Sarita Sawant Bhosale

Inspirational

2  

Sarita Sawant Bhosale

Inspirational

नकोशी-समस्या निराकरण

नकोशी-समस्या निराकरण

4 mins
936


 

  कालच माझ्या ओळखीच्या काकूंच्या सुनेला मुलगी झाली. मी आनंदाने शुभेच्छा द्यायला गेले, मुलगी म्हणजे लक्ष्मी घरी आली अस म्हणाले. त्या फक्त हसल्या आणि माझ्या हातावर बर्फी ठेवत म्हणाल्या "अग लक्ष्मी आली चांगलंच झालं, माझा विरोध नाही याला पण पहिला मुलगा झाला असता तर काही टेन्शन नव्हतं पुढे. नंतर मुलगी झाली असती तरी चाललंच असत आम्हाला. मला क्षणभर काय बोलावे सुचेना. त्यांना माझ्या मनाची घालमेल कळली असावी. त्या पुढे म्हणाल्या,"अगं मुलीचा जन्म म्हणजे जीवाला घोरच असतो बघ. तिला लाडाकोडात वाढवा, शिकवा आणि लग्न करून दुसऱ्याच्या घरी पाठवा. किती झालं तरी परक्याचंच धन बघ ते. आपण तळहाताच्या फोडासारखं जपायचं आणि एक दिवस दुसऱ्याचीच कोणाची तरी होणार ती. त्यात मुलीच लग्न म्हणजे साधं आहे का? मुलाकडचे जे मागतील ते द्याव लागत निमूटपणे. इतकं करूनही त्यांच्या मनाप्रमाणे संसार बरा झाला तर बरं नाहीतर आहेतच आई वडिलांचा उद्धार करायला सासरचे. इतकं सगळं मुलीच्या आई बापाला टेन्शन कमी का काय म्हणून आता मुलींच्या सुरक्षिततेचा किती मोठा प्रश्न निर्माण झालाय बघतेसच. तिला एकटं सोडायच तरी मनात धाकधूक. रोज त्या टीव्ही वरच्या बातम्यांमध्ये सांगतात ना आज इकडे बलात्कार झाला,आज रेल्वे मध्ये छेड काढली,आज काय अँसिडच फेकलं तोंडावर. सासरच्यांनी हुंडा नाही दिला म्हणून त्रास दिला वगैरे वगैरे. सगळं ऐकून जीव गुदमरतो ग. वाटतं तेवढा सोप्पा आहे का सांग बाईचा जन्म. म्हणून पण भीती वाटते मुलगी झाली तर एवढे प्रश्न असतात समोर. तिच्या जन्मापासून लग्नापर्यंत आणि नंतरचे पण आणि शेवटी वंशाला दिवा लागतोच की गं. मुलगा तर हवाच ना एकतरी घरात".

    मी काहीही न बोलता निघाले कारण बोलायला काहीच नव्हतं. विचारच करत होते की त्या बोलल्या त्यात चुकीचं काय. एक वंशाचा दिवा हवाच हे सोडून बाकी सगळं खरं होत त्यांचं बोलणं. मुलीचं आयुष्य वाटतं तितकं नक्कीच सोप्प नसत. चार भिंतीआडही तिची घुसमट होते आणि चौकटीबाहेरही तिचा जीव गुदमरतो. काकू म्हणाल्या तस समस्या आहेत पण समस्याच निराकरण होणं गरजेचं आहे. अस फक्त समस्या आहे म्हणून मुलीला नाकारू शकत नाहीना आपण आणि जन्माला आली म्हणून तोंड पाडून बसण्यात अर्थ नाही. तोच सोहळा हा व्हायलाच हवा. मुलगी जन्माला येते तेव्हापासूनच तिला जगण्याचे धडे आणि अस बाळकडू द्यावं ज्याने ती सुरक्षित आणि समृद्ध आयुष्य जगेल. तिला डान्स क्लास, हॉबी क्लास लावलाच पण सोबतच कराटे क्लास नक्की लावावा की जेणेकरून पुढे जाऊन तीच संरक्षण ती स्वतः करू शकेल. वेळ पडलीच तर इतरांचंही संरक्षण ती करू शकेल. तिला चांगलं शिक्षण द्यावं आकाशात उंच भरारी घेण्यासाठी, चांगलं गडगंज श्रीमंत,सुशिक्षित सासर मिळावं यासाठी नाही. आजही कित्येक भागांत मुलीला चांगलं सासर मिळावं यासाठीच शिकवलं जात पण हे चुकीचे आहे. तीच तिला खंबीर आणि पायावर उभे करण्यासाठी शिकवलं तर आपोआप चांगलं सासर मिळेलच आणि चांगला मुलगाही मिळेल जो तिच्यासोबत प्रत्येक निर्णयात सोबती असेल. ती "परक्याचंच धन" अस तिच्या मनावर बिंबवण्यापेक्षा ती स्वतंत्र माणूस आहे आणि सासरी गेल्यानंतर फक्त शोभेची बाहुली बनून न राहता, कोणाच्या आधिपत्याखाली न राहता तिचं तिला अस्तित्व आहे,स्वाभिमान आहे आणि ते नेहमी तिने जागृत ठेवावं,जपावं हे बिंबवाव. सर्वांचा आदर करायला आपण शिकवतोच पण स्वाभिमानाला ठेस लागत असेल तर नाही म्हणण्याची हिम्मत पण तिला द्यायला हवी. तिला स्वतः साठी लढायला शिकवलं की सासरचा जाचं,त्रास वगैरे सगळं संपेलच. कारण अन्याय करणाऱ्यापेक्षाही अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. हुंडा किंवा इतर मागण्या जश्या मागितल्या जातात तश्या आपण पूर्णही करतो. मुलीआधीही जागरूक पालक म्हणून आपण या गोष्टीला पुर्णपणे नकार दिला पाहिजे. तोच पैसा तिच्या शिक्षणासाठी खर्च करून तिला स्वावलंबी बनवावं. जेणेकरून तिच्या कर्तृत्वाचा हेवा वाटून तिच्याशी कसलीही मागणी न मागता मुलगा लग्नास तयार होईल आणि योग्य मुलगा निवडण्याच स्वातंत्र्य तिलाही नक्की द्यावं. तिच्याही मनात "ती"च्या स्वतःबद्दल सन्मान निर्माण होईल आणि मुलगाच पाहिजे म्हणून पुढे होणाऱ्या असंख्य "भ्रूणहत्या" थांबतील. 

  आजही खूप ठिकाणी बाहेर गेल की मुलगी सुरक्षित राहू शकत नाही म्हणून तीच शिक्षण थांबवलं जात. घरातलीच कामं शिकवली जातात. जे वय तीच खेळण्याचा,बागडण्याचं, समजायचं, उमजायच असत त्या वयात तीच लग्न करून काही दिवसांनी तीच तिच्या मुलांना खेळवताना दिसते. फार वाईट वाटत ही परिस्थिती बघून की तिला एक तर उपभोगाच साधनच समजलं जात आणि चूल मुलं या चक्रात अडकवल जातं. तिच्याकडे माणूस म्हणून बघणं आणि तस जगवणं गरजेचच आहे. तिच शिक्षण थांबवण्यापेक्षा,तिला घरात डांबून ठेवण्यापेक्षा घरच्या वंशाच्या दिव्याला शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवून नुसतं रुपडं बनवण्यापेक्षा सर्व स्त्रियांना ते आई बहिणीच्याच नजरेने बघायचे आणि सन्मान द्यायचे हा गुण आचरणात आणायला शिकवावे. एवढ्यानेच खूप बलात्कार,छेडछाड, अँसिड फेकणे अश्या प्रकारांना आळा बसेल. मुलींच्या बाबतीत आजकाल बरीच परिस्थिती सुधारते अस वाटतं असतानाच काकूंसारख्या मुलगी म्हणजे "नकोशी" असा विचार करणारेही आहेत हे लक्षात आले. एक सुजाण पालक म्हणून आपणच आपल्या मुलींना त्यांच्या अस्तित्वाची, स्वातंत्र्याची जाणीव करून दिली, तिला सक्षम आणि खंबीर बनवलं तर त्यांचेही विचार स्वतंत्र बनून पुढच्या पिढीत येणारे "नकोशी" प्रकरण बंद होतील. वंशाचा दिवा हवा म्हणून पणती नाकारू नका. तीच घर उजळवते आणि तेही दोन घरं. माहेर आणि सासर दोन्हीकडे ती असल्याशिवाय घराला घरपण नाही. लक्ष्मीची पूजा जशी मंदिरात तशी घरात पण व्हायलाच हवी.

    परक्याचंच धन, हुंडा प्रकरण, अत्याचार, बलात्कार, उपभोगाच साधन, चूल आणि मूल या संकल्पना जेव्हा नष्ट होतील तेव्हाच "नकोशी" "हवीशी" वाटेल.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational