The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

परेश पवार 'शिव'

Romance Tragedy

3  

परेश पवार 'शिव'

Romance Tragedy

फेरवळण

फेरवळण

9 mins
282


उन्हं उतरू लागली होती आणि छान केशरपिवळ्या रंगाची उधळण झालेल्या आकाशाचे तळ्यात पडलेले प्रतिबिंब पाहत बसलेल्या दिनेशने भानावर येत घड्याळ पाहिलं. साडेपाचला भेटायचं ठरलं होतं पण सहा वाजून गेले तरी भूषणचा पत्ता नव्हता. वैतागून त्याने हातातला खडा तळ्यात भिरकावला. इतक्यात गाडीची चाहूल लागली आणि त्याने मागे वळून पाहिलं. त्याला भूषण येताना दिसला. 


“अरे काय तू.. साल्या कधीपासून थांबलोय रे. आणि काय रे? मायला आजकाल चकाचक दाढी करून फिरतोस. इस्त्रीचे शर्ट बीर्ट.. केस पण कापले की लेका.. खरं सांग, पोरीचा मॅटर आहे ना? आ..?"


बाइक थांबवतोय इतक्यात दिनेशच्या या प्रश्नावर भूषण बावरला आणि गाडीवरून उतरत गोड हसत म्हणाला,


“छे रे.. तसलं मॅटर बीटर काही नाही. मी आता कंटाळलो रे त्या उडत्या प्रकरणांना.. आणि सॉरी.. थोडं काम आलं मधेच म्हणून उशीर झाला."


“ते खरं रे.. पण शाण्या, तू शेवटचा इतका नटलेला मला आठवत पण नाही. आणि आजकाल मी बघतोय तू लय खुशीत दिसतो. आणि भेंडी.. तू मला पण सांगणार नाय काय?"


दिनेशने त्याच्या पोटात गंमतीने बुक्का मारत विचारलं. 


“अरे तसं नाही रे पण अजून कशात काही नाही तेव्हाच कशाला गोंगाट? प्रिया आयुष्यातून गेली त्यालाही आता चांगली दहा वर्षे झाली. आता मस्त सेटल व्हायचं. बाकी काही नाही." भूषण.


“तू नाव तर सांग. सेटिंग लावून पाहिजे काय? बोल तू फक्त. भावा तुझ्यासाठी कायपण! तू मला इथे असं भेटायला बोलावलं तेव्हाच अंदाज आला मला." दिनेश हसत म्हणाला.


“अरे म्हणजे आहे रे तशी एक मुलगी. ताईसोबत खरेदीला गेलो होतो तेव्हा दिसली. त्यांचं दुकान आहे. बरेचदा जातो ना हल्ली तिथे तेव्हा भेट होते. खूप डिसेन्ट आहे रे. अस्मिता नाव तिचं." भूषणने थोडक्यात माहिती दिली.


“म्हणजे परत पोरगी आवडलेली आहे लेका तुला. पण एक सांगू का रे.. म्हणजे आता थोडं सिरियसली सांगतोय. पोरगी चांगली असेल तर खरंच नीट विचार कर. आणि सेटल हो. आता खूप झालं रे हे लफडी वगैरे. आता इतकी चांगली मुलगी आहे बोलतोस तर फालतूपणा बंद कर आणि तिला डायरेक्ट लग्नाचं विचार." दिनेश गंभीर होत म्हणाला. 


बाजूला पडलेल्या झाडाच्या काटकीशी चाळा करत भूषण खाली मान घालून ऐकत होता. दिनेशचं बोलून होताच घसा खाकरून भूषणने बोलायला सुरुवात केली. 


“तुझ्यापासून काही लपवलं नाहिये रे मी दिन्या. पण प्रिया नंतर कुणावर तसं प्रेम केलंच नाही मी. अगदी संध्यासोबत दोन वर्षं घालवली पण प्रियाचा विचार काही मनातून गेला नाही. आणि मग संध्यासोबत ब्रेकअप करताना तो सगळा ड्रामा पाहून तर मनात कुठेतरी एक भीतीच वाटायला लागली. त्यालाही झाली आता चारेक वर्ष. तुला माहीत आहेच नंतर मी आपल्या कितीतरी मित्रांसोबत नाती तोडून टाकली क्षुल्लक कारणांवरून. आणि शेवटी एकलकोंडा झालो. एक फक्त तू आणि विशाल आहात. त्यात तू तर जिवाभावाचा.. तुम्ही होता म्हणून थोडंतरी सावरलो नाहीतर काय झालं असतं देवाला माहीत."


“अरे पण आता काय प्रॉब्लेम आहे तुला? संध्यानंतर तू एकाही मुलीशी नात्याचा धड विचारच केला नाहीयेस. जास्तीत जास्त चार पाच महिने. ते पण मोबाईलवर चॅटिंग. मग भेटायचं.. काही दिवसांनी भांडण करायचं. अश्याने काहीही लागणार नाही हाती तुझ्या." दिनेश कळवळून म्हणाला.


“कबूल रे. पण इथे तसं नाहिये. उगीच काहीतरी बोलून तिला गमवायची नाहिये मला. म्हणून तर आता अस्मितासोबत बोलतानाही खूप विचार करायला लागतोय मला. हिंमत करून तिच्यापाशी गेलोही तरी ती पाहून इतकी गोड हसते. अशी की बस्स.. हिंमत कुठच्या कुठे विरून जाते रे. असं मला प्रियासोबत बोलायला गेलो की व्हायचं. मला खरंच सुचत नाही रे काहीच. कधी वाटलं नव्हतं मी कुणात इतका गुंतेन पुन्हा कधी."


बोलता बोलता आता भूषणला गहिवरून आलं होतं. त्याचा तो केविलवाणा अवतार पाहून दिनेश थोडा वेळ गप्पच राहिला. काही वेळाने त्याने विचारलं, 


“तिची माहिती तरी काढलीस का नीट?" 


“हो.. एकुलती एक आहे. अभ्यासात हुशार आहे आणि स्वभाव खूप गोड आहे. सगळ्यांशी छान हसून बोलते. श्रीमंत आहे पण गर्व नाही दिसत कुठेच चेहर्‍यावर.." 


“महाराज, धन्य आहात आपण. अरे ×××, ती इतकीच चांगली आहे तर नक्कीच तिच्या आयुष्यात कुणीतरी असणार. अश्या मुली सिंगल असतात का कधी? ××× साला.." 


दिनेशच्या या शंकेवर भूषण चमकला. पण लागलीच सावरून म्हणाला, 


“होतं तिचं एक अफेअर आधी पण त्यांचं ब्रेकअप झालं मागेच."


हे सांगताना त्याच्या चेहर्‍यावर हसू उमटलं. आणि ते बघून दिनेशला हायसं वाटलं. पण त्याला जास्त बरं वाटलं ते तिच्या आयुष्यात कुणी नसल्याचं ऐकून.


“चला आता. कामाला लागा. तिच्याशी मैत्री वाढेल असं बघ आता. पुढे बघू काय ते." 


असं म्हणत दिनेश उठला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, 


“टेंशन मत ले रे. होणार तुझं काम होणार. मस्त खा पी आणि मी म्हणालो तसं तिच्याशी बोलायचा प्रयत्न कर. मैत्री वाढव. आणि आता चल घरी निघूयात. उशीर होतोय.."


दोघे निघाले. आपापल्या गाडीवर बसले तसं दिनेश म्हणाला, 


“दिसायला कशी आहे वहिनी? काय फोटो वगैरे आहे का?" 


भूषणने लागलीच मोबाईलमध्ये फेसबुक उघडून त्याला प्रोफाईल दाखवलं. 


“तुझी चॉईस भारी असते हां लेका.. एक नंबर. हिला बहीण आहे का एखादी?"


“माझी तर सेटिंग लागू देत मग तुझं पण काहीतरी काम करूच की.."


उसने अवसान आणत भूषण हसत म्हणाला आणि ते दोघे थट्टामस्करी करत घरी निघाले. 


ठरल्याप्रमाणे भूषणने फेसबुकवर अस्मिताला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. महिनाभर वाट पाहिल्यावर ती स्विकारली गेली. हा पठ्ठ्या भलताच खुशीत होता. कारण नसता बहिणीला घेऊन खरेदीला जायचा. मुद्दाम तिच्या दुकानात जाऊन काहीतरी खरेदी करायला लावायचा. एव्हाना चाणाक्ष बहिणीच्या ध्यानात ही गोष्ट आली होतीच. त्यामुळे ती सुद्धा वाहत्या गंगेत हात धुवून घेत होती. दुकानात गेला की काहीतरी थातूरमातूर बोलायचा तिच्याशी. आज काय तर हवामानाच्या गप्पा, मग काय तर रस्ते कसे खराब आहेत, भ्रष्टाचार किती चालू आहे. ती सुद्धा हसून त्याच्याशी मोजकं बोलायची. सगळा अगदी सावळा गोंधळ. 


साधारण महिना दीड महिना झाला असेल आणि याने हिंमत करून एका रात्री मेसेंजरवर पहिला मेसेज पाठवला. आणि अख्खी रात्र वाट पाहत राहिला उत्तराची. पहाटे कधी डोळा लागला. सकाळी जाग आल्यावर त्याने आधी मोबाईल घेतला हातात पण पलीकडून काहीही प्रतिसाद नव्हता तरी गुड मॉर्निंग असा मेसेज केला याने. आणि मग रोजच कित्ता गिरवत राहिला तो. रोज सकाळी गुड मॉर्निंग रात्री गुड नाइट करत असे. पण समोरून काहीही नाही. गुढी पाडवा आला सगळ्यांत आधी याने तिला मेसेज केला मग बाकी सगळ्यांना. पण समोरून काहीच प्रतिसाद नसल्याचे पाहून हिरमोड व्हायचा नेहमी. तो दिनेशला सांगायचा सगळं. दिनेश त्याला धीर द्यायचा. दुकानात जायचा पण खरेदी करायचं रोज शक्य नव्हतं. तरी दर दहा बारा दिवसांनी बहिणीला घेऊन तो दुकानात काहीतरी खरेदी करायला जायचा. तिच्याशी बोलू पहायचा. तीही हसून बोलायची. पण पुढे काहीच नाही. मेसेंजरवर नसतेस का? गर्दीमुळे हे सुद्धा विचारायची सोय नव्हती. 


एके दिवशी अशीच भेट घेऊन घरी जात असताना भूषणला बहिणीने विचारलेच,


“खरं प्रेम करतो की उगीच आपलं चालू आहे काहीतरी?"


भूषणने गाडीचा वेग कमी केला आणि आणि तिला सांगू लागला,


“मी तर प्रेमाचा विषयच सोडून दिलेला अगदी. कारण प्रियानंतर तशी कुणी नजरेत भरलीच नाही. पण अस्मिताला पाहून वाटतं की आता इथे थांबावं. हिच्याशी लग्न करून सुखी होणार याची शाश्वती वाटते."


इतकं बोलतानाही त्याचे डोळे भरून आले. पण पुढच्या क्षणी तो सावरला आणि गाडीचा वेग पुन्हा वाढवला. घरी जाईपर्यंत नंतर कुणीच काही बोललं नाही.


दिवसामागून दिवस जात होते. आणि आता तर चांगले चार पाच महिने झालेले. याची चलबिचल वाढत होती. रोज सकाळ संध्याकाळ मेसेजेस आणि काही ना काही कारण काढून दुकानाजवळ घुटमळणे हाच त्याचा क्रम. कविता करणे सोडून दिलेले त्याने प्रिया गेल्यावर पण आता पुन्हा कविता करायला लागला. एके दिवशी याने कविता केली तिच्यावर आणि दिनेशला फॉरवर्ड केली.


तिचा रंग ऐसा, गव्हाळी गव्हाळी 

ओढ्याच्या काठी, लव्हाळी लव्हाळी 


डाळिंबाची ओठी, डहाळी डहाळी 

रूप, कांती, बांधा, नव्हाळी नव्हाळी 


तिचा रंग गहिरा, सदा पावसाळी 

सखी रानफूल, हिवाळी उन्हाळी 


रुतून राहिली ती, जिव्हाळी जिव्हाळी 

काळजात भरली, शहाळी शहाळी 


तिचा स्पर्श व्हावा, सकाळी सकाळी 

पहाटेच्या कानी, भूपाळी भूपाळी


“वा मेरे शेर.. काय सुंदर कविता लिहिलीस रे. मस्तच. आता एक सांगतो ते ऐक. ही कविता तिला ऐकव जाऊन. मेसेंजर वर पाठवू नकोस. दुकानात जा आणि कोण नसेल तेव्हा मुद्दाम वाचून दाखव. आणि काय बोलते ते सांग मला." दिनेशने रिप्लाय दिला.


“असं म्हणतोस? उद्या जातोच मग. बरं तू कधी येणार आहेस अमरावतीहून? आलास की भेटू तळ्यापाशी. गेले काही दिवस खूप बेचैन होतंय रे."


भूषण म्हणाला. मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर तो झोपी गेला. 


सकाळी उठला तेव्हा छान हसतच उठला. सवयीने मोबाईल हातात घेतला. अस्मिताला मेसेज करून झाला आणि मग बाकीचे मेसेज पाहिले तर प्रसन्नता विरत गेली त्याच्या चेहर्‍यावरून. त्याचा मित्र विशालच्या आईला अ‍ॅडमिट केलं होतं. याने आंघोळ वगैरे आटोपली आणि तसाच तडक इस्पितळात गेला.


“काय रे, कधी केलं अ‍ॅडमिट? आता कशी तब्येत आहे?"


नुकताच एक कॉल संपवून आत जाणार्‍या विशालला गाठून भूषणने विचारलं. त्याला पाहताच विशालने मिठी मारली आणि तो पण रडू लागला. भूषणने त्याला धीर देत बसवलं तसं तो सगळी हकिगत सांगू लागला.


“अरे रात्री एक हळदीच्या जेवणाची ऑर्डर होती आईच्या मंडळाला तिथे गेलेली. तिथे डीजेच्या आवाजाने त्रास व्हायला लागला तिला पण तिने दुर्लक्ष केलं. नंतर तिला चक्कर येऊन ती पडली. तेव्हा बाकीच्या बायकांना समजलं मग दोघींनी लागलीच रिक्षात घालून इथे आणली. डॉक्टर म्हणाले माईल्ड हार्ट अ‍टॅक होता. आता बरी आहे पण तरी ४८ तास इथे अंडर ऑब्झर्वेशन ठेवावी लागेल म्हणालेत. बाबा निघालेत सकाळच्या गाडीने. खूप घाबरलो रे. मला काही सुचेना. शेजारचे काका होते त्यांनी मदत केली. मावशी पण आली लगेच. खूप रात्र झालेली म्हणून कॉल नाही केला फक्त मेसेज केले तुम्हाला."


“मी पण सकाळी मेसेज बघून लगेच निघालो. असो. काही नाही होत. आपण आहोत आता काळजी नको करू. तू काही खाल्लं नसशील ना? चल काहीतरी खाऊन येऊ. मी पण नाही खाल्लं काही. येताना मावशी साठी पण काहीतरी आणू या."


असं म्हणत भूषण त्याला घेऊन बाजूच्या हाटेलात गेला. मग संपूर्ण दिवसभर त्याच्या सोबत राहिला. संध्याकाळी घरी जाऊन पुन्हा रात्री तिथेच विशालची सोबत करायला आला. विशालचे बाबाही एव्हाना आले होते. त्यामुळे मावशीला घरी पाठवले. रात्री इकडच्या तिकडच्या गप्पा मारून विशालला धीर देत राहिला आणि दोघे आळीपाळीने झोपत होते. सकाळी उठल्यावर फ्रेश होऊन चहा आणायला गेला भूषण. परत येतो तोच विशालच्या रडण्याचा आवाज कानावर आला म्हणून धावतच तो आत गेला. डॉक्टर नर्स सगळेच आत जमले होते. बाजूला विशालचे बाबा रडत उभे होते. विशालची आई गेली होती. झोपेतच दुसरा मोठा झटका येऊन तिने जीव सोडला होता. विशालच्या रडण्याच्या आवाजाने भूषण सुन्न झाला. 


पुढचे तीन-चार दिवस तो आणि त्याचे मित्र विशालच्या घरी काय हवं नको पाहत होते. या सगळ्यांत अस्मिता ला विसरूनच गेला होता तो. एके दिवशी असाच एकदम जास्तीची आणि स्वस्त भाजी आणायला तो मित्राला घेऊन होलसेल बाजारात गेला. तेव्हा रस्त्यात जाताना एके ठिकाणी मंडप सोडण्याचे काम चालू होते. गर्दीमुळे गाडी थांबवली आणि त्याचा मित्र म्हणाला, 


“हे बघ इथे आलेल्या काकू हळदीची ऑर्डर पूर्ण करायला. काकूंना इथेच अ‍टॅक आला होता."


भूषणने तिकडे पाहिले आणि इतक्यात त्याची नजर समोरच्या बॅनरवर पडली आणि तो उडालाच. चि. रोहन याचा शुभविवाह चि.सौ.कां. अस्मिता आणि बाजूला त्याच्या अस्मिताचा फोटो पाहून क्षणभर त्याच्या डोक्याला मुंग्यांच आल्या. हे कधी झालं. आपल्याला काहीच कसं कळू नये. त्याच्यासमोर फक्त अस्मिताचा चेहरा फिरू लागला. गाडी बाजारात पोहोचली तेव्हा त्याची तंद्री भंग पावली. भाजी घेताना पण त्याचे लक्ष नव्हते. कसाबसा अश्रू आवरून तो मित्रासोबत थांबला होता. भाजी घेऊन विशाल च्या घरी गेला खरा पण घरात न जाताच बाहेरच्या बाहेर तो सटकला. थेट समुद्रावर गाडी नेली आणि तिथे एकटाच एका कोपर्‍यात खूप रडला. बर्‍याच वेळाने सावरून त्याने थेट घर गाठले. आंघोळ करून तो भूक नाहिये सांगून त्याच्या खोलीत गेला. नंतर काही दिवस तो अगदी शांत होता. त्याचा म्लान चेहरा पाहून विशालच्या आईचे दुःख असेल असं समजून दुर्लक्ष केले. पण जेवणावर परिणाम झालेला पाहून नंतर ती सुद्धा चिंता करू लागली. तिने बहिणीकरवी विचारलं पण त्याने फारसा काही प्रतिसाद दिला नाही. बहिणीला आठवले की प्रियाच्या वेळेस पण असाच कोषात गेला होता. 


असाच आठवडा निघून गेला. भूषण काय वागत होता कुणालाच काही कळत नव्हतं. दिवसभर त्याच्या खोलीत बसून रहायचा. त्याचे कशातच लक्ष नव्हते. एके दिवशी दिनेश घरी आला.


“काकू, कश्या आहात? भूषण आहे का घरी? त्याचा फोन बंद आहे."


“अरे बाळा, बरं झालं आलास. भूषण बघ कसा करतोय. त्याच्या खोलीत आहे. ना धड बोलतो.. ना खातो.. गप्प पडून असतो बेडवर.. तू तरी विचार काय झालंय ते.."


दिनेश चमकला. लागलीच खोलीत जाऊन पाहतो तर बेडवर दाढी वाढलेला, काळवंडलेल्या चेहर्‍याचा, डोळे आत गेलेला भूषण शून्यात नजर लावून हेडफोन्स लावून गाणी ऐकत बसलेला. प्रिया सोडून गेली तेव्हा होता अगदी तसाच. त्याने जवळ जाऊन त्याच्या मोबाईल पासून हेडफोन्स वेगळे केले तसे भूषण भानावर आला. समोर दिनेशला पाहून त्याने रडतच त्याला मिठी मारली. त्याला धीर देत दिनेश मनातच म्हणू लागला, 


“दहा वर्षांनंतर आता कुठे माझा दोस्त सगळ्यातून बाहेर पडत होता. खुश होता. आणि आता पुन्हा त्याला तिथेच आणून सोडलास.. का देवा का..?"


बाजूला मोबाईलमधून तेच जुने गाणे कानावर येत होते. 


“तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शूनि गेला..

सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला.."


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance