पावसाळ्यातील ती रात्र
पावसाळ्यातील ती रात्र
जून महिना लागला होता म्हणजे पावसाळ्याची सुरुवात, आजही वातावरण ढगाळच होत. कधी पावसाच्या सरी अंगावर कोसळून अंग ओल करतील याची भीती अरुणला वाटत होती. अमरावतीच्या धान्य मार्केट मध्ये आज त्याच्या शेतीचा माल त्याने उतरवीला होता व त्याच पैशात नवीन पेरणी साठी त्याला बियाणे खरेदी करायचे होते. त्याचे काम जवळपास झाले होते. बियाणे खरेदी करून घेतले होते. गावातीलच परतणाऱ्या गाडीत ते बियाणे त्याच्या घरी जाणार होते पण या सर्व भानगडीत त्याला रात्र झाली होती.
तस अमरावती शहर हे त्याच्या साठी नवीन नव्हतं त्याच नेहमीच येन जाणे चालू राहायचे. एक रात्र कुठे काढू म्हटलं तर नातेवाईकही बरेच होते. पण आज रात्र फारच झाली होती. तशी त्याच्या कडे स्वतःची दुचाकी होती. पण त्याचे घरचे त्याला नेहमी सांगायचे कि रात्र व्हायच्या आत घरी येत जा म्हणून तसा तो नियम पाळायचा असं बेरात्री प्रवास करण्यात त्याची सुद्धा घाबरघुंडी सुटायची पण कामामुळे उशीर झालाच. त्याच गाव दर्यापूर, जिथे त्याला जायचे होते.
कुणाला त्रास होऊ नये म्ह्णून अरुण नातेवाईकांच्या घरी सुद्धा गेला नाही. वेळ म्हणाल तर रात्रीचे अकरा वाजणार होते. मन नसतानाही तो गावाकडे निघाला. त्याची दुचाकी शेतात वापरून वापरून पार खटारा झाली होती. गाडी चालवताना गाडीचे एकूण एक पार्ट हलायचे.
आता मेन सिटी तुन तो नवसारी गावाकडे आला. जे अमरावती परत वाडा रोडवर होते.
सिटी तुन निघताना एक पेट्रोल पम्प लागायचे. चांगलं दोनशेच पेट्रोल भरून त्याने गाडी परत रस्त्याला लावली. अमरावती परतवाडा रोड वर चांगलीच ट्राफिक असायची त्यामुळे एवढ्या रात्रीला सुद्धा काहीच वाटायचं नाही. पण गाडी आता दर्यापूर मार्गाला लागणार होती.
दर्यापूर सडक तशी रात्रीला शांतच असायची. मेन अमरावती परतवाडा रोड सोडला तर वलगावापासून डाव्या हाताला चाळीस पन्नास कि. मी. अंतरावर दर्यापूर हे गाव लागायचं. मधात बरेचशी गावे लागायची. पण हि सडक जरा जास्तच शांत असायची.
वरून पाऊस कधी कोसळणार याची काही खात्री नव्हती. कारण थंड हवा सुटली होती. त्या थंड हवेत अरुणची दुचाकी भर वेगाने पळत होती. पण जे व्हायला नको तेच झाले पाण्याचे बारीक थेंब त्याला लागत होते. दुचाकी वेगात असल्याने ते पाण्याचे थेंब त्याच्या अंगाला झोंबत होते पण त्याचे सुदैव कि त्या रोडवर जवळच एक गाव होते.
तळेगाव रस्त्यावरूनच त्याला त्या गावची चकाकणारी लाईट दिसत होती. पावसाला सुरुवात झाली होती. त्यातच ढगाचा गडगडाट आणि त्या रात्रीच्या काळोखात ते किरकिर करणारे रात्र किडे अरुणच्या अंगावर काटा आणत होते. अंग जवळ पास भिजायला आल होत. गाव सुद्धा जवळच येत होते.
एकदाचे गाव आले. अरुण पूर्ण पने भिजला होता. अमरावती वरून जवळपास त्याने वीस बावीस किमी अंतर पार केले होते. त्याने स्टॉप वरच वडाच्या झाडाखाली गाडी थांबवली. जिथे एक पानटपरी होती. तिथे बऱ्याच अशा प्रकारच्या पान टपऱ्या होत्या. पण एवढ्या रात्रीचे ते चालू असणे अशक्यच. समोरील डांबरी रस्त्यावर सरर्रर्रर्र करत पाण्याच्या सरी कोसळत होत्या. अरुण पूर्ण पने भिजला होता. अंगातील सदरा काढुन त्याने पिळला. मधातच एखादि वीज चमकायची. गावात जावं म्हटलं तर गावची लोक तशी लवकरच झोपतात आणि ते पण असं पावसात इतक्या रातीला गावात जानही त्याला ठीक वाटत नव्हते. वेळ म्हणाल तर आता बाराच्या पार झाला होता. कधी पाऊस कमी होतो आणि घरी जातो असा विचार त्याच्या मनात येत होता.
"हट च्यामायला तिकडेच कुठं थांबलो असत तर बर झाल असत. इथं फालतु अडकलो."
अरुण स्वतःशीच म्हणाला. सगळी कडे काळोख होता. स्टॉप वरील एका खांबावर फक्त लाईट झळकत होता. पावसाच्या सरी त्यात स्पष्ट दिसायच्या.पाऊस कमी व्हायची वाट अरुण पाहत होता. पाच दहा मिनिटांनी अरुणला अंधारातून कुणीतरी येताना दिसले. कुणीतरी लंगडत लंगडत येत होते. ते जसजशे जवळ येत होते ते स्पष्ट दिसत होती. ती एक म्हातारी होती. पावसाच्या पाण्याने पूर्ण चिंब भिजली होती. पांढरे केस अंगात लुगडे डोक्यावरील कुंकू पाण्याने विरघळून पाण्या सोबत वाहून जात होते. तिचे दोन दात जरा बाहेरच वाटत होते. थोडेसे कुबडे निघालेले. हातातील काठीचा आधार घेत लंगडत ती रस्ता पार करत होती.
"इतक्या रातच्याला हि म्हातारी इथं काय करतेय, ते बी इतक पावसात "अरुण तिच्याकडे पाहत स्वताशीच म्हणाला.
"अय्य.. म्हातारे " अरुणनि तिला जोरात आवाज दिला पण तिला तो ऐकू गेला नाही बहुतेक पाण्याच्या आवाजामुळे.
ती तशीच चालत होती होती. त्याला नवलच वाटत होते. एक विचार त्याच्या मनात चमकून गेला.
"हडळ.. बिडळ तर नसलं? पण आज तर अमावस्या पण नाही "
या विचारानेच त्याला कापरा फुटला.
"छे हे काय मनात येतंय"
मनातील विचार झटकत अरुण तिला पाहत होता. तिचे लंगडत चालणे अरुणच्या मनात फारच भीती निर्माण करत होते. पाण्याचा जोर आता कमी होत होता. पाऊस थांबत होता. आता कुठे अरुणच्या जीवात जीव येत होता. त्याने गाडीच्या सीटवरील पाणी हातानेच दूर सारत गाडीवर टांग टाकली आणि गाडीची चाबी फिरवली. त्याने सहजच त्या म्हातारी वर नजर टाकली. ती म्हातारी चालतच अंधारात जात होती.
ती म्हातारी काहीच दूर गेली असेल तोच धाडकन जमिनीवर घसरली. काहीशी ती कण्हत होती. एक विचित्रच आवाज ती काढत होती ... रडण्याचा. जो त्या भयाण काळोखात आता त्याला स्पष्ट ऐकू येत होता.
अरुण फारच घाबरला होता,
"जाऊदे असू काय पण मला काय” घाबरत त्याने झटकन गाडीला किक मारली आणि गाडी चालू झाली. तो रडण्याचा आवाज अजूनही येत होता. त्याने झटकन गाडी रस्त्याला लावली. पण त्या म्हातारीचे रडणे त्याला अजूनही आठवत होते.
गावठी माणसाच्या अंगात माणुसकी हि जन्मताच असते त्यामुळेच काय त्याला त्या म्हातारीचे वाईट वाटत होते.
त्या म्हातारीला काही झाले तर, उदयाला पश्चाताप नको की आपल्यापुढे कोणीतरी अडचणीत होत आणि आपण मदत केली नाही. अरुण विचार करत होता, त्याने परत गाडी त्या म्हातारीकडे वळवली. म्हातारी जवळ पास उठण्याचा प्रयत्न करत होती. गाडी स्टॅंडला लावून अरुण तिच्या कडे आला. पूर्ण भिजलेली ती म्हातारी होती. थंडीमुळे ती कुरकुरत होती. तिचे रडणे आता थांबले होते.
"काय .. ग म्हातारे एवढ्या रात्रीला अशा पाण्यात कुठे फिरतंय तू "
"अर पोरा घरी जात व्हते.."
कापतच तिने उत्तर दिले.
"गाव तर मागेच आहे न इकडे कुठे अंधारात जातेय "
"होय.. पण इकडे आहे माझं घर "अंधाराकडे बोट दाखवत ती म्हातारी बोलू लागली.
अरुणणे तिकडे पहिले पण अंधारात त्याला काही दिसत नव्हते.
"बर बर चल सोडतो तुला "
हाताने उचलत अरुणनी तिला उठवले.
तिचा एक पाय थोडा लहानच होता. म्हणूनच कि काय ती म्हातारी लंगडत होती असा विचार त्याच्या मनात आला. त्याने खाली पडलेली काठी तिच्या हातात दिली. पडल्यामुळे म्हातारीला हाताला पायाला खरचटले होते.
"म्हातारे दुचाकीवर बसता येईल का तुला?"
गाडीकडे वळत अरुण म्हणाला. म्हातारीचा त्याला काहीच आवाज आला नाही त्याने मागे वळून पहिले.
म्हातारी एकटीच लंगडत त्या अंधाराकडे चालली होती.
"अरे अजबच आहे हि, सोडतो म्हटल्यावर... एकटीच निघाली."
आणखी कुठे अंधारात म्हातारी पडेल म्हणून अरुण तिच्या जवळ धावतच गेला.
"थांम्ब... थांब... सोडतो तुला तिचा हात धरत तिला तो तिच्या घराकडे नेऊ लागला."
"तुझ्या घरी बिरी आहे न कोणी".. अरुण तिला म्हणाला
"होत बाबा एक पोर पण पाच वरीस झाले अजून घरी नाही आल."
"पाच वरिस"
"होय.. पाच वरिस कामाला व्हता शहरामंदी"
"का पण का नाही आला?"
"लोक म्हणत्यात कि मेला म्हणून तो कसल्याश्या अपघातात"
"काय...? अरर वाईटच झाल” अरुणला त्या म्हातारी बद्दल फार वाईट वाटत होते.
त्या नंतर त्याने तिला काहीच विचारले नाही. ती वेळही नव्हती विचारायची ते त्या अंधाऱ्या रस्त्यात चालत होते, नुकतेच पाणी आल्यामुळे जागो जागी पाण्याचे डबरे साचले होते.आता अंधारात अरुणला एक कौलावजी घर दिसत होते.पूर्ण अंधारात बुडालेले. त्या घराला मातीच्या भिंती होत्या ज्या अर्थवट खचलेल्या वाटत होत्या.
कसल्या घरात राहते हि म्हातारी, तो मनातच म्हणत होता.
"काय करत.. पोरा आता कस बी राहावं लागत."
ती म्हातारी कण्हत म्हणाली.
तिचे बोलणे ऐकताच तो भीतीने पाणी पाणी झाला.
हिला कस ऐकू गेल मी तर मनात बोललो. त्याला काही समजत नव्हते.
असा विचार करताच त्या म्हातारीने त्याच्या कडे पहिले आणि कसलीशी हसली.
म्हातारीला त्याने त्या घराच्या दाराजवळ नेले. समोरील टपरी वजा दार उघडताच एक किळसवाणा भपकारा त्याला आला.
"बर बर म्हातारे जा आता घरात मी निघतो."
पाऊस परत लागणार होता. दूरच वीजा चमकत होत्या.
घाबरतच तो पटापट तिथून निघून जाऊ लागला.
काहीतरी भलतीच आहे हि म्हातारी असं तो मनोमन म्हणू लागला.
तो मोजून वीस एक पाऊल चालला असेल तोच परत म्हातारी रडण्याचा आवाज येत होता.तिचे रडणे हे काळजाचे ठोके चुकवणारे होते.आता अरुणला त्याचे हृदयाचे ठोके स्पष्ट जाणवत होते. ते रडणे जरा जास्तच वाढू लागले. मधातच आकाशातून एक वीज चमकायची.
“परत खाली पडली कि काय म्हातारी” अरुण म्हणाला. पण भीतीने आता त्याच्या मनात आता घर करायला सुरुवात केली.
"म्हातारी जरा अजिबच आहे, पण जर भूत बित असेल तर... नाही नाही.. ती भूत, बित, नसेल आज तर अमावस्या पण नाही ती भूत बित असती तर तिने आता पर्यंत मारले असते आपल्याला..! नक्कीच म्हातारी पडली"
विचार करत अरुण परत त्या म्हातारीच्या घराकडे निघाला. तो घराजवळ येताच तिचे रडणे थांबले.
परत... भीतीची घंटी अरुणच्या मनात वाजली. घराचा दरवाजा उघडा होता. पण आतील घर पूर्ण अंधारात होते.
"म्हातारे ठीक आहेन तू.." बाहेरूनच अरुणने आवाज दिला.
पण म्हातारीने त्याला उत्तर दिले नाही. आता अरुण घरात शिरू लागला. अंधारात त्या म्हातारीला आवाज देऊ लागला. पण पूर्ण घरात फक्त अंधार दिसत होता. तो थोडा आणखीण आत शिरला. त्याला काहीच दिसत नव्हते. आता त्याच्या खांद्याला काही तरी लागले. त्या अंधारात त्याने हातानेच ते काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला.
थंड स्पर्श त्याच्या हाताला झाला त्याने बरोबर चाचपून पहिले. तो एक पाय होता मानवी पाय.
आता त्याची धडधड जास्तच वाढली होती. ते नेमके कोणाचे पाय होते त्याला समजत नव्हते.
आकाशात एक वीज चमकली आणि तिच्या त्या पांढऱ्या प्रकाशात अरुणला समोर काहीतरी दिसलं.
त्याचा चेहरा त्याने वर केला. घरातील लाकडी नाठीला त्या म्हातारीच शरीर लटकले होते. गळ्याला एक दोरखंड होता. तोंडातून जीभ बाहेर आली होती. आणि डोळे जणू खोबणीतून बाहेरच पडणार असे वाटत होते. अरुणचा जीव घश्यात आला होता. त्याचे लक्ष त्या देहावरून हटत नव्हते. तोच तो नाठीवरील दोरखंड कचकच करत होता आणि एका क्षणात तो दोर तुटला .... त्या म्हातारीचे थंड शरीर अरुणच्या अंगावर धापकन पडले. आता उरला सुरला जीवहि अरुणच्या शरीरातुन निघून गेला.
सकाळी सकाळी काही तरी बघण्याची घाई काही लोकांना होती. एक व्यक्ती पायातील पॅन्ट टोंग्या पर्यंत खोसत त्या गर्दी कडे जाऊ लागले. तो व्यक्ती गर्दीतून वाट काढत पुढे गेला. समोर एक मृतदेह पडलेला त्याला दिसला. त्याचे तोंड उघड्या स्थितीत होते. डोळे पूर्ण निळे पडले होते. त्या डोळ्यात भीती साफ दिसत होती.
"काय हो..काय झाले" तो व्यक्ती बाकीच्या व्यक्तिला म्हणाला
"अहो आज सकाळी अमरावतीला जात होतो तर रस्त्यामंदि हि दुचाकी उभी दिसली. म्हटलं बघावं कुणाची आहे, इकडे येतच होतो. तर हे पडक्या घराचा दरवाजा उघडा दिसला. तसं इकडे कुणी जात नाही मला वाटलं गाडी वालाचं असेल....फक्त पाहायलाच गेलो तर हे दिसलं बघा." त्या मृतदेहाकडे पाहत तो दूसरा व्यक्ती घाबरत म्हणाला.
"अहो पाटील तुम्हाला माहीत कस नाही .. इथं आधी लंगडी म्हातारी रहात होती. माहीत नव्ह तुम्हाला, पाच वरिस झालेत तिला मरून. तिचा मुलगा अपघातात मेला आणि एकुलत एक पोरग मेल म्हणून त्याच दिवशी गळफास लावला त्या म्हातारीने तिच्या या घरात. तेव्हा पासून कुणालाना कुणाला ती म्हातारी दिसते रातच्याला इथंच, तीच रडणं, कनन. मी सुद्धा ऐकलंय पण कधी इकडे आलो नाही मी"
त्या गर्दीतील एक तिसरा व्यक्ती म्हणाला.
( समाप्त )

