नाते तेच तरी पण...
नाते तेच तरी पण...
संजय आणि समिधा यांच्या कडे लग्नाच आमंत्रण करायला संजयचे काका येणार असतात, सासूबाई अगदी सर्व सुचना देतात, जेवायला काय करायचं? मान-पान कसा करायचा? एकच मुलगी आहे भावोजींना.. त्यामुळे सगळं कस रितीला धरून व्हायला हवं.. असे म्हणत सासूबाईंनी तीच्या जन्मापासूनचा सर्व पाढा परत वाचला, जो समिधाने लग्न झाल्यापासून रक्षाबंधनाच्या, भाऊबीजेच्या सणाला अगदी ५० वेळा तरी ऐकला असेल.. पण समिधा नेहमी प्रमाणे त्या कडे दूर्लक्ष करत सर्व तयारी अगदी मनापासून करत होती कर्तव्याला ती कधीच चुकली नव्हती तरीपण सासूबाई परत परत काही गोष्टी अजून कशा बाकी आहेत याची जाणीव करून देत होत्या..
तिला या सर्व गोष्टीची इतकी सवय झाली होती की ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करायची जेणेकरून घरात शांती राहील... आलेल्या पाहुण्यांच केळवण खूप छान झाले, जेवण, मान-पान अगदी सर्वच..
लग्नाला पाच दिवस सर्व आधीच गेले, तिथे सुद्धा घरची मोठी सून म्हणून ती सर्व काही करत होती.. मुला-बाळांच बघून सर्व करत होती.. सर्वानी हातावर मेहंदी काढली, सर्व लहान मुलांना खूप भूक लागली. आचारीला जेवण बनवायला थोडा वेळ होता. सासूबाईंनी सर्वांसमोर समिधाला मुलांसाठी चपाती घरीच करायला सांगितली.. तिने मेहंदीचे हात धुवून चपातीचे पीठ भिजवायला घेतले, तशी दुसऱ्या जाऊबाईंनी येऊन तिची मुले चपाती खातील असे सांगितले, आतेसासूबाईंनी त्यांच्या नातवंडाना पण चपाती हवे असे सांगितलं.. त्यांच्या सूनबाईंने हातावर मेहंदी काढले त्यामुळे तूच कर.. पण लग्न घरात शांतता राहावी म्हणून समिधाने सर्व लहान मुलाना चपाती केली..
मुलांची शाळा, ऑफिस सर्व बंद करून ५ दिवस सर्व तिकडेच राहिले, पूजा झाल्यावर सर्व आपल्या घरी आले..
सर्वानी समिधाचे कौतुक केल्यामुळे सासूबाई खूप खुश होत्या..
२ महिन्याने समिधाचे काका-काकू त्यांच्या एकूलत्या एक मुलीच आमंत्रण करायला आले, तेव्हा मात्र सासूबाईंनी घरातली आलेली साडी काकूच्या हातात ठेवली, संजयने तर घरी लवकर येण्याची तसदी देखील घेतली नाही, काकाने ऑफिसला जाऊन जावई म्हणून मानाने आमंत्रण दिले, तेव्हा सुद्धा संजयने मला जमणार नाही, सुट्टीच जरा अवघड आहे, लग्नाच्या दिवशी येईन, समिधा आधी येईल असे म्हणून उडवून लावले.
समिधाला खूप राग आला.. पण काही बोलले तर आपण जाताना कटकट नको म्हणून ती गप्प बसली...
लग्न अगदी छान पार पडले, सासूबाईंनी अगदी हात राखून आहेर केला.. समिधाला ही गोष्ट खूप खटकली, पण मुले लहान आहेत उगाच त्यांच्या समोर काही नको म्हणुन ती शांत राहिली..
२ वर्षाने तीच्या भावाच लग्न जमले, आईनं दहा वेळा सांगून सुद्धा सासूबाई साखरपुड्याला आल्या नाहीत.. तेव्हा घरी आल्यावर तिने त्यावरून दोन शब्द सुनावले असता संजयने आपल्या आईची बाजू घेऊन तिलाच सूनावले.
समिधाला खूप वाईट वाटले. संजय तिला समजवायला गेला, हे बघ समिधा.. आईला किती वाईट वाटलं? तू अस बोलायला नाही पाहिजे.. आईला होत नाही आता..
संजय बसं.. मला नका समजावू.. नाती तीच नियम फक्त वेगळे... मुलीने मात्र लग्न झालं कि स्वतः चा मान अपमान सोडून सासरी स्वतःला पूर्ण वाहून घ्यायचे, कोणतही कर्तव्य करताना चूक करायची नाही. सगळ्या बाबतीत सासरी पहिले प्राधान्य द्यायचे, मग् स्वतः चे आई बाबा आजारी पडले तरी? पण जशी एक मुलगी नवर्याच्या आई बाबांना आपले मानते त्यांच्यासाठी झटते तसे नवऱ्याची पण जबाबदारी आहेच ना?
सूनबाई ने असे वागावं तसे वागू नये असा नियम बनवणार हा समाज जावई या नात्याला का कोणते नियम लावत नाही, सासू ही जशी सूनेशी वागते तशी जावया जवळ का नाही वागत दोघांची पण सासूच असते ती तरी.....
एक मुलगी मात्र सगळं आपले मानून त्या नवीन घरात अड्जस्ट होते, कॊणी किती बोलले तरी उलट न बोलता सर्व काही अड्जस्ट करून नवर्यासाठी सगळे सहन करते ती तीचं घर तिची माणसे सोडून सगळ्यां गोष्टीची नवीन सुरुवात करते त्याच्यासाठी, घरातले कोणाचे लग्न असो, कोणाचे आजार पण असो कोणाला काय हवे काय नको हे ति बघते, अन हीच वेळ जेव्हा एक जावई म्हणून त्या मुलाकडे येते तेव्हा मात्र तो तिकडे अगदी दुर्लक्ष करतो त्याच्या आयुष्यात त्या गोष्टींना दूय्यम स्थान असते.
जेव्हा त्याच्या बहिणीचे किंवा भावाचे लग्न असते तेव्हा तिने खरेदी, आमंत्रण, तयारी, सगळ्या गोष्टीत अगदी मनापासून लक्ष द्यायचे सगळे करायचे अन् जेव्हा तिच्याकडची वेळ येते तेव्हा तो मात्र मला नाही जमणार, काम आहे आज नको उद्यां असे म्हणतं एक दिवस जाणार आणि आल्यावर तुझे बाबा असेच बोलतात,तुझी आई अशीच आहे तुमच्याकडे असे अन् तसे....
तिची आई आजारी झाली तर... इथले काम आधी आवरून जा.. माहेरी कोणत्या हि कामासाठी जायचे म्हटले कि सगळयांचे चेहऱ्यावर जे बोल येतात त्यातून तिने समजून घ्यायचे, सासरी कोणाचे हि वाढदिवस असो, कोणाला हैप्पी जर्नी असो तिने मात्र फोन वर बोललेच पाहिजे पण जेव्हा तीच्याकडच्या नातेवाईकांशी असे बोलायची वेळ येते तेव्हा???
तुमच्या भावंडानी केलेले प्लॅन्स भले ते आयत्या वेळेवर असो लगेच सुटटी मिळते पण माझ्या आते मामे भावंडाच्या काय सख्ख्या भावाच्या लग्नात मात्र सहा महिने आधी माहित असून पण काम असते सुट्टी मिळत नाही... बाकी गेट टूगेदर वगैरे तर लांबच हो साधे सख्या मेव्हण्या च्या लग्नात पण एवढा भाव खाता तुम्ही जावई....
आम्हा बिचार्या मुलींची तारांबळ उडते हो माहेर आणि नवरा याचा समतोल राखताना... शेवटी काय हो माझे काय अन तुमचे काय नाते तेच ना पण नियम मात्र वेगळे....जे बायकोचे सून म्हणून कर्तव्य आहे तेच नवर्याचे जावई म्हणून आहे हे का नाही शिकवलं जात?
सुनेने मुली सारखे राहावे पण स्वतःचा मुलगा जावईच राहावा....अहो पण तूम्हाला एक कार्यक्रम होईपर्यंत सगळे ऐकायचे आहे, त्यांच्या सोबत जाऊन राहायचं नाही?
हा विचार कोणताच मुलगा का करत नाही की प्रत्येक घरातले वातावरण वेगळे असते प्रत्येक व्यक्तीच्या स्वभाव वेगळा असतो आणि आपण काही क्षण नाही अड्जस्ट करू शकत, तर आपल्या घरात आल्यावर तिलाही काही पटले नसेल तरी ती ह्या घरात कशी अड्जस्ट करून राहते? समिधा भडाभडा सर्व ओकून. शांत झाली..
संजयला आज त्याची चूक जाणवली, त्याने समिधाला शांत बसवले, पाणी दिले.. तिची माफी मागितली.. नक्कीच बदल करेन असा विश्वास दिला.. अन् प्रेमाने तिला जवळ घेतले.. आज त्याच्या मिठीत तिला विश्वास जाणवत होता...
