उद्ध्वस्त
उद्ध्वस्त


“आत्ता व माय, पाणी बेटा दुश्मानच बनून पडत हाय.”
“आठ रोजापासून रोजच्या रोज धो-धो सांडते नव्हं.”
“आये तं आभाळच फुटलं आनं त्या आभाळानं आपले नशीबच फोडलं हायत त्याले आपण तरी का करणार.”
“अवं मा, आता त्या नदीचा पूर शिवारात पण शिरला म्हणे, रात्रभर पाणी नाही थांबलं तं उद्या आपलं कसं होणार.....”
शेवंता आणि तिची आई रात्रोच्या मिणमिणत्या मातीच्या तेलाच्या दिव्यात चटणी-भाकर खात चिंतेने व्याकूळ होत होती. गप्पा चालू होत्या. तिच्या डोळ्यात आठवडाभर पडणारे पावसाचे पाणीच जणू वाहात होते.
अगदी बारा वर्षापूर्वीचं असं स्वरूप पुन्हांदा परतून आलं होतं. होत्याचं नव्हतं करणारं ते आभाळाचं विक्राळ रूप होतं. गावात सर्वत्र हाहाकार माजला होता. चिंतेची धग सलत होती. आठ दिवसापासून कोणीही घराबाहेर पडले नव्हते. याला जबाबदार कोण तर पाऊसच... निसर्ग हा मित्र तर, कधी दुश्मन बनून येणारा... आता पाऊस ओसरण्याचीच वाट, नाहीतर...
तसे पाहता लाडज या गावाला ही काही नवीन गोष्ट नव्हती, पण नियमीततेपेक्षा हे भयावह असंच होतं. वैनगंगेच्या अगदी काठावर असलेलं हे गाव. उत्तर-दक्षिण वाहणारी ही अजगरासारखी महाकाय नदी. आणि गावाच्या चौफेर शेपटी सारखा वेढा मारीत लाडजला कवेत घेणारं हे जणू समुद्रातील बेटाचंच स्वरूप होतं. वैनगंगा दुथडी भरून वाहायची तेव्हा गावातील मैदान लगत प्रदेशात सर्वत्र पाऊस पसरायचा. पन्नास साठ घरांची ही वस्ती.
शेवंतानं जेवण आटोपले, भांडीकुंडी न घासताच तशीच बाजूला ठेवत खाटेवर पडली होती. घरात नुसता ओलसरपणा आलेला. उद्यातरी पाऊस बंद व्हावं नाहीतर... आता गावातील घराघरात पाणी येईल. या पुरातून कसं वाचायचं? हाच एक प्रश्न होता. गावात काही मोठी माणसं खलबत आखत होती आणि शेवंताची आईही निसर्गाला हात जोडत अलगद खाटेवर पहुडली.
मागील पुराच्या वेळेस शासनाने या गावाचे पुर्नवसन करायचे ठरविले. चार वर्षात या प्रक्रियेला जोरही चढला होता. चार कोस दूर वैनगंगेच्या दुसऱ्या टोकाला सर्वांना गावठाण जमीनी देण्यात आल्या. शेतजमीनीचे पैसे पण मिळाले. पण गावातील चार घर सोडली तर कुणीही या गावातून आपलं घर सोडलं नव्हतं आणि शेतीचा मिळालेला पैसा दुसरी जमीन खरेदी न करताच जींदगाणीच्या वापरात आणि काहींनी तर एैश आराम, चैनित व शौकात बुडविला होता.
इथली जमीन सुपिक, गाळाची आणि काळी कसदार होती. यामुळं दुप्पट पिक व भाजीपालाही पिकायचा. यावरच त्यांची गुजराण चालायची. आज ही जमीन सोडणं म्हणजे लेकराला सोडण्यासारखंच होतं. ही शेती सोडून जावूच नये अशीच यांची भूमिका... शासनानेही पुढे या पुर्नवसन गावाकडे दुर्लक्ष केलेलं. या मातील जन्माला आलो तर याच मातीत जगायचं, मरायचं आणि राहायचं ही एक विचारसरणीच बनली होती आणि सर्वांचे असंच इथं राहणं सुरू होतं.
जमीनीवर, गावावर आता सरकारची मालकी होती. इथूनच वीस कोसावर गोसेखुर्द धरणाचं कामही सुरू झालं होतं. धरणाचं पाणी तुडूंब भरलं की धरणाचे दार उघडले जायचे आणि पुन्हा पुराचा फटका या लाडजला बसायचा. या धरणानं लाखो एकर शेती जमीनी हिरव्यागार होणार हे हिरवे स्वप्न इथल्या परिसरात पुढाऱ्यांनी पोहचविले होते. पण अजूनही धरणाचे काम व त्याचे कालवे पूर्णतः व्हायला एखादी पिढी संपावी लागेल, तेव्हाच हे काम होईल. असेच दिसून येत होते. ‘दिन मे ढाय कोस’ ही म्हण या कामाला लागू पडत होती.
धरणाच्या मातीत पैसा ओतून पाण्यासारखा पैसा वाहून जात होता. तरीपण अपूर्णतःच होती. शासनालाही याची चांगली जाण होती पण आता त्याला इलाज काय?
शेवंताची झोपडी टपटप गळणं सुरूच होतं. तीचं लक्ष आपल्या अंधाऱ्या झोपडीतील गवतावर जात होतं. पण पावसाची रिपरिप सुरूच... आठ दिवसापा
सून रोवलंलं धानही आता वाहून गेलं होतं. सडलेलं होतं. यंदा खायलाही काही उरणार नव्हतं. कधी ओला तर, कधी वाळला दुष्काळ. हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असायचं पण वाळल्या दुष्काळाचा या गावाला नदी काठावर असल्याने सामना करावा लागत नव्हता हीच जमेची बाजू होती.
शेवंताच्या आईला दोन लाख रूपये शेतीचे मिळाले होते. मात्र शेवंताच्या मोठया भावानं मिळालेल्या गावठाणावर घर व शेत खरेदी ऐवजी स्वतःच्या एैशोआरामवर खर्च केला होता. कॉलेजात शिकायला जातांना एका मुलीशी लगट करून तीच्या प्रेमधुंदीत बराच पैसा उडविला. आणि एके दिवशी गुजरातच्या कंपनीत नोकरी मिळाली असे सांगून, घरून आपल्या स्वप्नपरीसह पोबारा करीत तिकडेच लग्न लावून कायमचाच मोकळा झालेला. सारं काही संपलं होतं. आणि शेवंताची आई आपल्या मुलाच्या अशा वागण्यानं पुरती खचली होती. बालपणीच बाप सोडून गेलेला. असलेला मुलगाही असाच नालायक निघाला होता. तो कधीही परत आलाच नव्हता.
शेवंताही आता वयात आलेली. तीचंही लग्न करावं लागणार होतं. पण यंदा पुन्हा हा ओला दुष्काळ. आता परत एक वर्ष तीला लग्नाकरीता शेतीतून पैसे जमविण्याची वाट बघावी लागणार होती.
आईनं अलगद डोळे पुसले. तिने झोपलेल्या शेवंताकडे बघीतलं. तीही जणू विचार करीतच असावी. शेवंताने कुस बदलली होती.... डोळा आता लागणार नव्हताच... मेघांचं गर्जन पुन्हा वाढलं होतं.... लखलखत्या विजांचा लख्ख प्रकाश आता झोपडीत येवून आदळत होता. सगळीकडे काळाकिट्ट अंधार दाटला होता.
रात्र बरीच पुढे सरकली असेल. शेवंता या अक्राळ-विक्राळ गर्जनेतही केव्हा निद्राधीन झाली तीलाही कळले नाही आणि गावात आरडाओरड सुरू झाली.
“पळा, पळा.... गावात पाणी घुसलंय... धरणाचे आणखी दरवाजे खुले झालेत... नदीला पाणी वाढलंय....”
आई आवाजानं भानावर येत उठली होती. अंधारात वाट काढत सगळे लोकं शाळेच्या स्लॅबवर चढायला शाळेकडं पळत होती.....शेवंताही जागी झाली. दोघ्याही मायलेकी याच अंधारात शाळेकडे चालू लागल्या होत्या....
जसं जमेल तसं लोकं स्लॅबचा आधार घेत शाळेवर चढत होती.... आता गावात एक फुट पाणी घराघरात साचलं होतं. जीकडे-तिकडे रडण्याचा, ओरडण्याचा आवाज वाढला होता. आता या गावाला व गावातील लोकांना इथून दूरवर बाहेर हालवावे लागणार होते. पण एवढया लवकर मदत शक्यच नव्हती. काही लोकांनी उंच झाडाचाही आधार घेत त्यावर आपलं ठाण मांडलं होतं. मंदिराच्या कळसभागावरही काही लोकं चढले होते... आणि या गर्दीत कदाचित कुणी घसरून पडत वाहात जाणार याचाही काही नेम उरला नव्हता.
“मा देनं व हात, चांगला घट्ट पकड. ये वर ये... पटकन वर ये....”
शेवंतानं आईचा हात घट्ट पकडून तीला वर ओढलं होतं......मात्र तीच्या वयोमानाने तीला वर चढणं कठीण झालं होतं. मधातच कुणीतरी येवून तीला आधार देत वर उचललं होतं. आवाजाचा गलका वाढला होता..... कोण कुठे आणि कसा स्वतःला वाचवतो आहे याचीच ही धावपळ होती. दोघ्याही मायलेकी स्लॅबवर पोहचलेल्या. तीथं बरीच गर्दी झालेली.... सगळीकडे अंधारातही समुद्रासारखं पसरलेलं धो-धो वाहणारं पाणी दिसत होतं.... आता पाण्यानं सगळे ओलीचिंब झाली होती. अंगात वारा, पाऊस थंडी भरून आलेली. आणि शेवंताची आई हे सारं काही बघून या थंडीच्या गारठयानं बेशुद्ध पडलेली.
शांताचा एकच टाहो “मा... ऊठ नवं! मा तुले का झालं वं? असी काऊन करतेस... मा...., पाहा नं जी माही माय......”
आणि क्षणभरातच विजेचा कडक आवाज होत डोळयासमोर वीज लखलखली होती. या विजेच्या उजेडात जणू सगळं पाढरं फक्कड पुर्नवसन लाडज गावाचं कॅमेरागत फोटो क्लिक झालं होतं. उद्याच्या वृत्तपत्रात, बातम्यात याच फोटोसह खूप मोठी बातमी असेल.
‘उध्वस्त गावाची कथा’