Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

Sanjay Yerne

Tragedy


4  

Sanjay Yerne

Tragedy


एन्जॉय लाईफ यार!

एन्जॉय लाईफ यार!

14 mins 253 14 mins 253

“What’s are you say? Oh no, so sad yaar!” मंगेशच्या हातातील मोबाईल पलीकडील सागरच्या बातमीने अलगद खाली पडला. मंगेश कसाबसा सावरला. ऐकावे ते नवलच होतं. त्याला दरदरून घाम फुटलेला. या बाबीला कदाचित आपणच जबाबदार असल्याची अपराधी भावना त्याच्या मनात रूंजन घालू लागली. पुढे काय करावे ते त्याला सुचेना.

 मंगेशने खिशात कोंबलेला रूमाल काढीत घाम टिपला. बाजूच्या खुर्चीवर बसत त्याने क्षणभर छताकडे बघितले. डोळयातून अश्रू पाझरू लागलेले. खिडकीच्या बाहेर बघत तो विचारचक्रात बुडाला. त्याला घडलेल्या काही घटनांचे प्रसंग आठवू लागले.

  ‘संज्या, काय यार तू जगतोस? अरे तू मास्तर आहेस. चांगला पन्नास हजार पगार कमवितोस. पण काय कामाचं? अरे, स्वतःसाठी तरी जगून पहा कधीतरी. कमविलेल्या पैशाचा उपयोग स्वतःच्या आनंदासाठी तरी कर.’ मंगेशने संजयला गमतीनेच म्हटलं होतं.

  ‘होय, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण प्रत्येकांच्या अडीअडचणी आणि जगण्याच्या पद्धती वेगवेगळया असतात, असलेला पैसा चैनित उडविणे म्हणजेच का जीवन आणि त्यात आनंद असतो होय? कधीतरी तू ‘एन्जॉय’ या शब्दाच्या पलीकडे जावून विचार कर.’

  ‘हो ना यार! तेच तर मी तुला सांगतो आहे.’

  ‘तसं नाही रे! तुझी जीवन जगण्याची कला म्हण की, पद्धती म्हण, फार वेगळी आहे, आपल्यासारखंच इतरांनी जगावं, वागावं असा दुराग्रह काय म्हणून रे कामाचा? पैशाने सारं काही विकत घेतलं, इतरापेक्षा महागडया वस्तूचा उपभोग घेतला, आनंद घेतला, म्हणजे जीवन जगलो, असं तू समजतोस? ते मला नाही पटत मुळीच.’

  ‘मग कुठल्या रे कामाचं जीवन? एवढा पगार कमवायचा आणि स्वतःवर खर्च न करता पैसा साठवत पुढच्या पिढिला जतन करून ठेवायचं, असंच ना! आपण कमवायचं तर त्याचा उपभोग आपण घ्यायलाच हवा!’

  ‘मला नाही पटले तुझे विचार, कमीतकमी तू आपले बालपणी भोगलेले गंभीर क्षण, दिवस आठवून पहा.... एका एका रूपयाला मोहताज असलेला तुझा तो क्षण, आज सारं काही विसरून तू एन्जॉय म्हणून साध्याश्या अर्थाने घेतो आहेस. आजचा जमाना फार वेगळा आहे. अरे, आज जर तुझ्याकडे पैसा नसेल तर उद्या काय? याचा विचार कधी करतोस का?’

  ‘अरे, हो ना! सारं काही आठवते मला, आपण जे भोगलो ते आता भोगायचं नाही. मनातल्या साऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्यात मला. बालपणीचे दिवस आठवतात मला, अरे! शेजारचे मूलं बापाच्या पैशावर मस्त आनंदाने खावू खायचे, त्याक्षणी साधं चॉकलेट खावं ही इच्छाही अधुरी राहायची. मी त्यांच्या तोंडाकडे पाहात बसायचा. निव्वळ तोडांला पाणी यायचं.... किती मन मारीत जगलो रे आपण...? तेव्हाच ठरविलं. आपण मोठं झालो की हवी ती वस्तू वापरायची, पण सगळे लोकं वापरतात ती नव्हे! तर त्यापेक्षाही महागडी, अगदी आपली वस्तू बघून लोकांनींही विचार करावा... लोकांनींही मला झुरावं, मी बालपणी जसा झुरलो अगदी तसाच.... आणि आज बघतोस ना....! तू साधी शंभर रूपयाची टी शर्ट वापरतोस पण मी पाच हजाराची इंम्पोर्टेड लेवीज कंपनीची टी शर्ट वापरतोय.... बघ, तू माझ्याकडे, तूला काय वाटतं? या क्षणी विचार कर, कदाचित तुलाही वाटेल मी एवढी महागडी टी शर्ट केव्हा वापरणार....? कदाचित काही लोकांना मी वापरणाऱ्या वस्तू मुळे झुरणं होणार.... असो... पण मी हा आनंद उपभोगतोय, अगदी मनातील सर्व क्षणांना पूर्ण करण्याचा हा आनंद वेगळाच असतो. कधीतरी तुही विचार कर यावर.... अरे! तुझ्याकडे पैसा असून काय कामाचा.... ऐपत असतांनाही असं कधी भिकाऱ्यागत जीवन जगायचं. मला नाही आवडत तुझं जगणं....’

  ‘अरे! कसं जगायचं, कसं राहायचं? हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. म्हणून का आपण असंच जग, तसंच जग हा इतरांना आग्रह धरायचा काय?

  ‘आग्रह नाही रे! पण असं मनकोंडी होवून जगणं, पैसा असून उपभोग न घेणं, मेल्यावर काय कामाचा रे हा पैसा. तू बघायला तरी राहणार आहेस का? आपल्या कुटुंबातील आपल्या कमाईवर चैनीने जगतीलच ना! तेव्हा स्वर्गातून का नरकातून तू बघायला येणार आहेस होय? तुला पश्चाताप होईल..... आणि म्हणशिल अगोदरच मी माझ्या पैशाचा उपभोग घेतला असता तर बरे झाले असते.’ मंगेशने ने हसतच संजय मास्तरला म्हटलं, आणि सिगारेट कश मारताच धुर हवेत पसरला होता. क्षणभर त्याकडे एकटक बघत पुन्हा हसतच म्हणाला.

  ‘अरे! त्या स्वर्गात काही तू पैसे घेवून जाणार नाहीस. नाहीतर तिथं अप्सरेचा कॅबरी डान्स बघायला तरी मिळालं असतं. तिच्या शो ची तिकीट काढून, यापेक्षा आत्ताच इथे एखादा कॅबरी डान्स बघ ना! जा नागपूरला तिथं प्लाझा थ्री स्टार हॉटेल मध्ये एक स्कॉच घ्यायची. बाजूलाच असलेल्या बारबालेशी थोडं लळीवाळ व्हायचं, कशी जगण्यातील नशा आणि तो रोमांच एकदा करून तर बघ...अहाहा.... काय ती मजा असते. तुला म्हणून सांगतो मास्तर, ते स्वर्गसुख की त्यापेक्षाही.... मी तीला असा स्पर्श करताच..... अहाहा..... जावू दे तुला सांगून काय फायदा? मीच स्वप्नागत आठवतो आहे.’

  मंगेशने तर संजयच्या डोक्याला चांगलाच झिनझिनाट आणला होता. कुठली गोष्ट त्याने कुठवर नेली होती आणि स्वतःच त्याच्या निरखणाऱ्या चेहऱ्याकडे पाहून हसत राहिला.

  सागरही त्याच्या या गोष्टींना अगदी मन लावून ऐकतच राहिला. ‘अहाहा.... खरंच मला पण वाटते रे!’

  ‘जावू दे रे! तुझा विषय बंद कर.... जेव्हा पाहिलं तेव्हा तुम्हाला गंमतच सुचते... जगण्याच्या का हयाच तऱ्हा जगात आहेत असं तुला वाटते? हे फार चुकीचे आहे. जगण्याचा आनंद म्हणजे फक्त महागडया वस्तू वापरणं नव्हे!’

  संजयने राग आल्यागत विषयाला कलाटणी दिली होती. दररोज मंगेश, सागर, संजय फिरायला जातांना हया अशाच गोष्टी निघायच्या. कधीतरी मंगेशचं हे मांडल्या जाणारं जीवन जगण्याचं गणित थोतांड असतांनाही त्यावर नरम-गरम चर्चा व्हायची. त्यादिवशीही अशीच चर्चा झाली होती. मंगेशला हे सारं काही आज आठवू लागलं होतं.

  मंगेश रेल्वेत इंजीनिअरींग विभागात गॅंग मेट पदावर नोकरीला होता. त्याला रग्गड साठ हजार रू. पगार मिळायचा. तसे पाहता मंगेशने बालपणी अनंत हालअपेष्टा भोगल्या होत्या. लोकांची हमाली कामे करीत जगतांना त्याचं मन नोकरी मिळताच अगदी बदललं होतं. आजवर भोगलेले क्षण आता पुन्हा जवळही फिरकू दयायचे नाही की भोगलेल्या यातना मनपटलावर आठवणीसह उरू नयेत त्यासाठीच त्याचं जगणं बदलंलं होतं हे त्यालाच ठावूक.....

  मंगेशचं शिक्षण जेमतेम दहावी पुरतंच मर्यादित राहिलं होतं. बापही पक्षघाताच्या आजाराने फार दिवस आजारी राहात संपला होता, तेव्हाचे क्षण आणि यातना त्याला आता आठवूनही आठवत नव्हत्या. हातात पगार येताच सारं काही चैन करून उडविणे हे एकच सार त्याला उमजायचं. बायको, मुलं त्यांच्या भवितव्यासाठी काहीतरी उरूण पुरवावं ही संकल्पनाच जणू त्याला आता कठीण होवून बसली होती. अगदी महागडया उंची वस्तू वापराची सवय त्यालाच नव्हे तर त्याच्या कुटुंबातील सगळयांनाच झाली होती, साधी वस्तू घ्यायला तो नागपूरच्या महागडया एम्प्रेस मॉलची निवड करायचा. इंम्पोर्टेड, ब्रॅन्डेड वस्तू वापरणं हेच त्याच्या सवयीचा भाग झालेला आणि हाच त्याच्या जगण्याचा आनंद. तेच तो संजय मास्तरला आणि सागरलाही सांगायचा.

  संजय मास्तर मात्र त्याच्याएवढाच पगार कमवूनही अगदी गरजेपुरता आनंद घेणारा व कुटुंबाला काहीतरी आपल्यानंतरही उरावे अशा विचारसरणीचा त्याचा मित्र होता. मात्र सागरही मंगेशच्या बोलण्याची ‘री’ ओढत संजयवर जेव्हा उपहास साधायचा, तेव्हा नको ते मित्र असेही कधीकधी संजयला वाटायचे. आपला कुठेतरी अपमान होते आहे असेही कधी वाटून जायचे. तर कधी तो मित्र म्हणून त्यांच्या या गोष्टीवर फार विचार करायचा.

  ‘हो बेटा, आपण किती कुढत जगतोय, एक वर्ष झालं आपण एकच शंभर रूपयाची चप्पल वापरतोय, घरीही तीच व बाहेरही तीच.... मात्र मंगेश एका वर्षात चार शूज जोड, दोन-तीन चप्पल, अशाप्रकारे चांगले वर्षात याच गोष्टीवर वीस हजाराहून अधिक खर्च करतोय, त्याकडे बघतांना वाटते की आपण एवढं कमवूनही किती मागे आहोत नाही? आज जगण्याची तऱ्हाच बदललेली. पण कशाला एवढा मिजास करायचा. शंभर रूपयातलं जगणं वीस हजार खर्च करून आनंद मिळवित जगणं, खरेच उचित नाही, एकंदरीत काय तर आनंदासाठीच हा खर्चाचा व्यापार होय. पण पुढे हाच पैसा आपल्या अडचणीच्या कामी येईल हे त्याला कुठं कळते. नको, आपण त्याच्या बोलण्याचा एवढा परिणाम मनावर घेणे योग्य नव्हे जावूदे!’

 संजयच्या मनात अशा अनंत विचारांची स्पंदने हृदयाच्या कप्प्यात घर करून जायची आणि त्याचा विचार हा सुरूच असायचा.

  मंगेश आठवडयातून दोन ते तीन दिवस मासांहार करायचा. दररोज दोन सिगारेट पॉकीटवर होणारा खर्च, इतर चैन, बाहेर मित्रासोबतचं विलासी जगणं आणि गरज नसतांनाही महागडया वस्तू फॅशन म्हणून वापरणं, हेच त्याचे आनंदाचे क्षण होते. तो त्याचा पुरेपूर उपभोग घ्यायचा. जणू हाच त्याचा छंद होता.

  संजयही मास्तर होण्यापूर्वी हलाखीचे, गरिबीचे जीवन जगलेला माणूस, रोजीरोटी करीत शिक्षण घेत त्याने या परिस्थितीवर खरेतर मात केली. पण ही परिस्थिती त्याच्या नेहमी नजरेसमोर यायची. आजचे इतरांचेही असे हलाखीचे जगणे बघून त्याच्या कनवाळू मनात, त्याच्या अनंत क्षणांची आठवण रेंगाळायची. खेडयात इतर विद्यार्थ्यांचे हलाखीचे जगणे, त्यांच्या कुटुंबातील परिस्थिती समोर राहतांना उची वस्त्र परिधान करणे जणू त्यांना हिनविणेच असेल असे त्याला सहज वाटून जायचे. याचमुळे का असेना मंगेशचं तत्त्वज्ञान हे त्याला कमीपणाचे वाटायचे. आवश्यक त्या वस्तूवर, गरजेवर मोजकाच खर्च करून पगारातील रक्कम उरविणे व भवितव्य सुखर करणे हेच त्याचं ध्येय होतं. याचमुळे का असेना आज त्याचं चांगलं स्वतःचं घर, प्लॅट सारं काही होतं. पण मंगेशचं ना घर, ना फलॅट, फक्त चैन करणं एवढंच....

  दोघांच्याही पगारदार असण्यातील जगण्याची तऱ्हा म्हणजे जणू आकाश, पाताळ यातील अंतर होय. मात्र यातूनच एकमेकांच्या जगण्यावर ओढलेले ताषेरे म्हणजेच त्यांची फिरायला जातांना करमणूक असायची. मात्र त्यांच्या मैत्रीत यामुळे कुठलेही अंतर आलेले नव्हते.

  ‘अॅमेझानवर छान ऑफर सेल आहेत. सागरने मोबाईलवर बघत म्हटलं होतं.’

  ‘हो ना! अरे त्यावर स्केचर चा शूज बघ बरं!’ कितीला आहे?’

  ’आठ हजारापासून सुरूवात दिसते.’

  ‘हं हाच तो...!. मला आवडलाय, कर त्याला कार्ट.’ मंगेशने क्षणाचा विचार न करता ती वस्तू बाय केली.

  ‘अरे, पण हा दहा हजाराचा आहे ना!’ संजयने त्याला म्हटलं.

  ‘हो ना! चाळीस टक्के सूट मिळतेय ना! त्यावर, हो हाच घ्यायचा.’

  अगदी इंम्पोर्टेड असा शूज होता तो. संजयही चहाचा घोट घेत त्यांच्या ऑनलाईन खरेदीला निरखत राहिला.

  ‘अरे, मास्तर तुझ्या चपलेचा अंगठा तुटला. नाही शूज तर साधी एखादी चप्पल तरी घे...!. बघ रे, त्याच्यासाठी, एखादी इंम्पोर्टेड चप्पल, नवरदेवासारखी...’ मंगेश त्याला टोमणा मारत हसला.

  ‘नाही रे मला नाही आवडत, ही अशी खरेदी.... खूप महागडी आहे ना..!’ संजयने सहज म्हटलं.

  ‘मग काय शंभर रूपयाची चप्पल घासून-घासून वापरणं परवडते. अरे, एकदा घालून पहा, मग समजेल. ते क्रिकेटर लोक वापरतात ना या कंपनीचे शूज, ती कंपनी आहे ही. त्यांचे तर लाखाचे शूज असतात, फक्त कंपनीच नाव आहे आणि त्यातला आनंद.... अरे, झोपतांनही बेडवर वापरशील.’ मंगेशने एका दमातच संजय मास्तरला म्हटलं, त्याच्या वाक्यातील विनोदाने आता तिघेही हसू लागलेले.

 संजयला तेव्हा कुठं कळलं होतं. ही कंपनी आणि या शूजची खासीयत काय ते.

 ‘अरे, सगळा पगार का या शूज, पॅन्ट अशा महागडया वस्तूवर खर्च करतोस.’

 ‘का नाही? अरे, पैसा स्वतःच्या उपभोगासाठीच कमवितो आहोत ना! आणि यातील आनंद बघ ना! अरे बालपणी ठिगळ लावलेला पॅन्ट वापरतांना कुढत काढलेले दिवस आठवतो ना! तेव्हा राग येतो मला. त्या दिवसांचा. आता नाही जगायचं तसं. अगदी बिनधास्त जगायचं, झकास जगायचं. तो आठवते काय सिनेमातला डॉयलॉग?

 ‘कोणता रे?’ सागरने मधातच ‘री’ ओढली.

  ‘कडक.’ हं! अगदी असंच कडक जगायचं...... बरं! ही तूझी टी शर्ट केवढयाला घेतली होती?’

  ‘दोनशे रूपयाला.’

  ‘माझी टी शर्ट बघ, चार हजाराची आहे, लेवीज कंपनीची, हा आहे तुझ्यातला आणि माझ्यातला फरक. अरे, मेल्यावर काय घेवून थोडं जाणार आहोत आपण. आता जन्म एकदाच मिळाला आणि त्यातही नोकरीने चांगला पैसा मिळतो आहे तर त्याचा उपयोग स्वतःच्या चैनीवर नाहीतर कशावर करणार?’

 मित्रमंडळीत अशी चर्चा नेहमीचीच, असा हा खरेदीवरून रंगणारा विषय आणि मंगेश असाच उपदेश देत राहणारा. यात त्याला फार समाधान मिळायचं. मात्र आपल्यासारखं इतरांनीही असा जीवनाचा आनंद उपभोगावा असं पटवून देतांना मंगेशचा प्रयत्न मात्र असफल झालेला असायचा.

  संजय मास्तरला ही मंगेशची जीवनपद्धती कुचकामी वाटायची. अधिकचा खर्च करून काय उपयोग? क्षणभर मिळेलही आनंद, पण पुढे? क्लेशदायकता येवू नये, असं त्याला नेहमीच वाटायचं. आपण मागे आणि पुढेही जगत असलेल्या क्षणात तफावत करायला नको. नाहीतर, लोकंच नावबोट ठेवतात. असंही त्याला वाटायचं. जीवनाचं गणित चैनीच्या वस्तू खरेदीने बिघडले तर.....! ते गणित सोडविणे कठीणच, समाजात अनेक उदाहरणे आहेत, रग्गड पैसा असतांनाही पुढे गरिबीत प्रवेश करणारे आणि स्वतःहून चुकीच्या वागण्याने अडकून पडणारे. आपण नशिबाने, प्रयत्नाने का असेना नोकरीवर लागलोत. पैसा कमवितो, म्हणून काय असा वागण्यातील उतावीळपणा आपण स्वतःहून करायचा?

  कधीकधी मंगेशच्या जीवनाचं हे गणित त्याच्या डोळयासमोर यायचं. रात्रौ पुस्तके वाचतांना तो अगदी विचारप्रवाहात मग्न व्हायचा. खरंच मंगेश आपल्याला वस्त वापरावरून सल्ला देतो हे चांगले आहे काय? की आपणच चुकतो आहोत. आपण असे कुढत जगतो हे खरेच चुकते आहे काय? आपल्याकडेही भरपूर पैसा गोळा झालाय, पण स्वतःसाठी, चैनीसाठी कधीही उपयोग केला नाही. खरंच! एकदा या अशा आनंदाचा उपयोग घेवून पाहावं काय? मंगेशसारखं एकदातरी जगून पाहावं?

  ‘होय, आपण घेवूया असा उपभोग, मंगेशसारखं अगदी तसंच, एकदातरी, आपण बदलल्याचे बघून मंगेश..... तुझ्यासारखं मीही जगू शकतो, मी एवढा काही कंजूष नाही रे! एवढं कमजोर ठरवू नकोस! या शंभर रूपयाच्या चप्पलेपेक्षा दहा हजाराचे शूज घालून मी नक्कीच मिरवित जाणार.... जीन्स, टीशर्ट सारं काही अगदी क्लासिक घेवूया...’

 संजयच्या मनातले खरेदीचे धागे घट्ट विणल्या जात होते. एवढा सारा खर्च करण्याची जणू हिंमतच त्या कंजूष देहात तयार झाली. तो स्वतःच स्वतःला प्रतिप्रश्न करू लागलेला आणि त्याच्यासमोर मंगेशच्या कुटुंबाचं वातावरण तरळू लागल होते.  

  ‘होय, आपणही आपल्या मुलांबाळांना, बायकोला असे महागडे कपडे, वस्तू खरेदी करायच्यात. त्यांनाही फार आनंद होईल, एकदा हा अनुभव घ्यायचाच.’

  ‘दरवर्षी गाडी बदलविणारा मंगेश, दर महिन्याला महागडया वस्तूची खरेदी, वाॅच, मोबाईल, लॅपटॉप आणि जीवनात लागणारं सारं काही. काय त्या वस्तू? सारं काही अगदी श्रीमंत थाटाचं ते उदाहरण. अगदी त्याच्या बायको-मुलांपासून सर्वांनाच ते आवडणारं.... तशी वागण्याची, जगण्याची त्यांना सवय होवून गेली आहे. पण आपण स्वतःसह कुटुंबालाही कुढतच जगवतोय. एकदा आपल्या मुलाने नाही का आग्रह केला? महागडया पॅन्टचा, पण आपणच त्याच्या इच्छेला मुरड घालीत कमी किमतीची वस्तू निवडायला लावली, बायको तर नेहमी म्हणते, ‘मला एखादी महागडी साडी घ्यायचीय.’ पण आपण त्या बाबीलाही नकारच दिलेला.....अरे, होय! आता तिलाही अगदी ‘वाडा’ शोरूम मध्येच साडी घ्यायला नेणार. अगदी श्रीमंत स्त्रिया घेतात म्हणे तिथे कपडे.... आपणही जावूया अनुभव घेवूया....’

 संजयचे मन असं विचारात घिरटया घालणारं, तर कधी मनाला समजावणारं,

  ‘अंथरूण पाहून पाय पसरावं माणसाने, पण आपलं अंथरूण कुठं लहान आहे. आपलं मनच लहान आहे, आपल्या गरजा आपण मर्यादीत ठेवल्या आहेत.’

  ‘पुन्हा सायंकाळची भेट, असंच फिरायला गेले असतांना........

 ‘मग काही ठरवलंस काय? अरे! मी नागपूरला जाणार आहे, खरेदीला... एम्प्रेस मॉल मध्ये...... येतोस काय?’

  ‘कशाची खरेदी?’

  ‘अरे, यार! अॅपलचा नवा मोबाईल लॉंच झालाय, म्हणून...’

  ‘पण तू तर हा मोबाईल चार महिन्यापूर्वीच घेतला आहेस ना!’

 ‘अरे हो ना! पण माझं मन भरलंय यात. आता छान नवा मॉडेल आहेच तर घेवूया.’

 ‘बरे बाबा, जा तुझ्या खरेदीला शुभेच्छा, मला नाही जमणार सोबत यायला....’

 ‘अरे, किती वर्ष झालीत तुझ्या या डब्बी मोबाईलला, फेकून दे ना त्याला! नाही महागडा तर चांगल्या दर्जाचा कॅमेरा असलेला स्मार्ट फोन तरी घे.... सांगू काय किमती, तुला परवडेल अशा अनेक आहेत.... चल, सोबत निदान डोळाभर बघून तरी घेशील.’

  ‘कशाला हवं तो महागडा फोन, एखादया वेळी हरवला की गेला....?’.

  ‘अरे, हरविला तर हरविला. काय तुझं नशीब जाणार काय?’

  पुन्हा अशा एन्जॉयमेंटच्या गप्पाने संजय मास्तरचं डोकं गरगरू लागलं होतं. होय, मंगेश वागतो तसं आपणही जगून पाहायचं, एकदातरी अनुभव घ्यायचाच. मंगेशच्या जीवनपद्धतीचे अनुकरण करावे अशी ईच्छा जणू संजय मास्तरच्या मनात तरंगू लागली होती..... पण त्याचं मन या विचाराने अजूनही घट्ट होत नव्हते.

 ‘मंगेश किती हसतो नाही का आपल्यावर? त्याला पैसा म्हणजे किती सहज खर्च करायची वस्तू वाटते? अगदी मागेपुढे न बघता, उद्याचा कुठलाही विचार न करता जणू त्याचं हे खरेदीचे व त्यातही उंची वस्तू वापरण्याचे वेड खरेच एवढा दिलदारपणा आपल्यात नाही का येणार? नको नाही परवडणार आपल्याला.’ त्याच्या मनात अनंत विचार येत राहिले.

 चार-आठ दिवस उलटले असेल. संजयने खिशात दोन हजाराची बंडल कोंबत नागपूरला जायला निघाला. ‘एन्जॉय’ या एकाच शब्दाला आता तो समोर जाणार होता.

  ट्रॅव्हल स्टॉप वर येताच लगेच एआरबी लक्झरी एसी कोचची बुकींग करीत प्रवास सुरू केला. आजतागायत महागडी टिकीट असल्याने तो कधीही या कोचचा प्रवास करू शकला नव्हता.... त्याने लगेच मंगेशला फोन करून खरेदीची बातमी दिली. तेव्हा मंगेशला त्यावर विश्वासही बसला नाही. मंगेश पलीकडून फक्त हसत राहिला.... संजय मास्तरने, ‘चल उदया भेटू.....’ म्हणून कॉल बंद केलेला.

  नागपूरला पोहचताच प्रथम महागडया आलिशान पॅराडाईज बार मध्ये जात माईल्ड बियर घेतली. खायला झिंगा फा्रय मागविला. कित्येक वर्षांनी घेतलेली बियर कडक तेवढीच घश्याला चिरफाड करीत आत गेली. त्याने मात्र अगदी आंनदाने हा मार्ग पत्करला होता. अत्यंत महागडं असं ते जेवण. साध्या दोनशे रू. ऐवजी हजाराची नोट खिशातून काढीत वेटरला पन्नास रू. ची टीप देत अगदी चेहऱ्यावरील आनंद तिथल्या ग्लासात बघत बाहेर पडला.

  पहिल्यांदाच त्याने अॅटो ऐवजी समोरच्या ओला कॅबला बुक करीत एम्प्रेस माॅलकडे निघाला. अगदी महागडया अशा स्कुजनर शूज शोरूम दालनात त्याने एन्ट्री घेतली. साधी चप्पल घालणारा माणूस आज पहिल्यांदाच शूज घेत होता. अगदी स्मॉर्ट शूज म्हणून त्याने नऊ हजाराचे शूज पसंत करीत खरेदी पूर्ण केली. पिटर शोरूम दालनातून टी शर्ट, अत्यंत महागडा जीन्स, सोबतच मॉल मध्ये, वॉच, बेल्ट, गॉगल, असं सारं काही इंम्पोर्टेड खरेदी केलं, आपल्या पत्नी व मुलांनाही अगदी अशीच महागडी खरेदी यात दहा हजाराची साडीही घेतली. आपल्या कुटुंबालाच खरेदीला आणलं असतं तर असा साधासा विचारही त्यांच्या मनात आलेला. चला, ‘असू दया. त्यांना ही खरेदी आवडली तर पुढे आणूच.’ असं मनाला समजावित, चार तास अगदी आनंदाने खरेदीत घालविले. आज पहिल्यांदाच एवढी महागडी खरेदी करतांना तो आनंदित होता. त्याला वारंवार मंगेशचा चेहरा डोळयासमोर यायचा. उदयाला आपण मंगेशसमोर उभे राहू तेव्हा मंगेश मला बघून अगदी आनंदाने हसेल.... मीही अगदी गळाभर मिटी मारीत त्याला हसणार.

  अगदी श्रीमंत असे लोक, त्यांची महागडी खरेदी, त्यांचा आनंद याचेही त्याने निरीक्षण केले. खरेच आपण पैसा असूनही असे कुढत जगतो, कंजूष म्हणून स्वतःला हीनवून घेतो. याचा त्याला मनातच राग उन्मळून येवू लागला.

 ‘खरे आहे मंगेशचे. जीवंतपणी पैसा कमावून त्याचा उपभोग आपण नाही तर कोण घेणार? स्वतः उपभोग घ्यायचा नाही म्हणजे काय? खरेच, आपले चुकते आहे. आपण विनाकारण मंगेशला, त्याच्या विचारांना दोष देत राहिलो. खरेच, आज किती हेवा वाटतोय. काहीतरी जीवनातील हिरावलेला आनंद आपण या महागडया खरेदीतून मिळविला......’

  खरेदी संपताच बाजूच्या थिएटरकडे त्याचे लक्ष गेले. बराच वेळ शिल्लक असल्याने त्याने इथेही वेळ घालवायचे ठरविले. त्याने बालकन्नीची अत्यंत महागडी तिकीट खरेदी करीत सिनेमा बघितला. सिनेमाचा आनंद घेतांना आलेले स्नॅक्स व इतरही खादयपदार्थाचा आस्वाद घेतला. मनाला आलेली मरगळ या चित्रपटाच्या कहानीणे पळाली होती. 

  ‘होय, किती आनंद आहे ना मल्टीप्लेक्स मध्ये येण्याचा...!’

  सायंकाळच्या वेळेला ट्रॅव्हल कंपनीत स्पेशल कार बुक करून आपले सामान घेत मास्तर गावाकडे परतला. अगदी शंभर रू. च्या साध्या बसच्या तिकीट ऐवजी दोन हजार रू. ची स्पेशल कार करीत, आज खरेदी केलेला नवा तीस हजाराचा आय फोन आणि त्यातील संगीत ऐकत तो घरी आनंदाने परतलेला.

  तब्बल साठ-सत्तर हजाराहून अगदी जास्त रकमेची ही खरेदी व तेवढीच एन्जॉयमेंट. त्याला स्वर्गसुखाचा आनंद देवून गेली.

  ‘पप्पा, हे माझ्या करिता..... आणि ही साडी मम्मी करिता.... मम्मा बघ... किती छान..... आणि एवढी महागडी....!’

  मुलं, पत्नी ही खरेदी बघून किती-किती आनंदित झालेली. जीवनात पहिल्यांदाच अशा उची वस्तू त्यांना प्राप्त झाल्या होत्या.

  आपण अत्यंत महागडी खरेदी करू शकला, याचे मास्तरला समाधान झाले असले तरीपण क्षणभरातच त्याला बालपणी भोगलेल्या यातनांचा उजाळा होवू लागला.

  रात्रौ जेवणं आटोपली. तसे पाहता संजय मास्तरला आता जेवायची गरजही नव्हती. प्लाझा पासून ते घरी येईपर्यंतचा प्रवास अगदी सुखकारक व आनंदमय असाच झालेला. चारपाच हजाराच्या ऐवजी अचानक केलेली महागडी खरेदी. संजय मास्तर स्वतःच अवाक होवून विचार करीत असलेला.

  दिवसभराच्या अगदी आनंद प्रवासात आलेला थकवा, संजय मास्तर फिरणाऱ्या फॅनकडे एकटक बघत बेडवर निजलेला.

  ‘अरेच्चा! आता आपण बेडरूममध्ये अगदी श्रीमंतासारखं एसी लावावं. नको, त्या गर्मीचा त्रास, त्या प्लाझा मध्ये आणि थिएटरला कसा एसीचा गारवा आहे. होय! मंगेश एवढा खर्च करतो पण त्याकडेही एसी नाही, आपलं हे पुढंच पाऊल.....’.

  डोळे भरून आलेले. उद्या हया इंम्पार्टेड कपडयांचा जणू आपण पहिल्यांदाच शुभारंभ करणार.... अगदी गोड आठवणी आणि उदयाचा उजाळणारा दिवस..... दिवसभरातील आनंदाचे क्षण व खरेदीच्या आठवणी.... मन झोपेच्या अधीन झालं.

  मुलांनी पप्पाला आवाज दिला. ‘मम्मी बघ ना, पप्पा अजून उठले नाहीत.’ मुलांची मम्मी त्यांच्या आवाजाने त्यांना उठवायला आत आलेली.

  चादर ओढताच तिला घाबरल्यासारखं झालं. आवाजानेही उठेना म्हणून हात लावून बघितलं. शरीर निपचीत निजलं होतं. तिने जोरजोराने हलवलं, श्वास थांबलेला आणि तिच्या मनाचा बांध फुटून तिचे रडणे कापरे भरविणारे. तिने हंबरडा फोडताच दोन्ही मुले धावतच आलेले. ‘पप्पा....’ जोराचा हंबरडा.....

  एकाएकी सारं काही संपलं होतं. जीवनाचा आनंद, महागडी चैन, रात्रौ आनंदानं पुन्हा उद्याचे रंगवलेले एसीचे स्वप्न अधुरेच राहिलेले..... मास्तरांना झोपेतच हृदयाचा झटका आलेला.....

 सगळीकडे बातमी पसरली. ‘मास्तर एकाएकी गेले....’ सागरला हे कळताच त्याने मंगेशला फोन करीत सारं काही सांगितलं होतं.....

What’s are you say? Oh no, so sad yaar!’ मंगेशच्या हातातील मोबाईल पलीकडील सागरने दिलेली बातमी ऐकताच अलगद खाली पडला. मंगेश कसाबसा सावरला.

  सागरही त्याच्या घराकडे जायला निघालेला....

  घराजवळ गर्दी वाढलेली. आनंदानं महागडी खरेदी करीत जीवनाचा आस्वाद घेणारा मास्तर, मंगेशच्या मनातील बाबीला मनात नसतांनाही, त्याप्रमाणे चैनीचं जगणं स्वीकारणारा मास्तर, जीवनभर परिस्थितीची जाणीव ठेवीत कुढत जगणारा मास्तर, आता सारं काही संपलेलं.

  मंगेश त्यांच्या घरी घाईगडबडीने येताच मास्तरकडे एकटक बघतच राहिला. ते महागडे शूज, शर्ट, पॅन्ट, अॅपल मोबाईल सारं काही इंम्पोर्टेड वस्तू, जीवनातील महागडी चैनीची ही पहिलीच खरेदी..... खोलीत बाजूच्याच टेबलवर ठेवलेली, मंगेशच्या डोळयात अश्रू झिरपले. डोकं गरगरू लागलं.

  मंगेश करूणामय स्थितीत उद्गारला, ‘माझ्या अतीगमतीचा हा परिणाम?’

मास्तर डोळयासमक्ष......... अनंतात विलीन झालेला........Rate this content
Log in

More marathi story from Sanjay Yerne

Similar marathi story from Tragedy