sangita tathod

Drama

3  

sangita tathod

Drama

नंदाची होळी

नंदाची होळी

4 mins
829


पिंट्या सकाळी सकाळी डोळे चोळत होता. रात्रीची झोप अजून त्याच्या डोळ्यातून गेली नव्हती. पण आईच्या मोठाल्या आवाजाने त्याला उठावेच लागले. झोपेतून उठलेला पिंट्या अंथरुणात रेंगाळत होता.


तेवढ्यात आईचा आवाज आला,"पिंट्या, डोये चोयन, झाले असतील तं, तोंड धुई. चा, मांडला. गार चा, तुया घशाखाली जात नाई."


नाईलाजाने पिंट्या उठला. बाहेर येऊन पाहतो तर अजून उजाडले नव्हते. तोंड धुतले. चहा घेण्यासाठी चुलीपाशी गेला. पाहतो तर काय! त्याची आई स्वयंपाक-पाणी आटोपून निघण्याच्या तयारीत होती. पिंट्याने चहा घेतला.


"पिंट्या भाजी, भाकर करून ठुईली. खाऊन घेजो." आई.


"आई, आज इतक्या सकाउंन निंगाली का?"


"हो रे राजा, आता काई रोज, सकाउंनच जात जाईन. सखू हाय ना सोबतीला."


नंदा म्हणजे पिंट्याची आई त्याला आवश्यक त्या सूचना देत होती. तोंड आणि हात दोन्ही चालू होते.


"नंदा, आटोपलं की नाई?" बाहेरून सखुचा आवाज आला तशी नंदा घाईने निघाली.


नंदा आणि पिंट्या शहराबाहेरच्या झोपडपट्टीत राहत होते. तिथून जवळपास असणाऱ्या खेड्यातून नंदा रानगवऱ्या, सरपण गोळा करायची. ते विकुन पिंट्याचं आणि तिचं पोट भरायचं. आताशा भलंमोठं ओझं घेऊन चालणं तिला जमायचं नाही. पण पोटासाठी करावं लागे. नंदाचे सरपण आजूबाजूचे लोक चुलीत जाळण्यासाठी विकत घेत. तिच्या रानगावऱ्यांना चांगली किंमत मिळत असे. लोक धार्मिक कार्यासाठी तिच्या गवऱ्या घेत. संपूर्ण शहरात त्या फक्त दोन-चार जनांकडेच मिळत.


पिंट्याने कितीवेळा समजावले, आता हे काम सोडून दे. दुसरे काहीतरी काम कर. तिने एकदा धुण्या-भांड्याचे काम करून पाहिले. पण त्यात तिच मन रमेना. सोडले आणि पुन्हा रानोमाळ मोकळ्या हवेत फिरू लागली. आता तर तिला जास्त काम करून नातवासाठी पैसे जमा करून त्याला पाहायला जायचे होते.


नंदाची मोठी मुलगी अनिता. ती पुण्याला राहत होती. दोनच वर्षापूर्वी तिचे लग्न झाले होते. जावई पुण्याला एका कंपनीत होता. लग्न झाल्यावर अनिता त्याच कंपनीत लागली. दोघे सुखाने संसार करत होती. नंदा अनिताच्या बाबतीत समाधानी होती. अनिताला दिवस राहिले. ही बातमी ऎकून नंदा खूपच हरखून गेली. पहिल्या बाळंतपणाला तिला आपल्या जवळ आणावे असे तिच्या खूप मनात होते. भर उन्हाळ्यात अकोल्याच्या कडक उन्हात आपल्या झोपडीत तिची कशी व्यवस्था होईल? हा विचार करून अनिताचे बाळंतपण पुण्यात झाले. नातवाला कधी पाहते अन कधी नाही असे नंदाला झाले होते. पैशांची जुळवाजुळव करताना तिच्या नाकीनऊ आले होते. एकदा पुण्याला जाण्याची सर्व तयारी झाल्यावर, तीच भयंकर आजारी पडली. सर्व पैसे आजारपणात गेले. असे करता करता नंदाचा नातू आता एक वर्षाचा होत आला होता.


एक दिवस मुलीचा फोन आला. शेजारच्या मावशीच्या मोबाईलवर "आई, माझा मुलगा आता एक वर्षाचा होत आहे. त्याच्या वाढदिवसाला तरी ये." माय-लेकींचे अश्रू मोबाईलच्या स्क्रिनने पाहिले. हो येते असे सांगून, नंदा जायची तयारी करू लागली. त्यासाठी सकाळी लवकर ऊठून जास्तीत जास्त गवऱ्या गोळा करायची. त्यातल्या त्यात शहरात एक मोठा धार्मिक यज्ञ असल्याने त्यासाठी जास्त गवऱ्या लागणार होत्या. ते तिच्या पथ्यावरच पडले. ती झपाटून कामाला लागली.


होळीनंतर दोन दिवसांनी पुण्याला जायचे ठरले. बऱ्यापैकी पैसे गाठीशी जमले होते. पोरीसाठी, जावयासाठी कपडे घेऊन झाले होते. फक्त नातवासाठी ड्रेस घेणे बाकी होते. जमा केलेल्या गवऱ्या आणि सरपण विकून ती नातवाला भारी ड्रेस घेणार होती. होळीचा दिवस होता. आज नंदा घरीच होती. लेकासाठी काहीतरी गोडधोड करावं म्हणून चुलीजवळ बसली होती. बाहेर काहीतरी आवाज झाला. तिने कान टवकारले. कुत्रं असेल म्हणून दुर्लक्ष केले. पुन्हा आवाज आला, तशी ती बाहेर आली. दोन-चार पोरं तिचं गवऱ्याचं पोत चोरून नेत होते. नंदा दिसल्याबरोबर त्यांनी चालण्याचा स्पीड वाढवला. तशी नंदा धावतच त्यांच्या मागे गेली. दोन- तीन डांगा टाकून त्यांना अडवले.


"काय, रे पोरांनो गवऱ्या अन लाकडं चोरून रायले काय?" नंदा त्वेषाने म्हणाली.


"मावशी ,चोरून नाही नेत आम्ही." एक मुलगा हिम्मत करून म्हणाला.


"मंग, काय उजागिरीन नेऊन रायले?" नंदाचा संताप शब्दांतून जाणवत होता.


"तसं नाही मावशी, आज होळी आहे ना? ही लाकडं, गवऱ्या होळीत जाळण्यासाठी नेत आहोत." एक मुलगा.


"हो ना मावशी, होळी पेटवणं, म्हणजे देवाचं काम, नाही का?" दुसरा समजुतीच्या सुरात म्हणाला.


"मंग, तुम्ही करा की लाकडं गोळा अन पेटवा होळी. नाही कोण म्हणते?"


"नाही म्हणजे, आम्ही केली लाकडं गोळा पण ती ओली आहेत. होळी पेटणार नाही. तुझ्या गवऱ्या अन लाकडं बघ कशी मस्त आहेत. झकास होळी पेटेल." पोरांचा कावा नंदाच्या लक्षात आला.


"ठीक आहे. द्या दोन हजार रुपये अन करा सण साजरा," नंदा. पोरं चपापली. निघून जाऊ लागली.


पण एक मुलगा म्हणाला, "नंदा मावशी, होळीच्या लाकडाचे कोणी पैसे मागते का? देणं तसेच तुझ्या पिंट्याचे दोस्तच ना आम्ही."


आता नंदा काय निर्णय घेते याकडे सर्वांनी कान टवकारले. "हो रे, दिड शायण्या, मले शिकुन रायला का तू? हे बरी अक्कल हाय रे तुले? एव्हडी होळी झकास पाहिजे तं, स्वतः आणावं लाकडं गोळा करून. नाहीतर मग् इकत घ्यावं.”


”आमच्या जवळ पैसे असते तर मावशी कशाला तुझी लाकडं चोरली असती?"


”दिवसभर सिगरेटचे भुरके ओढले अन पुड्या खायले पैसे असतात तुमच्यापाशी. होळीसाठी माया लाकडावर डोया?- -हे बेस जमते रे तुमले. एक गवरी की एक काडी भी भेटणार नाही. होळीची हौस हाय तं हा आजूबाजूला कचरा गोळा करा अन करा त्याची झक्कास होळी. चला निंगा आता."


नंदाने तिथंच रिक्षा बोलावली. गवऱ्या, लाकडं विकून पैसे हाताचे करून घेतले. तशीच दुकानात गेली. नातवासाठी झक्कास ड्रेस घेतला. घरी आली. पिंट्यासाठी गोडधोड बनवले. पोटभर जेवून झोपी गेली. नंदा दोन दिवसांनी महाराष्ट्र एक्सप्रेसच्या जनरलच्या डब्ब्यात बसली. कशीतरी जागा मिळाली. त्या गर्दीत तिने नातवासाठी घेतलेला ड्रेस काढला. हा ड्रेस घातल्यावर नातू कसा दिसेल या विचारात नंदा गुंग झाली. होळी फक्त मनातील राग, द्वेष मिटवत नाही तर मनातील तीव्र इच्छाही पूर्ण करते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama