गोपा आजी
गोपा आजी


साधारणतः पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पूर्णाकाठी वसलेल्या निंबा गावात गोपा आजी राहत होती. गाव तसे फार मोठे नव्हते. गावातील ऐंशी टक्के लोक शेती करत. गोष्ट जुन्या काळातील असल्यामुळे सहाजिकच, गावातील जुन्या लोकांना गावात खूप मान होता. अशाच मानदार व्यक्तींमध्ये गोपा आजीचा मान मोठा होता. आजीला हा मान फक्त घराण्यामुळे मिळाला नव्हता तर आजीचे कर्तृत्व हे त्यामागचे मोठे कारण होते. गोपा आजीच्या सल्ल्याशिवाय गावात बऱ्याच गोष्टी होत नसत. सोयरीक पक्की करायची की नाही? बारश्याचा मुहूर्त कोणता काढायचा? नवरा बायकोचे भांडण सोडवायलासुद्धा आजीचा सहभाग असायचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गावात गरोदर असलेल्या बाईला बाळंतपणासाठी माहेरी पाठवायचे की इथेच ठेवायचे की डॉक्टरचा सल्ला घ्यायचा, अशा अनेक कामात आजीचा सल्ला असे. बाळंतपणाच्या कामात आजीची डिग्री एम डी गायनिकपेक्षा वरची होती. गरोदर बाईला कोणताही त्रास असला तर ती पहिले आजीकडे धाव घ्यायची. आजी पाहून, कोणता महिना सुरू आहे, त्रास कशामुळे होत आहे, काय औषधे घ्यायचे, काळजी कोणती घ्यावी हे सांगत असे.
त्याकाळी खेड्यातील बहुतेक बाळंतपणं ही घरीच होत. अडल्या नडल्या बाईच्या मदतीला कोणतेही जातीपातीचे बंधन न पाळता, कोणतीही वेळ न पाहता आजी मदतीला तत्पर असे. पोरीची माय किंवा सासू अशा कठीण प्रसंगी धावून आलेल्या गोपा आजीला देवच माने. बाळंतपण झाले की, गोपा आजीचे बालरोगतज्ज्ञाचे काम सुरू होई. तिच्या बटव्यातील एक एक औषधी बाळासाठी उपयोगी असे. आणखी एक जिकीरीचे काम आजी हाती घेत असे, ते म्हणजे बाराव्या दिवशी बाळाचे कान टोचणे. सकाळी सकाळी एखादी बाळंतिणीची आई गोपा आजीजवळ येई, "आत्याबाई, आज संध्याकाई लेकराले पायण्यात घालावं म्हणतो जी..."
"घालना, काही हरकत नाई," गोपा आजी...
"नाई, पर त्याचे कान टोचाचे रायले, येता का तुमी?” आजीचा होकार घेऊन आलेली बाई पानसुपारी तोंडात टाकून पुढच्या तयारीला निघून जाई. मग गोपा आजी कान टोचण्याची सुई, धागा घेऊन बाळाचे कान टोचून येई. आजीने टोचलेल्या बाळाच्या कानाला कधीच कोणतेही इन्फेक्शन झाल्याचे ऐकण्यात नाही.
तर अशी ही गोपा आजी! तिचं आवडत काम म्हणजे नदीवर जाऊन कपडे धुणे. कपडे घुवायला आजी नदीवर आली की, नदीवर अंघोळीला आलेली पोरं पटापट बाहेर पडत. आजीचा धाकच होता तसा. आजीला गढूळ पाण्यात कपडे घुवायला आवडत नसे. म्हणून ती कपडे घुवायला गेली की सर्व पोरांना आधी बाहेर काढत असे. आजीच्या पुढे कोणी काही बोलत नसे. गोपा आजीचे कपडे धुणे होईपर्यंत सारी पोर बाभुलबनात लपून बसत.
गोपा आजीच्या घरी दूध-दुभत्या गाई, म्हशी होत्या. त्यामुळे दुधा-दह्याची चंगळ होती. आठवड्यातून एकदा दह्याचे लोणी काढण्यात येई. रवि लावण्याचे काम आजीकडे असे. भल्यामोठ्या पिंपात दही टाकून त्यात मोठी रवि फिरवण्याचे काम आजी करत असे. ती रवि
फिरवण्याची जादू आजीलाच जमत असे. तयार झालेले ताक आजी गावातील गरजूंना तसेच वाटून देई.
एकदा काय झाले - निंबा गावात दर आठवड्याला गावातील कोणाचेना कोणाचे गुरं चोरीला जाऊ लागले. पंचक्रोशीत शोध घेऊनही गुरं सापडत नसत. तरण्या पोरांनी रात्रीची जागरणं केली, पण चोर सापडला नाही. लोक हताश झाले. गोपा आजीने एका भल्या पहाटे तिच्या शेतावरच्या गड्याला हाताशी घेऊन चोर रंगेहात पकडला. तेव्हापासून तर आजीचा दरारा पंचक्रोशीत वाढला. त्यानंतर निंबा गावात चोरी झाली नाही. अशी सर्वगुणसंपन्न गोपा आजी निंबा गावाची शान होती. तिच्या सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. फक्त एकच खोट होती. ती म्हणजे आबांचा आणि तिचा छत्तीसचा आकडा होता.
आबा वसरीत असले की आजी अंगणात जाई. त्या दोघांना प्रेमाने तर सोडा पण साधे बोलतानाही कोणी पाहिले नव्हते. आबा स्वभावाने गरीब होते. गावचे पोलिस पाटील असल्याने त्यांनाही गावात खूप मान होता. आबा-आजी दोघेही सद्गुणी होते. ते एकमेकांच्या कामात कधीच ढवळाढवळ करत नसत. दर वटपौर्णिमेला सत्यवान-सावित्रीची गोष्ट तन्मयतेने संगणारी गोपा आजी आबाला मात्र नेहमी काया पाण्यात पाहत असे. दिवसामागून दिवस गेले. काळ बदलला. नातसुनांच्या काळात घरी वॉशिंग मशीन आली. आता एखादेच बाळंतपण घरी होऊ लागले. दळणवळणाची साधने वाढली. ज्या गावाचा पावसाळ्यात चार महिने इतर गावाशी संपर्क तुटायलचा त्याच गावातील पोरं दिवसातून चारवेळा शहरात जाऊन यायला लागली. अशा या काळातही आबांचा हनुमान जयंतीचा सप्ताह उत्साहात सुरू होता. शेवटच्या दिवशीची शेवटची पंगत उठली. आबांच्या पोरांना सुचना सुरू होत्या.
"आबा, आपण पुढच्या वर्षी यापेक्षाही झक्कास कार्यक्रम करू." एक उत्साही तरुण म्हणाला.
"देवाच्या मनात असेल तर जरूर करू." असे आबाने म्हटले. ते खाली बसणार तेवढ्यात त्यांना हार्ट अॅटॅक आला. मंदिराच्या आवारातच त्यांची प्राणज्योत मावळली. संध्याकाळ झाल्यामुळे आबांची माती दुसऱ्या दिवशी करायचे ठरले. त्या रात्री गोपा आजी रात्रभर आबांच्या निपचित पडलेल्या देहाजवळ बसून होती. जणू त्या देहाशी आयुष्यभर बोलायच्या राहिलेल्या गोष्टी मूकपणे बोलत होती. दुसऱ्या दिवशी आबांना नेण्याची तयारी झाली. आजी कोणाशी एक शब्दही बोलत नव्हती की डोळ्यातून अश्रूही काढत नव्हती. जमलेल्या साऱ्या लोकांच्या डोळ्यातील पाणी हटता हटत नव्हते आणि आजी मात्र सुन्न होती.
एक दोन कुजक्या बायांनी म्हटलेसुद्धा, "साऱ्या आयुष्यात बुढ्याले काया पाण्यात पायलं, आता कुठी येतील आसू?" आबांना आता उचलणार तेवढ्यात गोपा आजीचा जीव घाबरला.
कोणीतरी ओरडले, "पाणी आण, पाणी." आणलेले पाणी पिण्यास आजी जिवंत कुठे होती? आबांसोबत आजीही वैकुंठधामास निघाली. या सावित्रीने यमापासून सत्यवान सोडून आणला नाही तर तिनेसुद्धा शेवटच्या रस्त्यावर त्याचाच हात हातात घेतला होता.