Sunita Choudhari

Abstract

4.0  

Sunita Choudhari

Abstract

निर्णय

निर्णय

5 mins
312


जून महिन्यातला मोठा उन्हाळी दिवस. सायंकाळचे आठ वाजले तरी बाहेर अजून संधिप्रकाश होता. सूर्य बुडाला असला तरी निरभ्र आकाशात लाल, पिवळ्या रंगाची उधळण अजून ठशठशीत दिसत होती. झाडांची हिरवीगार पाने वारा नसल्याने स्तब्ध होती. अमेरिकेतले उन्हाळ्याचे दिवस म्हणजे खरं तर कडक थंडीच्या कचाट्यातून सुटल्यानंतर मजा करण्याचे, बाहेर मोकळ्या हवेत खेळण्याचे, फिरण्याचे , मित्रमॆत्रिणी सोबत बागेत बार्बेक्यू पार्ट्या करण्याचे. आज मात्र रस्ते निर्मनुष्य होते,पार्क रिकामे होते, गरम, उबदार हवेचा आनंद न घेता माणसे आपापल्या घरात बंदिस्त होती. संपूर्ण वातावरणात एक अजिब सन्नाटा होता. सारे जग असे ठप्प व्हायला कारणही तसेच विचित्र होते. जगात कोव्हीड -१९ विषाणू सर्वत्र पसरला होता. वैद्यकीय क्षेत्रात त्याबद्दल अगदी कमी माहिती उपलब्ध होती. योग्य त्या उपचारांची दिशा ठरत नव्हती पण हा विषाणू संसर्गाने पसरतो हे नक्की होते. आणि म्हणूनच प्रतिबंधक उपाय म्हणून नागरिकांना मुक्तपणे फिरण्यास सरकारने मनाई केली होती. अत्यंत जरुरीच्या कामासाठीच घराबाहेर पडावे अशी आज्ञावजा विनंती होती. जमावबंदी होतीच.


हॉस्पिटलच्या आवारातही प्रचंड शांतता होती. जेंव्हा केंव्हा एखाद्या नवीन पेशंटला घेऊन ऍम्ब्युलन्स हॉस्पिटलच्या दारात उभी राही, तेंव्हा ताबडतोब धावपळ सुरु होई. तोंडाला मास्क, डोळ्यांवर चष्मा, हातात, पायात रबरी ग्लोव्हज, पूर्ण चेहरा, डोके, सारे शरीर झाकणारे पातळ प्लॅस्टिकचे सुरक्षित आवरण घातलेले हॉस्पिटलचे कर्मचारी पटकन पुढे होऊन पेशंटला ताब्यात घेत. हॉस्पिटलच्या खास विभागात ठेवून उपचार सुरु करीत. डोरा इथेच नर्सची नोकरी करीत होतो. दोन वर्षांपूर्वीच तिने नर्स होण्यासाठीचा अभ्यासक्रम पुरा केला आणि लगेच तिला येथे नोकरी मिळाली. इथले सहकारी, डॉक्टर्स छान मनमिळाऊ होते, नवीन डोराला खूप काही शिकता येत होते. आवडीचे काम करताना डोरा अगदी खुश होती. पगारही बरा मिळत होता. पेशंटची संध्याकाळची आवश्यक ती सर्व नोंद झाल्यावर डोरा खोलीबाहेर पडली. रूमच्या बाहेर पडताना तिची नजर बाहेरच्या आवाराकडे गेली. संध्याकाळ झाली होती. कामाचा दिवस संपला होता. शरीर थकले होते. काहीतरी पटकन खाऊन आराम करावा असे वाटत होते. पण मन मात्र आठवणींच्या कप्प्यात लिसाला धुडांळत होते. गेले सात दिवस डोरा हॉस्पिटल बाहेर पडली नव्हती आणि लिसाला भेटली नव्हती. तिची आठवण येताच डोराच्या हृदयात कळ उठली आणि लगेच तिने जेनेटच्या मोबाईलवर फोन लावला.


कोव्हीड १९ चे रुग्ण दिवसागणिक वाढत होते. हॉस्पिटलला स्टाफची गरज होती आणि संसर्गजन्य रोग असल्याने कुटुंबियांनाही धोका उत्पन्न होऊ शकतो म्हणून हॉस्पिटलने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना घरी न जाता तिथेच राहावे असे सुचवले. पगारही जास्त देणार होते. हॉस्पिटलने राहण्या जेवण्याची सर्व सोय उत्तम ठरवली होती. डोरासारख्या नवीन लोकांना तर तिथे राहणे भागच होते. डोराचे आईवडील, बहीण-भाऊ तिकडे लांब टेक्सासला होते. जेनेट डोराची नर्सिंग स्कूल मधली मैत्रीण. छोटी लिसा गेले सात दिवस जेनेटीकडेच राहत होती. नर्स डोराच्या छोट्याशा विश्वात, जेकब बरोबर घटस्फोट झाल्यानंतर फक्त ती आणि तिची लिसा होती.. लिसा नुकतीच दोन वर्षाची झाली होती. जेकबच्या एकूण सवयींचा विचार करून कोर्टाने त्याचा कस्टडीचा अधिकार काढून घेतला होता. डोराच्या उपस्थितीत तो लिसाला महिन्यातून दोनदा भेटू शकत असे. व्यसनी जेकब तेही नेहमी करीत नसे. दिवसभर छोटी लिसा पाळणाघरात राहायची. डोराची ड्युटी संपली कि ती पाळणा घरात लिसाला घ्यायला जायची... डोरा वर्गाच्या दारात दिसली की लिसा दुडूदुडू चालत येऊन तिला बिलगायची. लिसा अशी बिलगली की डोराचा सारा श्रमपरिहार व्हायचा. घरी आल्यावर दोघी मायलेकी लिसाच्या आवडीचे जेवण जेवायच्या. झोपण्यापूर्वी लिसाला रोज गोष्ट ऐकायला आवडे आणि छोटी लिसाजवळ तिचा आवडता टेडी घेऊन झोपत असे. मग डोराला स्वतःसाठी, घरकामासाठी थोडा वेळ मिळे. असे छान रुटीन होते मायलेकींचे. आठवणीने डोराचे मन अगदी व्याकुळ झाले.


पलीकडे फोनची घंटी नुसती वाजत होती. बराच वेळ तसाच गेला आणि एकदाची जेनेट फोनवर आली. "हॅलो" जेनेटचा मूळचा राठ आवाज झोपेतून उठल्यावर यावा तसा थोडा अधिकच जाड वाटत होता. आता झोपली होती ही? डोराच्या मनात विचार आला. आणि लीसीच्या जेवणाचे काय? ती 

साडेआठपर्यंत झोपेला येते. "हाय,जेनेट." मनात आलेले प्रश्न पोटात गिळून डोराने संभाषण सुरु केले. "कशी आहेस? लिसी फार त्रास देत नाही ना तुला? तशी ती खूप शहाणी आहे," "शहाणी कुठची,?” डोराचे बोलणे मध्येच तोडत जेनेट म्हणाली," ममा पाहिजे म्हणून सारखी हट्ट करते. आणखी किती दिवस ग तू अशी काम करणार? It is very difficult to handle her. लिसाचे खाणे पिणे अंघोळ, किती वेळ जातो माझा. " डोराच्या डोळ्यात चटकन पाणी आले, अशी जाऊन लिसाला आपल्या घरी घेऊन जावे असे वाटू लागलं.

“And Dora, listen मला आता लिसाला बघायला जमणार नाही. माझ्या जॉबमध्ये त्यांना नाईट नर्स हवी होती , मी अँप्लिकेशन केला होता and I got it. डबल पगार आहे. तेंव्हा लिसाला तुला दोन दिवसात घेऊन जावं लागेल. And after all , it is your problem. ” हा धक्का अनपेक्षित होता. डोराच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. लिसाला तोडून बोलणाऱ्या जेनेटचा तिला राग आला. ही अशी बोलते मग कशी वागत असेल माझ्या बाळाशी ? लिसाचा गोड,गोबरा,निष्पाप चेहरा पुनः डोळ्यासमोर तरळला आणि तिच्या मनात कालवाकालव झाली. जेनेट खोटे बोलत असावी आणि लिसाची जबाबदारी टाळण्यासाठी केलेला हा बहाणा असावा असे मनोमन वाटू लागले. उघडपणे तसे बोलणे शक्य नव्हते. " बरं, मी नेते लिसाला दोन,तीन दिवसात घरी. तुझं अभिनंदन. लिसाशी बोलू का मी आता जरा ?" डोरा म्हणाली.


"लिसा मगाशीच झोपली, बाय." आपल्या जाड, राठ आवाजात जेनेट म्हणाली आणि तिने फोन ठेऊन दिला. हातातला फोन बंद झाला तरी डोरा तशीच फोनकडे बघत राहिली. लिसी एवढ्या लवकर झोपली, जेवली असेल ना ती? आपल्या बाळाच्या काळजीने ती अस्वस्थ झाली. खरेतर डोरालाही मनातून लिसाला जेनेटीकडे ठेवायचेच नव्हते. पण दुसरे कोणीही नसल्याने अगदी नाइलाजाने तिने जेनेटला विचारले. जेनेटचा सगळा उडवाउडवीचा कारभार होता. जेनेट सिंगल होती, रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे, सारख्या पार्ट्या , अभ्यास वेळेवर न करणे , वर्गात वेळेवर न येणे अशा गोष्टींची डोराने मनात नोंद करून ठेवली होती. जबाबदारीची कसलीच जाणीव तिच्या वागण्यात डोराला आढळली नाही. म्हणूचच अबोध लिसीला तिच्याकडे सोपवताना डोराच्या हृदयाचे पाणी पाणी झाले. लिसा दिवसभर पाळणा घरात राहणार होती . रात्री मात्र तिला जेनेट घरी घेऊन जाई. डोरा तीन चार दिवसात डॉक्टरांशी बोलून थोडी रजा घ्यायच्या विचारात होतीच. पण त्या आधीच जेनेटने आज सांगून टाकले.


दुसऱ्याचे मूल संभाळण्यातली जबाबदारी डोराला कळत होती पण तरीही जेनेटच्या आत्ताच्या बडबडीचा तिला प्रचंड राग आला. आपल्या गोड लिसाला असे परक्या घरी राहावे लागते ह्या परिस्थितीचा तिला तिटकारा आला. लिसाला आताच्या आता घरी आणावी, तिच्या गालाचे पापे घ्यावे, तिच्या कुरळ्या केसांवर हात फिरवीत, मोठ्या मोठ्या भोळ्या डोळ्यात बघत परीराणीची गोष्ट सांगावी असे वाटू लागले. तिने रजा घ्यायचे ठरविले आणि ती तडक मुख्य नर्सच्या ऑफिसकडे झाली. दिवसभर डोराचे खूप काम झाले होते , भूक लागली होती, ती दमली पण होती, तरीही डोक्यातला लिसीचा विचार आणि डोळ्यापुढला तिचा गोड चेहरा हलत नव्हता. आज निर्णय घ्यायचाच होता. मुख्य नर्सबाई ऑफिसात नव्हत्या. डोरा तिथे तशीच बसून राहिली. त्यांची ड्युटी अजून संपली नव्हती, हे तिला माहित होते. लिसीच्या विचारात गुरफटलेल्या डोराला तास दीडतास कसा गेला ते कळलंच नाही. रात्रपाळीची सहाय्यक नर्स लिंडा दहाच्या सुमारास खोलीत शिरली आणि डोरा तंद्रीतून जागी झाली. "हेडबाई कुठे आहेत?" डोराने लिंडाला विचारले. " त्यांना आज राऊंड नंतर मिटिंग होती. ती झाल्यावर त्या परस्पर खोलीवर गेल्या. आता उद्याच भेटतील तुला."


डोरा खोलीबाहेर पडली. न खाता पिता स्वतःच्या खोलीतल्या बेडवर येऊन पडली, फोनवरचे लिसाचे विडिओ, फोटो पाहात. सकाळी सात वाजताच येऊन ती नर्सबाईंना भेटणार होती. रजा घेणार होती आणि रजा नाही दिली तर? तरीही निर्णय झाला होता. तिच्या लाडक्या लिसीला कुशीत घेऊन कसल्याही संकटाचा सामना करायला ती सज्ज होती. नर्स डोरा बरोबरच्या सात दिवसांच्या ह्या मानसिक युद्धात आई डोरा जिंकली होती. लिसी अनाथ नव्हती, तिची आई तिच्यासाठी काहीहि करायला तयार होती.


Rate this content
Log in

More marathi story from Sunita Choudhari

Similar marathi story from Abstract