Sanjay Yerne

Fantasy Inspirational

3  

Sanjay Yerne

Fantasy Inspirational

रियली, आय स्विअर

रियली, आय स्विअर

10 mins
186


   व्हाट्सअप उघडताच कित्येक दिवसांनी तिचा मेसेज आलेला बघून अगदी डोकं चक्रावलं होतं. “लव यु सो मच..” एवढेच तिचे ते शब्द.

   तिचा मेसेज मी वारंवार वाचू लागलो. खरंच ती वेडी तर नाही ना! प्रश्न वारंवार मनावर दडपण आणत राहिला. दिवसभरात कित्येकवेळा तो मेसेज उघडून बघितला. आपण काय प्रत्युत्तर द्यावं? हेच न उमगेना.

   होय! प्रत्यक्षात कॉल करून बोलावं पण बराच वेळ विचार करण्यातच वेळ गेलेला. बोलावं तर काय आणि कसं बोलावं? एक प्रश्नच उभा. बराच वेळ कॉल केल्यावर पलीकडून मोबाईल बंद असल्याची जाणीव. पुन्हा विचारात गुंतलेलं मन, व्हाट्सअप उघडून तिला रिप्लाय दिला.

   “खरंच...!”

   आज कुठल्याही कामात मन रमत नव्हतं. एखाद्या चातकाने पाण्याची आस धरावी असंच एका प्रेमाच्या आसुलेपणाच्या त्या जाणीवा तर नव्हत्या ना! तिच्या मनातील भावभावना, कालवाकालव, गुंतागुंत कशी असेल ह्या दिवास्वप्नात मन रमलं होतं. रात्रौला मिणमिणत्या दिव्यातील उजेडात डोळ्याला झोप येईना. कित्येक वेळा कूस बदललेली. विचाराचं चक्र बराच अवधी सुरू राहिलं. उशिरा मध्यरात्रीपर्यंत ‘काही रिप्लाय तर नाही ना!’ पुन:पुन्हा बघत सारखा तिचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहू लागलेला.

   खरंतर तिच्याशी जवळीकता दीड वर्षापूर्वी आलेली. काही दिवसातच तिचं वागणं, बोलणं, स्वभाव खरंतर कुणालाही संमोहित करायला लावणारं होतं. ती मोजकंच बोलायची. तिचं बावीसीतील वय, सावळा गौरवर्ण, मध्यम बांधा आणि लाजराबुजरा चेहरा कुण्याही तरुणाला नक्कीच वेड लावणारा असाच. पण आपल्या दुपटीपेक्षाही जास्त वय असलेल्या व्यक्तीवर तिचं प्रेम, हे न समजणारे कोडेच होते. खरंतर याचमुळे विचाराचे अफाट चक्र सुरु होऊन मन त्यात गुंतले होते.

   रात्री खूप उशिरा आलेली झोप, नेहमीप्रमाणे उशिराचं उठणं. जाग येताच मोबाईल हातात घेत वाट्सअप उघडला. नुकताच तिचा मेसेज, पटकन चॅट बॉक्स उघडत मेसेज बघितला.

   “रियली, आय स्विअर...”

मेसेज बघून खरेतर गारद होण्याचाच तो क्षण. मनाची भंबेरी उडालेली. हातपाय तोंड धुण्यापूर्वीच पुन्हा खुर्चीवर बसत एकटक मेसेजकडे बघत विचाराचे अफाट चक्र सुरु झालेले. ती आता ऑनलाईन नव्हती. मोबाईलही बंद.

   “अरेच्या! ही वेडी तर नाही ना!” मनात प्रश्न उभा राहिलेला. पुन:पुन्हा मेसेज वाचन सुरू होतं.

   “हं खरंच! कशी सांगू अजून. रियली, आय स्विअर... मी कधीच इतकं प्रेम पाहिलं नाही. कोण लागत होती तुमची? का केलं इतकं प्रेम? का सांगितलं इतकं काही? सांगा ना! मला का रडू येते? जीव नाही लागावं म्हणून दूर जाण्याचा प्रयत्न केला, तरी का तुमचा सहवास हवाहवासा वाटतो? आधी का बरं नाही आलात माझ्या जीवनात? कदाचित आजपर्यंत अनेक यशाचे शिखर गाठले असते. का इतका उशीर केला? का विचारल्या माझ्या आवडीनिवडी? कशाला घर करून बसलात मनात? आज ह्या आठवणी काढून टाकण्याचा विचारही मनात आला तरी त्रास होतो. का? का? सांगा ना!”

तिच्या ह्या मेसेजने डोके चक्रावून वेड लागावं अशीच स्थिती आलेली. सकाळची कामे आवरून लगेच बाहेर पडलो.

   ऑफिसला पोहोचत खुर्चीवर बसलो. मनात अनेक विचाराचे चक्र सुरु होते. कदाचित ती इथे येईल, नकळत मनाला वाटून गेले. पण ती येणार नव्हतीच याचीही पूर्ण कल्पना होती. पण हे आसक्त मन तिच्या आगमनाची वाट बघणारे.

   अरेच्या! आपण तर तिच्याकडे कधी या प्रेमभावनेतून बघितले सुद्धा नाही. ती आपल्याला तिच्या गुणांनी आवडते. तिचे मितभाषीपण, कार्यालयातील अगदी स्नेहपूर्वक वागणं, सर्वांना समजून घेणे, सहकार्य करणे यामुळेच फावल्या वेळात अनेक गप्पा, चर्चा व्हायच्या. यात ती पण सहभागी असायची. बस ऐवढंच.

   आपलं हे प्रेम करायचं वय आहे काय? तिच्या नि आपल्या वयातलं अंतर... प्रश्नच. आज आपल्याला मुले, पत्नी असताना प्रेमात गुंतणं म्हणजे... छे! आपण काहीतरीच काय विचार करतोय. पण तिचा मेसेज, आपले मन ही एकाएकी तिच्याविषयी वाटणारी हुरहूर. का बरे?

   वारंवार दाराकडे जाणारी नजर, पुन्हा मोबाईलवरून बोटे फिरली. चॅटबॉक्स बघितला. ती ऑफलाईन. मोबाईल तेवढा बंद. मन सैरभर फिरत विचारात गुंतलेलं. कागदाच्या फायलीतही आता मनासारखीच गुंतागुंत वाटू लागलेली. पण ती येणार नव्हतीच...

  होय! ती कार्यालयात एखादा वर्ष नियमित आलेली. त्यानंतर मात्र ती वडिलांच्या दुर्धर आजारामुळे घरच्या कामाचे व्याप वाढताच कार्यालयात येणं बंद झालेलं. तरीपण केव्हा-केव्हा मात्र महिन्यातून ती एखाद्या वेळेस यायची. कामे उरकून लागायची आणि लवकरच परतायची. पण असं साहेबांनी तिला बोलावल्यास चारआठदा आली असेल. तसं पाहता ती जॉब सराव करायला म्हणूनच इथे आलेली. तिला कार्यालयाचे काम आणि मानधनाचा प्रश्न नसल्याने तिचं येणंजाणं तिच्यावरच अवलंबून होतं.

मात्र आता या गोष्टीला सहा महिन्याहून अधिक काळ उलटला होता. केव्हा केव्हा ती अशी एखाद्या वेळेस यायची, भेटायची, बोलायची. कधी व्हाट्सअपवर मेसेजवरती भेट व्हायची. पण सोबत कार्य करीत असताना जे घडले नव्हते ते ती सोबत नसताना विपरीत असेच मेसेजरूपी घडले होते.

   पुन्हा चॅट बॉक्स बघितला. खरंच आपण तिला समजवावं. खरंतर तिला कोणीही मुलगा मागणी घालेल. तिची परिस्थिती साधारण गरिबीची असली म्हणून काय झालं? तिच्यातले गुण, कौशल्य खरंच तिला पुढे नेणारेच आहेत. कदाचित तरुण वयात मन परिपक्व नसते. यामुळेच की काय? की तिचा तो खोडसाळपणा तर नव्हता ना! आपण तिला बोलूया... समजावून सांगूया! तिला भेटूया. तिच्या मनाला समजून घेत आधार देऊया.

   अरेच्या! पण तिचा फोन बंद येतोय. जावं काय तिच्या घराकडे? कुठे असेल ती? पण कार्यालयातून जाणं म्हणजे सुट्टीचा प्रश्न...

   मन सैरभर विचाराने धावत होतं. तेवढंच मन तिच्या आगमनासाठी आतूर झालं होतं.

   मनाची ओढच ती. कधीही न वाटणारी ओढ एका मेसेजने बदलली होती. वारंवार तिचं रूप, तिचं वागणं बोलणं दृष्टीस येत होतं. तहान लागली की पाण्यासाठी कासावीस होणाऱ्या पाखरासारखीच जणू ही अवस्था, हे मनातील कोडे न उलघडणारे असले तरी मनाच्या संयमी अवस्थेला आपण स्वतःच पारखावं यासाठीच जणू घडलेला तो प्रसंग होता. बराच वेळ मन न लागल्याने फाईलचा पसारा वाढलेला. मनात अनंत विचाराचे कवडसे नि आपलं पूर्ववत जीवन त्याला वारंवार आठवू लागलं होतं. तेवढंच अनंत प्रश्नाचे डोंगर, मन बधीर होऊन ओझे होऊ लागले होते.

   खरंच आपल्याला प्रेम जडलं काय? खरंतर आपलं हे वय आहे काय? ती तर आपल्या मुलीच्या वयाची. तिला आपण मुली सारखंच मानलं होतं. होय! तिला आपण मुलीच्या रुपात बघितलं होतं. तिचे गुण खरेच सर्वाना प्रभावित करायचे म्हणून असेल. तसं पाहता, ती मनमोकळेपणाने मोजके बोलणारी, रमणारी, सर्वांचे ऐकत समजून घेणारी, गोड छकुली होती.

   नाहीतरी आपल्या जीवनात अशी कुठे आपणास माया मिळाली. अख्ख्या आयुष्यात आपण जीवनाच्या चक्रव्यूहात दबल्या गेलो, गुरफटले गेलो. अख्या आयुष्यात आपण काही क्षण जे वेळातीत जीवनात यावे लागतात. होय! आपल्यावर असं हक्क दाखवणारी, प्रेम करणारी माणसं पूर्वी मिळाली असती तर! आज आपलं जीवन काही औरच असतं. नाही का? मनालाच प्रश्न पडलेला.

   पण, आपली वाट चुकते आहे. नको काहीतरी आपला गैरसमज की तिच्या मनाचा गैरसमज झालाय हे शोधायलाच हवं. खरंतर आपल्या एवढ्या कुटुंबाच्या रहाटगाड्यात आपले बाहेरील जगाशी असलेले नाते, आपुलकी विसरलोच होतो.

   मनात विचार करीत पुन्हा मेसेज दिला. “आपण बोलूया... किंवा तू ये भेटायला.”

   तिला मेसेज दिल्याने थोडं मन हलकं झालं. आपल्या मेसेजला काहीतरी ती रिप्लाय देणार ही खात्री होती किंवा ती नक्कीच भेटायला येणार. तरीपण मनात हुरहुर लागलेली. ‘करावे काय कॉल, बोलावं काय तिच्याशी?’ मनात मतमतांतरे.. मोबाईलवरून बोटे फिरून चॅट बॉक्स चेक करणे सुरू होतं. बऱ्याच वेळाने मेसेज आलेला. आतुरतेने उघडून बघितला.

   “बाबांची तब्येत फारच बिघडलीय. त्यांना भरती केले आहे. मी तिकडेच चालली.”

   तिचा रिप्लाय बघून तिच्या दु:ख, वेदनाविषयी कणव निर्माण होऊन पुन्हा आपुलकी निर्माण झालेली. खरंच! असं काय झालं? किती वेदना, दुःख सहन करते ही. अचानक असं काय घडलं असावं? करावा का फोन, बोलावं काय तिच्याशी? तिच्या दुःखद क्षणात होय सात्वनाच ती. विचार करीतच फोन लावला.

   “हं बोला..”

   “काय झालं?”

   “.....” ती रडायला लागली. तिचे मुसमुसणे मनाला गहिवर आणणारे.

   “सुरुवातीसारखीच तब्येत झालीय. ऍडमिट करायला लावले आहे.”

   “बरं, मागे आराम झाला होता ना! आताही होईल चार दिवसात. अशा दुर्धर आजारात असे व्हायचेच. काळजी घे.”

   ती काहीही न बोलता बराच वेळ स्तब्ध राहिली. तिच्या मनातील दुःखद भावनांना समजून घेत तिला समजावून मेसेज बाबत न बोलताच फोन बंद केला. तिच्याशी या क्षणी काय नि कसं बोलावं? तिचा मेसेज आणि आजचा हा क्षण. खूप वेदना सहन करते ती. कदाचित यामुळेच तिचे मन मायेला पारखे होत असावे.

   तिच्यात पुन्हा मन गुंतलं होतं. सारख्या तिच्या आठवणी. वर्षभरापूर्वी तिच्याशी झालेली ओळख, सोबत असतांनाचे तिचे बोलणे, प्रसंग सारेकाही आठवू लागलेले. मात्र या सहा महिन्यात ना तिच्याशी बोलणे की जवळीकता आलेली.

   तसं बघू जाता ती आपल्या कार्यभारात हातभार लावते म्हणून बोलावे, आदर करावा, तिच्या गुणांना प्रोत्साहन द्यावे. बोलता-चालता मन प्रफुल्लीत होण्यास्तव गंमतीजंमती करीत तिला हसवावं. त्यातून अनेक विषयाला वाट द्यावी. एवढंच घडायचं. ती सुद्धा गप्पात रमायची. कधीतर नुसते मूकपणे ऐकत राहायची. मात्र तिच्या मनावर असे कुठलेतरी बंधन, दु:खद भाव तणाव आढळून यायचा. कदाचित कौटुंबिक परिस्थितीने तिचे मन कोंडल्यागत झाले होते. असेच भासायचे.

   “मला तर वाटते तू गुंगी आहेस.” मी सहजच तिला एकदा म्हणालो. ती फक्त स्मीत हसली.

   “नाही जी, मला असे तुमच्यासारखे बोलायचे नाही सुचत. काय बोलावे तेच नाही कळत....”

   “असं तर...!”

   तिचे लाजाळू प्रमाणे लाजरे-बुजरे बोलणे हळूहळू सर्वांशी रमतगमत फुलू लागले होते नि ती सर्वाना मुलीसारखीच प्रिय वाटू लागलेली. पुढे सागराला उधाण यावे असेच तिचे बोलणे, गोडवा, माधुर्य, खरेतर अस्वस्थ अशा मनात ज्ञानाचा लपलेला भांडारच. ती निवडक तेवढंच बोलायची. हिंदी, इंग्रजी, मराठी, तीनही भाषेवरील प्रभुत्व बरंच खुलून आलं होतं. तिची एक वर्षाची सोबत एक आठवणच ठरली. पुढे तिला घरच्या परिस्थिती कार्यामुळे येणे कठीण होऊ लागलेले, एखादे वेळेस यायची ती अशीच मन मोकळे करायला, गुंतवायला.

   ती बरेच दिवसापासून न  आल्याने तिला विसरल्यासारखेच झाले होते. मात्र तिच्या मनात काय होतं कुणास ठाऊक. तिने धाडलेला तो मेसेज नि मी आश्चर्यचकित झालेलो.

   रात्रौला मन पुन:पुन्हा तिच्या मेसेजच्या प्रश्नावर सारखा विचार करीत गुंतले होते. खरेतर या प्रश्नावर काय नि कसे उतरायी व्हावे हे मलाही न उमगणारेच.

   चार दिवस असेच विचारचक्रात उलटले होते. ती बाहेरगावाहून आली नव्हती. तिचा ना कुठला मेसेज की काही नाही. मनात तिच्याविषयी कणव दाटून आलेली.

   “बाबाची तब्येत कशी आहे?” मी मेसेज दिला.

   मात्र या प्रश्नाला काहीही रिप्लाय नाही की ती ऑनलाइनही नव्हतीच. बरेचदा कॉल करून बघितला पण तो ही बंद. पुन्हा मी फार विचारात गुंतलो.

   “खरेच ही वेडी तर नाही ना! आणि मोबाईल बंद म्हणजे...?” मला तिचा जरा रागच येऊ लागलेला.

   कामाच्या ओझ्यात मात्र मी दोन दिवस तिला विसरलोच होतो. तिच्या वडिलाला तिच्या अगदी बालपणापासून झालेला तो आजार, यामुळे तर वडिलाचे प्रेम कधीही न मिळता बालपण हरवून त्यांच्या अशा सेवेत वारंवार दवाखान्यात राहण्याने तिचे मन भांबावले असावे. परिस्थिती अशी बेताची त्यामुळे होणारा खर्च कुटुंबाला परवडणाराही नव्हताच. काही का असेना मात्र ती मनकोंडी होऊन जगत होती असेच कळलेले. तिच्या या संघर्षमय आयुष्यात तिचं मुकं मन रडत होतं. खरेतर तिला आता आधाराची गरज होती. तिला मायेची पाखर हवी होती. असेच ध्यानात आले.

   माझे मन विचलित झालेले. एकटा असलो की तिच्या विचारात गुंतायचो. सहजच तिच्याविषयी ओढ वाढू लागलेली. मलाही काही एक कळत नव्हते.

   “हं खरंच! कशी सांगू अजून. रियली, आय स्विअर... मी कधीच इतकं प्रेम पाहिलं नाही. कोण लागत होती तुमची? का केलं इतकं प्रेम?....” तिचा मेसेज सारखा डोळ्यासमोर यायचा. मी बरेचदा तिला मानसिक आधार दिला होता. तिला कृतज्ञतापूर्वक मुलीसारखे जपले होते. मलाही कळत नाहीये ती माझी कोण लागत होती, पण एक मनातलं नातं तिच्याशी अंकुरलं होतं. कदाचित यालाच ती प्रेम समजली असावी. जीवन जगताना येणारे अनुभव तिच्याशी चर्चात्मक मांडले होते. चांगले वाईट ओळखण्याचा एक विश्वास दिलेला. यामुळे तर ती भावूक होऊन नुसती बघत राहायची. जणू तिला रडू कोसळताहेत हीच स्थिती. तिला जपण्याचा, तिला समृद्ध मार्ग दाखविण्याचा प्रयत्न खरेतर माझ्या मनाला आता चिंतातूर करून गेलेला. मला अनंत विचाराच्या चक्रव्यूहात फसल्यागत वाटू लागलेले.

   मी तिला फोन केला. बरे झाले आज तरी तिचा मोबाईल सुरु होता.

   “कुठे आहेस?”

   “इथेच हॉस्पिटलमध्ये.”

   “आता कशी आहे बाबाची तब्येत.”

   “पुन्हा बिघडलीय.” ती रडू लागली. मला राहवेना. काय बोलावे समजेना. मी तिला पत्ता विचारला. तिने मुसमुसत पत्ता सांगितला.

   “बरे काळजी घे! चिंता करू नकोस. होईल सारं काही ठीक होईल. मी येतोय....”

   तिच्या मनाची अवस्था, दु:ख, वेदना बघून मलाही रडवेले झालेले. मी फोन ऑफ करीत डोळे पुसले होते. मात्र तिचे रडणे आता माझ्या काळजात घर करून बसलेले.

   सकाळीच तयारी करून हॉस्पिटलला निघालो. वार्ड शोधत मी रुमजवळ गेलो. ती पाठमोरी उभी. मी तिला आवाज दिला. ती वळून बघत क्षणातच माझ्या ऊराशी कवटाळून ओक्साबोक्सी रडू लागली. मी अगदी शांत स्तब्ध तिला आधार देत उभा होतो.

   “पापाजी...! बालपणापासून बाबाचं प्रेम, आधार, माया नाही मिळाली मला. मला देणार ना बाबाचं प्रेम! तुम्ही होणार का माझे बाबा? वाटल्यास मी तुम्हाला पापाजी म्हणेन....!”

“हो पोरी, तू माझी मुलगीच आहेस....”

   ती मनसोक्त रडत होती. तिच्या नयनगंगेला पूर आलेला नि मीही तिच्या बाबाची आजारावस्था बघत, तिला उराशी मायेने जवळ घेतले होते.

*****                                


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy