ओली भाकरी..
ओली भाकरी..
ओल्या पावसात माझी
भाकरी भिजली
लेकरांनी माझ्या
निस्ती लाळचं गिळली...
वाद्या वैऱ्यासारखा पाऊस
भाकर छेदूनिया गेला
लेकरांची आसवं तो
आज मोजूनिया गेला...
नाचला दणाणा
माझ्या फुगल्या भाकरीवर
पिसाटला जीव
कापरं भरलं अंगभर...
थैमान घालीत वारा
चाबूकचं झाला
जिवाभावाचा मैतरं
आज वाद्याचं ठरला...
घाम गाळून गाळून
भाकर सोन्याची रं केली
ओल्या पावसानं माझी
धनदौलतच नेली....
भिजल्या भाकरीकडं आता
डोळं ओलं बघतात
कण कण भाकरीचं
ओल्या पावसात रडतात...
