Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Shital thombare

Drama

3  

Shital thombare

Drama

डोहाळजेवण...

डोहाळजेवण...

5 mins
899


नलिनी आणि राजेशच्या लग्नाला चार वर्ष होत आली तरीही त्यांच्या संसारवेलीवर अजूनही फूल उमललं नव्हतं, त्यामुळे नलिनी सतत उदास असायची.


राजेशला नलिनीची ही अवस्था पहावत नसे. तो तिला समजावयाचा. कधी उगाच मस्करी करून तिला हसवायचा. "काळजी करु नको गं नलू. मी आहे की तुझं बाळ, जन्मभर तुझं पिल्लू बनून राहीन." असंच काहीबाही बोलून तिला नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करी.


तर दुसरीकडे नलिनीची सासू राजेशची आई सुरेखाबाई मात्र नलिनीला मूल होत नाही म्हणून सतत टोचून बोलत असे.

नलिनी आणि राजेशचा प्रेमविवाह. दोघांच्या विवाहाला सुरेखाबाईंचा कडकडीत विरोध. त्यांचा विरोध पत्करून दोघांनी लग्न केलं. त्यामुळे सुरेखाबाई नलिनीला ऐकवण्याची एकही संधी सोडत नसत.


त्यात आता लग्नाला चार वर्ष होऊनही घरात पाळणा हलत नाही हे पाहिल्यावर सुरेखाबाईंना आणखीनच जोर चढला. उठता बसता त्यांनी नलिनीला दूषणं द्यायला सुरुवात केली.


नलिनी जॉब सांभाळून घरच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडायची. सासूला खुश ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करायची. पण म्हणतात न स्वभावाला औषध नसतं.

सुरेखाबाई नलिनीच्या प्रत्येक कामात फक्त खोटच काढायच्या.


राजेश आईला समजावयाचा खूप प्रयत्न करी.

सुरेखाबाईंवर मात्र परिणाम शुन्य होई. "माझ्या मुलाला तू मूठीत धरुन ठेवलंय. एवढा संसार केला पण आम्ही नाही असं वागलो.”


सुरेखाबाईचे टोमणे सतत चालू असायचे. नलिनी मात्र सासूच्या बोलण्याकडे शक्य तितकं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करी. एकटी असताना मात्र ती आपल्या आसवांना वाट मोकळी करून देई.

राजेशचं तिच्यावरचं प्रेम तिच्या सर्व जखमांवर फुंकर घालण्याचं काम करी.


घरात वाद-कलह नको म्हणून नलिनी सर्व निमूटपणे सहन करी. 

वर्षभरापूर्वीच राजेशच्या बहिणीचं रोहिणीचं लग्न झालेलं. घरात तिने गोड बातमी दिली. सुरेखाबाईंना खूप आनंद झाला. त्यांच्या हातात आयतं कोलीत मिळालं. लेकीचं कोडकौतुक करताकरता त्या नलिनीचा पानउतारा करु लागल्या.


नलिनीला रोहिणीच्या गोड बातमीचा आनंदच झालेला.

नलिनीच्या लग्नानंतर तीन वर्षापर्यंत दोघी अगदी मैत्रिणीसारख्या राहिल्या. रोहिणीलाही आईचा स्वभाव पटत नव्हता. पण सुरेखाबाईंच्या पुढे कुणाचंच काही चालत नव्हतं.

हा हा म्हणता रोहिणीला आठ महिने पूर्ण झाले. पहिलं बाळंतपण माहेरी करण्याच्या प्रथेप्रमाणे रोहिणीला माहेरी आणलं.


सुरेखाबाईंनी आपल्या लेकीचे सगळे डोहाळे पुरवले. रोहिणीला काय हवं काय नको त्या स्वत: जातीने पाहत. आपल्या लेकीसाठी किती करु अन किती नको असं त्यांना झालेलं.


नववा महिना संपला अन घरात तयारी सुरु झाली ती रोहिणीच्या डोहाळ जेवणाची. नलिनीने सगळ्या कामांची जबाबदारी स्वत:वर घेतली. कुठे काही कमी पडू नये याची दक्षता नलिनी घेत होती. नाहीतरी सर्व काही करुन सासूबाईंची बोलणी होतीच.


पाहुण्यांची यादी, जेवणाचा मेनू, देण्याघेण्याचा कार्यक्रम सगळी जय्यत तयारी झाली. घराच्या सजावटीपासून, पाहुण्यांची उठबस, खरेदी सगळी जबाबदारी नलिनीने कसलीही कसूर न करता उत्तम पार पाडली.


रोहिणीच्या डोहाळजेवण निमित्ताने जणू काही ती स्वत:ची स्वप्न पूर्ण करत होती. घरातील एकुलती एक सून म्हणून संपूर्ण जबाबदारी तिच्यावरच तर होती. राजेशनेही या सगळ्यात तिला उत्तम साथ दिली. प्रत्येक कामात तो तिला मदत करत होता.


डोहाळजेवणाचा दिवस उजाडला. कालपासूनच घरात पाहुण्यांचा राबता सुरु झालेला. घरात नुसती लगबग सुरु होती. नलिनी प्रेमाने पाहुण्यांचं आदरातिथ्य करण्यात, आपुलकीने विचारपूस करण्यात व्यस्त होती.


संध्याकाळी पाच वाजता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. पाहुणेमंडळींनी घर भरलं. रोहिणीच्या सासरची मंडळी आली.


इतका वेळ कामात व्यस्त असणारी नलिनी स्वत:ची तयारी करायची पार विसरून गेली. रोहिणीनेच मग जबरदस्तीने तिला तयारी करण्यास पाठवले. “काय हे वहिनी संपूर्ण घर सजवलंस, मला तयार केलंस, तू कधी तयार होणार? जा पटकन आवरुन घे."


नलिनी तयारी करून खोलीच्या बाहेर आली. हिरव्या रंगाची, बारीक काठाची, बुट्ट्याबुट्ट्याची साडी ती नेसली होती. तिच्या लांबसडक वेणीत माळलेल्या गजऱ्याने ती अधिकच खुलून दिसत होती. राजेशची तर नजर तिच्यावरुन हटेना. रोहिणीने हळूच राजेशला चिमटा काढला आणि एकच हशा पिकला नलिनी तर लाजून चूर झाली.


पाच वाजता कार्यक्रमासाठी सगळे हॉलमध्ये हजर झाले. कार्यक्रम सुरु झाला. सगळे आनंदी होते. रोहिणीचं कोडकौतुक करण्यात मग्न होते. ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरु झाला. माहेरची ओटी भरण्यासाठी रोहिणीच्या सासूने नलिनीला हाक मारली. पण सुरेखबाईंनी नलिनीला विरोध केला.


'वांझोट्या बाईने ओटी भरू नये. अपशकुन असतो.'

असंच काहीबाही त्या बरळायला लागल्या. सगळ्यांसाठीच हे अनपेक्षित होतं. सुरेखाबाई असं काही बोलतील असं कोणालाच वाटलं नव्हतं. जणू काही इतके दिवस मनात भरलेला राग त्या अशाप्रकारे बाहेर काढत असाव्यात.


त्यांच्या तोंडून निघालेला वांझोटा शब्द नलिनीच्या जिव्हारी लागला. राजेश आणि रोहिणीच्या तर रागाचा पारा चढला. आईचं हे बोलणं त्यांना न आवडलं न पटलं. रोहिणीने नलिनीचा हात धरुन तिला जवळ घेतलं, सगळ्या पाहुण्यांत तिने आईला ठणकाऊन सांगितलं.


"माहेरची ओटी नलिनीच भरेल. अन्यथा हा डोहाळजेवणाचा कार्यक्रम मी इथेच थांबवते. इतके दिवस वहिनी या कार्यक्रमाची झटून तयारी करते आहे. काही कमी पडायला नको, तुला सगळं पटायला हवं सगळ्याची तिने काळजी घेतली. तेव्हा नाही आठवलं तिचं वांझोटंपण. ओटी भरण्याचा तिचा मान आहे. तिला जर तो द्यायचा नसेल तर मला हा कार्यक्रमच नको. कोणालाही दुखवून मला माझा आनंदोत्सव साजरा नाही करायचा."


इतके दिवस आईच्या वागण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या राजेशला राग अनावर झाला. आईवर चिडतच तो म्हणाला, “आई मी गप्प होतो कारण नलिनीने मला शपथ दिली होती. सत्य जर तुला आधीच समजलं असतं तर नलिनीला वांझोटी बोलण्याची तू हिम्मतच केली नसती. आज इथे हजर असलेल्या सगळ्यांसमोर मी सांगतो. दोष माझ्या नलिनीत नाही माझ्यात आहे. मी बाप बनू शकत नाही. माझ्यामुळे नलिनीला कधीही मातृत्व सुख नाही मिळणार.


डॉक्टरांनी जेव्हा हे सांगितलं तेव्हाच मी तुला सगळ सांगणार होतो. पण नलिनीने मला शपथ दिली. तुला जर हे सत्य समजलं तर तुला धक्का बसेल. तुला सहन होणार नाही. म्हणून नलिनीनेच मला गप्प बसवलं. तू तिला छळत होतीस पण ती मात्र तुझाच विचार करत होती.”


नलिनीच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या. सुरेखाबाईंना समजेना हे काय चाललयं. त्यांचा स्वत:च्या कानांवर विश्वास बसेना. राजेश जे काही बोलला ते ऐकून त्यांना जबरदस्त धक्का बसला. काही समजण्याच्या आतच त्या जमिनीवर कोसळल्या.


राजेशने डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी सुरेखाबाईंना तपासले, घाबरण्याचं काही कारण नाही. त्यांना मानसिक धक्का बसलाय हळूहळू येतील त्या शुद्धीवर. सुमारे अर्ध्या तासाने त्यांना शुद्ध आली.


डोळे उघडताच त्यांनी पहिली हाक मारली ती नलिनीला. नलिनी आपल्या अश्रूंना मोकळी वाट करुन देत होती. इतके दिवस मनात एक संघर्ष घेऊन वावरत होती. आज सगळ समोर आलं, आता पुढे काय या विचारांनी मनात काहूर माजलं.


सुरेखाबाईंनी नलिनीला जवळ घेतलं. “मला माफ कर नलिनी मी तुझ्यावरचा राग असा व्यक्त करायला नको होता. एक स्त्री असूनही मी तुझ्या भावना समजू शकले नाही. किती त्रास दिला मी तुला, पण तरीही तू मात्र माझ्याशी चांगलंच वागत राहिलीस. मला माफ करशील ना नलिनी." सुरेखाबाईंनी नलिनीपुढे हात जोडले.


नलिनीने आपल्या सासूचे हात हातात घेतले, “आई हे हात फक्त मला आशिर्वाद देण्यासाठी पुढे येऊ द्या. माफी मागण्यासाठी नाही. माझा तुमच्यावर राग नाही झालं गेलं विसरून जा."


मनातील सारे हेवेदावे संपले. आनंदाने रोहिणीचा डोहाळजेवणाचा कार्यक्रम पार पाडला...


Rate this content
Log in