मोहिनी एक राजकुमारी
मोहिनी एक राजकुमारी
मोहिनी देखणी एकुलती एक मुलगी असते. तिचे आई बाबा दोघेही चांगल्या कंपनीत गलेलठ्ठ पगारावर नौकरीला असतात. मोहिनीला सांभाळायला लहानपणापासूनच बाई असते. मोहिनी एक वर्षाची झाल्यापासून बाईजवळच असते तिची आई सकाळीच नौकरी निमित्त बाहेर जाते तर रात्री 8 वाजता घरी येते. मोहिनी घरी एकटी असल्यामुळे घरी cctv लावून तिची काळजी नीट बाई घेते की नाही ह्याकडे लक्ष देते. तिला सारखे फोन करून चौकशी करते. हळूहळू मोहिनी मोठी होत जाते. आपण सतत बाहेर असल्यामुळे मोहिनीला वेळ देऊ शकत नाही ह्याची खन्त तिच्या आईला नेहमीच असते. म्हणून मोहिनीची प्रत्येक जिद्द आणि लाड पुरविण्याचा आई प्रयत्न करते. मोहिनी ह्यामुळे इतकी जिद्दी बनते की तिला जी गोष्ट जेव्हा पाहिजे तेव्हाच पाहिजे ..आईबाबाही तिचे लाड पुरवतात. शब्द झेलतात .पण ती शाळेत जाते तेव्हा इतरांकडूनही तिची हीच अपेक्षा असते की फक्त तिचे मैत्रिणींनी ,टीचर नी तिच्या कडेच लक्ष द्यायला पाहिजे. पाचवीपर्यंत सर्व तिचे ऐकतातही पण सहावीत गेल्यावर तिच्या मैत्रिणी तिचे ऐकत नाहीत. त्यामुळे ती एकटी पडते. पण काहीतरी आईवडिलांना हट्ट करून त्यांच्याकडून महागडे गिफ्ट आणून मैत्रिणीला देते आणि स्वतः चे ऐकायला भाग पाडते .
मैत्रिणीकडून होमवर्क पूर्ण करून घेते. ह्या स्वभावामुळे मोहिनी अभ्यासात मागे पडते. त्यामुळे शाळेतील टीचरची तक्रार येते की मोहिनीकडे वेळेत लक्ष द्या नाहीतर ती हाताबाहेर जाईल .टीचर जेव्हा तक्रार करते तेव्हा मोहिनीला वाटते की ही टीचर मला बोलूच कशी शकते .म्हणून ती आईला सांगते आता मी परत मी त्या शाळेत कधीच जाणार नाही. माझी शाळा बदल नाहीतर मी शिकणार नाही. तिची आई तिला खुप समजवण्याचा प्रयत्न करते की लाखो रुपये आपण भरलेत तु हे वर्ष पूर्ण कर पण ती ऐकायलाच तयार नसते. मुलीच्या हट्टापायी ती शाळा बदलण्यासाठी प्रयत्न करते पण तिची शालेय प्रगती बघून तिला ऍडमिशन द्यायला शाळा नाकारतात.
मग ती मोहिनीला समजवते की आपण तुझी शाळा बदलल्यापेक्षा तुझा सेकशन बदलू. पण मोहिनी त्यासाठीही तयार होत नाही. मग तिची आई म्हणते आपण टीचरलाच शाळेतून तक्रार करून काढून टाकले तर हे ऐकून मोहिनी खुश होते आणि तिची आई शाळेच्या प्रिंसिपल जवळ टीचर ची खोटी तक्रार करून तिला काढण्यासाठी भाग पाडते. मोहिनी ह्यामुळे खुप खुश होते आणि शाळेत जायला लागते .पण तिच्या ज्या टीचर ची खोटी तक्रार करून तिची आई काढते, ती मोहिनीच्या आईला भेटते आणि सांगते मी मोहिनीच्या भल्या साठी तुम्हाला सांगितले होते पण आताही मी तुम्हाला सांगते माझ्या नौकरी गेल्याचे दुःख तर मला आहेच पण मोहिनीचे तुम्ही जे आयुष्याचे नुकसान करत आहेत त्याचे मला वाईट वाटते .आता ह्यापुढे कदाचित कोणतीच टीचर तिची तक्रार करणार नाही पण ते मोहिनी साठी चांगले नाही .त्यावर तिची आई म्हणते मोहिनी माझी एकुलती एक मुलगी आहे आणि तिला आम्ही राजकुमारी सारखे जपले आणि पुढेही जपू त्यामुळे तिची चिंता तुम्ही करू नका. मग ह्यापुढे शाळेत कुठलीही टीचर मोहिनीची तक्रार करत नाही. तिच्या मनानुसार करते. मोहिनी बघता बघता कॉलेजला जाते .तिथल्या वातावरणात ती ड्रगच्या आहारी जाते .घरी ड्रग साठी वाटेल तेव्हढे पैसे मागते. रात्री बेरात्री घरी येते .असेच एकदा तिला पैसे असूनही ज्या मित्राकडून ड्रग तिला मिळतात त्यादिवशी तो त्याच्या जवळ आज ड्रुग्स नाही म्हणून सांगतो .मोहिनी खुप चिडते आणि चिडून तिच्या जवळ नेहमी संरक्षणाच्या दृष्टीने असलेला चाकू त्या मित्राच्या पोटात भर कॅम्पस मध्ये चार पाच वेळा कुणी तिच्या जवळ यायच्या आत भोकसते. त्या मुलाचा जागीच मृत्यू होतो .हे सर्व दृश्य cctv त कैद होते आणि सर्वांसमक्ष होते .त्यामुळे लगेच पोलिसांना बोलावून मोहिनीला अटक केली जाते .हे जेव्हा तिच्या आई बाबांना कळते तेव्हा त्याना मोठा धक्का बसतो .ते तिला जामीन मिळविण्याचा प्रयत्न करतात पण तो मिळणे अशक्य असते .तिचे आई बाबा आल्यावर ती मला आताच्या आता सोडवा नाहीतर मी सर्वांचा परत इथे खून करेल असे म्हणून एका पोलिसाची बंदूक हिसकते व त्या झटापटीत मोहिनीलाच गोळी लागून तिचा अंत होतो .
आपल्या राजकुमारीचा असा अंत बघून तिच्या आईवडिलांना खुप दुःख होते.आणि त्यांना तिची टीचर आठवते जिला त्यांनी शाळेतून काढले .तिचे बोलणे आठवते की तुम्ही मोहिनीचे अनाठायी लाड करून तिचे खुप मोठे नुकसान कराल .पण वेळ निघून गेलेली. पश्चाताप शिवाय त्यांच्या हाती काहीच राहत नाही. मोहिनीच्या ह्या परिस्थिती ला सर्वतोपरी आपण जबाबदार आहोत ह्याची जाणीव त्यांना होते .वेळीच रागावलो असतो ,ओरडलो असतो तिच्या अनाठायी हट्टाला आवर घातला असता तर ही स्थिती आपल्या राजकुमाराची झाली नसती हा विचार करून अधिकच त्यांना वाईट वाटते .
