Vasudev Patil

Drama Horror Crime

3  

Vasudev Patil

Drama Horror Crime

निवदाचा नवस - भाग २

निवदाचा नवस - भाग २

7 mins
701


दोन-तीन दिवसानंतर रघूनं आॅफिसातल्या फोनवरून गावच्या पोष्टात फोन करत वडिलांना बोलवून इथला नंबर दिला. त्याचवेळी वडिलांनी दोन नंबरच्या बहिणीसाठी नाशिक जिल्ह्यातील मुलगा बोदवडकडं ग्रामसेवक म्हणून लागल्याचं कळवत रघुलाच बोदवडला जात मुलाला पाहून आमंत्रण द्यायला लावलं. त्यानं नाव व पत्ता घेत जाण्याचं सांगितलं. त्याच दिवशी ग्रामपंचायतीत रब्बी पिकाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुक्यावरुन पथक सकाळी आठलाच आलेलं होतं म्हणून रघुनं शिपायामार्फत अजेंडा पाठवत गावात दवंडी फिरवत साऱ्यांना आधीच बोलवलेलं होतं. त्या गावातील त्याची पहिलीच सभा. त्यानं सुरुवातीस परिचय करून देत प्रस्तावना केली. सभेत गावातील रथी, महारथी, अतिरथी सारेच आलेले. हे त्याला सभेतील सहभागावरून व चर्चेवरून कळालं. व या गावात काम करणंही सोपं नाही ही जाणीव झाली. पण त्याचा आपल्या कामावर व थोरात साहेबांवर विश्वास असल्यानं आपण निभावून नेऊ ही खात्री होती.


सभेनंतर भुनाजीराव व त्याची माणसं निघून गेल्यावर सुनाजीरावांनी आस्थेनं रघूची चौकशी करत, "अप्पा, कामाशी काम ठेवत गावात साऱ्यांशी संबंध ठेवा. विकासासाठी कुणाचीच काय पण माझीही भीड ठेवू नका. पण तुम्ही जर वाकड्यात शिरला तर मग मीही तुमची भीड ठेवणार नाही. बाकी चांगल्यासाठी, विकासासाठी हा सुनाजीराव मरेपर्यंत तुम्हास साथ देईल!" सांगत धीर दिला. रघूला सुनाजीराव वरून नारळासारखा कठिण असला तरी माणूस निर्मळ आहे हे कळून चुकलं व हायसंही वाटलं. नी या माणसास आपण आधी कुठं तरी पाहिलंय पण आठवत नाही, असंही वाटलं. सुनाजीरावांचीच सुन सरपंच होत्या पण आज सभेत नव्हत्या. सुनाजीरावांनी रघूस चहापाण्यासाठी घरी बोलवलं पण 

रघूला लगेच बोदवडला निघायचं असल्यानं नम्रपणे नकार देत,

 "दादासाहेब आज मला बोदवडला जायचंय व लगेच परत यायचंय रेल्वेने म्हणून आज नाही पण येईन मी नंतर..." सांगितलं.


"ठीक आहे. आजच रेल्वेने येणार असाल तर मग तालुक्याला नका उतरू. कारण तेथून तुम्हास रात्रीची गाडी मिळणार नाही. त्याऐवजी कामतवाडीला उतरा तेथून तापीकाठानं सरळ आपलं गाव आठ किमी पडतंय नी आजच नाशिकहून मिनल (सरपंच) पण येणार असल्यानं आपली जीप त्यांना घ्यायला येणारच कामतवाडीला. मी ड्रायव्हरला सांगून ठेवतो त्याच गाडीवर या."


"दादासाहेब बरं होईल. मी पण त्याच विवंचनेत होतो की तालुक्याला मुक्कामी पडून सकाळच्या गाडीनं यावं लागेल. पण गाडी येणार तर मग मी कामतवाडीलाच उतरतो. पण यदा कदाचित बोदवडलाच उशीर झाला तर मग तेथेच राहिन मुक्कामाला. तसं ड्रायव्हरला सांगा."

सुनाजीरावांनी अंगणातील काशीला बोलवत समजावलं.

"रात्री कामतवाडीहून मिनलला आणताना हे अप्पा तिथं असलेच तर यांनाही आण!"

नंतर सुनाजीराव निघून गेले. व रघूही लगेच बोदवडला निघाला. त्याला सुनाजीराव, त्यांचे कुटुंब याविषयी जाणून घ्यायचं होतं पण घाई असल्यानं नंतर पाहू असा विचार करत तो निघाला.

  

सुनाजीराव घरी आले. आज घरात मिनल व नातू नसल्यानं त्यांना उदास वाटू लागलं. समोरच्या भिंतीवरील चारही फोटो पाहून तर त्यांच्या काळजात चर्र झालं. घरात मिनल असली की एवढी दाहकता त्यांना जाणवत नव्हती. बरंच होईल आज मिनल माहेराहून परत येतेय.

बंगळीवर बसत त्यांना पोरसवदा राघव झोपे आठवला. आपण साहेबांना लावून या पोरास आणलं पण हा पोर टिकेल का? का आपण त्याला नाहक निवदाचा बळी करतोय? आजच्या सभेत त्याच्या बोलण्यावरून तर पोरगं हुशार वाटतंय? पण मग आपला संदेश, किरण नव्हते का?

संदेश..! त्यांना निवडणूक व सारं नाट्य आठवलं...


दिवाळी एक महिना अशी निवडणूक झाली. वलवाडीतून सुनाजीरावांनी नव्या सुनेस - शितलला सरपंच म्हणून उभं केलेलं तर खलवाडीतून चुलत सून भुनाजीची बाई उभी. अस्तित्वाची लढाई. संदेश, किरणनं लाखो रूपये खर्च केलेले. शितल प्रथमच उभी राहतेय म्हणून पडणं म्हणजे इभ्रतीचा प्रश्न. तर भुनाजीच्या दहा वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागणार होता.

 

निवड झाली तेरापैंकी सात सुनाजीरावाच्या पॅनलचे तर सहा भुनाजीचे मेंबर निवडले. काठावरचं बहुमत मिळाल्यानं संदेशनं सातही सदस्यांना उचलत गुप्तपणे दक्षिण भारतात नेलं. सरपंच निवडीचा दिवस जवळ आला. तसं भुनाजीनं सातपैकी दोन बाल्ट्या व त्याची पत्नी तारी यांच्याशी सुगावा लागू न देता तिरुपतीला भेट घेतलीच. संदेशनं तारीला उपसरपंचपदाचं आश्वासन दिलेलं. पण भुनाजीनं तारीस सरपंच पदाचंच आश्वासन देत रोखीचंही आमिष देत बाल्ट्याला फोडावयास लावलं. तिरूपतीहून एक दिवस आधी निघायचं नियोजन संदेशनं आपल्या माणसांना दिलेलं. पण तारीनं त्या आधीच बाल्ट्याला फितवलं. खलवाडीहून कामतवाडीकडं जाताना तीन-चार किमी अंतरावर तापीकाठावर सुनसान जागेत भवानीचं देऊळ होतं. हे जागृत देवस्थान. लोक येथे नवस करत व दिवाळीला नरक चतुर्दशीला व चैत्रात फेडायला येत. दिवाळीच्या वेळी बोकड तर चैत्रात वरणबट्टीचा नवस फेडला जाई. दिवाळीत तर चार-पाच दिवस नवस फेडायला लोक येत. तारीनंही 'बाल्ट्या निवडून आला तर कोंबडाचा निवद देऊन पाच लोकांना खाऊ घालेन' असा नवस मानला होता. तारीनं तगादा लावत भवानीचा नवस फेडण्यासाठी गावाकडं परतण्याचा तगादा लावला. निवड तर दिवाळीच्या दिवशी. काय करायचं? माणसांनी संदेशरावांशी बातचीत केली.


"त्यांना घेऊन या पण सोबतच. एकटं सोडू नका. मी इथं कोंबडं, बोकडची व्यवस्था करतो. पण धनतेरसच्या रात्रीच अकरा वाजेपर्यंत थेट भवानी मातेजवळच आणा. दोघांना निसटू देऊ नका."

  

माणसांनी गाडी तेथेच ठेवत रेल्वेत त्यांना आणलं. दहा वाजता कामतवाडीत ते उतरले. इकडं भुनाजी गाडीची वाट तालुक्याला पाहू लागला. तारी व बाल्ट्यानं संधी साधत कळवलं. मग भुनाजीनं तारीला पढवलं.


"अहो ऐका ना! संदेशराव आबा जर कोंबडं, बोकडं सारंच आणतील तर मग आपला निवद लागू पडणार नाही. निदान थोडा तरी आपला हातभार लागलाच पाहीजे." तारीनं कांगावा केला.


त्याही स्थितीत हे कळताच निसटण्यासाठीचं हे नाटक म्हणून संदेशनं गाडी पाठवत त्यांना तालुक्याला पाठवलं. अकराच्या सुमारास मिळेल त्या दुकानावरून तारीनं देवीची ओटी व भाजीला लागणारा मसाला खरेदी करत गाडी शिंदणीमार्गे आली. शिंदणीहून सुनाजीच्या पक्षाचाच एक माणुस त्या गाडीत बसला. त्यानं अंधारात तारीकडं काहीतरी दिलं. तारीनं हसतच ते मसाल्याच्या धन्याच्या पुडीत गपचीप टाकलं. गाडी तो माणुस उतरताच खलवाडीला कट मारत भवानी मंदिरात गेली.

 

बाराला दोन्ही बोकडं कापले. कोंबडं फटकारलं. आधीच आलेल्या कारागिरानं बोकडं मोठ्या कढईत शिजवायला टाकला. अख्ख्या गावाला जेऊ घालायचा बेत दिसतोय हे त्यानं ओळखत भरपूर पाणी टाकलं. तारीनं कोबडं स्वत: शिजवलं. तारी वगळता निवडून आलेले गाडीतले सहाही मेंबर तर्र होऊ‌ लागले.


"पंतिगराव! हा संदेस, हा किरण काय आपणास फुकट फिरवतोय महिन्यांपासून? त्याची गररररज आहे. नुसत्या लाखात काय होतंय? तो भुनाजी तीन देतोय.” बाल्ट्या बरडू लागला.

 

माणसांनी भाजीला उकळी फुटणार तोच कारागिरास त्याच्या गावाला मोटारसायकल पाठवत खुष करत रवाना केलं. तारीनं बाल्ट्याला घेऊन देवीस निवद (नैवेद्य) दाखवला. दोन बादलीत बोकड व एका बादलीत कोंबड्याची भाजी काढली व पाच पत्रावळ्या करायला घेतल्या. बोकड संदेशरावानी मुद्दामच कुणाला शंका येऊ नये म्हणून ठेवले होते. पण तरी घोळ झालाच. खलवाडीत माणुस उतरला हे किरणनं पाहिलं. त्याला शंका आली. त्यानं माणसाकरवी त्याला उचललं मजबूत एक दोन तास कबलवल्यावर नंतर मार सुरू करताच तो उगळला.


संदेशराव आले. तारी पत्रावळी करून पाचही मेंबरांना बसायला सांगू लागली.


"तारी बाल्ट्या व तुझं पण पान लाव. तूही बस सोबत!" संदेशरावांनी सांगितलं.


"आबा आमचा नवस म्हणून हे पाच लोक जेवतील. आम्ही कोंबडा कसा खाणार?"


"तारी मुकाट्यानं जे सांगितलं ते कर..." संदेश राव गरजले.


"नाही आबा, आमचा नवस असल्यानं आधी पाच जण जेवतील. मग हवं तर बोकड खाऊ आम्ही."

संदेशरावांची खात्री झाली. त्यांनी सोबत गाडीत आणलेलं कुत्रं गाडीतून काढलं. एक पत्रावळीजवळ बसवलं. कुत्रं बकाबका कोंबड्याची हड्डी फोडू लागलं नी पाच दहा मिनिटातच लाथा झटकत शांत झालं. जे पाच मेंबर जेवायला बसणार होते त्यांनी कुत्र्याकडं पाहताच अंगातली सारी उतरली व ते भयाण झाले. आपणही अशाच लाथा झटकल्या असत्या या विचारानं ते संदेशरावांना बिलगले.


"बोला यांचं काय करायचं?" संदेशरावानं विचारताच 

ते गरजले, "आबा या दोघांना आम्ही पाहतो काय करायचं ते...”


बाल्ट्याला फक्त भुनाजीला मतदान करायचं इतपत माहित होतं पण या कोंबड्याच्या भाजीत काय आहे याची काहीच माहिती नव्हती. तो संदेशरावांच्या पायाला लागला. तोच पाचही जण उठले व त्याला कुत्र्याच्या पिलागत उचलला. जवळच बोकडाची भाजी खदखद उकळी फोडत होती. तारीनं पाहिलं. ती त्यांना बिलगली. त्याच धांदलीत तिलाही धक्का लागला व ती भाजीच्या कढईत पडली. माणसाच्या अंगावर गरम भाजीचे छिटे उडून भाजताच त्यांनी बाल्ट्याला फेकला. तो नेमका तारीच्या अंगावरच. ते पाहून संदेशराव कडाडले व धावले.त्यांना वाटलं हे यांना चोप देतील व सोडून देतील पण झाला प्रकार अचानक व भयाण होता. भाजीत पडलेली तारी व बाल्ट्यानं आकांत मांडला. तारी स्वयंपाक करताना ठेवलेल्या पाण्याच्या बादल्या शोधू लागली तिच्या हाताला बादली लागली. तिनं अंगावर टाकली. दुसरी बाल्ट्यानं अंगावर ओतली पण त्या पाण्याऐवजी तारीनंच भाजीनं भरलेल्या बादल्या होत्या. सर्व अंगावर भाजीच भाजी. कातड्या शिजल्या व लोंबू लागल्या ते इकडं तिकडं पळत अंगाच्या कातड्या काढत फेकू लागले. डोळ्यात भाजी गेल्यानं डोळे ही शिजले असावेत. ते ओरडत सैरावैरा धावू लागले. माणसं हे दोन्ही आपल्याला बिलगतील की काय म्हणून लांब पळाले. संदेशनं ओळखलं आता हे जगणं शक्य नाही. करायला गेलो काय नी झालं काय. सकाळी तर निवड असल्यानं आता आपलं फासावर लटकणं आलंच. जे झालं ते, आता माघार नाही. त्यानं धाडसानं जवळची बादली उचलत त्यांच्या अंगावर टाकली. पाणी पडताच दोन्ही एका ठिकाणी पडले. पण कढईत पडल्यानं तारीचा कमरेचा भाग तर बाल्ट्याचं डोकं व मान पूर्ण शिजली होती. त्यात वरून गरम भाजी टाकल्यावर तर अधिकच. त्यांची शुद्ध हरपली. संदेशनं पाचही मेंबर्सला लावून दोघांना एकत्र दोरानं बांधत ओढत नदी काठावर आणलं. दोघांना दगड बांधत तुडुंब भरलेल्या पात्रात समाधी दिली.


साऱ्यांनी धावपळ करत सारं सामान उचललं. दूर जाऊन पातेल्यातली भाजी खड्डा कोरून पुरली. साऱ्या खुणा पुसल्या व निघाले. निघताना "इथलं इथंच विसरा. कोणी फुटला तर सर्वांची फाशी निश्चीत आहे...” संदेशराव म्हणाले पण सारेच सुन्न.

तोच पहाट फुटली व नंतर सावकाशपणे नरक चतुर्दशीचा नवस फेडणारे हळूहळू येऊ लागले.

  

नंतर भुनाजी व पोलिसांनी जंग जंग पछाडलं पण खलवाडीत उतरलेला माणुस, तारी व बाल्ट्या सापडलेच नाही. परागंदा झाले ते झालेच. तशीच दफ्तरी नोंद झाली. भुनाजीरावालाही खोलात शिरणं म्हणजे आपल्या हातालाही विषाच्या पुडीचा वास येईलच म्हणून सत्ता गेली तरी चालेल पण त्या तारी, बाल्ट्याचं नाव नको म्हणत विरोधी म्हणून ग्रामपंचायतीतच काड्या कोरू लागला.

.

.

.

सुनाजीरावांनी उठत पाणी घोटलं व "संदेश पोरा करायला गेला काय नी झालं काय!" मनातच पुटपुटले.

पण तारी व बाल्ट्याचा 'पाच जणांना जेवू घालण्याचा निवदाचा नवस' पुरा फेडायचं अजून बाकी आहे... त्याचीच सुनाजीरावाना भीती सलत होती.


क्रमश:


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama