STORYMIRROR

Ganesh Velankar

Inspirational

3  

Ganesh Velankar

Inspirational

नवी पहाट

नवी पहाट

7 mins
202

काय करावं काही समजत नव्हतं , सांगावं तर कसं सांगावं , कशी सुरवात करावी कि जेणेकरून आमच्यात कोणताही वाद न होता मंदारला ते पटेल .स्वाती पण कशी प्रतिक्रिया करेल ? ती तर अजून कॉलेज मध्ये शिकते आहे .काही गोष्टी बुद्धीला पटल्या तरी मन, मान्य करायला तयार होत नाही .खूप विचार करून एका निर्णया पर्यंत मी येऊन ठेपले . याच मार्गाने सांगितलं तर दोघांनाही नक्कीच पटेल .

आज मंदार दुपारीच ऑफिस मधून लवकर घरी आला . तो जेवायचा होता , मी त्याला जेवायला वाढलं . स्वाती कॉलेज मधे गेली होती , हि संधी साधून मंदारशी बोलायचं ठरवलं .

" काय मग प्राजक्ता काय म्हणतेय , बरेच दिवसात भेटली नाही . " मी

" तिचा Msc चा रिझल्ट लागला कि ठरवूया ,असं म्हणाली " मंदार 

" बरं लग्न झाल्यानंतर कुठे राहायचं ठरवलंत " मी मुद्यालाच हात घातला. 

" कुठे म्हणजे ? इथेच ,असा का प्रश्न विचारलास ? मंदार 

" नाही म्हणजे प्राजक्ता ........"

" प्राजक्ता तुला काही म्हणाली का ? "

" नाही तसं काही म्हणाली नाही पण मला तिच्याशी बोलतांना थोडं जाणवलं "

" हं , साहजिकच आहे वाटणं " मंदार 

" म्हणजे ? " मी आश्चर्याने विचारलं 

" नाही तसं काही नाही , सांगेल तुला "

" काल पासून मला एक प्रश्न सारखा भेडसावतो आहे " मी 

प्रश्नार्थक चेहऱ्याने मंदारने माझ्याकडे बघितले .

" बहुतेक हल्ली बऱ्याच ठिकाणी हि समस्या उद्भूत होते आणि मुलगा धर्मसंकटात सापडतो." मी 

" म्हणजे ? " मंदार 

" आई बाबा कि बायको ? "

" नाही आपल्याकडे तसं होणार नाही ,प्राजक्ताला एकत्र कुटुंबातच राहायला आवडत " मंदार 

" हो अगोदर असं वाटतं , पण नंतर कोणताच पर्याय रहात नाही , वृद्धाश्रमाशिवाय "

" आई तू काय बोलतेस ? "

" हि झाली एक बाजू आणि दुसरी बाजू आपण एकत्र राहिलो तरी मी एकटीच ! समवयीन व्यक्ती बरोबर राहणं आणि मुलगा सुनेबरोबर राहणं यात खूप फरक आहे , तुला आज नाही समजणार " माझा आवाज एकदम खोलवर गेला . 

मंदारच्या लक्षात आलं 

" आई ... बाबांची आठवण येते आहे ?" मंदार 

माझं मलाच कळलं नाही अचानक माझे डोळे पाणावले .

" बाबा तर कायम माझ्या जवळच आहेत पण मी त्यांच्याशी बोलू शकत नाही "डोळे पुसत मी म्हटलं 

" हं " 

" मंदार मी लग्न करते आहे " भावनेच्या भरात मी बोलून टाकलं 

" काय ? " मंदार एकदम ताडकन उडालाच 

" आई तुझी तब्येत बरी आहेना , काय बोलतेस तू ? लग्न आणि या वयात ?

मंदार कडून असं विचारलं जाणार हे मला अपेक्षितच होत .

" उतार वयात एकटीने राहणं मला नाही जमणार " डोळे पुसत मी म्हटलं 

" असं काय करतेस , आम्ही आहोत ना ? "

मी यावर काही बोलले नाही , डोळे पुसत मी बाहेर हॉलमध्ये आले , प्राजक्ताशी या विषयी बोलणं आवश्यक आहे ,त्यामुळे मंदारशी बोलणं इथेच थांबवलं .

मी प्राजक्ताला फोन न करताच तिच्या ऑफिस मध्ये भेटावयास गेले .मला पाहताच 

" आई ,तुम्ही ?आत्ता इथे ?, surprising "

" चालेल ना ? येणार म्हणून ,आधी तुला काही सांगितलं नाही "

" अहो आई तुम्ही न सांगता अचानक आलात ते पाहून मनात किती सुखद आनंद झाला तो शब्दात नाही व्यक्त करता येणार ,'मी येऊ का ? तुला वेळ आहेना ?असले फालतू प्रश्न विचारलेले मला अजिबात आवडत नाहीत , आपण कॅन्टीन मध्ये जाऊया कि कुठे बाहेर ..."

" अगं तू ऑफिस सोडून कशी बाहेर येशील ?"

" त्याची तुम्ही काळजी करू नका , चला बाहेरचं जाऊया "

आम्ही ऑफिस मधून बाहेर पडलो आणि जवळच असलेल्या बागेत जाऊन बसलो 

" आपण अश्या ठिकाणी येऊन बसलो आहोत काही महत्वाचं बोलायचं आहे का ? " प्राजक्ता 

" हं " मी मानेनेच सांगितलं. काही वेळ गेला 

" प्राजक्ता ......."

" हं , बोला "

" ह्यांची खूप आठवण येते आहे " माझे डोळे पाणावले .

" हं , साहजिक आहे "

" तुला माहिती आहे , आमचं एकमेकांवर खूप प्रेम होत , खरंतर हि सांगायची गोष्ट नाही पण तुम्ही मुलांनी ते आमचे दिवस न बघितल्यामुळे सांगावं लागत ."

" ..... "

" निसर्गाने अचानक घात केला आणि त्या अपघातात क्षणात सर्व संपलं ." माझा आवाज खोल गेला होता .

"ह्यांना राहुलला जाऊन पाच सहा वर्ष होतील , अजूनही क्षणोक्षणी माझ्या जवळ आहेत असा सारखा भास होत राहतो ,अस्वस्थ व्हायला होत ."

" त्यांचं अस्तित्व नसणं हे मनाला सतत चटके देतं ."

" आई , तुमची मनस्थिती मी समजू शकते , नका काळजी करू आम्ही आहोत तुमच्या बरोबर " प्राजक्ता 

" तुमचं लग्न व्हायच्या आधी तुला मी सांगते आहे , तुझ्यावर असलेल्या विश्वासा मुळे ."

"तुमचा मोठा आधार आहे पण ... मी सर्व बाजूंनी विचार केला ,अगदी तुमचा सुद्धा , आणि एक निर्णय घेतला , या वयात मानसिक आधाराची खूप गरज असते ,आणि समवयीन व्यक्तीकडूनच ती पुरी होऊ शकते ." मी थोडं थांबले ," विशाल आणि मी लग्न करून एकत्र राहण्याचा विचार करतो आहोत "

" आई ....... "

" खरंतर हा पारंपरिक विचारांना तडा देणाराच निर्णय आहे , राहुल ची जागा ते निश्चितच घेऊ शकणार नाहीत याची मला आणि त्यांना हि जाणीव आहे . हे गेल्यानंतर खऱ्या अर्थाने विशाल ने आधार दिला ज्याची मला नितांत आवशक्यता होती , माझ्या भावना प्राजक्ता तूच समजू शकतेस "

" हो आई , विशाल खरोखरच मानसिक पोकळी भरून काढणार असतील , तर तुमचा निर्णय योग्यच आहे "

" प्राजक्ता ! " मी चमकून तिच्याकडे बघितलं .

" आई , मी जरी new generation मधली असली तरी जीवन मूल्य कोणत्याही काळात बदलत नसतात यावर माझा विश्वास आहे , आणि तो माझ्या आईवडिलांनी दिला . "

प्राजक्ता थोडी थांबली आणि म्हणाली 

" आई मला हेही माहिती आहे कि तुमच्या मनात एक भीती होती आमच्या लग्ना नंतर तुमचं आणि माझं पटलं नाही तर आपल्या तिघांनाही त्याचा खूप त्रास होईल , अश्या परिस्थितीत आईवडिलांची किती वाईट अवस्था होते याची कल्पना आहे मला , किंबहुना माझ्या घरी हेच होत आहे . माझ्या लग्नानंतर त्या विचित्र वागणाऱ्या भावजयी बरोबर राहायचं म्हणजे ...नाईलाजास्तव कदाचित त्यांना वृद्धाश्रमातही जाण्याची वेळ येईल." आई बाबांच्या काळजीने प्राजक्ता गहिवरली . प्राजक्ताच्या केसातून हात फिरवीत मी तिला जवळ घेतलं .

" आई मला तुमच्या कडून एक वचन हवं आहे , मला माहित आहे तुमचं लग्न झालं कि तुम्ही विशाल कडे राहायला जाणार ते , "

" हो , मला जावंच लागणार "

" नाही आपण चौघांनी एकत्र राहायचं ! "

माझ्या मनावरचा ताण खूपच कमी झाला , खरंच मी नशीबवान आहे अशी गुणी मुलगी माझी सून होते आहे, आज हे असते तर ........ मी त्या विचारात हरवून गेले 

" आई सांगाना "

" बघू नंतर , आधी तुमचं लग्न होऊदेत , तुझे आईबाबा लग्नाची तारीख ठरवायला कधी येत आहेत ? "

" पुढच्या महिन्यात रिझल्ट लागल्यावर ."

" आणि हो , हे मी तुझ्याजवळ बोलले आहे ते मंदारला सांगू नकोस , तो तुझ्याशी बोलेल किंवा बोलला तरंच विषय काढ ."

" हो आई " 

एक दोन दिवस गेले 

" आई ,तू लग्न करते आहेस ते मला अजिबात पटलेलं नाही " मंदार 

" हो पण मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तू अजून कुठे दिल आहेस . याच ठोस उत्तर दिलं असतंस तर मी विचार बदलला हि असता !"

" नाही नाही , तरी पण मला नाही पटत . "मंदार 

" आपली मतं दुसऱ्याला पटवून न देताच ,असंच व्हायला पाहिजे असं म्हणणं म्हणजे आपली मतं दुसऱ्यावर लादण्या सारखे आहे नाहीका ,बर तुला चुकीचं वाटत आहे तर प्राजक्ताशी बोल " मी म्हटलं 

" प्राजक्ताशी ? नको नको , "

" हे बघ , तुमच्या लग्ना आधी सर्व गोष्टी माहित असणं आवश्यक आहे "

" हो बघतो बोलून "

" आजच भेट " मी निक्षून सांगितलं 

रात्री घरी आल्यावर 

" भेटला होतास ?" मंदार घरी आल्या आल्या विचारलं .

फार उत्सुक पणे नाही पण अत्यंत शांतपणे मंदार म्हणाला 

" मी तिला म्हटलं , प्राजक्ता तुला एक गोष्ट सांगायची आहे "

" सांग कि "

" आई , आपलं लग्न झालं कि स्वतः लग्न करणार आहे ."

" विशाल सरांबरोबर का " प्राजक्ताने शांतपणे विचारलं ,तशी मंदारने चमकून प्राजक्ता कडे पाहिलं 

" आई लग्न करते आहे हे ऐकून तुला काहीच वाटलं नाही का ?"

" त्यात काय वाटायचं आहे , मी म्हणेन खूप चांगला आणि धाडसी निर्णय घेतला आईंनी "

" लोकं काय म्हणतील याचा विचार केलास , मुलाचं आणि आईच लग्न एकाच मांडवात "जवळ जवळ ओरडतच मंदार म्हणाला 

" चार दिवस बडबडतील आणि गप्प राहतील " तितक्याच शांतपणे प्राजक्ता 

" तुला पटलेलं असलं तरी मला अजिबात पटलेलं नाही " मंदार रागातच म्हणाला .

" चला म्हणजे प्राजक्ता या गोष्टीला तयार आहे तर " मुद्दामच मी म्हटलं 

" तू तिचंच कौतुक कर "मंदार 

" खरं आहे , प्राजक्तासारखी गुणी मुलगी सून होणं , भाग्यच आहे माझं ." मी 

मंदार प्राजक्ताच लग्न झालं आणि मग काही दिवसातच विशाल बरोबर मी हि लग्न केलं .

आमच्या लग्नात विहीणबाईंना प्राजक्ताच्या आईबाबांना आणि भाऊ भावजयीला हि बोलावलं होतं 

 " शारदा ताई तुम्ही खरंच चांगला निर्णय घेतलात , नाहीतर आमच्या सारखी अवस्था व्हायची "

" नाहीहो तुमची मुलगी अत्यंत गुणी आहे ,आता तर ती माझी मुलगीच आहे , आपण चौघेही एकत्र राहूया म्हणून आग्रह करते आहे , 

विशाल तयार होतंच नव्हते पण प्राजक्ताच्या पुढे त्यांचाही नाईलाज झाला " 

" किती हा विरोधाभास , माझी मुलगी , सासू सासऱ्यां बरोबर राहायचं म्हणून हट्ट करते , आणि माझी सून आम्हाला वृद्धाश्रमात टाकायला निघाली आहे " प्राजक्ताची आई गहिवरून म्हणाल्या . 

" विमलताई नका काळजी करू , प्राजक्ता करील सर्व ठीक " मी विमलताईंची समजूत काढत म्हटलं 

प्राजक्ता सहजपणे आणि आनंदाने स्वीकारेल असं वाटलं नव्हतं , पण साथ देणाऱ्या व्यक्ती जवळ असल्या कि दुःख मनाला स्पर्शूनही जाऊ शकत नाही ! 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational