Sanjay Yerne

Romance Fantasy

3  

Sanjay Yerne

Romance Fantasy

प्रेमबिम सब झुट

प्रेमबिम सब झुट

6 mins
383


  बिसन्याच्या पानठेल्यात परश्या धापा टाकत धावत-धावत येत कसाबसा बोलत होता. पण त्याचं म्हणणं तोंडाच्या बाहेरही पडणं अशक्य झालं होतं. अगदी घाबरलेला परश्या कुत्र्याने लहाकावे तसेच लहाकत होता. पानठेल्यात उभी असलेली चौकडीवरील लोकं त्याकडं एकसारखी पाहू लागली. तेव्हाच पलीकडच्या गल्लीतून रडारडीचा आवाज गुंजला आणि घराघरातून काही लोकं शिलाच्या घराकडे धाव घेवू लागली. काहीतरी विपरीत घडले असेच साऱ्यांना वाटत होतं.

 बिसन्याने आपल्या तोंडात बुकलेला खर्रा पिचकारी सोडत बाहेर फेकला. एका दमातच त्याला बघून जवळ येताच म्हणलं, "का झालं बे? असं लहाकतेस तं." आणि त्याकडे एकटक पाहताच राहिला. परश्याला छातीत पक्कीच धाप लागली होती. कसाबसा स्वतःला सावरत तो बोलू लागला.

 "ते...ती... शेवंता... मे... मेली.." परश्याला दरदरून घाम फुटला होता. त्याची बोबडीच वळली होती.

  शेवंता मेली एवढंच सगळ्यांना कळलेलं होतं. कशी मेली? का मेली? कधी मेली? असे अनंत प्रश्न आता सर्वांच्या मनात घर करून गेलेले. परश्या धापा टाकतच तिथं बसला. तेव्हाच पानठेल्यावरील आठ-दहा माणसं काही समजून घ्यायच्या आताच शिलाच्या घराकडे धावली.

  पन्नास-साठ घरांचे ते गाव, दोनच लहान-लहान गल्ली आणि दोन पानटपरीची दुकानं, दोन किराणाचे दुकानं, बस एवढंच! सगळे लोकं शेतीवाडीची काम, मजुरीचे काम करणारी. गावात गटग्रामपंचायत, सातवीपर्यंतची शाळा त्यात चार गुरुजी, पुढच्या वर्गाला चार कोसावर शिकायला जावं लागे. 

  'गावात याची खबर त्याला, त्याची खबर याला' नेमकी असायचीस. गावात कोणतीही गोष्ट लपून राहणं म्हणजे अशक्यच होतं. पण शीलाच्या शेवंताची गोष्ट इतक्या सालापासून दबून राहिली हे एक कोडंच होतं. याचं साधंसं गावात नवल वाटायचं.

  परश्या तिथच थंडगार होऊन पडला होता. बाजूच्या लिंबाच्या झाडाचा गारवा मात्र त्याला एवढा जिवंत ठेवण्यात पुरेसा होता. हेच बरं झालं होतं. एखाद्यानं चांगला देशीचा अर्धा खंबा पोटात रिचवून झोपला असावा असचं आता त्याला बघून वाटू लागलेलं. पण त्याच्याकडे आता लक्ष द्यायला कुणीही तिथे नव्हते. त्याचं डोकं हळूहळू बधीर होत होते.

  शेवंता आपली आई शीलासह दोघीच मायलेकी टिनाच्या या खोपाटात राहायचे. बाप मेल्याला एक तप झाला असेल. पोटाच्या आजाराने तो गेलेला. तेव्हा शेवंता पाच-सहा सालाची पहिली-दुसरीत असेल. तिला कुणी भाऊबंदही नव्हते. सगळे चुलत नातेवाईकच. आई शेतात राबत आयुष्याचे दिवस कसेबसे समोर ढकलत होती. वणभूत करीत घर चालवायची. शेवंता आता नुकतीच अठरा वर्षाची झाली होती. बारावीत नापास झाल्यामुळे तिने शाळा सोडलेली. अमदा चांगला वर मिळाला तर लग्न उरकून घेऊ असे आईला वाटायचे. शेवंताचे चार हात केले की झाले संपले जीवन. एवढ्याकरिताच तिचे जगणे होते. पण लग्नाची गोष्ट निघाली की शेवंताच्या डोक्यावर आठ्या पडायच्या. लग्न होऊन सासरी जाणं तिला पसंत नव्हतं असंही नव्हतं.

  शेवंताच्या घरासमोरच्या परश्याशी शाळेत असतापासूनचे तिचे प्रेमसंबंध जुळलेले. पण ही गोष्ट आजतागायत कुणालाही ठाऊक झाली नव्हती. याचेच गावाला कोडे पडले होते.

  तिने त्याला "माझ्याशी लग्न कर." म्हणून अट घातली होती. "नाहीतर तुझ्या घरात येवून बसेन." अशी धमकीही दिली होती. पण परश्या दररोज तिला मायबापाच्या धाकाने टोलवाटोलवी करीत होता. आई-बापाच्या मंजुरीशिवाय त्याचे तिच्याशी सुत जुळविणे अशक्य तेवढेच काही सबळ कामधंदा नसल्यामुळेही तो तिला नाकारायचा. "काही दिवस थांब, मग करू." असेच म्हणत राहिला. पण आता अतीच झालेलं. शेवंताच्या पोटात परश्याचे बीज उगवले होते. तरीपण परश्या टाळते आहे, हे बघून ती फारच चिडली होती. आता लग्न हा एकच पर्याय होता. यामुळेच दोघांत कडाक्याचे भांडण झाले होते.

  तीची आई वणीला गेली की परश्या आवडाव बघून मागच्या गल्लीतून तिच्या घरात दररोज घुसायचा. तिला त्याची आणि त्याला तीची सवय जडली होती. आजही नेमका हेच हेरून तो घरात घुसला. पण शेवंता आता पोटात वाढलेले बियाणे बघून आज ना उद्या आपली बदनामी होईल याच चिंतेत होती. तिचा आज मूडही खराबच होता. ती परश्याची वाटच बघत होती. परश्या घरी येताच तिने त्याला, "लग्न केव्हा करतोस ते एकदाचे सांग नाहीतर...?" धमकीच दिली. परश्याने तिला पुन्हा समजावले. "आपण तालुक्याला जाऊन पाडून घेऊ." असेही समजावले. पण तिला ते मान्य होणारे नव्हतेच.

  "आरं म्या आठवीत होती तव्हापासून मले गोंजारत आहेस. रातनदिवस मह्याशी लगट करून मले नासवलास. म्या कितीतरी दिवस स्वत:ले जपत राहिली आणि आता झाड उगवलं तं नाही म्हणतेस. चाल आता तुह्या मायबापाकडं..."

  "पाह्य शेवंते, माले राग नोको आणूस. माह्या मायबापाचे नाव नगं काढूस. तुलेच तं गरज होती म्हणून तू माझ्याशी लगट केलीस. म्या थोडीच तुले जबरदस्ती केली."

  "आरं, व्हयं पण आता तू तोंड फिरवून का फायदा?"

  "व्हयं, फिरवतो जा... म्या नाय करणार तुह्याशी लग्न. वाटल्यास मर मेलीस तं."

 परश्या आणि शेवंताचे चांगलेच बिनसले होते. शेवंताने त्याच्या 'मर' या शब्दालाच मनावर घेतलं. रागाच्या भरात धानावर मारायची, कोनोड्यात ठेवलेली फवारणी औषध तिला दिसताच तिने गपकन पोटात ओतली. परश्याने तिला अडवले पण काहीही उपयोग झाला नाही. दोघांचेही असे भांडण सुरु असतांनाच विपरीत घडलं होतं. परश्याची आता चांगलीच टरकली, त्याला काहीएक सुचेना. तिला मांडीवर घेत तो ढसाढसा रडू लागला. तीची नाडी मंद होत चाललेली, तोंडातून आता फेस येवू लागलेले. परश्याने एकटक तिच्याकडे पाहिले, बाजूलाच असलेली ती शिशी, त्यानेही हातात घेतली, काहीएक विचार करायच्या आतच त्यानेही तोंडाला लावली. थोडावेळ तो तसाच बसून रडत राहिला. त्यालाही चक्कर येवू लागली. त्याने तिला बाजूला करत उभे होत दारातून बाहेर पडला होता. पुढे पानठेला आणि तो ओरडतोय,

  "ते...ती... शेवंता... मे... मेली.."

 परश्या घामाघूम झाला होता. बाजूच्या झाडात गपकन पडला. पण तिथले सारे शेवंताच्या घराकडे पळालेली.

  शेवंता घरात पडलेली. गावातील होती नव्हती सारी तिला बघायला आलेली. तिच्या आईला निरोप द्यायला शेताकडे कुणीतरी धूम ठोकत पळालेला, रायबा पाटलाला समजताच त्याने तिला हात लावून पाहिलं. तिच्या नाडीचे ठोके मंद सुरु होते.

  "आरं बघता काय? चालू आहे नाडी, जीव आहे, जा रं ट्रॅक्टर आण, दवाखान्यात घ्या, उचला, उचला....." रायबाने म्हणताच तिला चार लोकांनी उचलली आणि तीची आई यायच्या आताच ट्रॅक्टर तालुक्याला निघालेलं.

  गावात, कसे झाले? का झाले? आता याचीच चर्चा सुरु झाली होती. मात्र यांचे प्रेमसंबंध याबाबत कुणालाही ठाऊक नव्हतेच. सगळे आता आपआपले तर्क लावत होती.

  इकडे परश्याला बिसन्यानं परत येताच बघितले. परश्या आता डोळे बंद करून तसाच थंडगार होत निजलेला. "अबे तं का झालं तुले? काऊन असा झोपलास, चल ऊठ..." बिसन्याने त्याला हात लावून उठविण्याचा प्रयत्न केला. आता चार लोकंही परत येत त्याकडे बघू लागलेले. जिकडेतिकडे शेवंताचीच चर्चा, "काऊन पेलं असन बे एंड्रीन...?" एवढ्यात बिसन्या ओरडला.

  "अबे, हा बी मेला... यानंही पेलं असन एंड्रीन, पाय न कसा फेस टाकते तं...." बिसन्याने त्याला बघतच म्हटलं. सगळे आता त्याकडे बघू लागली. रायबा पाटीलही ट्रॅक्टर घेवून शेवंताले घेवून गेलेला. शेताकडून शेवंताची आई रडत-रडत येत असलेली.

  चार लोकांनी त्याला उचलले, "घ्या रं याला दवाखान्यात...." म्हणत त्याला उचलले होते. कुणीतरी आपली मोटारसायकल आणली. त्याला मधात मांडून बिसन्याही तालुक्याकडे निघाला होता. अखेर ते जीवाभावाचे मित्र होते ना!

 दोन दिवस उलटले, कसेबसे दोघेही बचावलेली, पोटातील विषासह परश्याने शेवंताच्या पोटात सोडलेले प्रेमविष नाईलाजाने डॉक्टरच्या लक्षात येताच पडले होते. ती मोकळी झाली होती. दोघांच्याही तब्येतीत बराच आराम पडला होता. मात्र त्याच्या मायबापाला, तिच्या आईलाही आता सारी हकीकत समजली होती. गावात आता या लैलामजनूचीच गोष्ट जिथंतिथं सुरु असलेली.

  त्यांच्या शाळेतील गिरेपुंजे गुरुजीला माहिती मिळताच दवाखान्यात शेवंताला, परश्याला भेटायला आलेले. गुरुजींनी त्यांना सातवीपर्यंत शिकवलं होतं.

  दवाखान्यात आजूबाजूच्या बेडवरच दोघांनाही ठेवलेले, दोघांचीही प्रकृती स्थिर झालेली, एकदोन दिवसात सुट्टी मिळणार होती. परश्याचा बाप, शेवंताची आई, दोघेही मुलांचे प्रताप बघून हतबल होत एकमेकांकडे रागात बघत असलेली. गुरुजीला बघून शेवंता आश्चर्यचकित होत त्यांच्याकडे बघत लाजली. गुरुजीने तिच्याकडे बघितले.

  "कशी आहे तब्येत?"

  "आता बरी आहे."

  "बरं झाले थोडक्यात निभावले!"

  "हूं..." ती स्मित हसत म्हणाली.

  "पण शेवंता ऐवढं टोकाचे पाऊल घेणे म्हणजे....."

  "नाहीतं का गुरुजी, तुमच्या शाळेत होती तवापासून परश्या मह्यावर..... मंग का करीन तं मी, आनं आता वेळ आली त लग्नाले नाय म्हणत होता." 

  "मग आता परश्या तयार आहेस का लग्नाले?"

  "हं...." परश्याही गुरुजीच्या बोलण्यावर स्मित हसला.

  "कायचा तयार हाय, आधी कमवाची अक्कल आण म्हणा गुरुजी त्याले, मंग कर म्हणा लग्न, ह्या अश्या पोरीले म्या नाय घरात येऊ देणार...."

  परश्याचा शांत असलेला बाप एका दमातच भडकला होता, शेवंताची मायही जोरजोरात गुदमरलेला श्वास सोडत पोरीकडे पाहून भांडायला लागली, परश्या, शेवंता त्यांच्याकडे निमुटपणे बघत बेडवर निजूनच राहिली आणि गुरुजीने दवाखान्यातून काढता पाय घेतला....


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance