नावाचा मोठेपणा....
नावाचा मोठेपणा....
माझे नाव माझी इज्जत... माझ्या नावाखातर मला असे केलंच पाहिजे... तसे नाही केले तर लोकं मला नाव ठेवतील, असा विचार करून कितीतरी व्यक्ती प्रत्येक गोष्टी मागे धावत असतात... अन वर्तमान काळातला आनंद गमावत असतो... तसेच कधी कधी हे नाव जपून ठेवण्यासाठी खोट्या पडद्याआड आपला कमीपणा, कोणतीही खरी गोष्ट लपवून ठेवतो... असेच या कथेत आपण बघणार आहोत...
प्रत्येक कार्यक्रम करताना दिखावा हवा म्हणून वाटेल तेवढा खर्च करणारे श्यामराव... गावातील एक बडं प्रस्थ.. त्यांना प्रत्येक ठिकाणी मोठेपणा लागायचा.. अन तो मिळावा म्हणून कसलाच विचार न करता खर्च करायचा.. हा त्यांचा स्वभाव.. तर त्यांची बहीण सुलभा अगदी उलट... लहानपणी पासून ह्या विषयावर त्यांचे कधी पटलेच नाही... त्यात तिने प्रेम विवाह केला... अगदी साध्या घरातील मुलगा.. गरीब त्यात आंतरजातीय... मग् काय काही विचारू नका...
श्यामराव संतप्त झाले... तिच्याशी सर्व संबंध तोडून टाकले, आपले घराणे, आपले नाव सर्व काही धूळीला मिळवलेस तू.. तूझा माझा संबंध संपला असे बोलुन नाते तोडून टाकले...
सुलभा अतिशय शांतपणे म्हणाली, अरे दादा कसले नाव... नाव करतोस? प्रेम, आपलेपणा, माया, नाती सर्व काही विसरलास तू... या नावापुढे... असो तुझी इच्छा नाहीतर मी तुझ्याशी परत संबंध ठेवणार नाही... पण नाव आहे म्हणून असे वागायचं आणि तसे वागायचं ह्या तुझ्या हट्टाचा कधीतरी तूला पच्छाताप होइलच... अरे आपण आहोत म्हणून नाव आहे.... नुसत्या नावाला कोण विचारते रे.. तुझ्याकडे पैसा आहे... संपत्ती आहे म्हणून तुझ्या नावाला किंमत आहे.... पण हे नाव टीकवण्यासाठी खोटा दिखावुपणा नको करू... खोटे कधी लपुन रहात नाही... नाव मोठे अन लक्षण खोटे व्हायला वेळ लागत नाही... हे लक्षात ठेव...
लग्नाला एवढी वर्षे झाली तरी काहीच संबंध ठेवला नाही आणि स्वतःचा स्वभाव काही बदलला नाही... सुलभाने मात्र घर, संसार सर्व काहि सांभाळून राहिलेलं शिक्षण पूर्ण केले.. आणि खूप मोठी झाली.... पण कधीच नाव राहावे म्हणून कोणत्याही गोष्टीत दिखाऊपणा केला नाही... वर्षा मागून वर्षे जात होती..... ह्या वर्षी अचानक झालेला जास्तीचा पाउस.. यामुळे झालेले नुकसान... ह्या वर्षी आवक नाही.. पण स्वभाव असा की खर्च झालाच पाहिजे नाहीतर माझे नाव... माझी इज्जत.. लोक हसतील मला... असा विचार करत कर्ज घेऊन प्रत्येक सण ह्या वर्षी सुद्धा तितक्याच जोराने साजरा केला... त्यांचा मुलगा शंतनु त्यांना समजावून थकला... पण कोणाचे ऐकतील तर ते श्यामराव कसले?? शेवटी कर्जाचा डोंगर वाढला... आणि होते ते सर्व गमावून बसले... राहते घर विकायची वेळ आली तेव्हा त्यांचे डोळे उघडले... पण खूप उशीर झाला होता...
तेव्हाच गावात एका कार्यक्रमात समाजातील एक प्रतिष्ठीत व्यक्ती म्हणून सुलभाताईंना आमंत्रित केले होते... तेव्हा भाषण देताना त्या सर्वांना सांगत होत्या, जीवन जगताना आवश्यक असणार्या खूप गोष्टी आहेत.... आपल्या मुलभूत गरजा आहेतच याशिवायही पैसा, प्रसिद्धी आणि समाजात असलेली प्रतिमा म्हणजेच आपले नाव... ते टिकवण्यासाठी माणूस आयुष्यभर झटत असतो परंतू प्रत्येक गोष्टींमध्ये कुठे थांबायचे हे ज्याला कळते तो नक्कीच यशस्वी होतो आणि समाधानीसुद्धा... कारण प्रत्येक यशस्वी माणूस हा समाधानी असतोच असे नाही पण प्रत्येक समाधानी माणूस हा जीवनात नक्कीच यशस्वी होतो....
म्हणूनच चांगली असो किंवा वाईट प्रत्येक गोष्टीत ठराविक वेळेत थांबायला हवे कारण "अती तेथे माती" अन हे ज्याला कळते तो नक्कीच आनंदी आणि समाधानी जीवन जगतो... त्यांच्या ह्या वाक्यावर जोरात टाळ्या वाजतात..... प्रेक्षकांमध्ये बसलेले श्यामरावांचे डोळे भरून आले... आपल्या बहिणीने स्व कर्त्तॄत्वावर कमावलेले नाव बघून त्यांना तिचा अभिमान वाटला... आणि स्वतःची चूक समजली... ते शंतनूला म्हणाले खरच कुठे थांबायचे तेच मला समजले नाही.. अन आज होत्याचे नव्हते झाले.. सुलभाताई दुरून नेहमीच लक्ष ठेवून असायच्या... घर विकावे लागले हे त्यांना आधीच समजले होते.. म्हणुन त्यांनीच तें विकत घेतले होते एका मध्यस्थीला घेऊन...
कार्यक्रम संपला आणि त्यांनी श्यामरावांची भेट घेऊन त्यांचे घर त्यांना परत केले.... अन म्हणाल्या, दादा ही आपली वडिलोपार्जित वास्तू आहे.. त्याचे महत्व मला हि समजते... उभ्या पंचक्रोशीत ह्या वास्तूचे आणि आपल्या घराण्याचे नाव आहे आणि ते जपून राहावे म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न आहे...
श्यामरावांनी त्यांची माफी मागितली.. तसेच आपली चूक कबुल केली...आणि म्हणाले, आता मला नक्कीच कळलं कुठे थांबायचे ते... नाव जपून राहावे म्हणून नेहमीच प्रत्येक गोष्टीचा अतिरेक केला मी... पण खरच अती तेथे नेहमीं माती असतेच...
