ऑफिस बॉय ते शिक्षक
ऑफिस बॉय ते शिक्षक
मी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील मांजरगाव ह्या खेड्यातील गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलो. अल्प शेती असल्याने आमच्या कुटूंबाला मजूरी शिवाय पर्याय नसायचा.दोन वेळच्या अन्नासाठी आराम करणे आमच्या कुटूंबाला परवडणारे नव्हते.त्यामुळे उन, पाऊस, थंडी कितीही असो आमचे कुटूंब आमच्यासह मजूरीने राबायचे. गावच्या कामाचा अनुभव पाठीशी होता. मजूरी कधी, कधी मिळाली नाही तर घर चालवणे अवघड व्हायचे. त्यामुळे शिक्षणासाठी स्वतः च्या हिमतीवर कष्ट करून शिक्षण घेणे भाग पडले. खेड्यात पैसा ,बँक, बचत होत नव्हती. फक्त भाकरीसाठी उद्याचा विचार व्हायचा. आमच्या गरीबीत आम्हाला भविष्याची आर्थिक तरतूद होत नव्हती. धाब्याच्या घरावर सिमेंटचे पत्रे टाकण्याचे धाडस होत नव्हते. शालेय शिक्षण घेऊन मी मुंबई शहर शिक्षणासाठी गाठले होते. त्यात मी शिरोडकर डी. एड कॉलेज मध्ये गुणवत्तेवर प्रवेश मिळवला होता. गरीबांची कमी काळात कमी पैशात मिळणारी नोकरी म्हणजे शिक्षक. ती नोकरी मी फार त्रासातून मिळवली होती.अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करायचो. मुलाखत द्यायचो ;पण त्या काळात काही शिक्षणाधिकारी व काही संस्थाचालक मोठ्या रक्कमेशिवाय शाळेेतील नोकरी शिपाई, क्लार्क, शिक्षक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक यांची लाखो रुपये दिल्याशिवाय भर्तीच केली जात नव्हती. मुलाखतीत खुलेआम लाखो रुपये मागायचे. प्रत्येक पदाचे दर वेगवेगळे ठरलेले असायचे. त्यामुळे शिक्षकांचा नियुक्ती दर खूप काही लाखात असायचा.त्यामुळे महाराष्ट्रातील बरेच गुणवान विद्यार्थी नोकरी पासून वंचित राहिले. अनेक राजकारणी लोकांनी आपल्या जातीचेलोक, नातेवाईक ,स्वतः चे कुटूंब संस्थेत उच्च पदांवर नेमुन त्यांच्यासाठी रान मोकळे केले. त्यामुळे खेड्यापासून ते शहरापर्यंत राजकारणी संस्थाचालकांनी स्वार्थ साधून घेतला. हुशार, गुणवान, गरीब विद्यार्थी नोकरीपासून वंचित राहिले. त्यामुळे गरीबीचे प्रमाण वाढत गेले. गरीब गरीबच राहिला. श्रीमंत अधिक श्रीमंत होत गेला.त्याचा फटका म्हणजे मला त्या काळात ग्रामीण भागात अशा संस्थामध्ये नोकरी मिळाली नाही. इमानदार संस्थाचालक मात्र गुणवत्तेवर शिक्षकांची नियुक्ती करायचे. अशा संस्था महाराष्ट्रात बोटावर मोजण्या इतक्याच होत्या. त्यापैकी इंडियन एजुकेशन सोसायटी अजूनही गुणवत्तेला स्थान देत आहे. गुणवान शिक्षकांची नियुक्ती ह्या संस्थेत आजही केली जाते. त्याच संस्थेत मी आजही शिक्षक म्हणून कार्यरत आहे. अनेक सुप्त गुणांना तेथे वाव मिळतो. अनेक कृती कौशल्य वापरली जातात.
तरीपण मी डी एड केल्यानंतर मुंबईत काही दिवस सेठ बिल्डर दिंडोशी, गोरेगांव येथे ऑफिस बॉयची नोकरी करत होतो. ती करत असतांना मी नोकरी शोधत होतो. त्या काळात मला त्या नोकरीमुळे आधार झाला होता. याचे कारण म्हणजे मी केलेले लग्न. संसार करणे किती कठीण असते हे लग्न झाल्यावर मला समजले होते. संसाराची जबाबदारी आमच्या निरक्षर आईवडीलानी आमच्या खांद्यावर लवकर सोपवली होती. लग्न करणे सोपे असते ;पण संसार करणे तारेवरची कसरत असते. तेव्हाच्या यातना फक्त दोघांनाच सहन कराव्या लागल्या होत्या. लग्न म्हणजे खेळ नव्हे. कष्ट करण्याची हिमत असेल तरच लग्न करावे अन्यथा न लग्न केलेले बरे. लग्नात आपली बाजू वधूकडील मंडळीना सत्य सांगितली पाहिजे. खोट्या बढ़ाया मारून कोणत्याही मुलीचे आयुष्य उध्वस्त करू नये. आपण जे आहे ते सांगा. संसारात आराम करून चालणार नाही. मिळेल ते काम करून संसार सुखाचा केला पाहिजे. कष्ट केले पाहिजे. स्वाभिमानाने जगले पाहिजे. मागील परिस्थितीचे भान ठेवले पाहिजे. वाईट संगत स्वतःहून टाळली पाहिजे.सुसंगत व अध्यात्म्याची जोड धरावी.तरच खऱ्या अर्थाने आपले जीवन सुखी होईल.