ओंजळ माझी रितीच ग...
ओंजळ माझी रितीच ग...
ए आई, का तू त्यांना आपल्या आयुष्यात एवढे डोकावून देतेस.. वयाने मोठ्या आहेत, म्हणून काय मनाला येईल असं वागायचं का? साध काय वागावं? कसे बोलावे? याचे मॅनर्स नाहीत का त्यांना?
अपर्णा, गप्प बसं.. कॉलेजला गेलीस म्हणजे एवढी मोठी झालीस असे, नाही.. शेजारधर्म म्हणून काही गोष्टी करायच्या असतात.. अजून अख्खं आयुष्य जायचय तुझे, तोंड सांभाळून बोल... शिंग फुटल्यासारखी वागतेस? अवकाश आहे अजून या गोष्टीत लक्ष घालायला... आई म्हणजेच अाशा चिडून म्हणाली.. अनिलराव तिला शांत करत म्हणाले, हो ती अल्लड आहे पण तू का एवढी चिडचिड करते आहेस.. आणि गालात हसले..
तर ही गोष्ट आहे दामले काकू यांची.. अशा प्रकारच्या काकू, आत्या, मामी असे कॊणी ना कोणी आपल्या आजू बाजूला आपल्याला नक्कीच दिसतात... अर्थात मावशी हे नाते अशा कॅटेगरीत का येत नाही हे एक कोडे आहे, मला न सुटलेले, कदाचित ' माय मरो मावशी जगो' म्हणतात म्हणून असेलही.. असो मी कुठे भलतीकडेच निघाले आपली कथा सोडून.. चला बघूया कोण आहेत ह्या काकू.. आणि त्यांचा का त्रास होतोय अपर्णाला..
दामले काकू ह्यांचा स्वभावच असा होता स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायच वाकून.. कायम सगळीकडच्या खबरी काढायच्या अन् मग् इकडच तिकडे आणि तिकडच इकडे.. अपर्णाला कळायला लागल्यास खूप राग यायचा त्यांचा. सतत कुठेही वावरायच म्हटलं की आईचं वाक्य आठवायच, मुलीची जात नीट वाग नाहीतर ह्या दामले काकू सगळीकडे वाईट सांगतील...
आज तर त्यांनी घरात येऊन दादा-वहिनी विषयी आईला काही तरी सांगायचा प्रयत्न केला होता, वहिनी अशी वागते, सूनबाईला धाकात ठेव असे आईला सांगत होत्या... हेच वाक्य माझ्या आजीला सांगायच्या.. आई च्या बाबतीत.. त्यामुळेच राग आला मला.. आणि हि आई त्यांची बाजू घेते नेहमीं, त्यांना घाबरून वागते, काय गरज आहे का? अपर्णाच्या मनात विचारांनी गर्दी केली..
आशाने बरोबर ओळखले, तिने हळूच तिच्या खोलीत येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवला. अपी, मला समजतय बाळा, पण या अशा माणसांकडे जास्त लक्ष दिले तर आपल्यालाच त्रास होतो बघ. आपण नेहमी चांगलेच वागावे...
या काकूंनी तुझ्या पहिल्या वाढदिवसाला खूप गोंधळ घातला होता, आपल्या घरात खूप मोठे भांडण झाले, मी घर सोडून निघाले होते, तेव्हा तुझ्या आजीनं मला सांगितलं तेच मी तूला सांगते, कॊणी कसे वागले तरी आपण नेहमीच चांगले वागावे, कोणी किती काटे पसरले तरी आपण फुलांचा सडा घालावा, मोडायला एक मिनिट लागतें पण सावरायला अख्खं आयुष्य जाते.. आईचं बोलणे पटले आणि मी निर्णय बदलून टाकला.. तेव्हा त्यांनी सासूबाईंविरूद्ध आईला सांगितलं आणि म्हणाल्या मी तुमच्या जागी असते तर लेकीला इथे ठेवलेच नसते.. आई आणि मी एकमेकींकडे बघितले आणि मी मात्र समजायचं ते समजून गेले..
त्यानंतर मात्र मी नेहमीं मला जे पटेल तेच करत आले त्यामुळे तुझ्या आजीला पण खरे काय तें लक्षात आले, आता तीच गोष्ट त्या परत करत आहेत पण मी वैष्णवीला त्यांचा स्वभाव आधीच सांगितला आहे, त्यामुळे आमच्या नात्यात काहीच फरक पडणार नाही.. अपर्णा फक्त ऐकत होती, आई म्हणाली तू अजून लहान आहेस त्यांच्या कडे लक्ष देऊ नको.. तो वरती बसलाय ना तो सारं बघतो आहे आणि आपण जे बीज लावतोय त्याचेच फळ तो आपल्याला देतो बघ...
हळूहळू अपर्णा मोठी झाली, तिच्या लग्नाचे प्रयत्न सुरू होते, दामले काकू होत्या तश्याच होत्या.. पण आईने समजून सांगितल्यापासून अपी पण शहाणी मुलगी म्हणून वागत होती.. त्याचं हसर-खेळत कुटुंब त्याचा पाया होती आशा.. तिने सर्व कुटुंब तिच्या प्रेमाने आणि संस्काराने एक ठेवले होते.
अपर्णा माहेरी बऱ्याच महीन्यांनी आली, दामले काकूंची अवस्था तिला बघवत नव्हती, कायम सगळी कडे पुढे पुढे करणार्या काकू आज कुठे दिसल्याच नाहीत.. तिने आईला विचारले, तेव्हा अाशा म्हणाली, दामले काका गेले आणि मुलांनी हात वर केले, त्यांच्या स्वभावामुळे सर्वानी त्यांच्याकडे पाठ फिरवली.. एवढे दिवस काकांकडे बघून त्यांना सर्व लोकं सहन करत होते, आता आपल्या तालूक्याला 'सावली' वॄद्धाश्रम आहे तिथे ठेवलंय त्यांना, कोण म्हणते की त्यांना वेड लागलंय.. पण मला नाही वाटत तसे.. मी दर महिन्याला जाते, तू येणारेस का?
अपर्णा हो म्हणाली, दुसऱ्या दिवशी आईने त्यांच्यासाठी थोडे खाण्याचे पदार्थ घेतले आणि दोघी मायलेकी त्यांना भेटायला गेल्या... अपर्णाला बघितलं आणि काकूंना खूप भरून आले, रडून रडून खूप मोकळ्या झाल्या...
आशाला म्हणाल्या, तू खूप चांगली आहेस ग.. तुझी हि अपी कॉलेजला असताना खूप चिडली होती माझ्यावर, पण खर तर तिला समजत होते तें मला नाही समजले ग . नेहमीं दुसऱ्यांच्या आयुष्यात, घरात डोकावत राहिले, कोणाच्या आयुष्यात कसलेही रीतेपण आले की मला मेलीला आनंद व्हायचा.. कसा असा स्वभाव झाला तें कधी कळलच नाही बघ, साहेब नेहमीं सांगायचे, स्वभाव बदल, अशाने एकटी पडशील, पण त्यांचे ऐकले नाही कधीच...
ते म्हणायचे, अग कोणाची ओंजळ सुखाने भरता नाही आली तरी दूःख देऊ नये ग.. पण मी माझ्याच धुंदीत होते.. आपण जे पेरतो तेच उगवत असते..
आज माझी ओंजळ रितीच आहे बघ.. तूझं भरलेले गोकूळ असेच राहूं दे बाई.. एवढे दिवस कुत्सितपणे बोलायचे पण आज मनापासून बोलते.. तुझ्या सासूबाईंमुळे म्हणजेच उमामुळे माझी सासू मला खूप बोलायची म्हणून नेहमीच तुमच्या घराविषयी असुया बाळगत आले मी.. पण तू मात्र नेहमीच चांगली वागलीस, अजून सुद्धा वागते आहेस, या माझ्या फाटक्या स्वभावामुळे माझी ओंजळ रीती राहिली ग.. खुप् उशीर झालाय आता.. कोण म्हणत मला वेड लागलंय, कारण आज किती तरी दिवस मी खिन्न होऊन एकटीच बसायचे, पण आज तुझ्याशी बोलून मोकळी झाले बघ..
नेहमीच दुसर्यांच्या आयुष्यात रीतेपण यावे म्हणून प्रयत्न केले मी पण आजपासून मी ते रितेपण घालवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, तू दर महीन्याला येतेस ना.. तर तुझ्या सारख्या काही महिला बघ आहेत का? दर आठवडय़ाला या इथल्या लोकांसाठी काहीतरी कार्यक्रम राबवू आपण.. खूप कला आहेत या बायकांमध्ये त्यांचे कलागुण सादर करतिल त्या, आम्ही लहान मुलांसाठी संस्कारवर्ग सुरू करू, ज्याची फी अगदी वर्षाला १०० अशी ठेवू, जेणेकरून त्या मुलांना काही खाऊ किंवा भेटवस्तु देता येतील त्यासाठीच ह्या पैशांचा वापर करावा असे माझ्या डोक्यात आहे, दर शनिवारी हा उपक्रम करावा जेणेकरून ज्या मुलांना आजोबा- आजी नाहीत त्यांना चांगले संस्कार आणि त्यांचे प्रेम मिळावे हाच हेतू आणि घरात कॊणी नाही, सुट्टी असल्यावर मुलांना कुठे ठेवायचं हा प्रश्न ज्यांना पडतो त्यांची सोय होईल..
ह्या आश्रमात अशा हि काही स्त्रिया आहेत, ज्यांची वय जास्ती नाहीत पण लवकर लग्न झाल्यामुळे त्यांना मोठी मुले आहेत ज्यांना आई- वडील नको होतात म्हणून काही व्यक्ती इथे आहेत त्या व्यक्ती अजूनही एकटे कुठेही जाऊ येऊ शकतात, अशा व्यक्ती कोणाच्या घरी जाऊन त्यांची मदत करू शकतात, जसे की कोणाच्या घरी काही अडचण असते तेव्हा केअरटेकर म्हणून जाऊ शकतात असे काहीतरी करायला हवंय असे वाट्ते मला...
दामले काकूंचे हे रूप बघून अपर्णाला खूप छान वाटले, तिने लगेच त्यांना दूजोरा दिला. ती म्हणाली काकू मी तुम्हाला साथ देईन, हल्ली सोशल मिडीया लोकं सर्रास वापरतात त्याचा आपण उपयोग करू...
लगेच आश्रमाच्या प्रमुखांशी बोलुन हि योजना अमलात आणली, अाशाने तिच्या मैत्रिणींना सोबत घेऊन त्यांना मदत करायचे ठरवले, अपर्णाने सोशल मिडीया वापरून त्यांना शक्य होईल तेवढी सर्व मदत केली...
लवकरच त्यांच्या ह्या उपक्रमाचे सगळीकडे कौतुक व्हायला लागले, बघता बघता त्यांच्या आयुष्यात आलेले रितेपण भरून गेले, आणि परत त्यांची ओंजळ खर्या समाधानाने आणि आनंदाने भरून गेली...
माझ्या सख्ख्या माणसांनी माझ्याकडे पाठ फिरवली पण तुमच्या मुळे माझ्या रित्या आयुष्यात परत एकदा सुख आले... तरीही जे केले त्याची शिक्षा मला देवाने दिली ग.. नेहमीं दुसर्यांच्या आयुष्यात रितेपणा आणणार्या मला, देवाने खूप मोठे रितेपण दिले आहे ग.. माझ्या कुटुंबामुळे माझ्या आयुष्यात आलेले रितेपण.. त्यांना हुंदका आवरला नाही...
आशा म्हणाली..अहो काकू, तुमच्या चुकीची उपरती झाली तुम्हाला आणि आता तर तुम्ही लोकांच्या आयुष्यात सप्तरंग उधळत आहात त्यामुळे असे काही मनात आणू नका.. खुप् चांगले काम करत आहात.. आणि हो आज मी तुम्हाला माझ्या नातीच्या पाचव्या वाढदिवसाचे आमंञण करायला आले नक्की या...
हिच्याशी कशी वागले मी, तरीही हिने वेगळेच नाते जोडले माझ्याशी.. आशाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत काकूंनी डोळे पुसले...
