा एकटाच या सभ्य उच्चभ्रू मुलांच्या संगतीत आलेला.. त्यांच्यात हसं नको व्हायला म्हणून हा थोडा शांतच राहिला.. १०वीच्या एका शिबिरात तशी त्यांची तोंडओळख झालेली पण तेव्हाही यांचं वागणं त्याला काही तितकसं मोकळं नाही वाटलं.. तरी तोंडदेखलं हसून तो वेळ मारून नेत होता.. कसाबसा दिवस ढकलून रितेशच्या नोट्स घेऊन तो घरी गेला. दुसरा दिवसही तसाच गेला.. फक्त अजून काही ओळखीचे चेहरे दिसले जे त्याला शिबिरात भेटले होते..

पण तिसरा दिवस जणू नवी दिशाच घेऊन आलेला.. दोन दिवसांत तो थोडासा स्थिरावलेला.. शुक्रवारचा दिवस.. पहिलं लेक्चर ऑफ.. म्हणून टंगळमंगळ करत बसलेला.. ओळखी वाढत होत्या.. त्याला दहावीला ८२% होते हे ऐकून त्याचं कौतुक चाललेलं.. छान वाटत होतं त्याला.. मग जरा बाहेर फिरूया म्हणून सगळे निघाले.. याची सॅक डेस्कमध्ये ठेवून हा ही मागोमाग निघाला.. तोवर सगळे मैदानात पोहचलेले.. हा धावत निघाला.. आणि त्याला ती दिसली.. लाल पंजाबी ड्रेस.. कुरळे केस.. खांद्याला सॅक अडकवलेली.. चेहऱ्यावर कमालीचा निरागसपणा.. डोळे तसेच अगदी निष्पाप.. तिला पाहताच याची धावणारी पावलं आपोआप मंदावली.. नजर एकटक तिच्यावरच खिळून राहिली.. तिची नजर मात्र नाकासमोर.. तुरुतुरु चालत ती त्याच्या बाजूने निघूनही गेली.. हा मात्र तसाच उभा होता.. त्या काही क्षणांत एक सणक त्याच्या पायातून निघून डोक्यापर्यंत गेलेली.. छातीजवळ काहीसं दुखलं पण ते सारं काही खूप सुखद होतं.. आयुष्यात पहिल्यांदाच होत होतं त्याच्यासोबत ते सगळं.. १६वं वरीस धोक्याचं का ते कळण्याची वेळ आलेली कदाचित.. नकळतच “आई गं..” असं काहीसं पुटपुटला तो.. मान आपसूकच वळली तिला पाहायला.. आणि तिला आपल्याच वर्गात जाताना पाहून हा भलताच खुश झाला.. हा लागलीच वॉशरूमला गेला. तोंड धुतलं.. केस विंचरले.. शर्ट नीट इन केला.. बाहेर आला तोच मित्र भेटले..

“काय रे कुठे राहिलेलास?” एकाने विचारलं..

त्याने काहीबाही बोलून वेळ मारून नेली कारण त्याची नजर आता तिला पुन्हा पाहण्यासाठी आतूर झालेली.. जेमतेम ५ मिनिटं झाली तसा हा वर्गाकडे निघाला.. मित्रही निघाले त्याच्या मागोमाग.. हा त्याच्या जागेवर जाऊन बसला आणि तिला शोधू लागला.. नजर वळवली तर त्याच्याच शेजारच्या बाकावर ती होती मैत्रिणीसोबत बोलत.. मग लेक्चर सुरू झाल्यावर ती पुढे गेली बसायला पण अगदीच २ बेंच सोडून.. बाकीचा दिवस तरंगत गेला.. तिला पाहण्याची एकही संधी तो सोडत नव्हता.. कॉलेज सुटलं पण आज याचं पाऊल निघत नव्हतं.. ती निघाली तसा तिच्या मागोमाग हासुद्धा निघाला.. पण ती तिथेच आसपास राहत होती.. कॉलेजबाहेरच्या रस्त्यावर नजरेआड होईपर्यंत तो तिला पाहत राहिला.. परतीच्या वाटेवर आज त्याला शीळ घालत उडत उडत जावंसं वाटत होतं..

“उडता ही फिरूँ.. इन हवाओं में कहीं..

या मैं झूल जाऊँ.. इन घटाओं में कहीं..”

घरी गेल्यावरही तिचा चेहरा काही केल्या नजरेसमोरुन जाईना.. आईने काही सांगितलं तर हा भलतंच करत होता..

“काय रे.. कॉलेजचा वारा लागला वाटतं दोन दिवसांतच...?” आजी हसत म्हणाली.

त्याला कशाचं काही नव्हतं.. तिचा चेहरा नजरेसमोरून हलत नव्हता.. रात्रीही तिचाच विचार करत झोपला.. सकाळी उठला तो ही तिच्याच आठवणीने.. झटपट आवरलं.. स्टॉपवर जाऊन उभा राहीला.. पण आज गाडी का लेट होतेय? त्याची नुसती घाई चालू होती.. बेचैनी वाढत होती.. वास्तविक सगळं वेळेवरच होतं पण त्याला धीर नव्हता.. एकदाची गाडी आली आणि हा कॉलेजला निघाला.. तिच्या विचारात अंतर कसं सरलं कळलंच नाही त्याला.. कट्ट्यावर मित्र भेटले पण त्याला जणू फक्त तिलाच पाहायचं होतं.. सगळे वर्गात गेले.. थोड्या वेळाने ती आली.. निळा ड्रेस आणि गुलाबी ओढणी.. तिला सगळंच सुंदर दिसतं.. ती मैत्रिणीकडे बघून हलकेच हसली.. कलिजा खलास झाला..चा प्रत्ययच जणू त्याला येत होता.. तिचा तो कमालीचा निरागसपणा तिच्या हसण्यातही जाणवत होता.. तिचे ते दोन डोळे.. एखाद्या मांजरीच्या लहान पिलासारखे.. खूपच गहिरे.. अबोध.. निरागस..!

मग पुढचे ८-१० दिवस बघताबघता निघून गेले.. याचा दिनक्रम ठरलेला.. रविवार तर कधी येऊच नये असं वाटायचं त्याला.. काही दिवसांनी प्रॅक्टिकल्सच्या बॅचेस पडल्या.. प्रॅक्टिकल्स सुरू झाले.. नशीब जणू त्याच्यावर मेहरबान झालेलं.. ते दोघंही एकाच बॅचला आलेले.. तिचा रोल नंबर त्याच्याच जवळपास.. केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये तर हा आनंदाने उड्या मारायचाच बाकी होता.. ती चक्क त्याच्या समोरच्याच टेबलला होती.. आता मात्र त्याने ठरवलं की हिच्याशी काही करून बोलायचंच.. पण मुलखाचा लाजरा.. कसं करायचं..? डोकं आपसुक चालायला लागलं.. आता ही दिसली की मस्त स्माईल द्यायची तिला.. पण ती तर धड बघत पण नाही कुणाकडे.. आपल्याच दुनियेत असते चालताना.. पण नशीब खरोखरच त्याच्यावर प्रसन्न होतं.. दुसऱ्या दिवशीच त्यांची नजरानजर झाली.. याने स्वतःच्या नकळतच गोड स्माईल दिली.. आणि ती ही उत्तरादाखल गोड हसली.. त्याला आता कसलीच फिकीर नव्हती.. तो मिळालेली प्रत्येक संधी घेत होता तिला स्माईल देण्याची..

एके दिवशी केमिस्ट्री लॅबला प्रॅक्टिकल चालू झाली पण कुणाकडेच माचिस नव्हती बर्नर पेटवायला.. “दरवाज्याजवळ जो मुलगा आहे त्याच्याकडे पैसे द्या.. तो आणेल सगळ्यांसाठी माचिस..” सर त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाले.

लगेचच सगळ्यांनी पैसे जमा करून त्याच्याकडे दिले.. जमलेले पैसे घेऊन तो गेला धावतच आणि झटपट आलाही माघारी पण पावसात भिजत.. रुमालाने डोकं पुसून होताच सगळ्यांना माचिस दिल्यावर जाणवलं की सरांनी टायट्रेशनची पद्धत शिकवून झालीय.. आणि सगळ्यांनी सुरूही केलेलं काम.. तो झटपट कामाला लागला.. इतक्यात एक गोड, शांत आवाज त्याच्या कानावर पडला..

“ए.. ते सोल्यूशन आधी थोडं गरम कर आणि मग टायट्रेट कर..” त्याने चमकून पाहिलं तर समोरून तिच त्याला ते सांगत होती.. नजरानजर होताच दोघं छान हसले.. बापरे... हे काय झालं होतं.. ती स्वतःहून त्याच्याशी बोलली.. त्याला तर स्वर्ग दोन बोटे उरला होता.. त्यादिवशी सबमिशनच्या वेळेस त्याने रोलबूक पाहिलं. त्यात तिचा रोल नंबर, नाव आणि सही होती..

रोल नंबर ५४९ पूर्वा जाधव.

पूर्वा.. नावही तसंच तिला सांजेसं.. उगवतीच्या प्रसन्न किरणांसारखीच तर होती ती.. तिचा रोल नंबर तर त्याच्या पक्का लक्षात राहिलेला.. तिची सही सुद्धा त्याने कित्येकदा गिरवून पाहिली. फ्रेंडशिप डे ला तिने काढलेलं नाव ३-४ दिवस तो तसंच गिरवून कॉलेजला जात होता..

त्याचं मराठी छान होतं.. किंबहुना वर्गातल्या सगळ्या मुलांमध्ये तरी तोच सरस होता त्याबाबतीत.. घटक चाचणी झाली तेव्हा त्याला ३० पैकी २६ गुण होते.. मराठीच्या सरांनी पहिल्या १० मुलांना उभं केलं त्यात काही मुले आणि बऱ्याच मुली होत्या.. त्यात तो होता आणि ती ही.. तिने वळून त्याच्याकडे पाहिलं आणि गोड हसली.. पठठ्या भलताच खुश झाला.. पावसाचे दिवस हळूहळू निघून चालले होते.. पण त्याच्या आयुष्यातील इंद्रधनुष्य तसंच होतं..

अशातच प्रथम सत्र परीक्षा म्हणजेच फर्स्ट टर्म एक्झॅम आली.. मराठीच्या पेपर ला तिने त्याच्याकडे पाहून त्याला ऑल द बेस्ट ची खूण केली.. त्याने आधी खात्री करून घेण्यासाठी इकडेतिकडे पाहिलं.. मग ते आपल्यासाठीच असल्याचं लक्षात येताच मनोमन देवाला असंख्य धन्यवाद दिले त्याने..! खूप छान गेली परीक्षा, हे वेगळं सांगायला नकोच! निकाल लागल्यावर तर खरी गंमत.. मराठीचे सर वर्गात आले आणि रोल नंबर पुकारायला लागले.. जितके नंबर तितक्या सगळ्या मुलीच उभ्या राहत होत्या.. शेवटी रोल नंबर ५५५ कोण आहे? असं विचारताच तो उभा राहिला.. सगळे त्याच्याकडे पाहायला लागले.. आणि मुलांमधला तो एकटाच उभा राहिलेला पाहून मुलांनी एकच जल्लोष केला.. त्याला सर्वाधिक गुण मिळालेले.. मग तर तो थोडा जास्तच चमकला वर्गात..!

पण त्याला तिच्याशिवाय बाकी काही सुचत नव्हतं.. प्रत्येक क्षणाला एखाद्याचा विचार करणे म्हणजे काय ते तो अनुभवत होता.. कायम फक्त तिचाच विचार.. इतका की पेन घेऊन कागदावर काही लिहायला सांगावं तर तो तिचं नाव लिहीत.. स्वप्नात तिच्याशी खूप खूप बोलायचा पण समोर आली की तोंडाला कुलूप.. शब्दच गोठायचे.. छातीत धडकीच भरायची.. दिवस भुर्रकन जात होते.. डिसेंबर आला तसे डेजचे वारे वाहायला लागले.. चॉकलेट डे, पिंक ब्लू डे, रोज डे नुसती धम्माल.. टाय डे ला तो अगदी मस्त टाय लावून फॉर्मल कपड्यांत कॉलेज जवळ आला तो समोरच्या स्टुडिओबाहेर ती साडीत उभी..! लॅवेंडर रंगाची साडी, नेहमी पोनीटेल मध्ये दिसणारे कुरळे केस आज मोकळे होते.. एका बाजूने भांग पाडला होता तिने.. पायात चमकणारी कसलीतरी नक्षी असलेली चप्पल.. आणि हातात पर्स.. तो तिच्याकडे पाहतच चालत राहिला.. पुढे जाईपर्यंत तो तिला पाहत राहिला.. आपसूकच चेहरा खुलला होता दोघांचा.. त्याचं काळीज कळवळून जात होतं.. त्याच्या काळजाची धडधड कानाला ऐकू जात होती आणि ती तिलाही ऐकू जावी, असं त्याला सतत वाटत होतं.. त्याच्या मनात प्रचंड उलथापालथ होत होती.. त्याचवेळी काहीसं त्याच्या मनात आलं की काहीही करून तिला आपलं प्रेम कळलं पाहिजे.. पण कसं? काहीच कळत नव्हतं.. तिला प्रपोज करायचं हे नक्की पण तिच्याशी बोलतानाही त्याची हालत खराब व्हायची..

“जब किसीकी तरफ दिल झुकने लगे.. बात आकर ज़ुबॉं तक रुकने लगे..

आँखों आँखो में इकरार होने लगे.. बोल दो ग़र तुम्हें प्यार होने लगे..”

त्याने ठरवलं मनाशी की जानेवारीतली दुसरी चाचणी परीक्षा झाली की तिला मनातलं सांगायचंच..

चाचणी सुरू व्हायच्या काही दिवस आधी लॅबमध्ये तिने त्याच्याकडे पेन मागितलं.. त्याने दिलं.. तिने फक्त सही करुन थँक्स म्हणत ते परत केलं.. मग त्याने त्याच पेनाने चाचणीचे सारे पेपर दिले.. ८९% मिळाले चाचणीत..! अभ्यासू होताच तसा तो.. पण आजकाल प्रेमात पडल्याने नशीबावर खूप विश्वास बसत चाललेला त्याचा! कारण तिलाच स्वतःचं नशीब मानून चालत होता तो..!

आता तो विचार करायला लागलेला ते तिला मनातलं कसं सांगायचं याचा..! जानेवारी संपायला आली तसे याचे विचार अजूनच याला सतवायला लागले.. गुडघ्यावर बसून गुलाब देणं वगैरे त्याच्याचानं शक्य नव्हतं.. एकदा क्रिकेट खेळत राहिल्याने बायोलॉजीच्या लेक्चरसाठी उशीर झालेला, तेव्हा नोट्ससाठी तिच्याकडून वही मागताना काळीज गळ्याशी आलेलं.. तिची वही परत करताना मनात आलेलं की पिक्चरमधल्या हीरोसारखं पत्र द्यावं त्या वहीत! तेव्हा हिम्मत नाही झाली पण आता मात्र तेच योग्य वाटायला लागलं.. पत्रातून जास्त चांगलं व्यक्त होता येईल.. शिवाय समोर बोलताना ततपप होण्यापासूनही वाचेन.. ठरलं..!! पत्र लिहायचं.. त्याच्या आयुष्यातलं पहिलं प्रेमपत्र!!!

त्या रात्री खूप बेचैन झालेला तो.. कशातच लक्ष नव्हतं त्याचं.. तसं तिला पाहिल्यानंतरच्या अश्या कितीतरी रात्री त्याने बेचैनीत घालवल्या होत्या.. कविता करायला लागलेला तो तिच्यावर.. कधी खूप हसायचा स्वतःच्या वेड्या कल्पनांवर.. तर कधी तिचा इतका विचार करायचा की रात्रभर रडायचा.. वेडच होतं ते.. एकदा गंमतीतच ताईच्या मित्राने त्याला कुणी आवडली की नाही? असं विचारलं तेव्हा थोडा चरकला आणि खूप लाजलेलाही..! खरंच.. तिने इतक्यातच किती बदलून टाकलं होतं त्याचं आयुष्य... आताच इतकं मग ती आयुष्यात कायमची आली तर काय होईल... या विचारात त्याने रात्र रात्र जागून काढल्या होत्या.. विचारचक्र चालूच होतं.. आता हे काही महिने गेले की संपली अकरावी! मग १२वी.. बोर्डाची परीक्षा.. नाही! आता वेळ दवडून चालायचं नाही.. लवकरात लवकर पत्र लिहायला घ्यायला हवं..! आयुष्याचा प्रश्न आहे.. विचार करताना पहाटे कधीतरी झोप लागली त्याला..

सकाळी ९ वाजताच तयार होऊन निघाला.. कॉलेजसमोरच्या स्टेशनरीच्या दुकानातून काळा आणि लाल असे सेलो ग्रीपरचे दोन पेन घेतले.. कॉलेजच्या मागच्या मैदानात जाऊन एक शांत जागा शोधून तिथे तो पत्र लिहायला बसला.. आधी कच्चं लिहून घेऊ मग छान अक्षरात सावकाश लिहून काढू,असा विचार करत त्याने लिहायला सुरुवात केली.. आणि त्यासोबतच अभ्यासाची एक वही उघडून तो बसला. म्हणजे बाकी कुणी पाहिलं तर अभ्यास करतोय असं वाटेल.. हुशारी हळूहळू वाढत होती पठ्ठ्याची! सगळं नीट जमलंय हे पाहून त्याने पत्र लिहायला सुरुवात केली..

प्रिय पूर्वा.. छे! फक्त प्रिय कसं लिहायचं? प्राणाहून प्रिय.. नको.. हे कृत्रिम वाटतंय.. झालं? मायन्यालाच गाडी अडकली.. पत्र कधी व्हायचं लिहून..? त्याने वही बंद केली.. आणि डोळे बंद करून झाडाला टेकून बसून राहीला.. बहुधा डोळ्यांनाही सवय झालेली की काय म्हणून तिचाच चेहरा समोर आला.. कळत्या वयापासून जेव्हा प्रेम म्हणजे कायतरी असतं जे हीरोला हीरोइन सोबत होतं.. हे कळायला लागलेलं तेव्हापासून जी स्वप्नसुंदरी त्याच्या स्वप्नात पांढऱ्याशुभ्र पोषाखात धुक्यातून वाट काढत त्याच्याकडे येताना दिसायची.. जिचा चेहरा कायम माधुरी दीक्षित, रविना टंडण किंवा ऐश्वर्या राय सारखा दिसायचा.. पण त्यांच्या जागी आज पूर्वा दिसली.. तिला फक्त प्रिय वगैरे बोलून कसं भागेल...? शेवटी त्याने विचार केला की जे खरंखरं वाटतं तेच लिहायचं आणि वही उघडून त्याने सुरुवात केली..

पूर्वा,

तुला प्रिय लिहू की प्राणाहून प्रिय? तुला काय मायना लिहू कळतच नाहीय. कारण, तुझं माझ्या आयुष्यातील अस्तित्व असं शब्दांत सांगता येणार नाही..

व्वा!! हे अगदी मस्तच जमलंय.. वाचायलाही छान वाटतंय आणि मुख्य म्हणजे भावनाही अगदी खरी आहे! असा विचार करतानाच त्याला मयूरची हाक ऐकू आली.. त्याच्या मोजक्या म्हणजे अगदीच निखिल, सुहास, हर्षू, मयूरेश असे २-३ खास मित्र सोडले तर बाकी कुणाला त्याच्या प्रेमाची कल्पना नव्हती.. त्यामुळे त्याने ती वही बंद केली आणि दुसरी वही वर काढली..

त्याला बघून मयूर म्हणाला.. “वा साहेब.. इतका अभ्यास..? बोर्ड १२वी ला आहे.. आता नाही..”

त्यावर हा फक्त हसला.. आणि वह्या सॅकमध्ये भरून उठून उभा राहत म्हणाला.. “बोर्ड नसलं तरी पास तर व्हायचंच आहे ना..!”

दोघंही हसले आणि कॅंटीनकडे निघाले.. तिथे बाकीची गॅंग भेटली पण त्याचं मन नव्हतं लागत आज.. त्याने फक्त चहा घेतला.. खजिना लपवावा तसं तो ते पत्र जपत होता.. घरी तर शक्यच नव्हतं पण कॉलेजमध्ये पण लपूनछपून पत्र लिहायला लागणार हे त्याच्या लक्षात आलेलं.. तो दिवस तसाच गेला.. फक्त सुरुवात झालेली लिहून.. तो खूप वैतागलेला.. रात्री झोपतानाही मनात तो पत्रच लिहीत होता..

“ये रत जगे, लंबी रातों को दिल ना लगे.. क्या करें..?”

पुढचे २-४ दिवस त्याने पत्र पूर्ण करण्यात घालवले.. अगदी त्याच्या मनातल्या भावनाच झरल्या होत्या शाईऐवजी! लिहावं तरी किती आणि काय काय.. तिचंच वर्णन करावं तर तिचं हसणं कसं निरागस आहे अगदी हिरव्यागार वनराईतून वाहणाऱ्या शुभ्र झऱ्यासारखं स्वच्छंदी हे लिहावं की तिच्या निष्पाप डोळ्यांचं कौतुक करावं..? आणि तिच्याबद्दल तिलाच काय सांगावं..? हरेक श्वासागणिक तिचं नाव जपणाऱ्या मनातली प्रत्येक भावना कागदावर तरी कशी उतरवावी..? इतके दिवस तिला पाहताना वा तिच्याशी बोलताना कोणती गाणी त्याच्या मनात वाजत राहतात, ती ही लिहून काढली त्याने.. खूप प्रामाणिक आणि प्रांजळपणे त्याने सगळंच कबूल केलेलं.. जी काही हिंमत करायची ती सगळीच त्याने एकवटली असावी..! १०-१२ वेळा वाचून पाहिल्यावर शेवटी त्याचं प्रेमपत्र फायनल झालं.. आता स्वच्छ सुवाच्य अक्षरात त्याने ते लिहून काढलं.. अगदीच नाही तरी जवळपास अडीच पानं भरली होती.. अर्थात त्याच्यासाठी ते कमीच होतं.. दुपारनंतरचं लेक्चर बुडवून समुद्रकिनाऱ्यावर जाऊन ते पत्र वाचून काढताना खूप रडला होता तो.. तिने आयुष्यच व्यापून टाकलं होतं त्याचं.. आता हे पत्र तिला द्यायचं.. मग ती आपली होणार.. नक्कीच... तिला ते देताना काय बोलायचं.. कसं बोलायचं.. सगळं ठरवत होता तो.. त्याशिवाय त्याला बाकी काही सुचतच नसावं..

त्याने पत्र लिहिताना ठरवलेलं की टिपिकल काही नाही करायचं.. त्यामुळे व्हॅलेंटाईन डे ला त्याने तिला पत्र नाही दिलं.. हे सगळे बहाणेच होते खरंतर.. त्याने हिंमत तर केलेली पण पत्र द्यायची वेळ जसजशी जवळ येत होती तशी त्याची हिंमत ढासळू पाहत होती.. असं होतंच ना.. माणूस खूप विचित्र वागतो पहिल्यांदा प्रेमात पडल्यावर! पण अगदीच व्हॅलेंटाईन डे वाया नको जायला म्हणून तिला विचार करायला लावूया या बेताने त्याने ती यायच्या आधी गुपचुप जाऊन तिच्या बेंचवर 'आय लव यू पूर्वा’ असं लिहिलं.. आणि मित्रांकडे जाऊन शांतपणे बसून गप्पा मारायला लागला, जसं काही घडलंच नाही.. काही वेळाने ती आली.. तिचं लक्ष गेलं बेंचकडे आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.. तिने इकडेतिकडे शोधक नजरेने पाहिलं.. मग ती तो बेंच सोडून पुढे बसायला गेली. तो नाही म्हंटलं तरी थोडासा धास्तावला.. त्या दिवशी अगदी मोजकेच लेक्चर्स झाले.. पण ती पहिल्या २ लेक्चर्सला नव्हती. त्याला कसंतरीच वाटत होतं.. मन खायला लागलं.. मॅथ्सच्या ट्यूटोरियलचा रिजल्ट होता त्यादिवशी.. त्याला १५ पैकी १४ गुण मिळालेले.. पण त्याचं सगळं लक्ष तिच्या नसण्याकडे होतं.. तितक्यात ती आली.. पण तिचे डोळे पाहून त्याची हालत खराब झाली.. ती रडलीय हे सपशेल कळत होतं.. त्याला कळून चुकलं की आपण खूप मोठी चूक करून बसलोय.. आता त्या पत्राचं काय करायचं, हा विचार त्याला छळू लागला होता.. आणि त्याची हिंमत तुटायला लागली होती.. शेवटी त्याने मनातलं निखिलला बोलून दाखवलं.. त्याने धीर दिला तेव्हा कुठे हा सावरला.. कसाबसा दिवस काढला. शेवटचं लेक्चर ऑफ असल्याने फिज़िक्सचं लेक्चर झालं तसे सगळे निघाले.. पण त्याचं मन जड झालेलं.. जेमतेम बाहेर निघाला तर ती जिन्याजवळ उभी होती आणि त्याच्याकडेच काहीशा रागाने पाहत होती.. हिला कळलं वाटतं सगळं.. असं मनात आलं त्याच्या.. त्याने तिथून काढता पाय घेण्यात धन्यता मानली.. तो थेट रस्त्यावर त्याच्या रोजच्या जागेवर जाऊन उभा राहिला जिथून तो तिला घरी जाताना पाहत.. आज थोडा वेळ लागला..पण थोड्या वेळाने ती दिसली तिच्या मैत्रिणीसोबत.. तिला हसत जाताना पाहून त्याची कळी थोडी खुलली.. ओझं कमी झाल्यासारखं वाटलं आणि तो घरी गेला.. पण घरी गेल्यावर तिन्हीसांजेला त्याची हुरहूर पुन्हा वाढली.. बिचारा चुपचाप पुस्तक घेऊन बसला.. कुणाला सांगणार होता तो? उद्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता..

दुसर्‍या दिवशी गेला तोच निखिलला शोधत.. पण निखिलला आज नेमका उशीर होत होता.. त्याच्या वाटेकडे डोळे लावून हा कॉलेजच्या रस्त्यावर उभा राहिला.. एकदाचा निखिल आला. त्याला खेचतच हा कॉलेजच्या मागच्या मैदानात घेऊन गेला.. तिथे मनातली सगळी भीती बोलून दाखवली.. निखिलने सगळं ऐकून घेतलं मग तो त्याला म्हणाला,

“हे बघ.. तू आता इतक्या पुढे गेलाहेस तिच्या प्रेमात की आता तुला घाबरून नाही चालणार.. तुला हिंमत केलीच पाहिजे.. नंतर कदाचित ही वेळ मिळेल की नाही कुणास ठाऊक..!”

निखिलचं बोलणं ऐकून तो अजूनच घाबरला..

“तूच देशील का पत्र माझ्यासाठी..?” त्याने विचारलं.

निखिल हसत म्हणाला, "अरे गधड्या, तू निदान काही वेळा का होईना तिच्याशी बोलला आहेस.. माझं तर तिच्याशी कसलंच संभाषण नाही आजवर.. मी कसं देणार पत्र..?”

पण तो काही मानायला तयार नव्हता..

शेवटी निखिल म्हणाला, “तिची मैत्रीण बघ एखादी आणि तिच्याकरवी दे पत्र तिला..”

त्याचे डोळे चमकले. त्याने विचार केला की तिची मैत्रीण कशाला? त्याची मैत्रीण हर्षू आहे की!! तो खुश झाला.. त्याने सुहासला म्हणजे हर्षूच्या बॉयफ्रेंडला गाठलं.. तिच्याबद्दल विचारलं तर त्याला समजलं की ती गावी गेलीय आणि आता थेट परवाच येईल.. तो नाईलाजानेच परवाची वाट पहायला लागला.. ते दोन दिवस त्याने अगदी जिवापोटावर ढकलले.. शेवटी १७ तारीख आली.. त्याने घाई-घाईतच कॉलेज गाठलं.. पण देवही जणू त्याचा अंतच पाहत होता.. हर्षूचा अजून काही पत्ता नाही हे पाहून त्याने सुहासला पकडलं. आणि त्याच्याकडून जेव्हा कळलं की हर्षू दुपारहून येणार तेव्हा हा जवळपास किंचाळलाच बिचाऱ्या सुहासच्या अंगावर.. शेवटी हर्षू आली दुपारी तीही थेट अगदी त्यालाच भेटायला मैदानात! त्याने तिला सगळं सांगितलं.. आणि एकदाचं ते प्रेमपत्र तिच्याकडे दिलं.. हर्षू त्याच्याकडे पहातच राहिली..

“असं काय पाहतेस..?” त्याने हसत विचारलं..

ती म्हणाली, “वेडा झालाय तू अगदी तिच्यासाठी.. प्रेमपत्र वगैरे.. भलताच रोमॅंटिक आहेस तू तर..!”

तो तेवढ्यातही लाजून हसला..

हर्षू म्हणाली, “एक सुचवू का? तू स्वतः दे ना.. ते जास्त चांगलं वाटेल..”

“तेवढी हिंमत नाहीय म्हणून तर तुला सांगतोय.. तू आता मला अजून नको घाबरवू.. तू प्लीज तिला हे दे.. बाकी मग पुढे मी सांभाळेन!” त्याने उत्तर दिलं..

हर्षू हसली आणि म्हणाली, “भित्रा कुठचा! प्रेम करता येतं.. मग हिंमत पण करायची ना..! ठीक आहे, मी देईन तिला पत्र पण आज नाही.. उद्या सकाळी देते आता मला लगेच निघावं लागेल.. निव्वळ तुझ्यासाठी आले आज.. नाहीतर आज नव्हतीच येणार..”

तो खूप आनंदला आणि अगदी हर्षूला सोडायला स्टँडवर गेला सुहाससोबत.. आणि मग तसाच घरी गेला.. finally त्याच्या भावना तिला कळणार होत्या आता.. पण सोबतच एक अनामिक भीती वाटायला लागली त्याला.. त्याने बसच्या खिडकीतून बाहेर पाहिलं आणि डोळे बंद करून वारा झेलायला सुरुवात केली.. त्याला थोडं बरं वाटलं.. पण जसा त्याचा स्टॉप आला त्याला चिंता वाढू लागली.. दिवाबत्ती करताना त्याने आज दोन वेळा गणपतीस्तोत्र म्हंटलं.. तरी त्याची चलबिचल नव्हती थांबत.. फासावर जाणारा कैदी फाशीच्या आदल्या रात्री असाच तळमळत असावा.. त्याला आता असे नको नको ते विचार येत होते.. त्याला त्या रात्री अजिबात झोप नाही लागली कारण उद्या त्याचाही फैसला होणार होता..!

१८ फेब्रुवारी ची सकाळ झाली. त्याने लवकरच उठून तयारी केली.. त्याच्या आवडीचं पिस्ता कलरचं शर्ट आणि त्याची एकमेव काळी जीन्स.. त्यासोबत मस्त बूट.. त्याला जितकं शक्य होतं तितका मेकअप केला खरा त्याने पण मन भरत नव्हतं त्याचं.. शेवटी त्याने ते प्रयत्न सोडले आणि चहा घेऊन तो निघाला.. गाडीत बसल्यावर विचारचक्र पुन्हा सुरू झालं.. रात्रभर झोप नसल्याने डोळा लागला त्याचा.. अचानक पूर्वाचा आवाज कानावर पडला.. “तूच द्यायचं ना रे पत्र..!” खडबडून उठला तो.. त्याला भास झालेला.. स्टॉप जवळ आलेला त्याचा.. स्टॉपवर उतरताना त्याला वाटलं की आपणच हिंमत करायला हवी.. आपणच देऊ पत्र.. हर्षूला गाठायला हवं पटकन.. तो भरभर निघाला कॉलेजकडे.. कॉलेजला पोहचेपर्यंत १०.४५ झालेले.. गेटमधून थोडं आत जातोय तोच हर्षू समोर..!

“बरं झालं इथेच भेटलीस पटकन..” तो म्हणाला.

“मी तिला पत्र दिलं मघाशीच.. तिने तुला ७ नंबर रूममध्ये बोलावलंय भेटायला..” त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधीच तिने पटकन सगळं सांगून टाकलं.. त्याचा चेहरा पडला..

“दिलंस का? ठीक आहे.. भेटतो मी जाऊन..” इतकंच बोलला तो.. आणि निघणार इतक्यात ती म्हणाली, “तो बघ निखिल आला त्यालाही घेऊन जा सोबत तिचीही मैत्रीण आहे तिथे..”

निखिलला घेऊन तो निघालाच काही न बोलता.. काय ते कुणास ठाऊक पण त्याला काहीतरी खटकलं.. दोघं पटापट ७ नंबर वर्गात पोहचली.. ती आणि तिची मैत्रीण समोरच बेंचवर बसलेल्या.. ती रडत होती, हे लगेच कळत होतं.. त्याचा धीर खचायला लागला.. तरी तो शेजारच्या बेंचला जाऊन टेकून उभा राहिला.. निखिल काहीसा मागेच थांबला..

“तू का नाही दिलं हे पत्र मला?” तिचा पहिला प्रश्न आला.

त्याच्या तोंडून शब्दच बाहेर येत नव्हता.

“तू वाचलं का?” असं काही बोलला पण त्याचं त्यालाही ऐकू नाही गेलं.. तिने पुढे बोलायला सुरुवात केली..

“त्या दिवशी बेंचवर पण ते तूच लिहिलं होतंस ना? हे बघ.. मला भांडण वगैरे काही नाही करायचंय पण आपण खूप लहान आहोत या सगळ्यासाठी.. मला या सगळ्यांत खरंच पडायचं नाहीय..” आणि असं म्हणत म्हणत तिने ते पत्र फाडून टाकलं..

त्याचं तोंड तर आधीच शिवलेलं पण ते सगळं ऐकून आणि पाहून मेंदूला मुंग्या आल्यासारखं वाटलं त्याला.. समोर सगळं फिरल्यासारखं वाटलं.. आणि पुढच्या क्षणी ती भुरकट दिसायला लागली.. एक आवंढा गिळला त्याने आणि ठीक आहे इतकं बोलून तो तिथून निघून गेला.. मागे वळूनही पाहिलं नाही त्याने..

निखिल आपल्यासोबत असल्याचंही त्याच्या लक्षात नाही राहिलं.. तो वाट फुटेल तिथे चालत निघाला.. मागून निखिलने खांद्यावर हात ठेवला.. पण त्यालाही काय बोलावं कळलं नाही.. तो बिचारा त्याची सोबत करत चालू लागला त्याच्यासोबत.. वॉशरूम मध्ये जाऊन त्याने नळ चालू केला आणि पाण्याचे हबके चेहऱ्यावर मारायला सुरुवात केली.. जणू काही स्वतःला स्वप्नातून जागं करत होता.. तोंड पुसून झालं तसा तो निघाला.. निखिल काहीसा घाबरला.. पण काहीच न बोलता सोबत निघाला.. दोघं आता मागच्या मैदानात एका झाडाखाली येऊन बसले.. तो डोळे मिटून शांतपणे झाडाला टेकून बसला.. समोर निखिल बसला.. काही वेळ नुसती शांतता.. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले.. निखिलही क्षणभर हेलावला.. धीर देण्यासाठी काही बोलायला सुरुवात केली.. पण त्याला फक्त झालेला प्रसंग आठवत होता आणि पूर्वाचे ते शब्द कानात घुमत होते.. नाकपुड्या लाल झाल्या होत्या.. आणि डोक्यात एकच विचार.. आपल्याला नकार मिळालाय.. त्याला अपराधी वाटायला लागलं.. निखिल तिथे असून नसल्यासारखाच होता.. लंच ब्रेकपर्यंत ते दोघे तिथेच बसून राहिले.. कशीबशी समजूत घालून निखिलने त्याला कॅंटीनला नेला. तिथेही त्याने फक्त चहा घेतला..

निखिल म्हणाला, “उरलेले लेक्चर तरी करुयात.. आता फक्त दोनच लेक्चर होतील..”

तो काहीसा सावरला होता एव्हाना.. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि ते वर्गाकडे चालायला लागले..

वर्गात शिरताच त्याचं लक्ष सवयीने तिला शोधायला लागलं.. ती सुद्धा त्याच्याकडेच पाहत होती. पण नजरानजर होताच दोघांनीही नजर चोरली. तो जागेवर जाऊन बसला.. जेमतेम ते उरलेले लेक्चर आटोपून त्याने निखिलचा निरोप घेतला आणि तो घरी निघाला.. त्याला काहीच सुचत नव्हतं.. त्याने कसंबसं स्टँड गाठलं.. गाडी यायला वेळ होता.. इतक्यात त्याची तंद्री भंग पावली ती हर्षूच्या आवाजाने.. सोबत सुहास होता.. त्याला बळेच तिथून एका बाजूला नेत त्यांनी त्याला समजावलं.. हर्षूचं बोलणं झालेलं पूर्वासोबत त्यामुळे तिला सगळी कल्पना आलेली.. आता फायनल एक्झॅम मग लगेच १२वी येईल. त्यामुळे याचा फारसा विचार नको करू.. आणि असे बरेचसे सल्ले त्यांनी त्याला दिले.. पण तो काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता.. त्याने डोळे उघडावेत आणि ती वेळ जणू एखाद्या वाईट स्वप्नासारखी संपून जावी.. सरून जावी.. इतकंच वाटत होतं त्याला...

दिवस भरभर निघून जात होते परीक्षा आली पण त्याचं मन थाऱ्यावर नव्हतं.. कशीबशी परीक्षा दिली. साधारण महिन्याने निकाल लागला.. त्याला distinction मिळाले होते.. पण त्याचं कौतुक तो सोडून बाकी सगळ्यांना होतं.. त्यात त्याला हर्षू कडून कळलं की पूर्वाचे बाबा आता या जगात नाहीत.. शेवटचे दोन पेपर राहिले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच ते गेले.. तिने ते पेपरही नाही दिले. पण कलेक्टीव रिजल्टमुळे तिला ७२% मिळालेत. त्याला अजूनच अपराधी वाटू लागलं. तो त्याच्याच दुःखाला कुरवाळत बसला असताना तिच्या वाटेला किती मोठं दुःख आलेलं.. तिच्यापाशी जावं तर कदाचित सहानुभूती मिळवायला आलाय असंच तिला वाटेल, या विचाराने त्याचे पाऊल अडले.. तो स्वतःचाच धिक्कार करायला लागला.. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं.. ज्यात ती त्याच्यापासून दूर जाताना आणि तो स्वतः आक्रोश करताना दिसत होता.. मग तर अशी स्वप्नं त्याला वारंवार पडू लागली..

१२वीच्या वर्षात तर तो देवदास म्हणूनच ओळखू जाऊ लागला होता वर्गात.. त्यात त्याच्या वेदनेनं भरलेल्या कवितांची चर्चा होऊ लागलेली.. तिला पाहून थंड उसासे टाकणं तर नित्याचंच झालेलं.. ती मात्र त्याच्याकडे फक्त दुर्लक्ष करत होती.. ती इतकी पाषाणहृदयी असेल, असं स्वप्नातही नव्हतं वाटलं त्याला.. त्याला मिळालेली वाचा जाऊन तो पुन्हा मुका झाला होता.. बोलत होते ते फक्त त्याच्या कवितांचे जखमी शब्द.. बाकी तो अगदी शांत झालेला..

“टूँटा टूँटा एक परिंदा ऐसे टूँटा, के फिर जुड़ ना पाया..

लूटा लूटा किसीने उसको ऐसे लूटा, के फिर उड़ ना पाया..”

१२वी साठी त्याला कधी नाही ते ट्यूशन लावण्यात आलेले.. पण त्याला कसलं सोयर नव्हतं का कुणाचं सूतक! लेक्चर बुडवून मित्रांसोबत टवाळक्या करणं त्याला बरं वाटायला लागलेलं.. घरी मात्र तो कमालीचा उदास व्हायचा.. झोपून राहायचा.. कुठे येणं जाणंही त्याला रुचेनासं झालं होतं.. अभ्यास करायचा पण फक्त पास होण्यापुरताच.. ट्यूशनला जायचा कारण त्या निमित्ताने ती दिसायची.. तिला पाहून दर आठवड्याला किमान एकतरी कविता लिहायचा तो.. पण एका वहीत लपवून ठेवायचा.. जणू काही मनातलं दु:ख कैद करून ठेवत होता वहीच्या कागदांमध्ये.. काही करायची उमेदच नव्हती राहिली त्याच्या मनात.. सारं आयुष्य नीरस आणि बेचव झालं होतं.. ते ही एका वर्षात.. वर्गातली मुलं त्याला चिडवायची.. तिच्या शपथा देऊन काम करून घ्यायची.. बरेचजणांनी त्याला त्यांच्या गर्लफ्रेंडसाठी पत्र लिहायलाही सांगितलं.. पण ती एक गोष्ट सोडून बाकी काही बोला असं म्हणायचा तो..!

वेळ आपल्या गतीने चालतच होता.. बघताबघता वर्ष सरलं.. १२वीचा निकाल हाती आला.. खरंतर त्याला आपण नापास होणार अशीच भीती वाटत पण त्याला ६८% मिळाले. त्याला बरं वाटलं.. पण दहावीच्या ८२% वरुन आता थेट ६८% वर घसरल्याने घरी त्याला खूप बोलणी मिळाली.. पण त्याच्या संवेदना जणू बोथट होत चाललेल्या.. सीईटी द्यावी असंही त्याला नाही वाटलं.. याउलट तिला ७०% मिळाले आणि तिने मेडीकलची सीईटीही दिली होती. शेवटी त्याने त्याच कॉलेजात डीग्रीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला.. कॉलेज सुरू झाल्यावर तिला त्याच वर्गात पाहून मात्र तो काहीसा चक्रावला.. त्याने माहिती काढली तेव्हा त्याला कळलं की तिचं मेडीकल कॉलेज सुरू होण्यास वेळ आहे. म्हणून ती आलीय.. तिच्या प्रेमात पडल्यानंतर हवेत उडत राहणं जसं अंगवळणी पडलं तसंच त्याने आता तिच्या विरहात जगणंही सवयीचं करून घेतलं होतं.. फ्रेंडशिप डे आला.. तिला त्याने जिन्यात गाठलं.. एकमेकांना फ्रेंडशिप बॅंड बांधले. त्याच्या तोंडून कधी नाही ते स्पष्टपणे काही शब्द बाहेर पडले.. “हॅप्पी फ्रेंडशिप डे” म्हणत त्याने हात मिळवला.. आणि दोघं आपापल्या वाटेने निघून गेले.. तो इतका व्यथित झाला होता की इच्छा असूनही त्याने मागे वळून नाही पाहिलं.. त्याला कायम वाटायचं की प्रेमाची कबूली तर त्याने दिली मग आता काय वेगळं सांगायचं.. आता तिला काही वाटत असेल ते तिने सांगावं.. बिचारा पहिल्यांदा प्रेमात पडलेला.. प्रेमाचे बालिश वाटणारे नियम त्याला अमान्य होते.. किंबहुना माहितच नव्हते.. त्यामुळे तो तिच्या साद घालण्याची वाट पाहत होता.. निखिल १२वी नंतर गावी पुण्याला शिकायला गेला.. सुहास आणि हर्षू इंजीनीरिंग ला गेले.. आता हा एकटाच होता.. २ दिवसांनी स्टँडवर त्याला पूर्वा दिसली.. तिला पाहताना त्याच्या मनात कालवाकालव व्हायला लागली आणि ती मात्र त्याच्या समोर गाडीत बसून निघून गेलीही.. गाडी पुढ्यातून जाताना तिची पुसटशीच एक झलक त्याला दिसली.. त्याच्याही नकळत त्याचे डोळे भरून आले..

“का रे इतका लळा लावूनी, नंतर मग ही गाडी सुटते..?

डोळ्यांदेखत सरकत जाते., आठवणींचा ठिपका होते..

गाडी गेली, फलाटावरी निःश्वासांचा कचरा झाला..

गाडी गेली, डोळ्यांमधल्या निर्धाराचा पारा फुटला..”

दुसऱ्या दिवशी तिच्या एका मैत्रिणीने तिचं मेडिकल कॉलेज सुरू झाल्याचं सांगितलं त्याला.. उत्तरादाखल त्याच्याकडून फक्त एक भकास हसू आलं.. म्हणजे फ्रेंडशिप डे ला झाली ती शेवटची भेट ठरली त्या दोघांची..

कथा-कादंबऱ्या किंवा चित्रपटात वर्षांचे टप्पे अलगद सरतात. खऱ्या आयुष्यात तसं नसतं.. त्यापुढची १०-१२ वर्षं त्याने कशी काढली ते त्याला आणि त्या विधात्यालाच माहीत! फेसबूकवर अकाऊंट चालू केल्यावर सगळ्यांत आधी त्याने तिचे नाव शोधले.. गूगलवर शोधलं.. ती जणू अस्तित्वातच नव्हती अशी गायब झाली.. दरम्यान त्याने एका मुलीला प्रपोज केलं.. मुंबईला पुढच्या शिक्षणासाठी गेला असताना तिथे तिच्याशी ओळख झाली.. मग थोडी जवळीक वाढली शेवटी त्यांचं अफेयर सुरू झालं.. पण त्याला लवकरच कळून चुकलं की आपण तिच्यातही पूर्वालाच शोधतोय.. त्याला स्वप्नात आजही पूर्वाच दिसते, हे लक्षात येताच त्याने त्या नात्याला तिथेच विराम दिला आणि पुन्हा पूर्वाचा शोध घ्यायला लागला. दरम्यान तिच्याबद्दल खूप काही ऐकायला मिळत होतं त्याला.. कुणी म्हणायचं की ती आता परदेशी गेली शिकायला.. तर कुणी म्हणे ती तिकडेच स्थायिक झाली.. जवळच्या एका मित्राने जेव्हा तिचं लग्न झाल्याची बातमी सांगितली तेव्हा तर तो प्रचंड बिथरलेला.. त्यावेळी भर पावसाच्या संध्याकाळी भिजत भिजत रडतच भरधाव गाडी चालवत तो घरी गेला होता.. मग तर तो एखाद्या सूफी संतासारखा अबोल झाला.. स्वतःमध्येच रमलेला असायचा.. पण देवाला जणू त्याची दया आली.. रूसलेलं नशिब हसलं.. आणि जवळपास १० वर्षांनी त्याला तिचा काहीतरी सुगावा लागला. फेसबूकवर अकाऊंट दिसलं.. फोटो नव्हता पण त्याने खात्री करून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिने ती स्वीकारलीही! पण त्यापुढे काहीच नाही.. शेवटी नाताळच्या दिवशी त्याने तिला मेसेज केला..

"हाय.. कशी आहेस आणि कुठे आहेस? साधारण तासाभराने तिचा रीप्लाय आला तसा हा उडालाच! त्याने लगेच त्याचा व्हॉट्सअॅप नंबर दिला आणि तिला मेसेज करायला सांगितलं.. १० मिनिटं गेली असतील तोच त्याला अनोळखी नंबरवरून मेसेज आला..

“हाय.. मी पूर्वा.. ओळखलंस?”

तो आधी हसला मग म्हणाला,

“अगं हा प्रश्न तर मी तुला विचारला पाहिजे.. तू काय विचारतेय?”

तिने उत्तरादाखल स्मायली पाठवली. काही वेळ खुशालीची औपचारिकता झाल्यावर ती म्हणाली,

“इतकं वाटत होतं ना तुझ्याशी बोलावं.. पण थोडं ऑकवर्ड वाटत होतं.. म्हणून तुझा मेसेज पाहिला आणि लगेचच मेसेंजर डाउनलोड करून तुला रीप्लाय केला..”

ती खूप मोकळेपणाने बोलत होती.. त्यालाही खूप बरं वाटलं.. तिच्याविषयीची ओढ तशीच होती पण एक दशक उलटलं होतं.. पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं होतं.. तो खूश होताच खूप; पण हुरळून जाणं टाळलं त्याने.. तिने सांगितलं की ती आता डॉक्टर झालीय..

त्यावर तो म्हणाला, “मला सगळं माहीत आहे. अगं.. तुझ्या कॉलेजमध्ये दरवर्षी तू पहिली यायची हे पण माहीत आहे मला..”

“तुला रे कसं माहीत?” तिने आश्चर्याने विचारलं.

“तुला तुझ्याबद्दल काय काय सांगू सांग?” तो काहीसा भाव खातच म्हणाला. आणि तिने रीप्लाय देण्यापूर्वीच तिच्याबद्दलची माहिती तिला देऊ लागला..

“तुला एक मोठी बहीण आहे. तीही डॉक्टर आहे आणि आता विवाहित आहे. तुझा एक लहान भाऊ आहे जो इंजिनियरिंग करतोय.. तुझी आई शिक्षिका आहे.. तुझे वडील..” काहीतरी लक्षात आलं आणि थोडासा थांबून तो पुढे म्हणाला..

“सॉरी, तुझे बाबा गेले तेव्हा मी तुझी सोबत नाही करू शकलो..”

“इट्स ओके.. पण खरंच तुला बरंच काही माहितेय.”ती म्हणाली.

“अगं हे काहीच नाही.. तुझ्या मामाचा ट्रॅवल्सचा बिझनेस आहे. त्याच्याकडे एक बस आहे जिचा रंग लॅवेंडर आहे..”

आता तर ती पुरती चक्रावली होती..

“यू मस्ट बी किडिंग मी.. आर यू मॅड ऑर व्हॉट?” तिचा मेसेज पाहून तो फक्त हसत राहिला काही वेळ..

“इतकं सगळं कसं माहीत तुला? मला तर तुझं नाव सोडलं तर काहीच माहीत नाही.. मग तुला इतकी इत्थंभूत माहिती? कशी काय?” तिने आश्चर्याने विचारलं..

“निखिल.. हा तोच निखिल जो माझ्यासोबत ७ नंबर रूममध्ये आलेला.. त्याने दिली माहिती बरीचशी आणि बाकीचे काही सोर्सेस होतेच. तिथून माहिती मिळाली.. तुझ्या पहिलं येण्याची खबर मला अशाच एक मित्राने येऊन सांगितलेली.. काही मला बरं वाटावं म्हणून सांगायचे तर काही चिडविण्यासाठी… असो..!”

“अरे पण माझ्या जवळच्या मित्रांनाही इतकी माहिती नाहीय.. बसचा रंग अँड ऑल.. कहर आहेस तू..”

“ते तुझं बोलणं एकदा कानावर पडलेलं तेव्हा माहीत.. पण सगळं नाही माहीत गं मला.. तुझं घर कुठेय ते अजूनही पक्कं नाही कळलं मला.. सुहास सोबत भर पावसात तुझा पाठलाग केलेला घर शोधण्यासाठी.. निखिलसोबत किती फेऱ्या मारल्या असतील.. चालून चालून थकून जायचो पण घर काही सापडलं नाही..”

“रो रो के पुँछा था पैरोंके छालों नें..

कहॉं बसा ली मंज़िल, कभी दिल में बसनेवालों नें..”

थोडं व्यथित होतानाच व्यथेला साजेसा शेर जोडून तो म्हणाला.

“ओह.. अॅक्चुअली अरे बाबा गेल्यानंतर आम्ही घर बदललं.. खूप त्रास झाला रे तेव्हा.. पैसेही मोजके असायचे.. त्यात तिघांची शिक्षणं.. सगळं खूप भयानक.. आताही आठवलं की कसंतरीच होतं.. कदाचित त्यामुळे तुझ्याबद्दल वाईट वाटूनदेखील मी दुर्लक्ष केलं..”

तिच्या परिस्थितीची खरी जाणीव त्याला आता होत होती.. त्याचे डोळे भरून आले..

“वाईटच वाटलं फक्त? बाकी काहीच नाही का वाटलं..?” त्याने आता मुद्दयाचं बोलायला सुरुवात केली.

“खरं सांगू का? तू प्रपोज नसतं केलं तर आज आपण खूप चांगले मित्र असलो असतो.. तू हुशार पण स्वभावाने लाजराबुजरा.. आणि त्यात अचानक असं प्रपोज केलंस. मला तर खरंच वाटेना की तू मला प्रपोज करू शकतोस..”

“आर यू सिंगल?” त्याने अधिक स्पष्ट होत विचारलं..

“लेट मी कंप्लीट फर्स्ट..” ती म्हणाली आणि पुढे बोलू लागली..

“तुला नकार दिला खरा पण नंतर १२वीच्या वर्षात तुझी हालत बघवत नव्हती रे.. तुझं ते मला पाहणं, थंड उसासे भरणं.. आणि मन मारून जगणं.. मला कळत नव्हतं असं नाही रे.. सगळ्याचं मलाही खूप वाईट वाटायचं.. एक क्षण तर आलेला की वाटलं.. तुला हो बोलून टाकावं.. पण बाबांच्या अचानक जाण्याने सगळं बदललं... मी तर खूपच डिस्टर्ब झाले.. आम्ही सगळेच.. नकळतच जबाबदारी पडली अंगावर.. मग तुझ्याकडे दुर्लक्ष केलं.. बट ट्रस्ट मी.. निव्वळ नाईलाज म्हणून मला तसं करावं लागलं..”

त्याला काय बोलावं कळतच नव्हतं.. त्याच्या डोळ्यांसमोर तो काळ उभा राहिला.. मन फ्लॅशबॅकमध्ये गेलं.. तिच्यासाठी जागलेल्या अगणित रात्री त्याला आठवल्या.. तिच्यावर केलेल्या कविता.. ते सगळं रोमांचित करणारे दिवस.. तिला लिहिलेलं पत्र.. आणि ते फाडून टाकत तिने दिलेला नकार.. त्यानंतरची प्रत्येक रात्र म्हणजे त्याच्यासाठी युगासमानच..! रडवेल्या डोळ्यांनी, गुदमरल्या श्वासांनी विरहाग्नीत जळत तिच्या परत येण्यासाठी मध्यरात्री उठून देव्हाऱ्यातल्या देवापुढे हात जोडून केलेल्या याचना.. सारं काही त्याला आठवायला लागलं.. त्याचे श्वास जोरात चालू लागले.. डोळे भरून आले.. मोबाईलच्या थरथरण्याने त्याची तंद्री भंगली.. तिचे ४-५ मेसेजेस आलेले..

“..तुझं ते स्वतःला त्रास होत असतानाही मला त्रास न देणं.. मला खरंच आवडलं.. मला फक्त एकदा विचारलंस मग पुन्हा कधी कसलाच त्रास नाही दिलास.. तेव्हा तू खूप भावलास मनाला.. कदाचित म्हणूनच तू कायम लक्षात राहिलास आणि राहशील..”

“काय बोलू कळतच नाहीय गं.. तू बोल.. मी ऐकतो आता फक्त..”

“तू दिलेलं पत्र.. किती सुंदर होतं ते.. किती मनापासून लिहिलं होतंस..”

“तुला अजून आठवतंय?” आता शॉक बसायची त्याची पाळी होती.. त्याला ते पत्र तिने फाडलं याचा खूप राग होता. निखिलने एकदा शंका काढली होती.. त्या पत्राचं नंतर काय झालं कळलंच नाही म्हणून..

“हो.. त्याची प्रत्येक ओळ आठवते.. ते वाचून कुणीही तुझ्या प्रेमात पडेल..” असं म्हणत तिने त्याच्या पहिल्या ओळी म्हणून दाखवल्या..(लिहून पाठवल्या)

‘पूर्वा , काय मायना लिहू कळतच नाही कारण तुझं अस्तित्व शब्दांत सांगता येणार नाही.. तुला पाहताच क्षणी वाटलं की येस.. शी इज दॅट गर्ल..!’ “असंच लिहिलेलं ना?” तिने विचारलं..

“बापरे.. तुला आठवतंय की..!” तो खरंच अवाक् झाला..

“अरे गंमत तर ऐक.. मला आवडलंच पण माझी मैत्रीण जी त्यादिवशी सोबत होती माझ्या.. ती पण इम्प्रेस झाली.. मग आम्ही तू यायच्या आधी तू लिहिलं तसंच्या तसं ते पत्र कॉपी केलं.. अगदी शाईसुद्धा तशीच वापरली.. आणि मग ते तुझं पत्र फाडलं तुझ्यासमोर..! घरी गेले तेव्हा गुपचुप ताईला दाखवलं.. तिलाही खूप आवडलं.. पण मग तिच्या सांगण्यावरून ते जाळून टाकलं.. आईच्या हाती लागू नये म्हणून..!

त्यातलं ते गाणं मी मुद्दाम पाठ केलं आणि आजही मला ते पाठ आहे..

“ऐ नाज़नी सुनों ना.. हमें तुम पे हक़ तो दो ना..”

“ओ माय गुडनेस..!” अवाक् होऊन तो फक्त इतकंच म्हणू शकला..

तब्बल साडेचार-पाच तास ते सलग बोलत होते.. एका युगासमान दशकानंतर.. पावसाची सर धो धो कोसळावी तसं.. साचलेलं सारं मळभ दूर होऊ लागलं होतं आता.. इतकी वर्षं साचलेली धूळ साफ झालेली.. मुसळधार पावसानंतर ढग बाजूला सरून सूर्य चमकायला लागतो आणि वातावरण साफ, स्वच्छ होतं.. तसं वाटत होतं त्याला.. डोळ्यांत आसू पण चेहऱ्यावर हसू होतं.. त्याच्या प्रेमपत्राची दुसरी बाजू आज त्याला समजली होती.. भानावर येत त्याने पुन्हा विचारलं..

“पूर्वा, आर यू सिंगल?”

काही वेळ गेला आणि मग उत्तरादाखल एक मोठा मेसेज आला..

“सॉरी डियर, पण आता माझं लग्न ठरलंय.. अरुण नाव त्याचं.. डॉक्टरच आहे तोही.. माझा सीनियर..वेल सेट्टल्ड.. खूप चांगला आहे.. ३ वर्षांपूर्वीच त्याने मला लग्नासाठी मागणी घातली.. आणि मी नाही म्हणू शकले नाही.. तुझ्याबद्दल माझ्या मेडिकल कॉलेजच्या मित्रांसारखंच अरुणलाही माहीत आहे. तुझ्याबद्दल तेव्हा जे वाटलं.. ते खरं आणि प्रामाणिकच होतं; पण त्यानंतर खूप वर्षं गेली रे.. तू काही बोलतही नव्हतास.. तू एकदा पुन्हा विचारलं असतंस.. एकदा अडवलं असतंस तर कदाचित... असो..! पण मग बाबा गेल्याचं आणि तुला दुखावल्याचं दुःख मनात घेऊनच इथे आले मी.. सर्व विसरून अभ्यासाकडे लक्ष दिलं.. त्या दरम्यानच अरुण आयुष्यात आला.. त्याने खूप सावरलं मला.. तो खूप चांगला आहे.. समजूतदार आहे.. माझ्यावर खूप प्रेम करतो.. मला खूप खूश ठेवेल याचीही खात्री वाटते मला.. म्हणून मग त्याला होकार कळवला मी.. तू भेटलास तर तुलाही आवडेल तो.. सॉरी पण आधीच हे सांगितलं असतं तर कदाचित तू पुढचं नीट ऐकलं नसतंस असं वाटलं मला.. आय होप तू समजून घेशील..”

त्याचा चेहरा पडला.. हुरळून जायचे नाही असं ठरवलेलं त्याने पण तिच्याशी बोलताना त्याचं भान हरपलं होतं.. तिच्या शेवटच्या मेसेजने तो जमिनीवर आला.. त्याला वाईट वाटलं.. पण का कुणास ठाऊक, नकळतच तो पुन्हा हसला.. शब्दांची जुळवाजुळव केली मनात आणि मग मेसेज टाइप करायला घेतला..

“खोटं नाही बोलणार मी पूर्वा.. तुझ्यावर आजही तितकंच प्रेम करतो मी.. त्यादिवशी तुला गाडीतून जाताना पाहिलं तेव्हा खूप प्रकर्षाने जाणीव झाली एकटेपणाची.. तुझ्या नसण्याने माझं काय होईल,याची पहिल्यांदाच भीती वाटलेली. तुझ्यावर किती प्रेम करतो हे खरंतर त्या दिवसानंतर कळलं मला.. पुढची ३ वर्षं खूप कठीणच होती. जर माझे हे नवे मित्र मला नसते भेटले तर.. तर काही खरं नव्हतं.. अभ्यास करतच होतो.. पासही होत होतो, पण कशातच मजा नव्हती आधीसारखी.. पुढच्या शिक्षणासाठी मुंबईला गेलो तिथे एक मुलगी मलाही आवडली. आमचं अफेयर पण झालं.. पण तिच्यात मी तुलाच शोधायचो.. तेव्हाही मला तुझीच स्वप्नं पडायची.. मग तिला आणि स्वतःला फसवतोय याची जाणीव झाली. शेवटी न राहवून तिच्यापासून वेगळा झालो.. आता तुझ्याशी सगळं बोलून झाल्यावर खूप हलकं वाटतंय.. मोकळं वाटतंय.. पण आत कुठेतरी दुःखाची जाणीव होते आहेच.. कदाचित याचं जास्त वाईट वाटतंय की इतकं जवळ होतो आपण.. अगदी एका हाकेच्या अंतरावर.. तरी एक नाही होऊ शकलो... कारण ती हाक मी मारली नाही आणि तुला ती मारणे शक्य झालं नाही.. तुला पुन्हा विचारायचं आलं मनात.. पण तुझा रागही यायचा आणि तुझा तो रडवेला चेहरा यायचा समोर.. तुला त्रास नको माझ्यामुळे म्हणून नाही धाडस केलं.. तुझ्या मनाचा काहीतरी संकेत मिळाला असता मला तर विचारलंही असतं पुन्हा..

“शब्दच नव्हे.. मौनही असतात हजारार्थी..

आयुष्याच्या वेड्या वेळी कळणार कुठून..?”

बहुधा माझ्या तळहातावर विधात्याने तुझी रेषाच नाही लिहिली.. आणि आता खरंतर या बोलण्यालाही काही अर्थ उरत नाही.. तुझ्यावर प्रेम करणं सोडून देईन असं तर नाही सांगत. पण इतकं तर खरं की मी आता तुझी वाट पाहणं सोडून देईन.. जमेल तितक्या लवकर मूव ऑन करेन.. आणि एक सांगायचंय तुझ्यावर प्रेम केल्याचा मला अभिमान वाटतो.. तुझ्याबद्दलचा आदर आता अजून वाढला आहे.. आता फार नाही लिहीत काही.. फक्त तू खूश रहा.. तुम्ही दोघंही खूश रहा..”

त्याने मेसेज पाठवला. आणि निरोप घेतला तिचा..

ती संध्याकाळ त्याच्या कायम स्मरणात राहील. खूप मोकळं तरीही थोडंसं अस्वस्थ वाटत होतं त्याला.. सुरेश भटांच्या काही ओळी राहून राहून त्याच्या मनात घोळवू लागल्या.. शेवटी रात्री मनाचा हिय्या करून त्याने “हा आता माझा शेवटचा मेसेज”, असं सांगत तिच्यासाठी लिहून त्या ओळी पाठवल्या.. आणि तो खूप रडला.. पण कदाचित शेवटचं...

“..मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल,

अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल..

मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चूर,

तिकडे पाऊल तुझे उंबर्‍यात अडखळेल..

विसरशील सर्व सर्व आपुले रोमांचपर्व,

पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल..

सहज कधी तू घरात लावशील सांजवात,

माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल..

जेव्हा तू नाहशील.. दर्पणात पाहशील,

माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल..

जेव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत,

माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुणगुणेल..

मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद,

माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल...”

*******समाप्त*******


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational