वंदू
वंदू


त्या दिवशी मार्केट मधील काम आटोपुन ऑटोची वाट बघत मी बसस्टँड जवळ उभी होती. रस्त्यावर खूप वर्दळ होती. त्याच वर्दळीतून मागुन "मॅडम, मॅडम 'असा आवाज आला. मागे वळून पाहिले तर एक विस ऐकोणविस वर्षांची बाई वजा मुलगी माझ्याकडे येत होती. साडीचा पदर खांद्यावर घेतलेली, कडेवर एक दिड वर्षाचा मुलगा असलेली, चमकदार डोळ्याची ,हसऱ्या चेहऱ्याची , ती , माझ्या अगदी जवळ आली तरी मला तिची ओळख पटली नव्हती. "कमाल आहे, या मुलीने मला पाठमोरी असतांना ओळखले,! मी मात्र तिला समोर ,पुढ्यात उभी असतांनाही ओळखू शकली नव्हती.' माझ्या चेहऱ्यावरील भाव पाहून तिच म्हणाली " मॅडम , ओळखलं नाही का मला? मी वंदू ,- - -रामगावची. तुम्ही नाही का रामगावला टिचर होत्या. मी पाचवीत होती तेव्हा तुम्ही आल्या होत्या. तुम्ही नाटिका बसवली होती." तिचे हे शब्द ऐकताच वंदूची पक्की ओळख पटली. तिच्याशी थोड जुजबी बोलणे होत नाही तोच मागुन आवाज आला "तु इथं व्हय ?किती शोधतोय मी? चाल पटकन आपल्या गावची एस टी लागली." " हो ,हो - -आलीच " वंदुला माझ्याशी किती बोलु अन किती नाही असे झाले होते.
पण तिकडे नवऱ्याचा हुकूम मोडता येत नव्हता. वंदूच्या गुणी बाळाच्या हाती खाऊसाठी मी पैसे ठेवले. घाईघाईने वंदूने माझा निरोप घेतला. निघताना तिच्या डोळ्यातील तिने लपवलेले पाणी ,माझ्या नजरेने अचुक टिपले. पुन्हा नवऱ्याचा आवाज आला "चल की पटकन, ही एस टी गेली की आणिक तीन घंटे बसा लागीन ". वंदू नवऱ्या मागे निघुन गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी बघत राहिले. ती दिसेनासी झाल्यावर भानावर आले. घराकडे जाणाऱ्या ऑटोमध्ये बसले.वंदूची दोन मिनिटांची भेट मला तब्बल बारा वर्षे मागे घेऊन गेली.
रामनगर हे माझ्या नोकरीच पहिलं गाव. शहरापासून पंधरा - विस किलोमीटर अंतरावर. जॉईन होण्याआधी टेन्शन होतं. पण पहिल्या आठच दिवसात मी मुलांमध्ये रमून गेली .अस वाटत होते मी खुप वर्षांपासून यांना ओळखत होती.मला पाचवा वर्ग मिळाला. वंदू पाचवीत होती. वंदूची आणि माझी तर फारच गट्टी जमली होती. त्याला कारण होते वंदूचा चुनचुणीतपणा. सतत तिला बोलायला आवडायचे. ती शाळा सातवी पर्यंत होती. पहिले ते सातवी पर्यंतच्या सर्व मुलामुलींशी वंदूची मैत्री. वंदू जेव्हडी बोलकी होती तेव्हडीच शांतही. अभ्यास करतांना कमालीची एकाग्र व्हायची, जसे फुलपाखरू फुलातील रस पितांना होते. शिकवलेला अभ्यास ती चटकन ग्रहण करायची. असे वाटायचे वंदू मध्ये माता सरस्वतीचा वास आहे. प्रजासत्ताक दिन, स्वतंत्र दिन ,बालक दिन ,शिक्षक दिन किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाला तिला भाषण द्यायला आवडायचे. साधेच भाषण पण ती असे काही सादर करायची की ,प्रत्येक भाषणाला टाळ्या घ्यायची. वंदूचा लहान भाऊ आमच्या शाळेत होता. एकदा मुलामुलांची भांडण झाले. तिच्या भावाला थोडं लागलं. तिच्या भावाची चुक नसतांना त्याला मार खावा लागला. या कारणाने वंदूने एकदम दुर्गेचा अवतार धारण केला होता. तिचा तो अवतार पाहून मी अवाकच झाली होती. असेच दिवसामागून दिवस जात होते. अभ्यास झाला की, वंदू मला अनेक प्रश्न विचारी. तिच्या अचाट प्रश्नांचे मला कौतुक वाटे. एका लहानश्या खेड्यात असलेल्या मुलीच्या मनात येणाऱ्या प्रश्नांमधून तिची बुद्धिमत्ता दिसत होती. असे वाटायचे की , वंदू मोठी होऊन ऑफिसर बनेल. तिचे वकृत्व पाहून वाटायचे की ही लेक्चरर होईल. ति कोणीतरी मोठी व्यक्ती होईल असे नेहमी वाटायचे. आपण तिच्या वयाचे होतो तेव्हा आपल्याला, काहीच समज नव्हती. काही कारणामुळे रामगावातून दोन वर्षे होताच मला बदली घ्यावी लागली. त्यानंतर वंदूचा आणि माझा कायमचा संपर्क सुटला. इतक्या वर्षानंतर ती अशी अचानक माझ्या समोर उभी राहिली.वंदूच्या विचारात माझा स्टॉप केव्हा आला कळलेच नाही. ऑटोतून उतरले. घरी आले. सर्व कामे आटोपली. वंदूचा विचार मनातुन जात नव्हता. काय ही वंदूची अवस्था?कुठे लुप्त झाली तिच्यामधील सरस्वती ? तिच्यातील दुर्गा कोण्या राक्षसाला घाबरली तर नाही? वंदूच्या अवस्थेला जबाबदार कोण? तिचे अडाणी आईवडील?की आपली सामाजिक परिस्थिती? वंदू गावातील सातवी पर्यंतची शाळा संपल्यावर वंदू पुढे का शिकली नसेल?