पाळणाघरातील मुलाचे पत्र
पाळणाघरातील मुलाचे पत्र


प्रिय आई,
काल मी शाळेतून पाळणाघरात घरी न जाता तु सांगितल्याप्रमाणे स्कूल बस काकाने मला माझा मित्र तन्मयकडे सोडले. जसे आम्ही बसमधून खाली उतरलो तसे त्याच्या आईने त्याला व मला प्रेमाने घरी नेले. त्याच्या आईने त्याचा लाड केला व घट्ट हात धरला. तो आईकडे खूप लाडिक हट्ट करत होता शाळेतल्या सर्व गोष्टी आईला सांगत होता. त्याच्या आईने आमच्या दोघांच्याही बॅग्स घेतल्या. घरी आल्यावर त्याच्या आईने त्याला शूज काढण्यास मदत केली, मी माझे काढले मला त्यांनी विचारले पण मी नको म्हटले . नंतर आम्ही दोघांनी हातपाय धुतले. त्याच्या आईने त्याला जवळ घेतले पुसून दिले व कपडे बदलल्यावर आम्हाला आवडेल ते बनवून दिले.त्यांनी आईला गरम पास्ता बनवायला सांगितलं तिनी तो हि बनवून दिला . व आम्ही त्याच्या आईनी बनविलेले पराठाही खाल्ला. तो खातांना आईला हट्ट करायचा तर त्याची आई त्याला भरवत होती. तो खाण्यासाठी नको म्हणत होता तर त्याची त्याला समजवून खायला घालत होती हे सर्व मी खातांना बघत होतो . माझे मी संपवत होतो. आम्ही थोडा वेळ खेळलो . त्याची मध्ये येऊन आमच्यासोबत खेळत होती. काही हवं नको बघत होती. नंतर तिने आम्हाला झोपायला सांगितले आम्ही झोपण्यासाठी गेलो तेव्हा तन्मयने तिला थोपटवून झोपविले. मी मात्र माझं मी झोपलो. मला तन्मयचा खूप हेवा वाटला.
आई मी आता पाच वर्षाचा आहे. मला आठवतही नाही तेव्हापासून तू मला पाळणाघरात ठेवते. तू सांगते कि मी नऊ महिन्याचा असल्यापासून पाळणा घरात आहे. तन्मयची आई जे करते ते सर्व मला पाळणा घरातही मिळते. पण आईच्या मायेत जी आपुलकी मला दिसती ती मला दिसत नाही. मला खूप मुलांमध्येही एकटे असल्यासारखे वाटते. शाळा संपल्यावर परत मुलांच्यात राहायला खरं सांगायचे तर मला आवडत नाही. कारण शाळेनंतर शांती पाहिजे . घरातील उब मला पाळणा घरात नसल्यासारखी वाटते. मला खूप मुलांमध्येही एकटे वाटते. माझ्यासारखी बरीच मुले तिथे आहेत पण तरीही मला ते सर्व आवडत नाही. आई तू सतत कामात व्यस्त असते . तरीही मी तू आल्यावर करायचा तो हट्ट करतो पण मला शाळा सुटल्यावर तुझ्या मायेच्या सावलीत आपल्या घरात राहायला जास्त आवडते.
शाळा सुटल्यावर जेव्हा इतर मुलांच्या आई त्यांना घरी परत घ्यायला येतात तेव्हा मला त्यांचा खूप हेवा वाटतो. मलाही वाटते माझ्या आईनेही घ्यायला असेच यावे. निदान शाळा सुटल्यावर बस मध्ये बसून आपल्या स्वतःच्या घरी यावे. आपल्या स्वतःच्या घरात मला जी आपुलकी, माया वाटते ती मला पाळणा घरात कदापिही वाटत नाही. त्यामुळे कधी कधी मी कुणाशीही पाळणा घरात खेळत नाही एकटाच गप्प बसतो. नाहीतर कधी कधी कुणाचेही ऐकत नाही. मला खूप कंटाळा येतो. दिवाळी, उन्हाळ्याच्या सुट्टीतही मला पाळणा घरातच राहावे लागते. रोज तयार होऊन जाऊन तीच दिनचर्या करावी लागते याचे मला फार दुःख होते. कधी कधी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मला वाटते कि छान १० पर्यंत सकाळी झोपावे. दिवसभर तुझ्या अवती भोवती फिरावे. पण तुला ९ वाजताच ऑफिस मध्ये निघायचे असल्यामुळे मला रोजचीच दिनचर्या पाळावी लागते.पाळणा घरात कदाचित माझी घरच्यापेक्षा खूप चांगली काळजी घेत असतील कारण तू माझ्यासाठी सर्वात महागडे आणि चांगले पाळणा घर शोधले. पण आपल्या घरातील बिनधास्तपणा, आपुलकी ,मोकळेपणा मला वाटत नाही.आता तर आई मी मोठा पाच वर्षाचा झालो पण लहानपाणीही आई मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायचा.मी मित्रांमध्ये पाळणाघरामध्ये नेहमी आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो पण तो मला मिळत नाही . पण तरीही मी त्यात आनंद शोधून आनंद मानून घेणे शिकलो आहे.पण आई तुझेही बरोबर आहे तू म्हणते तुझी नौकरी हि माझ्यासाठीच आहे. मला जगातल्या चांगल्यात चांगल्या गोष्टी मिळाव्यात म्हणून तू नौकरी करते.पण खरं सांगू का आई कधी कधी मला वाटते जगातील कुठलीच चांगली गोष्ट मला नको. मला फक्त तूच हवी. तुझ्यासोबत असतांना मला जो आनंद मिळतो तो मला कुठेच मिळत नाही.आणि सर्वात आवडते ठिकाणही मला माझे घरचं वाटते.
आई तू प्रयत्न कर ना नौकरी सोडून तुला माझ्याजवळ राहता आले तर बघ ना. मी तुला काहीही मागणार नाही. कुठलाही हट्ट करणार नाही. फक्त मला तूच हवी आहे...
पण असू दे आई हि माझी इच्छा आहे पण तुला जर माझ्यापेक्षा तुझी नौकरी जवळची वाटत असेल तर ती तीच कर. कारण माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि तुझ्या सुखासाठी मी पाळणा घरात रहायला तयार आहे.
देव बाप्पा माझ्या आईला सदैव सुखी ठेव.मी राहील पाळणा घरातच.आय लव्ह यू आई...
तुझाच पिल्लू
कौस्तुभ