मुलगा की मुलगी?
मुलगा की मुलगी?


सुमन आणि मोहीत दोघांचाही प्रेमविवाह... दोघांचेही विचार एकमेकांशी तंतोतंत जgळणारे... एकमेकांना पटणारे... लग्न झालं अन् वर्षभरातच वेध लागले बाळाचे... आपलं बाळं... किती सुंदर... कल्पना करूनच कसलं भारी वाटतंय... ईश्वरी देणगीच ही... ती मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या... तळमळणाऱ्या... जोडप्यांना पाहिलं होतं दोघांनी... त्यामुळे आपण आईबाबा होणार... या बातमीने दोघांनाही आकाश ठेंगणं झालं... वाऱ्यासारखी बातमी घरात... नातेवाईंकामध्ये पसरली... अन् इथूनच सुमन आणि मोहितच्या आयुष्यात खरी गंमत सुरु झाली...
सुमन आणि मोहित दोघेही नोकरी करणारे... त्यामुळे नोकरी, घर सांभाळून दोघेही सुमनच्या गरोदरपणातील... प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होते. जसंजसं सुमनचं पोट दिसायला लागलं... नातेवाईक... मित्रमैत्रिणी... शेजारीपाजारी... इतकेच काय हॉस्पिटल किंवा अगदी रस्त्यात भेटणारी... फक्त तोंडओळख असणारी... एखादी बोलघेवडी आजी... सुमनला पाहून सगळ्यांचेच तर्कवितर्क सुरु झाले... सुमन चेहरा चांगलाच उजळलाय मुलगीच होईल तुला... मुलगा असला की तोंड पार कोमेजून जातं बघ... कोणी म्हणे पोट फार दिसतंय... नक्कीच मुलगा आहे... मुलाचीच लक्षणे ही...
सुमन आणि मोहित सुशिक्षित... विज्ञानावर अगाढ विश्वास आणि श्रद्धा असणारे... लोकांच्या या बोलण्याची त्यांना भारी गंमत वाटे... असं शरीरातील बदलावर ठरतं का? मुलगा होणार की मुलगी.. आणि काय फरक पडतोय मुलगा आहे की मुलगी ह्याने... जन्माला आल्यानंतर कळेलच की...
प्रथेप्रमाणे सुमन आठव्या महिन्यात माहेरी आली... डोहाळजेवणाचा कार्यक्रम आयोजित केला... पुन्हा एक खेळ बर्फी की पेढा... सगळंच गमतीशीर... सुमनला पटत नव्हतंच... घरच्यांच्या आनंदासाठी तिने विरोध केला नाही... माहेरी आल्यावर आई कोडकौतुक करण्यासाठी तयारच होती... पण सुमनला कसलेच डोहाळे लागले नव्हते... हे खायचंय? नको... ते खायचंय? नको... ना गोड ना आंबट... ना कसला त्रास... सुमनची चुलत काकी जवळच राहायची... सुमनचा ना चा पाढा ऐकून म्हणाल्या,"तुझं बाई जगावेगळंच... काहीच खावंसं वाटत नाही. पण मी तुला सांगते तुला मुलगाच होणार."
सुमन म्हणाली,"कशावरून गं काकू?" अगं हे केस काय असेच काळ्याचे पांढरे नाही झालेत... सुमनला हसू आले.
"अगं हसतेस काय? तुला मुलगाच होणार आणि मुलगा झाल्यावर जावयाकडून चांगले किलोभर पेढे घेणार बघ."
काकू किलोभर काय चांगले दोन किलो देते... पण हे मुलगा- मुलगी खूळ डोक्यातून काढा आधी...
सुमन आणि मोहितची एकच इच्छा होती, मुलगा असो की मुलगी... आपलं बाळ फक्त तंदुरुस्त असावं... बाळ आणि बाळंतीण सुखरुप असले की जग जिंकलं आपण... पण लोकांच्या बोलण्याचा इतका परिणाम झाला की... सुमनला एके रात्री आपल्याला मुलगा झालाय असं स्वप्न पडलं... सुमनला उगाच भीती वाटू लागली... बापरे! आपण वहावत चाललोय की काय? या मुलगा-मुलगीच्या स्पर्धेत... नाही नाही... आपण आपल्यावर या सगळ्याचा परिणाम मुळीच होऊ द्यायचा नाही.
नऊ महिने नऊ दिवस झाले... नवव्या दिवशी सकाळीच सुमनला कळा येऊ लागल्या... तसं सुमनला हॉस्पिटलमध्ये नेलं. सोबत मोहित आणि सुमनची आई होतीच. सुमन हॉस्पिटलच्या रुममध्ये कळ
ा देतेय अन् बाहेर मोहित अस्वस्थ होऊन फेऱ्या मारतोय. बाहेर बाकावर लोकांची गर्दी... गर्दीतल्या एक आजीबाई गर्दीतून पुढे आल्या. मोहितला म्हणाल्या, "काळजी करु नको बाबा सगळं नीट होईल. काल बी तू आलतास न् मी पाहिलं तुला. माझ्या लेकीला मुलगा झालाय. कालपासून इथेच आहे मी. तुझ्या बायकोला पाहिलं काल.पोरगाच होईल बघ तुला."
आजीबाईंच्या बोलण्यावर हसावं की... सुमनच्या काळजीने रडावं... असं झालं होतं मोहितला.
इकडे कळा असह्य होऊन सुमनला अक्षरशः ब्रम्हांड आठवत होतं... सुमारे दोन तासांनी बाळाच्या रडण्याचा आवाज आला अन् मोहीतच्या जीवात जीव आला. सुमनने एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाला पाहून सुमनचा नऊ महिन्याचा सगळा त्रास, सगळा क्षीण कुठल्या कुठे पळाला. मोहितला तर काय करु अन् काय नको असं झालं होतं. इतकी गोड परी त्याच्या आयुष्यात आली होती.
बाळाला हातात घेतलं अन् मोहित सुमनला म्हणाला,"सुमन माफ कर मला पण मी पुन्हा एकदा प्रेमात पडलोय. तू माझं पहिलं प्रेम असलीस तरी आता ती जागा माझ्या परीने घेतलीय." सुमन आणि मोहित दोघेही एकमेकांकडे पाहून हसू लागले.
बाळाचं कौतुक करण्यात सगळे गुंग झाले. फोन करुन सगळ्यांना कळवलं. काहींचे सूर आनंदी तर काहींचे मुलगी झाली का असे बेसूर... कोणी अरे वा पहिली बेटी धनाची पेटी... असा प्रतिसाद ऐकून शेवटी मोहितने फोन करणं थांबवलं. क्षणभर त्याच्या मनात आलं... त्या सकाळी भेटलेल्या आजीबाईंकडे जावं अन् आपल्या गोड परीला दाखवावं. तिला सांगावं हाच आहे माझा मुलगा... पण त्याने स्वत: च्या मनाला आवर घातला...
दोन तीन दिवसातंच सुमनला घरी आणलं... आपल्या परीच्या स्वागताची मोहीतने जय्यत तयारी केली होती... त्यातही कुणीतरी कुजबुजलं मुलगी आहे तर एवढं करतायत... मुलगा असता तर किती केलं असतं...
मोहित हसून म्हणाला, इतकंच केलं असतं हो काकू... जितकं मी माझ्या परीसाठी करतोय.
सुमन घरी आल्यावर पाहुण्यांचा, शेजाऱ्यांचा घरात राबता सुरु झाला. सगळे खुश... एका आजीबाईने परीला हातात घेतलं... "बस आता हिच्या पाठीवर एक भाऊ येऊ दे... वंश पुढे चालवायला... पाठीवर हिच्या वेणीपण दिसत नाही... म्हणजे नक्की मुलगाच होईल बघ सुमन तुला..."
सुमनला शेवटी रहावलं नाही,"आजी तुम्ही वयाने, मानाने मोठ्या आहात. बोलायचं नव्हतं पण आज तुम्ही बोलायला भाग पाडलं मला. आमच्यासाठी मुलगा मुलगी एकसमानच आहे. आणि दुसरा चान्स घ्यायचा की नाही हे आमचं आम्हाला ठरवू द्या की... आमच्या बाळाच्या जन्माचा, तिच्या आगमनाचा आनंद तर घेऊ देत. तिची मुलाशी तुलना करून तुम्ही आमच्या आनंदाला गालबोटंच लावताय. मुलांना जन्म द्यायचा तो फक्त म्हातारपणी आपला सांभाळ करायला. आपला वंश वाढायला. आपल्या कर्तृत्वाने तुमचं नाव मोठं करणारा मग तो मुलगा असो की मुलगी... त्यानेच तुमचा वंश मोठा होणार आहे...
सगळ्या क्षेत्रांत मुलींची मक्तेदारी असताना मुलींचं वर्चस्व वाढत असताना मुलाला जन्म देण्यासाठीसुद्धा एका स्त्रीची गरज असताना... जन्माआधीच मुलीचं अस्तित्व का नाकारायचं? आमची मुलगीच आमच्या वंशाचा दिवा आहे...
त्या दिवसानंतर पुन्हा कोणी सुमनसमोर मुलगा-मुलगी हे गाऱ्हाणं नाही गायलं...