वेदना
वेदना
मी कोल्हापूर ST स्टॅन्ड मध्ये शिरलो ,अक्कलकोट -देवगड गाडी फलाटला लागलेलीच होती .गाडी पूर्ण भरलेली होती उभे प्रवासी हि बरेच होते पण आत जायला जागा होती , माझ्याबरोबर काही प्रवासी आत शिरले तशी कंडक्टर गरजला " वैभव वाडी ला जाणाऱ्यांनी मागे चला , मला देवगडला जायचं होत त्या मुळे मी मागे येऊन उभा राहिलो . कंडक्टरनी बेल वाजवली आणि लगेचच गाडी सुरु झाली . समोर सीटवर काळीसावळी मुलगी बसली होती चेहऱ्यावरून ती कोल्हापूरचीच असावी असा मी तर्क केला , गळ्यात मंगळसूत्र होतं म्हणजे लग्न झालेलं होत .हातातील मोबाईल चालू करून बोट फिरवीत होती आणि बंद करीत होती काही वेळाने पुन्हा चालू करीत होती मोबाइल वीस एक हजाराचा तरी असावा म्हणजे सधन घरात दिलेली होती . एकदोनदा आम्ही एकमेकांकडे बघितलं , तिने थोडं स्माईल हि केलं , मुलगी स्मार्ट आणि कोणालाही तीच्या बद्द्ल आत्मीयता वाटेल असे सालस चेहऱ्यावर भाव होते .
" तुम्ही बसा मी उठते " , माझ्याकडे पाहत ती म्हणाली.
"नको नको तुम्ही बसा मला मिळेल बसायला जागा " मी म्हटलं . , ती मुलगी लग्न झालेली असली तरी माझ्या मुलीच्याच वयाची होती . पण त्या मुलीने ऐकलं नाही ती जाग्यावरून उठली , माझा नाईलाज झाला , मला बसणं भाग होत . खिडकीशी एक साधारण सत्तरीच्या आसपास असलेले वयस्कर गृहस्थ बसलेले होते , त्यांना थोडं सरकायला सांगून मीही आक्रसून बसलो आणि तिलाही बसायला थोडी जागा करून दिली. ती मुलगी बसली . मला राहून राहून वाटत होत , त्या मुलीने मला बसायला जागा का दिली . काही ऋणानुबंध होता का ? मी वयस्कर उभा म्हणून तिने बसायला जागा दिली यात काही शंकाच नाही , पण तरी , मला जाणून घ्यायचं होत , तिच्याशी काहीतरी बोलावं असं सारखं वाटत होत .
" भाऊबीज जवळ येते आहे "
" अं "
" नाही म्हटलं भाऊबीज जवळ येते आहे आपले नाव कळू शकेल का ?
" नाही मी देऊ शकत . माझ्या नवऱ्याला राग येईल "
" भाऊबीज जवळ येते असं म्हटलं मी याचा अर्थ "
" हो समजलं आहे मला , कोणत्याही दुसऱ्या पुरुषाशी मी बोललेले तर माझ्या नवऱ्याला आवडत नाही , आणि मानलेली नाती तर मुळीच नाही त्याला राग आला तर मला मारेल हि . " शांतपणे ती म्हणाली .
' अरे बापरे ' मी मनात म्हटलं
पुढच्या संवादालाच तिने पूर्णविराम दिला .
तरी मला स्वस्थ बसवत नव्हतं
" तुम्ही कुठे उतरणार , माहेरून सासरी जात आहात का ? " मी साधारण अंदाज केला
" हो बावड्याला "
काही वेळाने
" गगनबावडा , गाडी दहा मिनिटे थांबेल " कंडक्टर ओरडला .
सर्व प्रवासी खाली उतरले ती मुलगीही आपली ब्याग घेऊन खाली उतरली तिच्या पाठोपाठ मीही उतरलो . माझ्याकडे पाहत स्माईल करून ती स्टँडच्या गेट कडे जाण्यासाठी चालू लागली.
तीला न्यायला नवरा येईल कि कुणी , नवरा येणं शक्यच नाही दोन वाक्यातच तिने तिच्या नवऱ्याची ओळख करून दिली होती ,
" माझ्या नवऱ्याला आवडत नाही , आणि मानलेली नाती तर मुळीच नाही त्याला राग आला तर मला मारेल हि ."
मी तर्क करीत होतो इतक्यात एक पंधरा लाखाची गाडी तिच्या समोर येऊन उभी राहिली . मागचा दरवाजा उघडून ती आत बसली , म्हणजे नवरा नाही , गाडी आणण्यासाठी पाठवून दिली होती ती मुलगी दूर निघून गेली तरी ..
" त्याला राग आला तर मला मारेल हि " हे शब्द मला अस्वस्थता आणणारे होते ,
"कसे आयुष्य ती काढत असेल"या कल्पनेनेच एक कळ माझ्या हृदयातून गेली
नवरा पैशाने खूप श्रीमंत होता , पण आयुष्य सुखी होण्यासाठी मन श्रीमंत असावं लागत , पैशाने सुख नाही विकत घेता येत !
तो सालस चेहरा सतत माझ्या डोळ्यासमोर येत होता , काहीतरी सांगत होता , मला समजत होत पण मी काही करू शकत नव्हतो .
.......... गणेश वेलणकर
See less
