पालाचं घर ते डॉक्टर-एक प्रवास
पालाचं घर ते डॉक्टर-एक प्रवास


"इथे प्रत्येक जणच मोठी स्वप्ने बघत असतो.पण सगळ्यांचीच पूर्ण होतात अस नाही...स्वप्न पूर्ण करायचीच असतील तर अथक परिश्रमाशिवाय पर्याय नाहीच. स्वप्न फक्त श्रीमंतांचीच पूर्ण होतात अस तर नक्कीच नाही. तुमचा तुमच्या स्वप्नांवर विश्वास आणि रात्र दिवस त्याचा ध्यास आणि अतोनात कष्ट यांची सांगड बसली की नक्कीच स्वप्नपूर्ती होते. तेव्हा मोठी स्वप्नं बघा,जगा आणि लढा त्या स्वप्नांनसाठी." पूर्वा जीचा प्रवास पालाच घर ते एक डॉक्टर असा झाला..आज मिडिया तिचा इंटरव्ह्यू घेत असताना आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती सोबतच प्रामाणिक परिश्रम घेणंही गरजेचं आहे असं सांगत होती.
पूर्वाचा इतक्या गरिबीतून डॉक्टर बनण्याचा प्रवास खरच खूप प्रेरणादायी आहे. तिचा जन्म एका भटक्या समाजातील कुटुंबात झाला.हा समाज चार बांबू आणि त्यावर ताडपदरी टाकून राहतात ज्याला पालाच घर संबोधतात. भिक्षा मागून उदरनिर्वाह करणे हा या समाजाचा व्यवसाय. दोन वेळच्या खाण्याची भ्रांत तर शिक्षण घेण म्हणजे न परवडणारीच गोष्ट होती त्यांच्यासाठी. पूर्वाचे आईवडीलही भिक्षा मागून किंवा बाहेर मिळेल ते काम करून कुटुंब सांभाळत होते. पूर्वाला लहान भाऊ होता. दोघे जवळच्या सरकारी शाळेत जायचे.कधीतरी पूर्वावरही भिक्षा मागून खायची वेळ यायची तेव्हा तिला ते काम आवडायचं नाही. लोकांसमोर गेली की लोकांच्या वखवखलेल्या नजरा तिला टोचायच्या. क्षुद्र समजून सतत तिचा अपमान व्हायचा. (उचभ्रू समाजातील पुरुषांना गरीब किंवा इतर समाजातील मुली,स्त्रिया उपभोगायला आणि नजरेचीही भूक क्षमवायला चालतात पण तिला स्वीकारायला म्हणा किंवा तिला एक स्त्री म्हणून सन्मान द्यायला चालत नाहीत ही दुर्दैवाची गोष्ट आहे) पण तेव्हाच पूर्वाने निर्धार केलेला या परिस्थितीतुन बाहेर येण्यासाठी खूप शिकायचं.. स्वतःची नवीन ओळख निर्माण करायची. पूर्वा शाळेत अतिशय हुशार होती. पहिलीपासून तिने पहिला किंवा दुसरा क्रमांक सोडलाच नाही त्यामुळे सगळ्या शिक्षकांचे तिला खूप प्रोत्साहन मिळायचे. तूझ भविष्य खूप उज्वल आहे फक्त शिकत राहा असा सल्ला द्यायचे तेव्हा पूर्वाचा निर्धार अजून पक्का होत जायचा. अशा बिकट परिस्थितीत पूर्वाने दहावीत नव्वद टक्के मिळवुन आई वडिलांच्या डोळ्यात आंनदाश्रू आणले. इतर मुलींप्रमाणे तिच्याही लग्नाबद्दल चर्चा आता सुरू झाली पण पूर्वाने आई वडीलांसमोर खूप विनवण्या करून,रडून पुढील शिक्षणासाठी संमती मिळवली. मुलगी हुशार आहे...शिकून काहीतरी बनायचं म्हणते म्हणून त्यांनीही मोठ्या मनाने होकार दिला. दहावीपर्यंत शिक्षण फुकट होत पण खरी लढाई आता होती. अकरावीला प्रवेश मिळवून पहिल्या दिवशी कॉलेजमध्ये तिने पाऊल ठेवलं तस वेगळं जग तिला पाहायला मिळालं. मुलींचे नवीन ड्रेस,त्यांच्या फॅशन, सँडलस, मेकअप सगळंच निराळं आणि पूर्वाने मात्र कोणीतरी दान केलेला ड्रेस घालून,साधी वेणी घालून वर्गात प्रवेश केला तसे वेगळ्या नजरेने सगळे तिला पाहू लागले..कुत्सित नजरेने हसू लागले. कुठून कुठून येतात लोक असेही शब्द तिच्या कानांवर बऱ्याचदा पडले पण ती हरली नाही. एकांतात आसवे गाळायची पण स्वतःची हिम्मत हरू द्यायची नाही. रात्रीचा दिवस करून तिने बारावीतही चांगले मार्क्स मिळवले. आता पुढे मेडिकलला ऍडमिशन घ्यायचं होत. प्रश्न पैशांचा होताच सोबत किती दिवस बिनालग्नाची पोर ठेवणार अस म्हणणाऱ्या समाजाचाही होता. पण तिचे आई,वडील आणि भाऊ खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहिले. खूप मेहनत करून,कोणाची मदत घेऊन प्रसंगी आईने स्वतःचे दागिनेसुद्धा विकून तिच्या पुढील शिक्षणाची तजवीज केली. आता मेडीकल कॉलेजचा अनुभव खूपच अनोखा पूर्वासाठी. इथल्या मुलांच राहणीमान अगदीच वेगळं. सगळी श्रीमंत घरातील,गाडी बंगला असणारी,लाखाचा मोबाइल वापरणारी,सगळ्या सुखसोयीत आणि चैनीत राहणारी. इथेही पूर्वा आणि इतरांचा मेळ बसत नव्हता. याने डिप्रेशन मध्ये जाऊन अनेकदा जीव संपवायचे विचार तिच्या मनात यायचे पण तिच्या या स्वप्नाशी तीच कुटुंबही जोडलेल आहे..तेही डोळ्यात आस लावून बसलेत की पूर्वा आता डॉक्टर होईल मग सगळ्यांना आनंदाने सांगत फिरू हे तिला आठवायचं आणि नव्या जिद्दीने ती पुन्हा उभी राहायची. तिचं मन तिला सांगायचं तू इथपर्यंत तुझा जीव संपवायला आली नाहीस..ही लढाई हरून मरण्यासाठी लढत नाहीस आणि मनाचा आवाज ऐकून ती नव्या उमेदीने स्वप्नपूर्तीकडे पावलं टाकायची. आता कठीण परिश्रम घेऊन फक्त जिंकायचं एवढंच तिने डोक्यात ठेवलं आणि रात्रंदिवस अभ्यास करून बुद्धीच्या जोरावर ती इतरांपेक्षा पूर्ण कॉलेजमध्ये श्रेष्ठ ठरली. अतिशय चांगले मार्क्स मिळवून कॉलेजमध्ये पहिली येण्याचा मान तिने पटकावला तेव्हा कुत्सित नजरेने पाहणारे,हसणारेच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत होते. आज तिच्या कष्टाच फळ तिला मिळालेलं...तिच्या कष्टाचं चीज झालेलं. आज ती पालाच घर ते डॉक्टर पर्यंतचा सगळा प्रवास आठवत होती. डोळ्यात अश्रू होते पण आंनदाश्रू. आई वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला याचा अभिमान त्या डोळ्यांत होता. तिच्या पूर्ण कुटुंबाला तर आकाशही ठेंगणे झाले होते. पूर्वा इथेच थांबली नाही तर पुढील शिक्षणासाठी ती प्रयत्न करते आणि तिच्या प्रयत्नात ती नक्कीच यशस्वी होईल. प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द सोबत तिची मेहनत,श्रम या सगळ्यांनी तिचं स्वप्न तिने पूर्ण केलं. आपल्या जिद्दी सोबत श्रमाच महत्वही स्वप्नपूर्तीत अनन्यसाधारण असत हे ती सांगायला विसरत नाही. तिच्या जिद्दीला,परिश्रमाला सलाम. कथा सत्य घटनेवर आधारित😊. पूर्वाची प्रेरणादायी कथा तुम्हाला प्रेरणा देऊन गेली का नक्की सांगा कंमेंट्स मध्ये. लेख आवडल्यास नावासहितच शेअर करावा.