Shital thombare

Drama

2.7  

Shital thombare

Drama

मुक्त जाहले आज मी...

मुक्त जाहले आज मी...

4 mins
650


पतीच्या अकस्मात निधनाने रमाबाईंवर दुःखाचा डोंगर कोसळला. आपली एकुलती एक मुलगी सुजाकडे पाहून त्यांनी स्वतःला सावरलं. आता जगायचं तर फक्त आपल्या लेकीसाठी.....


आर्थिक खर्च भागवण्यासाठी त्या चार घरी धुणीभांडी करु लागल्या. सुजाने शिकून आपल्या पायावर उभं राहाव अशी त्यांची खूप इच्छा होती पण परिस्थितीपुढे हतबल होऊन सुजाने दहावीपर्यंतच शिक्षण कसंबसं पूर्ण केलं. घरी राहून सुजा विणकाम, शिवणकाम शिकू लागली. 


सुजा अठरा वर्षांची झाली अन् रमाबाईंना तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली. एखादा चांगला मुलगा पाहून सुजाचं लग्न उरकून टाकूयात काय भरवसा आपल्या या आयुष्याचा. डोळे मिटण्याआधी लेकीचा सुखी संसार पाहायची त्यांना तीव्र इच्छा झाली आणि त्या दिशेने पावले उचलत मुलगा शोधायला सुरुवात केली. माहेरात न मिळालेलं सुख आपल्या लेकीला सासरी मिळेल, ती राजा-राणीचा सुखाचा संसार करेल अशी स्वप्न त्या पाहू लागल्या. 


आणि एक दिवस रमाबाईंचं हे स्वप्न सुजाला पाहायला आलेल्या शेखरच्या रुपात पूर्णत्वास आलं. दोन्ही घरची पसंती झाली अन् केवळ महिन्याभरात सुजा-शेखरवर अक्षता पडल्या. रमाबाईंनी मोकळा श्वास घेतला. आज एक मोठी जबाबदारी आपण पार पाडली. कित्येक रात्री नंतर आज त्यांना शांत झोप लागली. 


इकडे सुजाने आपल्या सासरी प्रवेश केला. डोळ्यात सुखी संसाराची स्वप्ने घेऊन तिने उंबरठ्यावरचं माप ओलांडलं. नव्याचे नऊ दिवस सरले..... सासरच्या मंडळींचं खर रूप हळूहळू सुजाच्या समोर यायला लागलं. आपली फसवणूक झाली हे तिच्या लक्षात आलं. ज्याच्या सोबत आपण संसाराची स्वप्ने पाहीली त्यानेच आपला घात केला. शेखर दारुच्या अधीन होता एवढंच नाही त्याला जुगाराचं व्यसनही लागलं होतं.... सुजाच्या पायाखालची जमीनच सरकली. काय करावं काहीच सुचेना. रमाबाईंना सांगावं तर त्यांना धक्काच बसला असता..... सुजाने निमुटपणे सगळ सहन करायचं ठरवलं दुसरं ती करणार तरी काय होती. 


वर्षभरातच घरात पाळणा हलला. सुजाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्या आनंदात ती आपलं सारं दुःख विसरून गेली. दिवस सरत होते पण शेखर बदलत नव्हता. त्यातच त्याची नोकरी गेली.... दारूचं प्रमाण वाढलं आणि सगळा राग सुजावर निघू लागला.... मारहाण तर रोजच होऊ लागली. इकडे तिच्या सासूबाईंनी घराण्याचा वारस म्हणत त्या इवल्याशा बाळावर हक्क गाजवायला सुरुवात केली. सुजाला कामाला जुंपण्यात आलं आणि सासूबाईंनी बाळाला आपल्या ताब्यात घेतलं... बाळाला भूक लागली की सुजाकडे द्यायचं बाकी पूर्णवेळ बाळ सासूबाईकडे असायचं... बाळाला पाहण्यासाठी ती आसुसलेली असायची त्याला जवळ घ्यावं छातीशी घट्ट धरावं असं तिला खूप वाटायचं पण तिचा नाईलाज व्हायचा पण ती आपलं दुःख कोणाला सांगू शकत नव्हती की बोलू शकत नव्हती...... आला दिवस ढकलायचा अस ठरवून रमाबाईंना त्रास होऊ नये म्हणून ती मूग गिळून गप्प बसली. 


रमाबाई आनंदी होत्या. आपली लेक सुखात आहे या भ्रमात जगत होत्या... लेकीचं सुख आपल्या डोळ्यांनी पाहावं म्हणून त्या चार दिवस लेकीला आणि नातवाला भेटायला आल्या अन घरच्यांचं रंगरूपच पालटलं. कालपर्यंत आपल्याशी वाईट वागणारी माणसं सूतासारखी सरळ वागत होती. सुजाला तर त्यांचं ते कृत्रिम वागणं पाहून धक्काच बसला..... पण आनंदही झाला. तिचं दु:ख रमाबाईंपासून लपलं होतं. एकाअर्थी झाल ते चांगलच झालं कारण सुजाला हेच हवं होतं....... चार दिवस राहून रमाबाई आपल्या घरी परतल्या.


आपला नातू आता वर्षाचा झाला असं म्हणत सासूने त्याला वरचं दूध द्यायला सुरुवात केली.... आणि सुजापासून तिचं बाळ अजूनच दुरावलं. रात्री झोपताना फक्त ते सुजाकडे जायचं त्यालाही आईपेक्षा आज्जीचा लळा जास्त होता.


शेखरला यात काहीच चूक दिसत नव्हतं. दारु पिऊन बायकोला मारणं यात त्याला स्वर्गीय आनंद मिळत होता उलट तूच मुलाकडे लक्ष देत नाहीस म्हणून माझ्या आईला त्याचं सर्व पाहावं लागतं, असं म्हणत तो अजूनच तिला मारत असे..... आपला सगळा राग गिळून ती शांत बसायची.


कधी कधी तिला वाटायचं...... ओरडावं, आक्रोश करावा, सगळ्यांना जाब विचारावा. मूठी आवळून ती पुढे यायची पण सगळे शब्द ओठातून बाहेर पडण्याआधीच विरघळून जायचे. खूप ठरवून पण ती काहीच करू शकत नव्हती. तिचा मुलगा आता बोबडे बोल बोलायला लागला. एक दिवस तिने त्याला आपल्या जवळ घेतल. त्याच्यावर आपल्या मायेचा वर्षाव करु लागली पण मुलगा स्वत:ला तिच्या हातातून सोडवून घेऊ लागला.


"तू नाय माझी मम्मा ती बाहेर बचली न ती माझी मम्मा..." सुजाला कळून चुकलं आपलं पोटचं बाळ आपल्या पासून दुरावत चाललंय, नाही मी हे होऊ देणार नाही कदापि होऊ देणार नाही..... त्याच क्षणी सुजाने एक धाडसी निर्णय घेतला. रात्री सगळे झोपल्यावर तिने अलगद बाळाला उचललं फक्त अंगावरच्या कपड्यांवर तिनं आपलं सासर कायमचं सोडलं अन् आईचं घर गाठलं. तिनं रमाबाईंना लग्न ते घर सोडण्यापर्यंतची सारी हकीकत ऐकवली. रमाबाई आपल्या लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. शेखरला कोर्टात खेचलं अन सुजाला घटस्फोट मिळवून दिला.


एक मुलगी, एक स्त्री म्हणून सुजा जे धाडस करु शकली नाही ते धाडस तिच्यातील आईने केले. लग्नानंतर पहिल्यांदाच सुजाने मोकळा श्वास घेतला..........


Rate this content
Log in