शर्ट
शर्ट
रविवारची सकाळ उजाडली. रविवार सकाळ फार सुखकर असते, उन्हं वर आली तरी लोळत पडलं (बेडवर) तरी कुणाची हरकत नसते. असाच आज नेहमीपेक्षा उशीरा उठून नुकताच पेपर वाचू लागलो. रविवारचा पेपर मग काय विचारता.
'अहो ऐकलं का, मी काय म्हणते ते ?'
'हं बोल' मी पेपरवरची नजर काढत म्हटलं
'आज मी बोहारीणीला बोलावलं आहे. तुमची एखादी शर्टप्यांट असेल तर काढून ठेवा.'
'आज तुला बोहारीणीशी घासाघीस करायला वेळ आहे वाटतं !' मी हसत विचारलं.
'हो, एखादा डबा वगैरे देते का बघते !' आत जात अंजू म्हणाली.
तुम्ही काही म्हणा पण बोहारीणी विषयी मला खूप कुतूहल आहे. चक्क फाटके, विटलेले कपडे घेऊन त्यावर स्टीलचं भांडं देते. या व्यवहारात बोहारीणीला काय मिळत असेल ? या प्रश्नाचं उत्तर मला अजूनही सापडलं नाही.
मी प्रश्न अंजलीला विचारला तर लगेच तिचं उत्तर 'अहो काय मिळतं म्हणून काय विचारता,
हे फाटलेले कपडे शिवून परत चांगले करते आणि बसते रस्त्यावर विकायला, न मिळायला काय झालं !'
हे जरी अंजलीचं उत्तर असलं तरी या उत्तराने माझं काही समाधान झालं.
या प्रश्नाचं उत्तर स्वतः बोहार (डॉक्टर-डॉक्टरीण) झाल्याशिवाय मिळणार नाही असा विचार करून मी पुन्हा पेपर वाचू लागलो.
अंजलीबरोबर, दोन वर्षापूर्वी माझं लग्न झालं अजूनपर्यन्त तिने कधी बोहारीणीला बोलावल्याचं माझ्या स्मरणात नाही. माहेरी ती बोलावीत असे असं तिच्याच तोंडून मी ऐकल्याचं आठवतं. इतक्यात अंजलीने कपाटातून एक शर्ट आणला आणि माझ्या समोर टाकला.
'हा फार जुना झाला आहे तुम्हाला तो चांगलाही दिसत नाही. मी तिला हा शर्ट देऊन टाकते !'
'अग पण हा फाटला कुठे अजून ?' मी
'फाटलाकीच टाकून द्यायचा असं थोडचं आहे. किती कळकट झाला आहे पहा जरा ! लॉन्ड्रीत टाकला तरी स्वच्छ होत नाही. हा शर्ट घालायची काही गरज नाही.'
' पण तुला कोणी सांगितलं की लॉन्ड्रीत कपडे स्वच्छ होतात ?'
'ते काही असेल, पण तुम्ही हा शर्ट घातलेला मला आवडणार नाही. गेलो सहा वर्ष हा शर्ट नुसते पादडता आहात !'
शर्टाचा उपयोग किती केला याचं मुल्यमापन 'पादडणे' हा शब्द करीत असल्यामुळे शर्टाविषयी मी आणखी काही बोलू शकलो नाही.
'या एका शर्टावर तू तिच्याकडे भांडं मागणार आहेस की काय?' मी चेष्टेने विचारलं.
'हो तर या शर्टावर द्यायला बसली आहे' माझ्या चार साड्या काढल्या आहेत ।'
'काय चार साड्या ?' मी आश्चर्याने विचारलं.
' हो आणि तुमचे ते दोन फाटके लेंगे.'
'अंजू कपाटात साड्या मावत नसतील तर तारेवर ठेवल्यास तरी चालतील.' मी गमतीने म्हटलं.
'तुम्ही पण असे आहात, थांबा तुम्हाला साड्या दाखवते.' असं म्हणून अंजली आत गेली. साड्या आणि माझे फाटके लेंगे (ते लेंगे आहेत असं कळत होतं म्हणून लेंगे म्हणायचं इतकंच !) घेऊन आली.
अंज-लीच्या साड्या पाहून बोहारीण हीला काय देईल याचा विचार करू लागलो.
कारण त्या साड्यांची अवस्था मला पहावत नव्हती.
'तुझ्या या साड्यांपेक्षा माझा हा शर्ट फारच चांगला आहे. खरच मला तो द्यावासा वाटत नाही.'
मी शर्ट पुन्हा हातात घेतला. त्या शर्टाचे आणि माझे संबंध फार जवळचे होते.
शर्ट निर्जीव असला तरी मला बोहारीणीकडे देऊ नका' अशी विनंती करतो आहे असं वाटत होतं.
'ते काही नाही' असं म्हणून तिने तो शर्ट पातळात गुंडाळला आणि ते बोजकं एका कोपऱ्यात ठेवून स्वैपाकघरात निघून गेली.
एका साध्या शर्टातसुद्धा माझा जीव इतका गुंतून रहावा याचं माझंच मला आश्चर्य वाटत होतं वाटत होतं सरळ त्या बोजक्यातून शर्ट काढून ठेवावा. पण अंजली म्हणत होती तेही काही खोटं नाही. तो शर्ट खूपच मळला होता. बायको आणि आई-वडील यांच्या कचाट्यात सापडलेल्या मुलाप्रमाणे माझी अवस्था झाली होती. त्या बोजक्यातून त्या शर्टाचा हात बाहेर आला होता. तो शर्ट देऊन टाकायचं माझ्या जीवावर आलं होतं. त्या केविलवाण्या शर्टाकडे पाहून माझ्या मनात विचार आला, हल्लीच्या या काळात वृद्धांच्या मनाची अवस्था, इतके दिवस हँगरला असलेला आणि अचानक कोपऱ्यात एका बोचक्यात पडलेल्या या शर्टासारखी असेल का ? नाहीतरी या जगाची रीतच मुळी अशी आहे, की उपयोग होईपर्यंत उपयोग करून घ्यायचा आणि मग टाकून द्यायचं , मग ती वस्तू निर्जीव असो वा सजीव ! निर्जीव वस्तूंच्या बाबतीत समजू शकतो. पण सजीबांच्या माणसांच्या बाबतीत सुद्धा हीच व्यवहारी दृष्टी !
'अहो कसला विचार करताय एवढा ! बोहारीण आली आहे. गॅसवर जरा दूध ठेवलं आहे ते जरा बघा'
असं म्हणून पातळाचं बोचकं बेडरूममधे ठेऊन दार उघडायला गेली. बोचकं आत ठेवायचं कारण सगळे कपडे तिच्या दृष्टीस पडू नयेत म्हणून असावं. मी निमुटपणे स्वैपाकघरात गेलो. अर्धा तास झाला तरी सौंदा पटत नव्हता. हा सौदा पटला नाहीतर बरं होईल असं वाटत होतं. आपला आवडता शर्ट पुन्हा दिसणार नाही. मंदारच्या पत्नीने मंदारच्या आई-वडिलांना घराबाहेर काढून त्यांच्यावर जसा अन्याय केला तसा अन्याय या शर्टावर होतो आहे असं मला वाटू लागलं. इतकी वर्ष सातत्याने माझी सेवा केली आणि आज मी त्याला घराबाहेर काढतोय ! तो निर्जीव शर्ट मला केविलवाणा दिसतोय. मग असे कितीतरी वृद्ध ज्यांचा काही उपयोग नाही (असं तरुण मंडळी म्हणतात) अशांना घराबाहेर काढलं जात त्यांचे... त्यांचे चेहरे तर मला पहावणारच नाहीत. अनेक वर्षे मुलासाठी हाल सोसून, मुलाने शेवटी आपल्या आई-वडिलांना बोहारीणीकडे म्हणजे वृद्धा-श्रमात ठेवावं.
असंच काहीसं या शर्टाच्या बाबतीत माझ्याकडून घडतं आहे.
दूध उतू गेल्याचं माझ्या लक्षात आलं मी झटकून गॅस मालवला इतक्यात..
'अहो हे बघा त्या कपड्यांवर हा मोठा स्टीलचा डबा दिला तिने !'
'त्या फाटक्या कपड्यांवर एवढा मोठा डबा ? त्यात फक्त शर्टच चांगला होता.'
'त्या शर्टाचं कौतुक कळलं हो ! बघा आज कमाई झाली की नाही मस्तपैकी !'
'झाली खरी ! शेवटी फाटक्या कपड्यांची किंमत बोहारीणीलाच कळणार !'
गणेश वेलणकर
