पावडर
पावडर
कादंबरी
गालावरील तुझ्या
पावडर
होऊ काय?
**
संजय वि. येरणे
**
संजय वि. येरणे
प्रभाग ७, शिवाजी चौक,
मु.पो.तह. नागभीड, जिल्हा चंद्रपूर ४४१२०५
मो. नं 9421783528
**
(प्रस्तुत कादंबरीतील घटना, पात्र, प्रसंग हे काल्पनिक असून यातील कथानक संबंध साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.)
मनोगत
“गालावरील तुझ्या पावडर होऊ काय?” ही कादंबरी वाचकांसमोर उपलब्ध करून देताना खरेतर मी आनंदीत आहे, तेवढाच सांशकही आहे. यापूर्वी “योद्धा, यमुना, रमास्त्र” ह्या तीन कादंबरी संत वाड्.मय व ऐतिहासिक स्वरुपात माझ्या हाताने पूर्णत्वास आले आहे. ‘बयरी’ ही ग्रामीण कादंबरी स्त्रीव्यथेवरील आपणांसमोर साकार झाली आहे. मात्र प्रेम या विषयावर ‘पावडर’ ही कादंबरी अगदी खूप वय व बुद्धीने वाढल्यावर लिहिणे मलाच हास्यास्पद वाटते आहे. खरंतर ‘प्रेम’ या विषयावर काही नवीन मांडता येणार नव्हतेच. “तोच मसाला आणि तोच भात” असे प्रेम विषयाच्या बाबतीत घडत असतं. एका चित्रपटाच्या कथानकदृष्टीने एका व्यक्तिमत्वाने सांगितल्यामुळे काहीतरी वेगळे कथानक देता येईल काय? याचाच विचार करत असताना या कादंबरीचे लेखन कार्य सुरू केले. मात्र तब्येतीची कुरकुर आणि कौटुंबिक कार्याचा व्याप यामुळे मी या विषयाला न्याय देताना खूप उशीर केला. प्रेम या विषयावर कादंबरी लिहिणे हा माझा पिंड नव्हताच. त्यामुळे मी केलेले लिखाण हे साहित्यमूल्याच्या दृष्टीने वरचढ असेल असेही मी मानत नाही.
कादंबरीला दिलेले ‘पावडर’ हे वेगळे नाव ऐकून नावातूनही हसू येतं. प्रतिकात्मक काव्यकल्पनेतून सुचलेलं हे नाव आहे. या कादंबरीतील घटना, पात्र, प्रसंग मांडताना खरेतर इतिहास या विषयापेक्षा मला फार कस लागलेला आहे. ही कादंबरी कलश-स्मिता या पात्राची मध्यवर्ती भूमिका, त्यांच्या मनभावना आणि त्यांचं वागणं-बोलणं यावर चित्रीत झालेली आहे. फ्लॅशबॅक पद्धतीने काही मोजक्याच दिवसाचं कथानक मांडण्याचा यात प्रयत्न केला आहे. आत्मकथन व निवेदन सूत्र वापरून रचलेले कथानक आणि समिश्र भाषेचा संगम, प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी सिनेमाच्या गीताने केलेली सांगता, नाविन्यपूर्ण कल्पकता मांडण्याचा प्रयत्न याद्वारा झाला आहे. खरंतर यातील घटना, पात्र, प्रसंग हे काल्पनिक असून यात कुठलाही योगायोग साधर्म्य येणार नाही ही खात्री आहे.
कादंबरीतील वैचारिक मांडणी सोडून प्रेममांडणीला ही तरुणाई नक्कीच आपलीशी करेल, या उद्देशाने लिहिलेले हे मनोरंजनात्मक कथानक होय. प्रबोधन किंवा सामाजिकता या बाबीकडे दुर्लक्ष करावे लागेल. काही वर्षांपूर्वी देशोन्नती ‘जल्लोष’ मध्ये तरुणांईवर वैचारिक लेख लिहिताना मनात असलेलं कादंबरीच्या रूपातील प्रगटन हे आज कित्येक वर्षांनी ‘पावडर’ रूपाने समोर आले आहे. याचमुळे हा आनंद.
कथा, कविता, कादंबरी, समीक्षा, बालवांड्.मय, संपादन अशा अनेक प्रकारातील पस्तीसहून अधिक पुस्तकाचे लेखन कार्य करताना पुन:श्च या कादंबरीरूपाने साहित्यकार्यात पडलेली भर मन सुखावणारी आहे. कादंबरीचे कथानक आपण वाचणार आहातच. त्याविषयी काय बोलावे? मात्र आपणास मनोरंजन या दृष्टीकोनातून ही कादंबरी नक्की आवडेल. या कादंबरी निर्मिती मागे काही मित्रमंडळीचे सहकार्य लाभले. त्यांच्याशी केलेल्या चर्चा आणि त्यांनी सांगीतलेल्या घटना, प्रसंग यांचाही मी आभारी आहे. अखेर आपल्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत.
लेखक - संजय येरणे.
नागभीड, जिल्हा चंद्रपूर.
मो.नं. 9421783528

